इंद्रायणी तीरी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 December, 2013 - 06:04

इंद्रायणी तीरी.....

इंद्रायणीच्या लाटांवरती
अवचित उठली अनाम खळखळ
सुवर्ण पिंपळ स्तब्ध शांतसा
अजानवृक्षी अपूर्व सळसळ

म्लान पाहता श्रीहरिचे मुख
ध्यान सोडिती गिरीजाशंकर
शिष्य निघाला स्वस्थानासी
श्रीसद्गुरुंना फुटला गहिवर

इंद्रायणीच्या तीरावरती
भागवतांचे मेळे निश्चळ
ज्ञानोबाचा गजर अंतरी
नयनी उरले अश्रु व्याकुळ

टाकून बिरुदे देवपणाची
भक्तासोबत श्रीहरि पाऊल
चिरा लोटता समाधीवरी
मागे उरला तुळसी दरवळ......

(कार्तिक वद्य त्रयोदशी - संजीवनसमाधी सोहळा - श्रीक्षेत्र आळंदी)

श्री माऊलीं चरणी सविनय, सप्रेम समर्पण....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर

सुरेख !