क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

Submitted by सचिन पगारे on 28 November, 2013 - 11:26

jyotirao-govindrao-phule.jpg

क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.

समाजसेवेला आपले पूर्ण जीवन वाहून घेतलेले दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचे स्थान इतिहासात कायम अग्रणी राहील.तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र नि समस्त स्त्री वर्गाची मुक्तता व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे ह्या महात्म्याचे जीवितकार्य होते.

केशवपन सारख्या विकृत नि अमानवी रुढीविरुद्ध हा महात्मा उभा ठाकला नि त्यांनी विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.स्त्री नि अस्पृश्य ह्यांच्या शिक्षणाविरुद्ध शब्दही काढणे हे पाप मानले जात असतानाच्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी नि अस्पृश्यांसाठी शाळा काढली. सनातन्यांनी धर्म बुडाला,धर्माचा नाश झाला. असा नेहमीप्रमाणे प्रचार सुरु केला पण त्याला ज्योतीबांनी भिक घातली नाही. स्त्रियांना आणि अस्पृश्य शाळेत शिकवण्यासाठी जाणार्या सावित्रीमाई ह्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली गेली दगड शेणाचा मारा झाला पण हि विद्येची देवता आपल्या निर्णयापासून जराही परावृत्त झाली नाही.स्वताला होणाऱ्या त्रासापेक्षा ह्या दाम्पत्याला स्त्रिया व शुद्र ह्यांच्या जीवनात परिवर्तन होणे ते सन्मानाने जगणे महत्वाचे होते.

समाजात विधवाविवाह व्हावेत स्त्रीला पुन्हा नवे जीवन सुरु करण्याची संधी मिळावी ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दुष्काळात आपल्या घरचा हौद अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी खुला केला. महात्मा फुले हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. आपल्या स्वताच्या उदाहरणातून ते समाजापुढे आदर्श ठेवत.सनातन्यांनी त्यांना रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यांच्यावर मारेकरीही घातले पण ज्योतिबा नावाच्या वादळापुढे धर्मांध सनातन्यांचा पाला पाचोळा हा उडून गेला.

समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

अश्या ह्या महामानवास व त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुले दांपत्याला सादर प्रणाम.

ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरची काही पुस्तके:

महात्मा जोतीराव फुले
लेखक - धनंजय कीर

MAHATMA (in English)
- लेखक - RAVEENDRA THAKUR

म. फुले यांचे नवदर्शन : एक तौलनिक अभ्यास
लेखक - रा. ना. चव्हाण