अन्या ५

Submitted by बेफ़िकीर on 25 November, 2013 - 05:51

नशीब पालटणे म्हणजे काय ह्याची प्रचीती अन्याला आली. काल ह्या वेळेला आपण काय होतो आणि आत्ता काय आहोत हेच त्याला कळत नव्हते. पण बारा वर्षात बारा गावचे पाणी प्यायल्यासारखा त्याचा लहानसा पण अनुभवी मेंदू त्याला अजुनही रेड सिग्नल दाखवत होता. आत्ताच्या क्षणी जे काही घडत आहे ते क्षणभंगुर आहे आणि लवकरच आपले सत्य स्वरूप तालुक्याला कळणार आहे ही भीती त्याला खात होती. पब्लिक इतके यडचाप असेल ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

ज्या झाडावर तो दुपारपासून वास्तव्यास होता त्या झाडाचेही नशीब पालटले. अचानक त्या झाडाभोवती एक मोठी झोपडी तयार झाली. त्या झोपडीत तीन खोल्याही तयार झाल्या. एक पवार आणि इग्यासाठी, एक भक्तांनी देवाला भेटण्यासाठी आणि एक दस्तुरखुद्द झाडवाले बाबा ह्यांच्यासाठी! इग्याच्या घरी कोणीही नव्हते. पवारचे कुटुंब होते पण पवारने ते आता वार्‍यावर सोडण्याचा निर्णय घेतलेला होता. साक्षात दत्ताघरचे श्वान झाल्यावर हवा कशाला संसार?

पहाटे पाच वाजता झाडवाले बाबांना उल्टी झाली. चुरमुरे, खोबरे, वड्या, फुटाणे, केळी आणि जे जे काही काल रात्रीपर्यंत भरलेले होते ते उलट दिशेने प्रवास करून निषेध व्यक्त करत बाहेर पडले. उल्टी झाल्यावर बाबांना बरे वाटू लागले. आत्मविश्वास बळावला. आत्ता पहाटे पहाटे दोन टमरेल भरून चहा मिळावा असे वाटू लागले. गावातला एक गरीब म्हातारा बोलावण्यात आला. त्याने झोपडी साफ करून दिली.

इग्या कोठूनतरी 'च्या' घेऊन आला. मातीच्या तीन भांड्यात आलेला तो साखरेचा पाक चहा तिघांनी ढोसला. तरतरी आली तशी मग चर्चा सुरू झाली. धोरणे आखायलाच हवी होती. नशिबाने दार ठोठावलेले होते. आतून कडी घालून बसणे हा मूर्खपणा झाला असता. इग्या आणि पवार तर खुळ लागल्यासारखेच वागू लागले होते.

तिघे कुजबुजत बोलू लागले. इग्याने सर्वप्रथम उपयुक्त सल्ला दिला. इग्या म्हणाला......

"गावात मुसलमानबी लईयेत. निस्ता दत्ताचा अवतार म्हून अर्धीच जन्ता पाठीशी र्‍हाईल. बाबांचे नांव अवलिया ठिवायचं काय?"

पवारने क्षणार्धात मान डोलावली. अन्याला तर घेणेदेणेच नव्हते. कुठूनतरी फुकट खायला मिळावे आणि येणार्‍याजाणार्‍याने सलाम ठोकावा ह्यापलीकडे त्याचे काही ध्येयच नव्हते. पवारला कंठ फुटला.

"अवलिया बाबा दिसायला कसे पाह्यजेत?"

"यक भगवं आन् यक हिरवं कापड गुंडाळायचं निस्तं! भगवं वरती आन् हिरवं खालती."

आता अन्या चपापला. म्हणाला......

"आन् आतमधी?"

"आतमधी काय न्हाय! मोठमोठे गोसावी नंगे फिर्त्यात"

"आन् चालताना हिरवं सुटलं म्हन्जी?"

"आसं कसं सुटंल? घट बांधायचं. आन् तुम्हाला कुटं फार चालायचंय तवा? मान्स डोईवं उचलून चाल्नार तुमाला"

"इग्या, पर ह्यो अवतार खरा वाटत र्‍हायला हवा दोस्ता"

पवारचे हे वाक्य ऐकून बारा वर्षाच्या अन्याने हातात एक काठी घेतली अन उगारली. म्हणाला......

"भक्ती नसंल तर चालता व्हो भाड्या! अवतार खोटा वाटतूय व्हय तुला?"

पवार गांगरला. तसा इग्याच म्हणाला......

"पवारा, मर्दा चुकून्बी आस्लं इधान पुना करू नकू. नमस्कार कर"

दोघांनी अन्याला बसूनच नमस्कार केला. एकमेकांची इभ्रत आणि प्रतिमा जपणे या एकाच खांबावर पुढची इमारत उभी राहणार आहे हे तिघांनाही मनोमन पटले.

"कोंबडी आरवायलायत. सूर्व्य उगवनार"

"मग?"

"भगत मंडळी यतील ना च्या बी घ्यून?"

"मग?"

"मग अवलिया बाबांचं स्नान नकू व्हय होऊन जायला?"

"बाबा स्नान करून घ्या"

"आज कोन्वारे?"

"का?"

"आमी हप्त्यातून एकांदा स्नान करतू"

"आता दिसातून चार यळा करावं लागंन्"

"का?"

"पावित्र्य पायजेल ना?"

"गार पाणी व्हय?"

"अवतार हायसा"

"वता डोईवं माझ्या, अन् पाडा आजारी भडव्यावं"

अन्या वैतागून बोलला तसे दोघे फुस्सकन् हासले आणि तिघेही मागच्या बाजूला आले. अन्याला काही कळायच्या आत दोन मडकी गार पाणी त्याच्या अंगावर ओतले गेले. दगडाने त्याचे अंग घासले गेले. थंडीत कुडकुडताना अन्या कळवळत होता. पण सवय पाडावीच लागणार होती. अर्ध्या पाऊण तासात कोणी भक्त आले तर अवलिया बाबा निदान बघायला तरी बरे दिसायला हवे होते. इग्या कुठेतरी पळाला. स्वतःच्या खोलीतून त्याने कधीचे जपलेले एक भगवे कापड आणले. येताना एका मुल्लाच्या घराचे दार ठोठावले अन् म्हणाला एक जुने हिरवे कापड द्या. मुल्लासाठी ही अत्यानंदाची बाब ठरली. तालुक्यात नवीनच आलेले बाबा मुस्लिमांच्या बाबतीतही उदार आहेत हे कळल्यामुळे त्याने नवे कोरेच कापड दिले. इकडे पवारने अन्याला तसाच उभा ठेवला होता. इग्या आल्यावर त्याने कापडे बाबांच्या अंगाला गुंडाळली. मग पवार आणि इग्या दोघांनी बिड्या ओढल्या. हा एक प्रकार अन्याचा राहिलेला होता. त्यानेही चार झुरके मारून पाहिले. कडवट चव आल्यावर थुंकला. पण भलतेच संकट उभे राहिले. बिडी ओढल्यामुळे आता संडासला जाण्याची घाई झाली. ही पवित्र वस्त्रे परिधान करून कसे काय जायचे हे त्याला कळेना! इग्याने तोही प्रश्न मिटवला. अर्धवट उजेडात त्याने अन्याला धरून झाडीत नेले.

भक्तगण आले तर काय करायचे ह्याचे नियोजन सुरू झाले. पवारने बाबांची दिनचर्या ठरवली.

सकाळी सहा ते सात - स्नान, फराळ व चहा

सात ते आठ - जप

आठ ते दहा - भक्तांना दर्शन

दहा ते सायंकाळी सहा - विश्रांती

सहा ते सात - भक्तांच्या तक्रारींचे निवारण

सात ते नऊ - प्रसाद, आरती, भोजन व भजन

नऊ ते दहा - महाभोजन, ह्यात बाबा स्वतः, पवार महाराज, इंगल्गी स्वामी आणि बाबांना त्या दिवशी वाटेल तो एक भक्त ह्यांचाच सहभाग असणार!

दहा ते अकरा - निद्रेची तयारी

अकरा ते सकाळी सहा - निद्रा

आता नुकतेच स्नान झाल्यावर पुन्हा स्नान म्हंटल्यावर अन्या कळवळला, पण आताचे स्नान भक्तांनी गरम पाण्याने घातले तरच स्वीकारायचे आहे हे पवारने सांगितले तसे मग त्याला बरे वाटले. पण ही दिनचर्या ह्या तिघांचीच ठरलेली होती. गावकर्‍यांना काय माहीत ही दिनचर्या! पावणे सहालाच दोन थेरडी उगवली आणि बाहेरून हाका देऊ लागली. घाईघाईने अन्याला आतल्या खोलीत पिटाळून इग्या बाहेर धावला आणि म्हणाला......

"अवलिया बाबांची स्नान, फराळ व चहाची यळ हाये. ह्यापैकी काई करायचे आसंल तर या न्हाईतर आठ ते धा दर्शनाची यळ हाये तवा या"

च्यायला काल महाराज झालेलं पोरगं आज भेटायच्या वेळी ठरवतंय हे बघून म्हातारे मनात वैतागले, पण श्रद्धेमुळे गप्प झाले आणि निघून गेले. पण त्यांनी परत जाऊन गावात बातमी पसरवली. सहा ते सात म्हणे स्नान, फराळ आणि चहा असणार आहे. झाले, काही म्हातार्‍या कोतार्‍या गरम पाणी, शेव चिवडा असले काय काय घेऊन धावल्या.

झोपडीच्या मागे अवलिया बाबा अर्धनग्नावस्थेत बसलेले होते. कंबरेला एक चिंधी सोडली तर काहीही नव्हते. लाजेने काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा गावकर्‍यांना विनयाचे व पावित्र्याचे चिन्ह वाटत होता. अनेक म्हातार्‍या आपापल्या वाटचे गरम पाणी तांब्यातून बाबांच्या मस्तकावर ओतू लागल्या. थंडी पळाली. अंगात ऊब आली. खसाखसा अंग पुसले गेले. हिरवे व भगवे वस्त्र परिधान करवले गेले. टिळा लावला गेला. काळीसावळी कांती तुकतुकू लागली. डोळे चमकदार दिसू लागले.

इग्याने बाबांच्या कानाला लागून सांगितले की 'गोरखनाथ की जय' असा जप मोठ्याने चालू ठेवा. बाबांचं काय जात होतं जप करायला? त्यांनी टिपेला आवाज चढवला. उदबत्त्या लावण्यात आल्या. बाबा मांडी घालून बसले. समोर शेव, चिवडा असले पदार्थ होते. हात शिवशिवत होते. पण नैवेद्य दाखवल्यावरच ते खायला मिळणार होते. भाविकांनी एकदाचा नैवेद्य दाखवला. शेव चिवडा खाताना आपण हपापलेले वाटू नयेत ह्याची अन्याने खबरदारी घेतली. पवारने कानाला लागून सांगितले की अडीअडचणी निवारण करण्याची ही वेळ नाही. आत्ता नजर शून्यात लावून बसा. एक अक्षर न बोलता अन्या ताव मारू लागला. त्याचे पोट भरल्यावर त्याने उष्टे केलेले ताट गावकर्‍यांनी क्षणार्धात फस्त केले. थेट ईश्वराचा प्रसाद ईश्वराने दिला ह्यापेक्षा अधिक काय हवे होते? आता गावकरी प्रश्न विचारू पाहू लागले. पावणे सात वाजलेले होते. पवार व इग्याने गावकर्‍यांना सायंकाळी सहा ते सात दरम्यानच तक्रार निवारण करण्यात येईल हे सांगितले. तत्पूर्वी सात ते आठ जप असून आठ ते दहा या वेळात भक्तांना नुसते दर्शन दिले जाईल हेही जाहीर करून टाकले. नाराज झालेले भक्त घराकडे निघू लागले. पण वीसच मिनिटांनी ही गर्दी झाली. काय तर म्हणे जप!

अवलिया बाबा काही कोणाला दिसेनात! झोपडीच्या बाहेर पवार आणि इग्या पद्मासन घालून बसले. अगरबत्तीचा सुगंध दरवळला. तीन चार देवादिकांचे फोटो एका ठिकाणी ठेवण्यात आले. हरि ओम तत्सत पासून ते ओम नमः शिवाय पर्यंत सर्व नामःस्मरणे हजारोवेळा झाली. गावकरी तर तल्लीन झालेच होते, पण नवल म्हणजे त्या वातावरणाचा परिणाम होऊन पवार, इग्या आणि आत बसलेले अवलिया महाराजही भारले गेले. कितीतरी वेळा तिघांच्याही मनात विचार आला की आपण हे काय करत आहोत! खरे तर आपण फसवत आहोत, पण तरी जप करायला किती बरे वाटत आहे. एक तासाने अवघडलेले पवार आणि इग्या कसेबसे उभे राहिले आणि झोपडीकडे बघत दोघांनी साष्टांग नमस्कार केला. तसे मग गावकरीही भुईसपाट झाले. अवलिया बाबा की जय असा जयघोष दुमदुमला. त्यातच मुल्ला आपल्या काही सहकार्‍यांना घेऊन उगवला. खळबळ माजण्याआधीच इग्याने जाहीर केले. अवलिया बाबा धर्म, जात, भाषा, श्रीमंती - गरीबी असले भेदभाव मानत नाहीत. ते सर्वांच्या कल्याणासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा जयघोष झाला. मुल्ला व त्याच्या सहकार्‍यांनी खीर आणली होती. ती खीर झोपडीत नेऊन पुन्हा बाहेर आणण्यात आली व प्रसाद म्हणून वाटण्यात आली. आता दर्शनाची वेळ झालेली होती. पवार व इग्याने दोन जाणत्या म्हातार्‍या बायकांना आत बोलावले व सांगितले की अवलिया बाबा आज स्त्रीच्या अवतारात दर्शन देणार आहेत. तसे मग त्या बायकांनी ते हिरवे आणि भगवे कापड अवलिया बाबांना साडीसारखे नेसवले. कपाळाला कुंकू लावण्यात आले. त्या बायकांनी स्वतःच्या गळ्यातील खोट्या एक दोन माळा बाबांच्या गळ्यात परतीच्या बोलीवर घातल्या. बांगड्या भरण्यात आल्या. आत्ता अन्याला स्पष्टपणे काहीच बोलता येत नव्हते कारण त्या म्हातार्‍या तेथे होत्या. आठऐवजी आठ वाजून वीस मिनिटांनी अवलिया बाबांचे पहिले पाऊल झोपडीच्या बाहेर पडले आणि इग्या आणि पवारने आकांताने आरोळ्या ठोकल्या. गावकरी महाराजांच्या पायावर डोके टेकवायला झुंबड उडवू लागले.

हे सगळे काय झालेले होते?

कोणीतरी एक निष्क्रीय मुलगा फुकट जगता यावे म्हणून लोकांना उल्लू बनवू पाहात होता. त्याचे अंदाज तीन चार वेळा चुकून खरे ठरल्यामुळे म्हणा किंवा त्याला आधीच माहीत असलेल्याच गोष्टी त्याने माहीत नसतानाही माहीत झाल्या असे दाखवल्यामुळे त्याला हवे ते पद आपसूक मिळू लागले होते. या पदाचा वापर करून आजवर नुसतेच धार्मिक माणूस म्हणवले जाणारे दोन इसम आता पट्टभक्त होत होते. अडाणी, प्रयत्नवादापासून चार हात लांब राहणारे आणि राजा हवा असणार्‍या विहिरीतल्या बेडकांसारखे गावकरी पुढेपुढे करत होते. ह्यात कोणाचा फायदा होता? पण आत्ता विचार करण्याची कोणालाही गरज नव्हती.

आठ वीस ते सव्वा नऊ या काळात सर्वांनाच दर्शन मिळाले आणि पाऊण तास हाती राहिला तशी मग पवार आणि इग्याच्या लक्षात चूक आली. दर्शनाचा कालावधी कमीतकमी ठेवला तरच अशी गर्दी रोज होईल अन्यथा अवलिया बाबाच्या दर्शनाला काही महत्वच राहणार नाही हे त्यांना समजले. ताबडतोब त्यांनी जाहीर करून टाकले. आजचा पहिलाच दिवस असल्याने बाबा इतका वेळ दर्शनासाठी उपलब्ध आहेत. उद्यापासून आठ ते सव्वा आठ अशी पंधराच मिनिटे दर्शन मिळेल. हे ऐकून गावकर्‍यांनी पुन्हा एकदा दर्शन घेतले.

अन्याच्या मनात नुसत्या उकळ्या फुटत होत्या. जो येतोय तो वाकतोय, समोर काही ना काही ठेवतोय, आपल्याला नमस्कार करायला झुंबड उडालीय! स्वप्न आहे की सत्य?

आता दहा ते सहा ह्या ऑफीस टायमिंगमध्ये अतिशय महत्वाचे काम होते. ते म्हणजे विश्रांती! जनतेकडे पाहात दोन्ही हात उंचावून अवलिया बाबा झोपडीत प्रवेशते झाले. मागे इग्याने केलेली अनाऊन्समेन्ट त्यांना ऐकू आली. ज्यांना बाबांच्या दुपारच्या भोजनाची जबाबदारी घ्यायची इच्छा असेल त्यांनी माझ्याकडे नाव नोंदवा! बारा जणांनी नांव नोंदवले.

सकाळी दहा ते सायंकाळी सहा! या प्रदीर्घ विश्रांती काळात झोपडीत कुजबुजत्या आवाजात प्रचंड चर्चा झाली. त्यात ठरलेले काही महत्वाचे मुद्दे असे होते. एक म्हणजे, रोज कोणाला ना कोणाला प्रचीती आल्याशिवाय अवलिया बाबांचे महत्व टिकणार नाही. त्यासाठी प्रसंग म्हणा किंवा गोष्टी म्हणा, मुद्दाम घडवून तरी आणाव्या लागतील किंवा पुढील दोन चार दिवसांत जे काही होणार आहे ते आधीच कळावे तरी लागेल. ही जबाबदारी पवारवर टाकण्यात आली. प्रचीती डिपार्टमेंट पवारकडे गेले तसे मार्केटिंग व रिकव्हरी डिपार्टमेंट इग्याकडे आले. अवलिया बाबांचे दर्शन, त्यांचे स्नान, त्यांचा प्रसाद, तक्रार निवारण करतानाचे त्यांचे मार्गदर्शन ह्या सर्व बाबी जास्तीतजास्त दुर्मीळ करणे व त्या अजिबात वादग्रस्त न ठरू देणे ह्या दोन जबाबदार्‍याही इग्याकडे आल्या. देणग्या मिळवणे हे पवारकडे लागले. एकदा विशिष्ट प्रसिद्धी लाभली की मग अनेक गोष्टी आपोआपच होतात हे दोघांनीही अवलिया बाबांना सांगितले.

अन्याच्या दृष्टीने आता प्रकरण हाताबाहेर चालल्यासारखे झालेले होते. त्याला एकट्याला ऐष करायची इच्छा होती. आपल्या नावाचा वापर करून हे दोघे उगाचच महंत ठरत आहेत हे त्याला खात होते. आपोआपच त्याच्या मनात ही भावना निर्माण झाली होती की केव्हा ना केव्हातरी ह्या दोघांना आपली खरी 'पावर' काय ते दाखवायचेच. हे सगळे प्रचंड नियोजन चाललेले असताना तो फक्त ऐकत होता.

दुपारी अनेकांनी काय काय जेवायला आणून दिले. यथेच्छ ताव मारून सुस्ती आली तरी गप्पा सुरूच राहिल्या. साडे पाचच्या सुमारास पवार बाहेर पडला. येत्या एक दोन दिवसांत काय चमत्कार करून दाखवता येईल ह्याचा तपास करण्यासाठी तो बाहेर पडलेला होता. सायंकाळच्या तक्रार निवारण सेशनला तो हजर राहणार नव्हता.

सहा वाजले तसे इग्याने बाहेरील गर्दीचा अंदाज घेतला. फार तर दहा पंधरा जण होते. काही विशेष प्रतिसाद मिळत नाही असे इग्याला वाटले. गावकर्‍यांना उद्देशून त्याने मनातच शिव्या हासडल्या. ह्या साल्यांना काही अडचणीच नाहीत की काय असे वाटले त्याला! मग त्याने एकेक माणूस नीट निरखला. प्रत्येक माणूस त्याला माहीत होता. जवळपास प्रत्येकाची तक्रार काय असेल हेही त्याला ज्ञात होते. आत येऊन त्याने अवलिया बाबांना खिडकीतून हळूच एकेक माणूस, एकेक स्त्री दाखवून कोणाची काय तक्रार असू शकेल हे सांगितले. फार कमी अवधीत अवलिया बाबांनी ते घोकून ठेवले. चार चार वेळा घोकले. आणि मग भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी अवलिया बाबांचे झोपडीबाहेर आगमन झाले. जे कोण आले होते ते नमस्काराला धावले. आशीर्वादपर हात उंचावून बाबा मांडी घालून बसले. इग्या मुद्दामच लांब उभा राहिला. एक म्हातारा उठला आणि बाबांसमोर येऊन बसला. बाबांनी बाळमुखातून प्रश्न विचारला.

"पाठिवले काय प्वारानं पैके शहरातून?"

म्हातारा तीनताड उडला. तिच्यायला? तोंड उघडायच्या आधीच म्हाराज सवाल करत्यात?

"न्हाई जी पाठिवले आजून"

"आज मंगळवारे! रोज सांजच्याला एक मूद भात पिंपळाच्या पानावं घ्यून लिंबासमोर ठिव. दत्ताला एक फळ ठिव! पुढच्या मंगळवारी तीनशे रुपये मिळतील आपसूक"

म्हातारं नमस्कार करून आणि अवाक होऊन मागे झालं! गावकरीही हबकलेलेच होते. बरं अवलिया बाबांनी स्वतःसाठी तर फक्त रोज एक फळच मागीतलेलं होतं. तरी म्हातार्‍यानं आठ आणे ठेवले समोर!

पुढे कोणी उठायच्या आतच बाबांनी एका म्हातारीला उद्देशून विचारलं!

"पाठ थांबली का व्हय दुखायची?"

म्हातारीने उत्तर द्यायच्याऐवजी अंतर्ज्ञानाचा तो आविष्कार पाहून हातच जोडले.

अन्याला आठवले. मागे एकदा त्याची पाठ जबरदस्त धरलेली असताना त्याच्या आईने वीट गरम करून विटेने ती शेकली होती आणि नंतर स्वतःचा पाय अन्याच्या पाठीवरून फिरवून पाठ मोकळी करून दाखवलेली होती. अन्याने हवेत वाक्य फेकले म्हातारीला उद्देशून!

"रात्री साडे नऊला आमच्या पायाचा मंत्र घे पाठीवं!"

म्हातारी नतमस्तक झाली. एक माणूस उठू पाहात होता, त्याच्याकडे दुर्लक्ष करत अन्याने तिसर्‍याच एका माणसाला विचारले की जमीनीत पाणी लागलं का? आता मात्र हद्द झाली. गावकरी तिथे जमल्याच्या दहाव्या मिनिटाला बाबा बाहेर आलेले असताना इग्या तरी इतक्या सगळ्यांच्या नेमक्या तक्रारी बाबांना कश्याकाय सांगेल आणि बाबांच्यातरी त्या लक्षात कश्या राहतील हा प्रश्न गावकर्‍यांना पडला. हळूहळू प्रकार बघून गर्दी वाढू लागली. माणूस तक्रार सांगायला उठायच्या आत अन्या स्वतःच त्या तक्रारीचा उल्लेख करत होता आणि तोंडाला येईल ते उत्तर फेकत होता. चमत्काराच्या शोधार्थ बाहेर गेलेल्या पवारला आत्ता इथे थांबला असता तर अन्या नावाचा चमत्कार दिसला असता. इग्यासुद्धा अवाक झाला होता अन्याचे कसब बघून! त्यातच अन्याला ती कालची सवाष्ण दिसली. आपण हिला जपायला हिच्या घरच्यांना सांगितलं हे चूक केलं, त्याचा आपल्याला काय फायदा? असे वाटून त्याने लांबूनच तिला आदेश दिला की पहाटे साडे पाच ते सहा या वेळात तिने रोज येऊन झोपडी साफ करायला पाहिजे. रोज मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात तिच्या पाठीची पन्हाळ न्याहाळता येईल या लालसेने अन्याने ती आज्ञा केली होती. आणि ती आज्ञा त्या सवाष्णीने आणि तिच्या घरच्यांनी ईश्वराच्या प्रसादासारखी स्वीकारली होती. बरं येथे रोज येण्याची वेळ आणि सांगितलेले काम तर असे होते की कोणालाच कसलाच संशय येऊ नये. त्या सवाष्णीच्या भाग्याचा जनतेला हेवा वाटला. आता नवीन गर्दी जमत असल्याने त्या नवीन लोकांच्या तक्रारी काय आहेत हे अन्याला माहीतच नव्हते. त्यामुळे वेळ उरलेला असूनही अचानकच हवेत बघत, डोळे विस्फारत, हात जोडत, वेगळा स्टँड घेत तो गरजला......

"जय गोरखनाथ! स्वामी.... येतू... येतू आम्ही आपल्या सेवंला... या स्वामी... भगताच्या झोपडीत या"

कोणा अदृष्य शक्तीला अन्या झोपडीच्या आत घेऊन गेला तशी गर्दी चकीतच झाली. इग्याही आत गेल्यावर अन्याने इग्याला खुण केली आणि म्हणाला.....

"आवं लई मान्सं येऊन र्‍हायलीन्! सगळ्यांचं काय ठाव हाय व्हय मला? घालवा गर्दी आता, उद्याच्याला या म्हनाव"

इग्याने बाहेर येऊन गर्जना केली.

"मूर्खांनो, खुद्द अवलिया बाबांचे स्वामी आलेले हायेत आतमधी आन् तुमी यडझव्यागत हितंच? निघा घरला! उद्याच्याला या"

गर्दीने परमोच्च श्रद्धेने हात जोडून काढता पाय घेतला.

आता सात ते नऊ प्रसाद आणि आरती वगैरे होते ते बहुधा रद्दच केले जाणार असे गावकर्‍यांना वाटले. रात्रीच्या भोजनाला कोणी शिरा आणून दिला तर कोणी साखरभात! तेवढ्यात ती म्हातारी टपकली. अन्याने तिला पालथी व्हायला सांगितली. इग्याने तिच्या पाठीवर तेल सोडले. अन्याने आपले पाऊल त्या पाठीवर दाबून फिरवले. म्हातारी गुदमरू लागली, कळवळू लागली पण ओरडेना! शेवटी काय झाले ते समजले नाही, पण अन्याने पाय काढला तेव्हा म्हातारी चक्क बर्‍यापैकी ताठ बसली. बघतच बसली ती महाराजांकडे! अचानक तिने त्यांच्या पायावर डोके टेकवले. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून अन्याला वाटले की कसे का होईना तिले बरे वाटले असेल तर आपले बाबा होणे चांगलेच म्हणायचे. उपकृत चेहरा घेऊन म्हातारी 'आता बरेच बरे वाटत आहे' ही बातमी गावाला सांगायला निघून गेली. आणि त्या क्षणी पवार टपकला......

पवारने कागदात तळलेले मासे आणलेले होते. तो वास येताच इग्या आणि अन्या पेटलेच. पण त्यापूर्वी पवार आणि इग्याने काहीतरी घशात ओतले. 'निद्रेची तयारी' या सदराखाली अन्यालाही ते थोडे मिळाले. आता अन्याला दोन इग्या आणि अडीच पवार दिसू लागले. पण मस्त वाटत होते.

...... आणि तर्र अवस्थेत तिघे असताना अडीचपैकी बहुधा अर्ध्या पवारने धक्का दिला...

"डोगरावं तीन रामोशी चोरून पाह्यले मी! तीन दिसांनी शिगलकरच्या घरात घुसून त्यालाच त्वडणारेत म्हनत व्हते त्ये! आता रं इग्या?"

इग्याचे डोके नेहमीइतकेच चालले. पवार आणि अन्याकडे पाहून तो म्हणाला...

"उद्या सार्‍या गावासामने म्हाराजांनी सांगायचं की शिगलकरच्या जिवास ध्वाका हाये... तीन दिसांनी गावकर्‍यान्ला आपलं म्हननं पटंलच.... मग काय इचारता???"

मात्र...... पाठोपाठ पवार आणि इग्याला महाराजांच्या लहानच्या मेंदूची जादू समजली.... महाराज शुन्यात पाहात बरळले......

"त्यो शिगलकर जगो न्हाईतर मरो...... रामोशी आपल्या बाजूचं व्हायला पायजेत...... त्ये बघा आधी...... फुडंमागं आस्ली मान्सं लागनारच आपल्याला"

=========================

-'बेफिकीर;!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !!!
मी पहिला....
भारी चालू आहे कथा.....आणि लय चालू आहे अन्या !!!!
हा हा हा हा

मस्त चाललीय कथा................... पुढचे भाग लवकर टाका.......!!!

वाह !!!

बेफि...................... पुढचे भाग टाका की राव लवकर.............

मागे एकदा त्याची पाठ जबरदस्त धरलेली असताना त्याच्या आईने वीट गरम करून विटेने ती शेकली होती आणि नंतर स्वतःचा पाय अन्याच्या पाठीवरून फिरवून पाठ मोकळी करून दाखवलेली होती.

झुरळ खाणार्या बाईला हे कळत????

बेफि,

मला हाफ राईस, old monk, चारचउगि, सगळ खुप आवडत, कुठ्ल्याहि कादम्बरित, कथेत -ve बोलाव अस काहिहि नाहि, पण हि अन्या काय पटायला तयार नाहि..
Sad
kuthalyahi khedyat ja...... gawat ja.....12 warshachya porala adiwasi bhagat pan awatar manar nahit....
मान्य कि kalpanik ahe sagal pan, tumacya etar kalpanik कथा pan manala satya ghatana asalyasarakhya bhidatat.
लहान तोन्डे मोथा घास, माफि असावि...