टिप टॉप आजी : लेखिका, अनुवादिका श्रीमती वासंतिका पुणतांबेकर यांची मुलाखत

Submitted by मंजूताई on 25 November, 2013 - 04:32

प्रसंग १ - स्थळ : कार्यालय नटलेली सजलेली बाल तरुण वृद्ध स्त्री पुरुष लग्न समारंभ आटपून मुख्य समारंभ अर्थात जेवणाच्या प्रतीक्षेत बसलेली... बॅकलेस ब्लॉऊज, शिफॉनची झिरझिरीत साडी, नखशिखान्त मॅचिंग अक्सेसरीजने सजलेली गार हवेची झुळूक यावी तशी आली अन नुसत्या तरुणांच्याच नाहीतर बाल, वृद्धांच्या नजरा तिच्याकडे वळल्या..खिळल्या. ती वधू-वरांपर्यंत पोचेस्तोव एक मिनिट हॉल स्तब्ध, निःशब्द! ती येतेऽऽऽऽ आणिक जातेऽऽऽऽ ती गेल्यावर कुजबूज... ही आत्ता तरंगत आली ती कोण? हे घडल्याला झाली दहा वर्ष! अन घडलंय ते एका तरुणीच्या बाबतीत अर्थातच नवल नाही पण... ह्या प्रसंगाची आठवण आली ती ह्या दुसऱ्या प्रसंगामुळे ...

प्रसंग २ - स्थळ - निसर्गोपचार आश्रम, वेळ अकरा - साडेअकराची, मिट्टीलेप, सूर्यस्नान, बाष्पस्नान, एनिमा, मसाज व हे सगळं करता करता मध्ये मध्ये रस, काढे पिऊन दमलेले(?),भुकेले(?) पेशंट्स, काही जेवायला बसलेले तर काही जेवणाच्या रांगेत उभे! ठक ठक काठी टेकवत एक ऐंशी वर्षाची तरुणी येते, हो ऐंशी वर्षाची तरुणीच! तरुणीच म्हणावं लागेल कारण तरुणीला लाजवतील असा त्यांचा पेहराव, झुळझुळीत मोरपिशी रंगाची टिकल्या टिकल्यांची साडी, मॅचिंग ब्लाऊज, त्याला साजेसे कानातले-गळ्यातले, ब्रेसलेट! त्या येताच एक मिनिट हॉल स्तब्ध, निःशब्द! सगळ्यांच्या डोळ्यात 'व्हॉट ए ग्रेसफुल म्हातारी' चे भाव! आजपर्यंत इतकी ग्रेसफुल म्हातारी बघितली नाही. रोज सगळ्यांना उत्सुकता, त्यांची फॅशन बघण्याची. कधी साधी सुती बंगाली साडी, त्यावरचं त्यांनी स्वतः लेस लावलेले फुग्याच्या बाह्यांच पोलकं, मोठ्या टिकलीतल्या टिपीकल बंगाली आजी तर कधी पँट व टी-शर्टातल्या युरोपियन आजी! ह्या कोणीतरी खासच असल्या पाहिजे. हो, खासच आहेत त्या! लेखिका वासंतिका पुणतांबेकर ! त्यांच्या राहणीमानावरून आश्रमातील तरुणाईने त्यांचं नामकरण केलं 'टिप-टॉप आजी'. त्यांच्यांशी मारलेल्या ह्या मनमोकळ्या गप्पा!

सुरुवात करूया तुमच्या बालपण व शिक्षणापासून?

मी पक्की मुंबईकर, जन्मच मुंबईतला. फार मोठं खानदानी, उच्चशिक्षित, श्रीमंत घराणं आमचं! माझे वडील तुळजापूरकर पेशाने वकील होते. साहित्याची त्यांना आवड होती. पक्के काँग्रेसी, गांधीजींचे शिष्य. घरातलं वातावरणही काँग्रेसी. आईपण त्या काळातली ग्रज्युएट. आयुष्यभर आई-वडिलांनी खादीच वापरली, आम्ही पण सात बहिणभावंडांनी देशीच कपडा वापरला, विदेशी कापडांची होळी व्हायची ना त्या काळात! वडील पुरोगामी विचारांचे. घरात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं, मुलगा- मुलगी असा भेद नव्हता. आमचं दहा खोल्यांचं घर, प्रत्येकाला स्वतंत्र खोली. आमचं घर म्हणजे गिरगावातील अडीचशे बिर्‍हाडांची अर्धगोलाकार बद्रिकाश्रम चाळ, जी अगदी आजही प्रसिद्ध आहे , तिथेच माझं बालपण मजेत गेलं. गांधीजी गेले, पाठोपाठ वडीलही गेले. त्यानंतर घरातलं वातावरण बदललं पण शिक्षणाचं वातावरण होतंच, मी ग्रॅज्युएट झाले संगीतात, एसएनडीटीमधून.

त्या काळी मुलींची लग्न लहान वयात व्हायची, जास्त शिकलेल्या मुलींची लग्नं जमायला कठीण असा समज होता. असे असताना तुमचे लग्न कसे काय जमले व नोकरदार स्त्रियांचे प्रमाणही कमी होते, कसं काय झालं हे सगळं?

मी आधी म्हटल्याप्रमाणे उच्चशिक्षित घराणं आमचं , घरचं वातावरण पुढारलेले होतं, त्यामुळे शिक्षण पूर्ण झालं. शिकतानाच आमच्या चाळीत राहणार्‍या मुलाशी, पुरुषोत्तमशी प्रेम जमलं. घरात कुणकुण लागली. लग्नाला घरून प्रचंड विरोध! दोन्ही घरात प्रचंड तफावत होती. हे चाळीच्या एका खोलीत राहणारे, फक्त मॅट्रिकपर्यंतच शिकलेले, पगार बेतासबेत, आई व भावाची जबाबदारी, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं अश्या अनेक कारणांनी विरोध होता. पण आमचा लग्न करायचा निश्चय झाला होता. रजिस्टर लग्न करायचं ठरवलं व नोटीस दिली. माझ्या मामांनी ती नोटीस वाचली अन त्याने तडक फोन करून घरी कळवले. त्या काळी काही श्रीमंत लोकांकडेच फोन होता, त्यात एक आमचे घर होते. घरात कोणी काही बोललं नाही. एक तारखेला पगार मिळतो म्हणून डिसेंबरच्या एक तारखेला एकोणीसशे छपन्नला दीर व मित्राच्या साक्षीने लग्न केलं. मला कामाची सवय नव्हती. ताटावरचं पाटावर, घरात गडी-माणसं, नोकर-चाकर, घरात गॅसची पाईपलाईन असं ऐषोआरामी आयुष्य होतं, ते पार बदलून गेलं. सुरुवातीला स्टोव्हवर स्वयंपाक, शेगडीत कोळसा भरणे अशी कामं करावी लागली. हळूहळू घरच्यांचा विरोध मावळला. पुढे मुलीचा जन्म झाला. आईने बाळंतपण-बारसं खूप थाटात केलं. चाळीतली एक खोली रिकामी झाली, ती मला दिली. आमचे चाळीतले शेजारी गुजराती, खावानु-पिवानु संस्कृतीवाले! आज काय स्वयंपाक केला अन काय करणार ह्यापलीकडे काही गप्पा नाही. मला घरी कंटाळा यायचा तसेच पैशाची गरज तर होतीच होती. मी घराजवळच्या रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी करू लागले. मुलीला आई सांभाळायची. पुढे मुलाचा जन्म झाला. दोन्ही मुलांना सांभाळून नोकरी करणं जड जाऊ लागलं, नोकरीचा राजीनामा दिला. मुलगा पाच वर्षाचा झाल्यावर मुलीला लोणावळ्याला शिकायला ठेवले अन रेल्वेत, पगार जास्त मिळावा म्हणून रिझर्वेशनला नोकरी करू लागले. काही घरगुती अडचणींमुळे परत नोकरी सोडावी लागली. मी हिंदीच्या 'रत्न' च्या आवड म्हणून परीक्षा दिल्या होत्या. काही दिवसांनी परत रेल्वेतच पण अनुवादक म्हणून काम करू लागले. हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. वरळीला स्वतःचा ओनरशिपचा ब्लॉक घेतला. संसाराची घडी पण व्यवस्थित बसली होती. माझी मोठी मुलगी हुशार होती. तिच्याबरोबरचं मीही एम ए(हिंदी) केलं. ती नोकरीला लागली, तिचा पण प्रेमविवाह झाला. मुलगा उत्तम क्रिकेट खेळायचा. तो रवी शास्त्री , संजय मांजरेकर बरोबर खेळलाय, त्याचेही कोच आचरेकरच. तोही शिकला, एअर इंडियात नोकरीला लागला, लग्न झालं, नातवंडं झाली.

लेखन प्रवास कधी व कसा सुरू झाला?

इतकी वर्षे नोकरी करत होते, घरी रिकामं बसू शकणार नाही हे माहीत होते. त्यामुळे निवृत्त होण्यापूर्वीच ठरवून लेखनाला सुरुवात केली होती. मी रेल्वेत अनुवादक म्हणून काम करत होते. तिथला अनुवाद तांत्रिक प्रकारचा असला तरी पण अनुवाद करू शकू असा विश्वास होता. रेल्वेतल्या नोकरीमुळे दिल्लीतल्या प्रकाशकांशी ओळखी झाल्या होत्या. चंद्रकांत बक्षी हे गुजराती लेखक आमच्या शेजारी राहायचे. ते मुलीकडे अनुवादासाठी 'पॅरॅलेसिस' हे त्यांचं खूप गाजलेले पुस्तक घेऊन आले पण विशाखा तेव्हा पीएचडी करत असल्यामुळे तिला वेळ नव्हता. मी त्यांना विचारलं की मी पण अनुवादक आहे, मी करून पाहू का? चाळीतल्या शेजार्‍यांमुळे गुजराथी मला येतंच होतं. त्यांनी होकार देताच मी काम सुरू केलं. त्यांना अनुवाद खूप आवडला. एक दिवस अचानक ते छापील पुस्तक माझ्या हातात पडलं, खूप आनंद झाला. प्रसिद्ध लेखिका मृणालिनी देसाई ह्या माझ्या मावशी. त्यांनी 'पॅरेलेसिस' वाचलं. त्यांनाही अनुवाद आवडला. त्यांनी 'पुत्र मानवाचा' ही त्यांची गांधीजींच्या जीवनावरची पाचशे पानांची प्रसिद्ध कादंबरी अनुवाद करायला दिली. मी अनुवाद केला. मी ते 'राधाकृष्ण प्रकाशन'कडे पाठवलं. त्यांनी ते छापलं नाही. त्यांच्याशी बराच पत्रव्यवहार केला पण ती कादंबरी असल्यामुळे छापू शकत नसल्याचे कळवले. मिस्टरांनी सुचवलं आपल्याकडे 'राधेय' आहे, तिचा अनुवाद का नाही करत? रणजित देसाईंची प्रसिद्ध कादंबरी 'राधेय'करायला घेतली . हे खूप आव्हानात्मक काम होतं. काही पानं करून विशाखाला, माझ्या मुलीला दाखवली. तिला अनुवाद अजिबात आवडला नाही. ती म्हणाली की उर्दूमिश्रित हिंदी भाषा ह्या पुस्तकाकरिता चालणार नाही. ही कादंबरी पौराणिक आहे तर तिची भाषा संस्कृतनिष्ठ व भारदस्त हवी. मी भाषेचा लहेजा बदलून परत लिहायला घेतले. काही पानं झाल्यावर रणजित देसाईंना दाखवायला घेऊन जाण्याचा विचार करते तोच त्यांच्या निधनाची बातमी आली. काही दिवसांनी त्यांच्या मुलींना अनुवाद दाखवून ते छापण्याची रीतसर परवानगी घेतली. तीही कादंबरी राधाकृष्ण प्रकाशनाकडे पाठवली. त्यांचे उत्तर आले की राधेय करू, पण पुत्र मानवाचा करू शकणार नाही. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचे स्नेही श्री. पै ह्यांनी दुर्गाबाई भागवत ह्यांचं 'ऋतुचक्र'चा कानडीत अनुवाद केला होता. त्यांनी सुचवलं ते हिंदीत करायला, ते करायला घेतलं. दुर्गाबाईंची भाषा! दिवसभरात कसंबसं एखादं पान व्हायचं. मी केलेल्या अनुवादांपैकी हे सर्वात कठीण, आव्हानात्मक काम होतं. केलं तर खरं पण धाकधूक होती. आनंदाची गोष्ट म्हणजे ते दुर्गाबाईंना आवडलं. छापायला दिल्लीला पाठवलं. हेही पुस्तक छापायचं नावं नाही. तीन्ही पुस्तकं पुत्र मानवाचा, राधेय व ऋतुचक्र पुस्तक दिल्लीत पडलेली. मी सस्ता साहित्य ही गांधीजींचं साहित्य प्रकाशन करणारी संस्था, नॅशनल बुक ट्र्स्ट, बिर्ला इ. संस्थांना दिल्लीत भेट दिली. काही उपयोग झाला नाही. दुर्गाबाई सरकारच्या विरोधात बोलणार्‍या त्यांचं पुस्तक कोण छापणार? त्यांना लेखी संमती हवी होती मी दुर्गाबाईंना भेटायला गेले त्यांना अडचण सांगितली. त्या म्हणाल्या,' आता हे पुस्तक तुझं झालं, वर चढ, पॅड काढ.' मी स्टूलवर चढून पॅड काढलं. आंधळा मागतो एक डोळा ...... त्यांनी त्यांच्या सगळ्या पुस्तकांच्या अनुवादाची परवानगी दिली! बिर्ला फाउंडेशनने चाळीस हजाराचं अनुदान देऊन हे पुस्तक छापलं. १५/५/१९९८ ही प्रकाशनाची तारीख ठरली पण तेरा तारखेपर्यंत माझ्या हातात पुस्तकाची एकही प्रत नाही. कसं काय प्रकाशन होणार? डॉ दुर्गा दीक्षितांनी प्रकाशन समारंभ थाटात करायचे ठरवले होते पण मला अश्या समारंभाचा काहीच अनुभव नव्हता. ह्या पूर्वी 'गिरगाव ते गोरेगाव' ह्या पुस्तकाच प्रकाशन घरीच केलं होतं. अखेर चौदा तारखेला पाच प्रति हातात पडल्या. माझा जीव भांड्यात पडला. प्रकाशन खूप थाटात झालं. दुर्गाबाईंशी भेट ही माझ्या आयुष्यातली खूप आनंददायी घटना! त्यांच्या पुस्तकाने माझ्या लेखनाला 'बेस' दिला!

निवृत्तीनंतर आम्ही पुण्यात राहायला आलो. तिथे मी पुणे विद्यापीठाचा एक वर्षाचा भाषांतराचा कोर्स केला, त्यात मी तिसरी आले. ऐक्यभारतीत मी काम करू लागले. तिथेच डॉ दुर्गा दीक्षितांशी भेट - मैत्री झाली. ऐक्यभारतीतर्फे ज्ञानपीठ विजेत्या लेखकांच्या साहित्याचा अनुवाद दिवाळी अंक काढला होता, त्याला बक्षीस मिळाले होते. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेकडून अनुवादासाठी पत्र आले. त्यावेळी कै सरोजिनी वैद्य संस्थेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी रमाबाई रानड्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद करायला दिला. सगळ्या सत्य घटना असल्याने कादंबरी सारखे इकडे तिकडे करायला वाव नव्हता, हा एक वेगळाच पण छान अनुभव होता. लेखिका व प्रकाशिका मंजिरी ताम्हणकरांनी पाच पुस्तके अनुवाद करायला दिली. ह्या पाच पुस्तकांमुळे मंजिरीसारख्या चांगल्या व्यक्तीशी ओळख झाली. जल-आशय हे महाराष्ट्रातील धरणांची माहिती असणारं पुस्तक. अनुवादासाठी सरकारी खात्याशी करार झाला. तांत्रिक पुस्तकाचा अनुवाद करणं अवघड असतं. एक प्रकरण झालं, पाठवलं, पण कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत त्यामुळे पूर्ण केले नाही. माझी मुलगी विशाखा फिल्म डिवीजनचेही काम करते. तिथल्या कुलदीप सिन्हांशी ओळख झाली. त्यांचं 'कशिश' खूप आवडलं, त्याचाही अनुवाद केला. कृषी डायरीचा अनुवाद केला तोही करायला अवघड, कृषी विद्यापीठात शब्दकोश उपलब्ध नाही त्यामुळे काही शब्द तसेच ठेवून भाषांतर केलं. हिंदीच्या कमलेश बक्षी मोठ्या लेखिका त्यांची दहा पुस्तकं केली. उत्तम कथा ह्या मासिकासाठीही मी लिहीत असते. अश्यातर्‍हेने एकापाठोपाठ कामं मिळत गेली. एकंदरीत सत्तावीस पुस्तकं अनुवादित केली.

लक्षात राहण्याजोगे लेखन - प्रकाशनामधील काही प्रसंग सांगा ना?

खरं तर प्रत्येक पुस्तक हे आव्हानच होतं. अनुवाद म्हणजे समान आशय व अर्थ व्यक्त करणे, मूळ कृतीच्या सौंदर्याला धक्का न लावता. ऋतुचक्र हे तर शिवधनुष्य होतं तर ' राधेय' आपल्या ज्ञानाचा कस लावू पाहणारा अनुभव होता. अनेक किस्से आहेत. राधेयचं आधी सांगितलं ना, त्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन आले. 'राधाकृष्णा'कडे पडलेलं होतं. ऋतुचक्र राधेय नंतर देऊनही ते प्रकाशित झालं होतं. 'राधेय'ची तर गंमतच झाली. एक दिवस इंदोरहून बहिणीचा फोन आला की आजच्या नई दुनियामध्ये बातमी आलीये राधेयचा हिंदी अनुवाद खूप छान झालाय, तुझं खूप कौतुक केलंय. मी राधाकृष्णाला आभाराचं पत्र पाठवल्यावर त्यांनी काही प्रती पाठवल्या. खूप सुंदर पुस्तक झालंय! त्याला राष्ट्रभाषेचा सर्वोत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार मिळाला. राधेयचं प्रकाशनला मोहन धारिया अचानकच काही कल्पना न देता आले होते. राष्ट्रभाषा सभेने 'यही जिंदगी' ह्या त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद करायला दिलं. ते त्यांना एका महिन्यातच करून हवं होतं, तेही केलं व त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या ८१व्या वाढदिवसाच्या दिवशी झालं. त्याकार्यक्रमात त्यांनी माझा सत्कार केला. रमाबाई रानड्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन श्री विलासराव देशमुखांच्या हस्ते झालं व गुलजारांनी सन्मान केला. ऋतुचक्रंच प्रकाशन वि.मा.बाचल ह्यांच्या हस्ते झालं. न वाचताच त्यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं हे एकमेव पुस्तक. अगदी सामान्य भाषा वापरून केलेलं कर्मवीर लोकमान्य टिळक ह्या पुस्तकाची आठवी आवृत्ती निघाली. एकदा तर तीन - तीन पुस्त़कं करायलाघेतली अन माझी तब्येत बिघडली. मी पलंगावर पडल्या पडल्या सांगायची अन मिस्टर लिहून काढायचे. त्यांनी कायम मला सक्रीय पाठिंबा दिला. पूर्वी प्रकाशनासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. मी माझं 'ठाणे ते पुणे' प्रकाशित करायला पैसे दिले. हल्ली सगळंच बदललंय. प्रत्येक पुस्तकाची एक कथा होऊ शकेल असे अनुभव गाठीशी आहेत. ह्या सगळ्यात पुत्र मानवाचा झालं नाही ते नाहीच. नंतर प्रकाशकांनी त्याला छोटं करा सांगितल्यावर ते पाचशेचं तीनशेपानावर केलं अजून छोटं करत अखेर ते दीडशेवर आणलं. अजूनही ते सगळं बाड पडलंय आजही प्रकाशनाची वाट बघत.... . पु.भा.भाव्यांचं साहित्य हिंदीत करायचं आहे असं वर्तमानपत्रात आलंय ते करायला मिळावं अशी मनापासून इच्छा आहे.

दुर्गाबाईंचा अनुभव कसा होता?

एवढ्या मोठ्या विदुषी त्या! त्यांचा सहवास खूप काही शिकवून गेला. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयाची आवड अन जिज्ञासा! त्यांचा व्यासंग अतिशय दांडगा! सगळ्या गोष्टीतील ज्ञान सखोल! माझं राहणीमान, वेषभूषा त्यांना खूप आवडायची. साड्या, त्यावरची कलाकुसर, भरतकाम, लेस निरखून बघायच्या त्यातले बारकावे अचूक सांगायच्या, अमका हा..हा.. टाका आहे वैगेरे आणि कौतुकही करायच्या. खाण्या-पिण्याची, बनवण्याची-खाऊ घालण्याचीही भारी आवड. त्यांना इडली-सांबार खूप आवडायचा. एकदा आम्ही दोघींनी उडप्याकडे जाऊन इडली-सांबार खाल्ला होता. मीही एकदा मुद्दाम त्यांच्याकरिता सुनेने बनवलेले इडली-सांबार घेऊन गेले होते. त्यांना काय आनंद झाला होता!

तुम्ही सामाजिक कार्यही केले त्याबद्दल सांगाल का?

आम्ही पुण्यात आल्यावर जेष्ठ्य नागरिक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होतो. कोथरुडामधल्या रस्ते, पाणी, कचरा, अतिक्रमण, मोकाट सोडलेली जनावरे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असे अनेक प्रश्न लोकशाही दिनाच्या दिवशी कलेक्टरला भेटून तडीस लावले. माझ्या मिस्टरांची तब्येत ठीक नसायची म्हणून ठाण्याला परतलो. इथे आल्यावर लेखन सुरूच होतं त्याचबरोबर समाज कार्यही करू लागले इथेही कोथरुडाप्रमाणेच इथल्या समस्यांचा पाठपुरावा केला व ते सोडवले. कलेक्टर ऑफिसमधली लोकं मला ओळखायला लागली होती. नेत्रदान व देहदानाचं इच्छापत्र करून ठेवलंय.

आठवणीत राहिलेले काही प्रसंग, क्षण?

नातवाची अंडर सिक्सटीन क्रिकेटमधली निवड, मुलीची पीएचडी, नातू आयएएस झाला. ज्येष्ठ नागरिकांच्या फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घेतला त्यात पहिला नंबर आला. एक लहानपणीचा प्रसंग आहे पण आठवण अगदी ताजी चौदा ऑगस्टला ओल्ड सेक्रेटरीयटवरचा ब्रिटिश ध्वज उतरवून तिरंगा ध्वज फडकवला, ते दाखवायला मुद्दाम वडील आम्हा मुलांना घेऊन गेले होते.

आजच्या तरुण पिढीबद्दल काय वाटतं?

आजची तरुण पिढी खूप हुशार आहे. पण त्यांना झटपट यश हवंय, त्यांच्यांत पेशन्स नाहीये. कष्टाला पर्याय नाही. कष्ट करा, यश नक्की मिळेल. भष्ट्राचाराच्या मार्गाने कधीही जाऊ नका.

आयुष्यात काही खंत?

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही खंत असते. पण खंत करत बसायला उसंतच मिळाली नाही आणि ती देऊही नाही, असे माझ्या वयाचा अधिकार घेत सांगेन. खूप चढ-उतार बघितले त्यात माझ्या कुटुंबीयांनी खूप साथ दिली. समृद्ध जीवन जगले. रेल्वेतली नोकरी होती खूप हिंडलो-फिरलो, भरभरून सगळ्याचा आनंद घेतला. आज समाधानी, कृतार्थ आहे मी!

१.

२.

.

३.


.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. संयुक्ता मधून आला म्हणून अजूनच मस्त वाटले. आजी ग्रेट आहेत. आजकाल कोणी खरेतर निवृत्त होतच नाहीत. असे पुढे पुढे काम करत जातात हे किती आशादायक आहे.

अप्रतिम लेख, आजीं कडुन खुप काही शिकण्या सारखे आहे. विशेषतः खंत करायला
उसंत कुठे आहे, व्वा, काय मस्त आटीट्युड आहे नाही! इतकी छान मुलाखात शेयर
केल्या बद्द्ल धन्यवाद.

वाह! हे अनुवाद वाचायला आवडेल.
खूप इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व. त्यांना भेटायला खूप आवडेल.
थँक्स मंजु Happy

मस्त मुलाखत आहे!! धन्यवाद.

परवाच वाचली होती पण प्रतिक्रिया द्यायची राहिली होती.

आवडली मुलाखत!!!

टिपटॉप आजींची सेल्फ कॉन्फिडंस ठासून भरलेली पर्सनॅलिटी एकदम भावली.. त्यांच्याकडून शिकण्यासारखं कितीतरी आहे..

वेरी इन्स्पायरिंग कॅरेक्टर!!! ___/\___

सगळ्यांना माझ्याकडून व आजींकडून मनापासून धन्यवाद! त्यांच्या बाबतीतील एक गोष्ट लिहायची राहून गेली ती म्हणजे त्यांना स्वतः सजण्याची आवड आहे तशीच घर सजवण्याची पण! सौंदर्यपासक आहेत आजी!