सोमरस

Submitted by सौरभ.. on 20 November, 2013 - 23:36

(सुचना - दारु / सिगरेटीसारख्या जिवनावश्यक गोष्टींना आपला विरोध असेल तर हे वाचुन मानसिक त्रास होण्याच्या संभव आहे. आपल्या मानसिक आरोग्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नसल्यामुळे, कृपया पुढील मजकुर वाचताना आमच्या आणि आमच्या पितरांच्या नावानी शंख करु नये.)

आमचा एक मित्र आहे. तसे आमचे अनेक मित्र आहेत. पण ते नुसतेच आहेत.काही लोकांच्या दर्शनानी आपले डोळे दिपुन जातात (आणि कान बंद करुन घ्यायची सोय देवानी का केली नाही असा प्रश्न मिनिटा मिनिटाला पडतो..)अश्या लोकांपैकी हा आमचा मित्र आहे.आपण नाव नको घेउयात. मी म्हणतो नावात काय आहे ? (बरेच लोक हे,कोणी एक शेक्सपियर की काय त्याच वाक्य आहे असं सांगतात. तिकडे लक्ष देऊ नये.)आडनाव जोशी आहे अस धरुयात.( धरुयात, म्हणजे आहेच...पण इतके जोशी आहेत की, रस्तामधे चालताना जर दहा माणस पाय घसरुन खड़्यात पडली, तर त्याच्यात सहा जोशी असतात अस आमच संशोधन सांगत...म्हणुन धरुयात म्हटल की प्रत्येक जोश्याला वाटणार दुसर्या बद्दल बोलतोय..).
तर या मित्राची आज एवढ्या कळकळीनी आठवण येण्याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी टीव्हीवर चॅनेल सर्फत असताना दाखवत असलेला युरोप - अमेरिकेतील लिकर शॉप्सचा कार्येक्रम ! आपल्याकडच्या बिग बझार सारखी मोठमोठी दुकानं, त्यात मैलोन मैल पसरलेल्या, विविध प्रकारच्या ब्रॅंड्स नी नटलेल्या, लखलखणार्‍या भिंती ! आणि हातात ट्रॉलीज् घेऊन तिथे शॉपिंग करणारे ते नशिबवान ग्राहक !
आता 'दारु' म्ह्टल की याची आठवण यावी अशी एके काळी परिस्थिती होती. मला आठवतात ते पुर्वीचे सोनेरी दिवस. लग्नाआधीचे - कॉलेजातले, नोकरीचे. दारुतला 'द' जरी कोणी उच्चारला तरी ह्याच्या शेंडीपासुन मांडीपर्यंत शिरशिरी उठायची ! आणि मग हा उठायचा !आपला अजस्त्र देह सावरत मग तो मित्रांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. साक्षात गजांन्तलक्ष्मी चालत यावी तसं हे येणं ! आजुबाजुला अज्ञ आणि नादान पोराटोरांचं कोंडाळ पडलेलं. मग वेटर तो काचेचा ग्लास समोर आणुन ठेवणार ! ह्याच्या मुखातुन त्याला आज्ञा जाणार, 'एक क्वार्टर' ! कशाची ? असा प्रश्न त्याने विचारला तर त्याच तोंड फुटणार ! हा प्रश्न संभवतच नाही ! फक्त आणि फक्त 'ओल्ड मॉंक' ! आजुबाजुला नादान पोरांचा किलबिलाट चाललेला...

कोणी म्हणतयं, 'आम्ही नाही घेत !'..

कोणी याच्या पावलांवर पाऊल टाकत ग्लास भरतोय..

कोणी एक पाऊल पुढे जाऊन 'On the rocks' घेतोय..

कोणी एखादा अवलक्षणी भरकटलेला जीव, साक्षात ओल्डीलाच नावं ठेवत आपला माज दाखवत दुसरच काहीतरी पितोय...

वेटर अदबीनी ग्लासात ती अमृततुल्य रम भरणार..त्यावर बर्फाचे ३-४ चौकोनी तुकडे..उगाच थोडस थंडगार थंब्स अप...मग तो बाहेरुन बाष्प जमलेला, थंडगार, ओल्डी चा ग्लास तोंडाला लागणार..तो पहिला घोट..थंड...ती अवर्णनिय चव...घसा जाळत खाली येणारं ते पेय....

पण मग दिवस फिरले. एकेकाळी सकाळी डोळे उघडताच एका हातनी सिगारेट आणि एका हातनी माचिस घेऊन सिगारेट शिलगावणारा हा, आज सिगारेट म्हटल्यावर आधी दचकुन आजुबाजुला बघतो. मग काहितरी कारण काढुन खाली जाउन सिगारेट पिऊन येतो. मग दारुचं काय सांगता..मासा-पंधरादिवसांनी कधितरी चानस मिळतो. त्यामुळे नीट खायला प्यायला न दिल्याने प्राणी संग्रहालयातल्या रोडावलेल्या ( आणि दात काढलेल्या ! ) वाघासारखी याची परिस्थिती झाली आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा की त्याच्या या दयनीय परिस्थिवर एक लेख लिहुन त्याच्या दुःखांना वाचा फोडावी असा विचार बरेच दिवस मनात होता. पण मनासारखा विषय सुचत नव्हता. शेवटी एका समारंभात तो युरेका क्षण आला. त्याच झालं असं...
आमच्या दुसर्‍या एका मित्रानी आपण बाप होणार हे मागच्या महिन्यात डेक्कनच्या गच्चीवर, जुलाब होऊन पोट आवळल्यावर होतो तसा चेहेरा करुन सांगितलं. नंतर हाच मयताला बसल्यासारखा चेहेरा करुन बसल्यामुळे (जो नेहेमिच तसा असतो..) आनंद व्यक्त करावा की नाही, ही बातमी त्याचे कुटुंबिय आनंदाची समजतात की नाही, हे न कळल्याने जनतेने माफक आनंद व्यक्त केला. त्यानंतर हा शहरात अश्याच चेहेर्‍याने आणि अविर्भावाने फिरत असल्याने (हां...होणारे मी बाप...काय एवढं त्यात...मगं ?) लोकांनी भलत्या शंका घेऊ नये म्हणुन शेवटी याच्या बापानी या आनंदाप्रित्यर्थ डोहाळजेवणाच्या नावाखाली जेवणावळ घातली. त्याप्रसंगी बिडी मारणेचे वेळी जोश्यावरील एका व्यक्तव्यामुळे ("काय झालं ? हा रडत होता..एक क्लासिक माईल्ड्स दे त्याला..."), एक विचाररुपी गांडुळ डोक्यात घुसले. त्याच गांडुळाचे झालेले हे अजगर...

(प्रसंग काल्पनिक आहे...तरी फारसा मनाला लावुन घेऊ नये...अर्थात लावुन घेतल्यास आमची हरकत नाही !)

प्रसंग - झोपलेला जोशी.
पात्रपरिचय - समस्त जोशी वंशावळ.

जोशी उताणा झोपलेला. पोटाचा नगारा संथ लयीत वर खाली होतोय. स्वप्नात आखीव रेखीव, घाटदार रमची बाटली !. तेवढ्यात दुरवरुन कुठुनतरी उंच किनर्‍या आवाजात रडण्याचा आवाज..'कोणाची रडतयं ?' हा विचार झोपेत जोश्याच्या (हा दहा टकीला चे शोट्स मारुन बाईक चालवत घरी जात असे !) डोक्यात येतो न येतो तोच, आतल्या खोलीतुन जोश्याचा आजा बाहेर येतो आणि जोश्याच्या बापाला विचारतो,

जोश्याचा आजा ( उंच धिप्पाड बांधा...दारु पिऊन कमावलेली शरीरयष्टी..हे एक खंबा मारुन एका हातानी गाडी चालवत खंडाळ्याचा घाट पार करत असत !) - कोण रडतयं ?

जोश्याचा बाप (सतेज चेहरा...दारुनी उजळलेली कांती...हे एक खंबा मारुन एका हातानी गाडी चालवत मुंबईला जात असत !) - आपला बबडु रडतोय !

जोश्याचा आजा - मग थोडीशी रम पाज त्याला ! तु लहान असताना मीही तुला हेच देत होतो !!

हे ऐकुन जोशी किंचाळुन उठणार इतक्यात आतल्या खोलीतुन जोश्याचा पणजा बाहेर येतो..
जोश्याचा पणजा (आडमाप शरीर..दारु पिऊन कमावलेली लिव्हर...हे एक खंबा मारुन घोड्यावरुन दौडत मुंबईला जात असत ! गांधीजींच्या स्वदेशीच्या आंदोलनात ह्यांनी विदेशी मद्याचा बाटल्या
फोडण्याचे आंदोलन केले होते व फक्त देशी पिण्याची शपथ घेतली होती !) - हा काय चावटपणा आहे ? कोण रडतयं ?
जोश्याचा आजा - बबडु रडतोय.
जोश्याचा पणजा - मग पाज थोडी त्याला ! तु लहान असताना मीही तुला हेच देत होतो !!

तेवढ्यात जोश्याचा खापर पणजा आतल्या खोलीतुन बाहेर येतो..
जोश्याचा खापर पणजा (पीळदार देह..शुध्द देशी पिऊन कमावलेल शरीर...हे खंबा मारुन घोड्यावरच्या कसरती करत असत...१९५७ च्या लढाईत यांनी गोर्‍या सोल्जिरांच्या डोक्यात दारुच्या बाटल्या फोडुन ब्रिटिश सरकारला जेरीस आणले ! त्यांना पकडण्यासाठी सरकारनं वर्षभर फुकट दारु मिळण्याच बक्षिस लावलं होतं ! (असं सांगतात की हे बक्षिस ऐकुन त्यानी स्वतःला पकडुन दिलं आणि बक्षिस स्वतःच लाटलं !!) )
जोश्याचा खापर पणजा - कोण आहे रे तिकडे ? हे काय चाललयं ? कोण रडतयं ?
जोश्याचा पणजा - बबडु रडतोय !
जोश्याचा खापर पणजा - दारु कमी पडली असणार ! हे झालच कसं ! तु लहान असताना मी कधी कमी पडु दिली का तुला ? ताबडतोब दारु पाजा त्याला !
हा गोंधळ ऐकुन आतल्या खोलीतुन एक तेजपुंज पुरुष बाहेर येतो ! एका हातात सोन्याचा चषक , दुसर्‍या हातात सोन्याची बाटली, दोन बाटल्या संपवुनही एका रेषेत पडणारी पावलं आणि अस्खलित वाणी ! यांना बघताच जोश्याची समस्त वंशावळ त्याच्या पायवर लोळण घेते ! हा जोश्यांचा ज्ञात मुळपुरुष ! हे शिवाजी महाराजांच्या काळात मुरारबाजींच्या सैन्यात 'दारु'खान्याचे प्रमुख होते ! तत्काळ चढणारी दारु बनवण्यात त्यांचा हातखडा होता. हे दोन बाटल्या रिचवुन दोन्ही हातात दाणपट्टा चढवुन शत्रुवर तुटुन पडत असत ! पुरंधरच्या लढाईत मुरारबाजी लढायला उतरले असताना हे प्यायला बसले होते. पण मुरारबाजी पडले असं कळताच, चार बाटल्या झाल्या असतानाही, दोन्ही हातात दाणपट्टा चढवुन ते रणांगणात उतरले आणि पराक्रमाची शर्थ करुन मुरारबाजींचा देह परत गडावर घेऊन आले ! हा पराक्रमासाठी त्यांना सोन्याची बाटली बहाल केली गेली, दोन तालुक्यांची मनसबदारी दारु साठी जोडुन दिली गेली आणि तुमच्या घराण्यात कधिही दारु कमी पडणार नाही असा आशिर्वाद मिळाला !
केळकरांचा मुळपुरुष - काय गडबड आहे ? कोण रडतयं ?
मंद्याचा खापर पणजा - बबडु रडतोय !
केळकरांचा मुळपुरुष - रडेल नाहीतर काय ...बघतोय मी काही वर्षांपासुन...लग्न झाल्यापासुन पीत नाही तो पुर्वीसारखा.....'नीट' दारु पाजा त्याला...शोभत का हे आपल्या घराण्याला ? तु लहान असताना मी बाई 'ठेवली' होती......तुला दारु पाजायला.....

इतक्यात जोश्याला आपल्या पोटावर एक सणसणीत आघात झाल्याचं जाणवल आणि जोश्या झोपेतुन जागा झाला. समोर साक्षात जोश्याची बायको उभी होती आणि तिच्या कडेवर जोश्याचं कार्ट रडत होतं ! ते बघताचा त्याला ब्रम्हांड आठवावं तसं आपण केलेलं कृत्य आठवलं..पण आता फार उशीर झाला होता..

जोश्याची बायको - प्यायलात ना ? तरी मी सांगत होते चोरुन पिऊ नका म्हणुन..आता झेपत नाही तुम्हाला पुर्वीसारखी..पिणं का काय हे ?? आख्खी बाटली संपवलीत बंड्याची ...आता काय पाजु मी बंड्याला ? ग्राईपवॉटर ?? शोभेल का आपल्या घराण्याच्या परंपरेला...सासरेबुवा काय म्हणतील मला ?..रडुन रडुन थकलं पोरगं...आत्ताच्या आता जा आणि क्वार्टर घेऊन या !

तर अशी परिस्थिती असल्यामुळे या आमच्या मित्रानी आपल्या घराण्याच्या परंपरेला आणि धमन्यांतुन वहाणार्‍या दारुमिश्रित रक्ताला जागुन निर्भयपणे पुन्हा आपलं दारुकाम सुरु करावं अशी मनःपुर्वक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users