बांध (जातीचा)

Submitted by अ. अ. जोशी on 5 November, 2013 - 09:24

***** खाली लिहीलेली कविता कोणताही आकस मनात ठेवून लिहीलेली नाही. तरी कृपया वाचतानाही तशीच वाचावी.

राही आल्याड भुकेला तसा पल्याडही आहे
फक्त बांधावरल्यांना मेवा मिळणार आहे

द्रोणा माहीत नव्हते पुढे काय होणाराहे
कोण्या एका चुकीसाठी जग थुंकणार आहे

जर माहीत असते वाद होईल जातीचा
अंगठा श्रीकृष्णानेही दिला असता स्वतःचा

भर सभेत विवस्त्र ज्यांनी द्रौपदीस केले
सामाजिक आंधळ्यांना कसे नाही ते दिसले

कर्णासाठी भांडतात कोणी आजी- कोणी माजी
एकातरी कर्णासवे त्यांनी खाल्ली पुरीभाजी?

शिव्या देऊन जाहल्या ज्यांच्या देवासही साऱ्या
लाळ-घोटेपणाने का माथा टेकती भिकाऱ्यां?

आता कशाला हे सारे....
आता कशाला हे सारे कोणी उकरून पाही
देव सर्वांच्यात आहे, सारे मानू आपणही

कर्ण-अर्जुनाला सोडा, एकलव्यालाही सोडा
आता पुढच्या पिढीचा विचार करूया थोडा

तेथे नको स्पर्शास्पर्श, नको जातीचाही वाद
फक्त वाढत राहू द्या मानवातील संवाद

सांगू पुढच्या पिढीला, नको ग्रह - नको तारे
बांध तोडून जातीचे मिसळून जाऊ सारे
बांध तोडून जातीचे मिसळून जाऊ सारे

---------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्ण-अर्जुनाला सोडा, एकलव्यालाही सोडा....

यातील - "सोडा" हा शब्द सोडून द्या अशा अर्थी वापरला आहे हे लक्षात घ्यावे.

धन्यवाद..!

शीर्शकात असलेली धग पुढे कवितेत जाणवली नाही त्यामुळे कविता फारशी भावली नाही पुरीभाजीतर काहीच्या काही हास्यास्पद वाटले (सोड्याचा प्रतिसाद मात्र आवडला ...मला सोडा आवडत असल्याने ...नुसता सोडा नाही बरका ;))

खूप दिवसांनी आपले लेखन वाचायला मिळाले अजय जी त्यामुळे आनंद झाला आपली आठवण अधून मधून येत असते
धन्यवाद

वैभव,
तुम्ही म्हणता ते खरे आहे. शीर्षकातली धग कमीच केली आहे मी. कारण, ती सर्वांना 'मानव'णारी नाही. कधीतरी भेट झाली तर मूळ धग सांगेन.

धन्यवाद..!

हां... आणखी एक....

- पुरीभाजी- चे रहस्य सरसकट नाही, पण.. कळणाऱ्यांना कळेल. त्यामुळे ते हास्यास्पद नक्कीच नाही. माझ्या मते तुम्ही पुन्हा एकदा वाचा.

खाली लिहीलेली कविता कोणताही आकस मनात ठेवून लिहीलेली नाही. तरी कृपया वाचतानाही तशीच वाचावी.<<<

म्हणजे बाकीचे साहित्य मनात आकस ठेवून लिहिले आहे का? Proud

बेफिकीर,

मी फक्त या माझ्या कवितेबद्दल माझ्या मनातल्या भावनांविषयी सांगितले. बाकी काय आहे ते इथे सांगितलेले नाही.

धन्यवाद...

खूप दिवसांनी जोशी साहेब माबोवर आल्याचे पाहून बेफीजींच्या आनंदास पारावार न राहिल्यासारखे वाटत आहे
मस्त आहेत प्रतिसाद

चालूद्या ...........