गोष्ट तशी छोटीशीच...

Submitted by मयुरा on 28 October, 2013 - 05:36

गोष्ट म्हटलं तर छोटीशीच आहे. अगदी काल परवा जॉगिंग ट्रॅकवर घडलेली.
सवयीने माणसं त्यांच्या गतीने फिरत होती. कोणाचा व्यायाम चालला होता. कोणाला रामदेवबाबांच्या प्राणायामाचं भरतं आलेलं होतं. बाजूच्या मैदानावर फुटबॉल जोशात आलेला होता. श्‍वानप्रेमींची संख्याही कमी नव्हती. हातात बारकुडी कामटी, बांधलेली साखळी पिल्लु वाटावी एवढं मोठं कुत्र्यांचं धुड घेऊन अनेक नाजूका चाललेल्या होत्या. कुत्रं त्यांचं ऐकत होतं म्हणून ते त्यांच्याबरोबर निमुट फिरत होतं. त्याने नाजूकांना फिरवायचं ठरवलं असतं तर....
असा सगळा नेहमीचा माहोल होता. तेवढ्यात तिथे नवीन पाहुण्या दाखल झाल्या. सायकलवरुन चिमण्यांचा थवा फिरायला आला. जेमतेम बारा-तेरा वर्षाच्या. वॉकिंग ट्रॅकच्या एका बाजूने सायकली दामटायचं काम वेगात सुरु होतं. डोक्याला लावलेल्या फुलाफुलांच्या क्लिप्स..कानातली लटकन... रंगीबेरंगी कपडे... खोंडाच्या कानात वारं शिरल्यागत उंडारत होत्या.
इथपर्यंत सारं ठीक होतं. पण अचानक काय झालं. एक भलं मोठं कुत्रं घेऊन चार-पाच पोरंटोरं तिथे फिरायला आली. त्यांचं कुत्रं फारच मुडमध्ये आलेलं होतं. त्याला एकतर धावायचं होतं. किंवा यांच्या त्याच्या अंगावर लाडं लाडं चढायचं होतं. तेवढ्यात त्यांची आपसात नेत्रपल्लवी झाली. कुत्रं मुलींच्या सायकलमागे सोडायचं ठरलं. एक आँटी त्यांच्या मागेच होती. त्यांना ते माहिती नव्हतं.
ते कुत्र्याला छूऽऽऽऽम्हणणार तेवढ्यात त्यातील सर्वात थोराड मुलाच्या खांद्यावर टॅप झालं. त्याने गर्रकन वळून पाहिलं तर ती आँटी हसत उभी होती. म्हणाली..
काय चाललंय दादा...
कुठे काय कुठे काय?
कुत्रं कोणाच्या अंगावर सोडताय?
चला आपण सोडू.
त्याच्या मागे पळू...
आँटीने पकडल्याचं पोरांच्या लक्षात आलं होतं. तिने पोरांना अत्यंत प्रेमळ भाषेत आसनात आणलं. कोणतीही गडबड न करता फिरायचा दम दिला. आवाज केलात तर बाकीच्यांनाही हाका मारीन. माझं लक्ष आहे असं बजावत ती पुढे चालू लागली.
मुलांच्या मनात विपरित काही असेलच असे नव्हते. कदाचित ते नुसतीच गंमत करत असतील. त्यांचाही चेष्टेचा मुड असेल. पण तरीही तिच्यातल्या ‘जागल्या’ने त्यांना विचारण्याचं धाडस केलं होतं. चांगलीच चपापली होती पोरं. निमुटपणे ट्रॅक सोडणंच त्यांनी पसंत केलं.
आँटी एवढ्यावरच थांबली नाही. झपाझपा चालत तिने त्या चिमण्यांना गाठलं. त्यांना कोणी त्रास देतं आहे असं वाटलं तर बिनधास्त आवाज द्यायला सांगितलं. आजूबाजूचं भान ठेवत खेळा असं बजावलं. आम्ही रोजचेच आहोत असं म्हणत आश्‍वस्त केलं. तेव्हा तिला जरा बरं वाटलं. चिमण्या चिवचिवत पळाल्या.
दोस्तांनो, आँटीने जागल्याचं काम केलं. आपल्या प्रत्येकामध्ये एक जागल्या दडलेला असतो. फार पूर्वी तो जागा असायचा. पण आता त्याला गाढ झोप लागली आहे. त्यामुळेच त्याला काही खटकेनासं झालं आहे. त्याच्या नजरेला काही दिसेनासं झालं आहे. त्याला जागवायला हवं.
मला सांगा, आपल्या चिल्यापिल्यांनी बिनधास्त फिरावं, जगाचा अनुभव घ्यावा, जमलंच तर थोडंसं व्यवहारज्ञान गाठीशी बांधावं, त्यांच्यात लढण्याची हिंमत यावी असं वाटतं ना.
मग तसं वातावरण निर्माण करुन देण्याची जबाबदारी दुसरं का कोणी पार पाडणार आहे? ती जबाबदारी तुमची-माझी-आपलीच आहे. त्यासाठीच तर आपल्यातला जागल्या कायम जागा ठेवायला हवा.
अचानक काहीही घडत नसतं. त्याची सुरुवात अशीच कुठेतरी होत असते. छोटे जगाचं भान नाही ठेऊ शकत. पण त्यांच्यापेक्षा चार पावासाळे जास्त पाहिलेले आपण ते नक्की ठेऊ शकतो.
आपण आपल्या आजूबाजूला जरा सजगपणे पहायला हवं. कायम जागरुक रहायला हवं. ट्रॅकवरच्या आँटीला जे जमलं ते सर्वांनाच जमू शकतं. काही खटकलं तर लगेच टॅप करायला काय हरकत आहे? मला काय त्याचं....मला आता या भानगडीत पडायला वेळ नाही....कोण नसती बलामत ओढून घेईल अंगावर...मवाली पोरांचा काय भरवसा....असा विचार क्षणभर जरी मनात आला तरी एक मिनिट थांबा.. डोळ्यासमोर आपल्या अपरोक्ष फिरणारी आपली मुलगी-मुलगा नजरेसमोर आणा. एवढं नक्की करा.
तुम्ही असं केलंत तर, तुमचा संबंध असो अथवा नसो, समोरच्याला टोकण्यापासुन तुम्ही स्वत:ला थांबवू शकणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी.
तुमचं एकदा टोकणं कदाचित पुढच्या अनेक गोष्टी थांबवू शकतं. निदान आपल्याकडे कोणाचं तरी लक्ष आहे ही भावना जागृत करु शकतं.
भयमुक्त वातावरण निर्माण करणं ही शेवटी तुमची-माझीच जबाबदारी नाही का?
तेव्हा जरा उठा आणि आपल्यातील जागल्याला जागवा. त्याच्याकडे चोवीत तास जागं रहाण्याची... जागरुकतेची... काहीही खटकलं तरी टोकण्याची जबाबदारी सोपवा.
एवढं करा आणि मग बघा, तुम्हालाच किती निवांत वाटतं ते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं Happy

(गोष्टं छोटी का? चांगली मोठ्ठी, विचार करायला लावणारी आणि छानै Happy )

जागल्या असतोच गं आपल्या मनात. फक्तं ती ठिणगी वापरायची वृत्ती, हिंमत हवी. मस्तं लिहिलयस. आवडलच.

वा!! फारच छान..
आपल्या च धुंदीत न राहता आसपास च्या माहोल चं भान ठेवून सदैव जागरूक राहण्याचा इशारा देणारी आंटी चं उदाहरण ठसलं अगदी मनावर !!!

मला अशी व्यक्ती कधी भेटली तर तिला मी आवर्जून धन्यवाद देईन..