नाही विसरता येत...

Submitted by आनंदयात्री on 18 October, 2013 - 00:14

नाही विसरता येत इतक्या सहज -
गुंतून राहिलेले श्वास,
अडून राहिलेलं आयुष्य
न मागताही दिलेली स्वाधीनता
आणि बदल्यात मिळालेली अगतिकता

नाही विसरता येत -
संवाद टिकवण्यावरची भाषणं
अर्धवट सोडलेली संभाषणं,
सोयीस्करपणे बदललेल्या अपेक्षा
बेमालूमपणे झिडकारलेली नाती
उच्च कळस बघताना खुपणारी
पायातली भुसभुशीत माती
ही संगती, ही विसंगती
ही तटस्थता, ही त्रयस्थता,
ही धुंदी, ही बेपर्वाई
आणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...

प्रश्नांच्या भोवर्यात प्राण घुसमटतानाही
धडपडत तिथेच घट्टपणे फिरत राहण्याचा हट्ट
आणि कुठल्याशा भव्य, उदात्त स्वप्नाचा हव्यास
मला खेचत नेतोय अनिश्चिततेच्या खोल गर्तेत…

एकटेपणाची सार्वत्रिक खंत आठवून देते
सक्तीने अंधारात बसून बघावी लागलेली रोषणाई
मधूनच बेसावध क्षणी कुणीतरी,
झगमग आवेशात
अंधारात मारलेला दिव्याचा झोत,
त्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण
आणि मग
पूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार...

नाही विसरता येत...

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/10/blog-post.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

एकटेपणाची सार्वत्रिक खंत आठवून देते
सक्तीने अंधारात बसून बघावी लागलेली रोषणाई
मधूनच बेसावध क्षणी कुणीतरी,
झगमग आवेशात
अंधारात मारलेला दिव्याचा झोत,
त्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण
आणि मग
पूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार...

नाही विसरता येत...

खासच रे..........

"अंधारात मारलेला दिव्याचा झोत,
त्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण
आणि मग
पूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार..."

हे ही विसरता येणार नाही नक्कीच....

ग्रेट!

<<ही तटस्थता, ही त्रयस्थता,
ही धुंदी, ही बेपर्वाई
आणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...>>

विशेष... सही!!

नाही विसरता येत -
संवाद टिकवण्यावरची भाषणं
अर्धवट सोडलेली संभाषणं,
सोयीस्करपणे बदललेल्या अपेक्षा
बेमालूमपणे झिडकारलेली नाती
उच्च कळस बघताना खुपणारी
पायातली भुसभुशीत माती
ही संगती, ही विसंगती
ही तटस्थता, ही त्रयस्थता,
ही धुंदी, ही बेपर्वाई
आणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...

पटलचं रे !