द वर्स्ट ट्यूटर - लायशा सिक्वेरा

Submitted by बेफ़िकीर on 9 October, 2013 - 10:07

धरणांच्या पातळ्या, पेट्रोलचे भाव आणि बायकोचे नखरे मध्यरात्री वाढतात असे ऐकून आहे. कामाचा ताण, ऊन आणि लायशा सिक्वेराचा सुगंध या गोष्टी दुपारी जास्त जाणवतात.

लायशा सिक्वेरा हा विधात्याने निर्मिलेला सर्वात सुंदर पुष्पगुच्छ आहे. धुळकट सावळा रंग, तीक्ष्ण नजरेचे मत्स्याकृती डोळे, मोकळ्या केसांच्या लाटा पाठीवरून कंबरेपर्यंत उधाणलेल्या, कर्णमधूर आवाजातील आळसटलेपण, कानात रहस्य सांगावे तसे बोलणे, बघत बसावे असे मान वेळावणे आणि ...

... आणि बाकीचे!

आधीच्या कंपनीच्या पुण्यातील ऑफीसमध्ये मी एकटाच असायचो. माझे मित्र व मायबोलीकर डॉ. ज्ञानेश पाटील यांनी ते ऑफीस पाहिलेले आहे. भला मोठा फ्लॅट, त्यात मी एकटा आणि एक ऑफिसबॉय!

हा ऑफीसबॉय एक तर पुण्यातील नव्हता. त्यात तो मॅट्रिकनंतर शिकलेला नव्हता. त्यात तो घाबरट होता. या सगळ्याचा परिणाम सुरुवातीला त्याचा राग येणे व नंतर त्याच्याबद्दल कणव वाटण्यात झाला. त्याला जसजसा नीट समजत गेलो तसे त्याच्यातील अनेक गुण समोर आले. अत्यंत प्रामाणिक, कोणतेही काम करण्यास तयार असलेला, कधीही 'नाही' न म्हणणारा आणि नम्र वागणूक असलेला असा तो मुलगा होता. परिस्थितीमुळेही आणि एकंदरच आकलन पातळीमुळे त्याचे शिक्षण कमी झालेले होते. मुख्य प्रॉब्लेम असा होता की इंग्लिशचा त्याला गंधही नव्हता. त्याला सतत बँकेचे काम पडायचे, अनेकदा हडपसर गावात जाऊन काही कुरियर वगैरेची कामे करावी लागायची. मदत म्हणून मी त्याला एक सायकल घेऊन दिली होती. मात्र त्याने ती ऑफीसच्या कामासाठी वापरण्याऐवजी स्वतःच्या गावाला नेऊन ठेवली. तो रोज तेथून लोकल ट्रेनने पुण्यात येऊन जाऊन काम करायचा. गावाकडे फिरायला म्हणून त्याने ती सायकल वापरायला सुरुवात केली. मी त्यावर त्याला काही बोललो नाही. त्याहीनंतर मी आणखीन एक छोटी मदत केली त्याला! त्याला इंग्लिश शिकवण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक केली. त्या शिक्षिकेने आठवड्यातून तीन दिवस दुपारचे दोन तास ऑफीसमध्ये येऊन त्याला इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. तिची संपूर्ण फी अ‍ॅडव्हान्स म्हणून देताना माझ्या मनात एकदा विचार आला होता की जर ही येईनाशीच झाली तर? पण प्रत्यक्षात मात्र 'लायशा सिक्वेरा' जाईनाशीच झाली....

लायशा सिक्वेरा!

पेरूची बी दातात अडकावी तशी लायशा मनात अडकली. तुमचे आडनांव जोशी, कुलकर्णी, देशपांडे, काहीही असो, लायशाला भेटल्यावर तुम्ही ते बदलून सुखात्मे कराल आणि पेपरात जाहिरातही द्याल. 'सर्व संबंधितांना कळवण्यात येत आहे की मी माझे आडनांव आजपासून बदलून सुखात्मे ठेवलेले आहे'!

"ही डझन्ट नो एनीथिंग"

एका दुपारी लायशा मुरारबाजीच्या आवेशात माझ्या रूममध्ये येऊन डोळे विस्फारून हे वाक्य बोलली.

त्या ऑफीसबॉयला इंग्लिशचा गंधही नाही हे मला आधीच माहीत होते. पण तिची अपेक्षा अशी असावी की निदान शिक्षक नेमल्यावर त्याच्यात सुधारणा होऊ शकेल इतपत तरी इंग्लिश त्याला माहीत असावे. आमच्या ऑफीसबॉयने तिच्या त्या अपेक्षांना सुरुंग लावलेला होता.

"आय विल नीड टू वर्क व्हेरी हार्ड"

लायशाने सोल्यूशनही स्वतःच ऑफर केले. मी आपला 'हो हो, मला समजतंय तुम्ही म्हणताय ते, पण दुर्दैवाने हे आहे ते असे आहे' अश्या अर्थाने मान हालवत होतो. आमच्या ऑफीसबॉयमध्येच नाही तर माझ्यातही फारशी सुधारणा होऊ शकत नाही अश्या अर्थाचा चेहरा करून ती परत शिकवायला गेली. मला माझी भूमिका काय असावी हे समजेना! पैसे तर सगळे देऊन झालेले होते. आता लायश्याच्यादृष्टीने माझ्याकडून काहीच मिळण्यासारखे नव्हते. आता तिने त्या मुलाच्या तक्रारी सुरू करून जर असे चित्र निर्माण केले की ह्याला शिकवणे अशक्य आहे, तर माझ्या हातात काहीच उरणार नव्हते. बरं, त्याने किमान इंग्लिश शिकावे ही माझी एक ऑफिशियल रिक्वायरमेंटही होती, पण त्या रिक्वायरमेंटसाठी कंपनीने काही त्याला इंग्लिश टीचर स्पॉन्सर केली नसती. मी समाजकार्य अधिक उपयुक्तता वाढवणे या अतीशहाणपणाच्या रोलमध्ये जाऊन पैसे भरून बसलेलो होतो. त्या मुलावर चिडणे शक्य नव्हते कारण त्याला मराठी त्याची मातृभाषा असूनही धड बोलता यायची नाही तिथे इंग्लिशचे काय होणार? थोडक्यात, आपले सहा हजार लवकरच पाण्यात जाणार आहेत व ते पाण्यात जावेत याचे प्रयत्न या टीचरकडून सुरू झालेले आहेत हे मला समजले. मग मी ताडकन उठून त्या खोलीत जाऊन बघतो तर काय? लायशा अत्यंत मनापासून त्या मुलाला इंग्लिश यावे याचा प्रयत्न करत होती आणि तोही तितकाच मनापासून लक्ष देत होता. दिसणारे दृष्य तरी सुखद होते. एकुण, लायशाबाबत माझे मत तत्क्षणी बदलले.

महिना झाला पण तो मुलगा काही सुधरेना! हळूहळू माझ्या मनावर लायशाचा परिणाम होऊ लागला. कडक माध्यान्हीमध्ये अलगद तिन्हीसांजेचे रंग उतरावेत आणि दिवसभर जोमात जग जिंकण्याचा आवेश प्रदर्शीत करत चौफेर उधळलेले मन हळवे आणि कावरे व्हावे तशी लायशा माझ्या आयुष्यातील त्या कालावधीवर व्यापू लागली. जी आज येणार आहे हे लक्षातही नसायचे ते 'उद्या येणार' हे आजपासूनच आठवू लागले.

असेच काही दिवस गेले आणि त्या मुलाने सकाळी मला एक फोन करून रजा टाकली. त्या दुपारी ती अवतरली त्या आधीच मी तिला 'आज येऊ नका' असे सांगू शकलो असतो. पण नाही सांगितले. कोणाला कधी काय सांगावे आणि काय सांगू नये याचे अधिकार मी राखून ठेवलेले असतात. तिच्यासमोर अभिनयही केला की 'अरे तुम्ही येणार हे माझ्या डोक्यातच नाही, तो आज नेमका रजेवर आहे'! त्यावर तिने उत्तर दिले की त्याचा तिलाही फोन गेला होता की तो आज येणार नाही आहे.

लायशा सिक्वेरा!

सत्तारूढ पक्षाने केलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात विरोधी पक्षाला घोटाळाच दिसावा तसे मला तिच्या डोळ्यांमध्ये गढूल भाव दिसले.

मग ती का आली होती? वानवडीहून हडपसरला उन्हातान्हात कोणी उगाच येण्याइतके आमचे ऑफीस काही सुंदर नव्हते.

"ओह, सो देन, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर?"

"आय जस्ट वाँटेड टू पे बॅक धिस अमाऊंट... थ्री थाऊझंड फाईव्ह हंड्रेड"

"व्हाय?"

"आय कान्ट टीच हिम! सॉरी, बट ही कॅन नॉट इम्प्रूव्ह"

माझ्या मनात एकाचवेळी अनेक विचार आले. एका विद्यार्थ्याला मी शिकवू शकत नाही असे म्हणणे शिक्षकाला शोभते का? एक चांगली शिक्षिका शिकवू शकत नाही म्हणजे आपला ऑफीसबॉय नक्की काय प्रकारचा विद्यार्थी असावा? हिने जर हेच कारण सांगून येणेच बंद केले असते तर आपण आपले हे साडे तीन हजार रुपये कसे परत मिळवले असते? आपण दिलेल्या फीपैकी साडे तीन हजारच का परत दिले जात आहेत? चार हजार का नाही? दोनच हजार का नाही? हा हिशोब कसा ठरला? हे पैसे परत द्यायला आजच येण्याचे कारण काय होते? पुढच्या बॅचला आल्यावर जातानाही हे पैसे ती का देऊ शकली नसती?

लायशाला बहुधा माझ्या मनातील प्रश्न समजले असावेत. तिने स्वतःच उत्तर दिले.

"बीचमे एक बार मैने डाटा था उसे! मैने पूछा था की मै इतनी बार सिखाती हूं, तुम्हे कुछ भी नही समझता, किस टाईपके स्टुडंट हो तुम! तो उसके आंखोंमे पानी आया था! आय डोन्ट वाँट हिम टू नो दॅट ही कॅन नॉट इम्प्रूव्ह! आप उसे बोलदेना के मै ट्रान्स्फर होगयी हूं! मै आगेसे उसका फोन नही लूंगी!"

लायशा आणि तो ऑफीसबॉय ह्यांच्यात एक अनोखे, निर्मळ शिक्षिका विद्यार्थी असे नाते निर्माण झालेले माझ्यासारख्या तुच्छ मनोवृत्तीच्या माणसाला जाणवलेलेही नव्हते. त्यावेळी आपल्या ऑफीसबॉयला इंग्लिशही येत नाही म्हणून तो किंवा त्याला इंग्लिश शिकवणे लायशाला जमतच नाही म्हणून लायशा यांच्यापैकी कोणाचाही राग येण्यापेक्षा मला माझा स्वतःचा संताप आल्याचे अजुनही आठवते. ज्या पातळीवरून मी त्या प्रकाराकडे केवळ पदरचे सहा हजार रुपये खर्च करून बघत होतो तो प्रकार त्या दोघांसाठी किती जिव्हाळ्याचा झालेला होता हे जाणवून माझी मान खाली गेली. आयुष्याने मला आजवर कोणतीच निर्मळ शिकवण तरी दिलेली नाही किंवा निर्मळतेला हुकुमीपणे गढूळ करण्याची काबिलीयत देण्याशिवाय इतर काहीच दिले नाही असे मला वाटले.

आता त्याही परिस्थितीत मी किती महान हेच ठसवायचे उरलेले असल्याने माझ्याकडे एकच वाक्य बोलण्याचा पर्याय उरलेला होता, जो मी वापरून पाहिला.

"तो.. पैसे तो रखदीजिये ना? आपकी क्या गलती है उसमे?"

जे पैसे मुळातच माझ्यादृष्टीने गेलेलेच आहेत ते परत न घेतल्यामुळे मी क्षणभर का होईना महान ठरत असेन तर बिघडले काय ही गर्विष्ठ भावना माझ्या तोंडून हा प्रश्न वदवून गेली.

या सगळ्या तिढ्यात कोण कोणाला काय समजत होते ते एकदा तपासायचेच होते मला. आज ते तपासायला वेळ मिळाला ही कथा लिहिण्याच्या निमित्ताने! तो ऑफीसबॉय मला उपकारकर्ता समजत होता. त्याची नोकरी माझ्यावर अवलंबून होतीच, पण त्याच्यासाठी मी स्वकष्टार्जित पैसे घालून हा क्लासही लावून दिलेला होता. त्याच्यामते तो कमी पडत होता माझे उपकार स्वीकारण्यासाठी! लायशा मला एक असा माणूस समजत होती जो नेक इराद्याने एका गरीब मुलाला शिकवू पाहात होता आणि जर त्या मुलाची शिकण्याची क्षमता नसेल तर तिच्यादृष्टीने आदर्श उपाय हाच होता की तिने उरलेल्या शिकवणीचे पैसे मला परत देणे! मी त्या ऑफीसबॉयला एक अक्षम, मंदबुध्हीचा असा माणूस समजत होतो की ज्याच्यावर पैसे उगाच घालवले असे मला वाटू लागले होते. आणि मी लायशाला काय समजत होतो? एक इंग्लिशची शिक्षिका, जी योगायोगाने आकर्षकही आहे आणि जिला मी फीचे पैसे देऊन प्रत्यक्षात स्वतः काहीच मागत नाही आहे.

या सर्व विचारांच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये मी एकटाच असा होतो जो स्वतःला त्या समीकरणातील सर्वेसर्वा समजत होतो आणि तेही केवळ काही रुपडे देऊन! हे तेच रुपये होते जे काम केल्याबद्दल किंवा काही वेळा पाट्या टाकल्याबद्दल मला मिळत. हे तेच रुपये होते जे माझ्या नशिबात होते आणि तितकेच होते जितके मी एखाददोन आठवड्यात उधळत असे. पण हे तेच रुपये होते ज्यांची किंमत लायशासाठी बरीच होती आणि त्या ऑफीसबॉयसाठी त्याहीपेक्षा अधिक!

जीवनाने मला इतके लाजिरवाणे यापूर्वी बनवलेले नसेल.

त्यातच लायशाने उत्तर दिले.

"नो नो, आय कान्ट अ‍ॅक्सेप्ट इट... थँक्स"

यापुढे लायशा दिसणार नाही, शेजारच्या खोलीतून एका जादूभर्‍या आवाजातील शिकवणी ऐकू येणार नाही. यापुढे ऑफीसबॉयला कोणत्याही दिवशी दुपारी बँकेत जायला सांगता येईल. यापुढच्या चार आठ दिवसात हे साडे तीन हजार, जे एक प्रकारे ब्लॅकमनी आहेत, ते उडवता येतील.

आणि यापुढेही आपल्याला स्वतःचा किंचितही आदर वाटणार नाही. थोडक्यात.... जे जसे होते तसेच राहील!

पडेल चेहर्‍याने मी फक्त इतकेच म्हणालो...

"आय अ‍ॅम सॉरी... ऑन हिज बिहाफ"

"यू नीड नॉट बी... आय हॅव सीन मेनी सच स्टुडंट्स... वैसेभी... इंग्लिश इज नॉट अवर लँग्वेज"

"ट्रू"

"सो.. मे आय लीव्ह?"

"ओके.. कीप इन टच.."

"शुअर... बाय"

"बाय"

ऑफीसच्या दारातून बाहेर पडेपर्यंत लायशाच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मी पाहात होतो. मला आठवते, तिच्याबरोबर अनेक गोष्टी जात होत्या. माझ्यातील माझ्याबद्दलचा वृथा अभिमान, ज्यांना इंग्लिश शिकताच येत नाही त्यांच्याबद्दलचा तिरस्कार आणि एक सुगंध, जो त्या ऑफिसमध्ये पाचदहा मिनिटांपुरताच भरून राहिलेला होता.

ऑफीसबॉयला अजिबात काहीही बोलायचे नाही इतकेच मी ठरवले.

जगात रोखता न येण्यासारख्या चारच गोष्टी आहेत. शिंक, जांभई, ठसका आणि उचकी! पाचवीची भर पडली. लायशा सिक्वेरा!

काही का असेनात! काहीतरी नक्कीच वेगळेही होते त्यात! उठून निघताना तिने तिचे डोळे जसे मिसळलेले होते त्यावरून माझे मन तरी मला सांगत होते की इथे सगळे संपलेले नसावे. किंवा निदान आपण तरी आपल्याकडून सगळे इथेच संपवायला नको.

स्त्री राजधानी एक्स्प्रेसमध्ये बसते तेव्हा पुरुष बैलगाडीत चढत असतो. आयुष्य हा सुखाचा शोध आहे, फक्त तो शोध घेण्यासाठी असलेले रस्ते दु:खांचे आहेत. या रस्त्यांवर चुकून मधेअधे सुखे भेटलीच तर ती दुर्लक्षित करणे हा विधात्याचा अपमान आहे.

मी लायशा सिक्वेराकडे अजिबात दुर्लक्ष करणार नव्हतो. विधात्याचा वगैरे कोण अपमान करणार उगाच?

=====================

लायशा सिक्वेरा ही माझी गरज नव्हती. एखादी व्यक्ती आपली गरज बनण्यासाठी प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींचे अस्तित्व आवश्यक असते. मी आणि लायशा यांच्यात असले काहीही नव्हते. तेरा ते चौदा दिवस रोजचेच आयुष्य जगताना अधूनमधून लायशाची आठवण येत असली तरी अगदी कसेसे वगैरे मुळीच होत नव्हते.

लायशा सिक्वेराची मी तर गरज नव्हतोच नव्हतो.

पण कोणीच कोणाला आठवत नसेल का? मला ती आठवत होती, तिला मी?

एके रात्री बारमध्ये असताना अचानक मला तिची तीव्र आठवण झाली आणि मी तिला एस एम एस केला.

"रिमेंबर मी?"

माझ्यामते बर्‍याच वेळाने पण मोबाईल फोनमधील घड्याळ्याच्या मते फार तर तीन चार मिनिटांत तिचे उत्तर आले.

"येस ऑफकोर्स"

मग मला जाणवले. मी तिची कौटुंबिक पार्श्वभूमीही विचारलेली नव्हती. मी त्यावेळी केलेला मेसेज हा कोणाच्या वादाचे कारण ठरू नये ही इच्छा मेसेज केल्यानंतर मनात आली. असो! पण ज्या अर्थी उत्तर आलेले होते त्या अर्थी शांतता बिनसलेली नसावी.

मग अधूनमधून फालतूगिरी सुरू ठेवली. आपण जसे आहोत तसे अधूनमधूनच वागलेले बरे पडते. कधीच नाही वागलो तर आपण आपल्याला फार कोणीतरी वाटायला लागतो आणि सारखेच वागलो तर जगात आणि आपल्यात काही फरकच राहात नाही.

सापशिडीच्या खेळात शिडीच्या चौकटीत पोचल्यावर जसे अचानक मधली कित्येक घरे टाळून आपण टारगेटच्या जवळ पोचतो तसा प्रकार एके दिवशी झाला.

तिचा मेसेज आला संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास! 'आर यू इन द ऑफीस?'! मी घाईघाईत 'हो' म्हणालो आणि माझ्याकडून माझे उत्तर पाठवले जाताच माझ्या मनाने मला एक अ‍ॅलर्ट पाठवला.

'समथिंग इज डिफरंट'!

काय ते माझ्या लक्षात येईना, पण लायशाचा तो मेसेज मला सरळ वाटला नाही. तिने ती येत असल्याचेही कळवले व त्याप्रमाणे सव्वा सहाला आलीही!

तिला पैसे पाहिजे होते. दहा हजार! मी कशाततरी अडकलेलो होतो, तेही प्रत्यक्षात वावगे न वागताच!

त्या दिवशी ती मला जरूरीपेक्षा अधिक फ्रेंडली वागल्यासारखी वाटली. का कोणास ठाऊक, पण तसे वागणे मला आवडले नाही.

गाहे गाहे इसे पढा कीजे
दिलसे बेहतर जोई किताब नही

काही दिवसांनी असाच कुठेतरी बसलेलो असताना स्वतःचे मन वाचत वेळ घालवत होतो. मला जाणवले की लायशाचे ते वागणे, तिला मी 'आत्ता माझ्याकडे पाचच हजार आहेत असे सांगणे', ते तिने मान्य करणे, ते मी तिला देणे, त्यानंतर तिने काही मेसेजेस पाठवणे यातले काहीच मला आवडलेले नव्हते. पण काहीतरी असेही होते की जे आवडलेले होते. ते काय होते? हेच वाचत बसलेलो होतो. हळूहळू आकलन झाले. लायशाला माझी गरज भासावी, माझे साडे तीन हजार मला परत देतानाचा स्वाभिमानी स्वभाव तिला खुंटीला अडकववून माझ्याशी बोलणे भाग पडावे आणि मी तिची मदत करण्यास सक्षम असावे व ती मी करावीही, हे मला सुखावत होते. सौदामिनी ठाकूरच्या वेळी मी वयाने आणि ह्या असल्या अनुभवांनीही खूपच लहान होतो. पण लायशाच्यावेळी मी वयाने वाढलेलो होतो. असे अनुभव येऊन गेलेले होते. कोणत्यातरी व्यवहार्य जगात, ज्यात मी सहसा जगतच नाही, लायशावर माझा कसलातरी हक्क पोचत होता आणि ही जाणीव अप्रत्यक्षपणे मला हुरळवत होती,. त्या जाणिवेचे मी अजुन केलेले काहीच नव्हते, पण नुसतीच तशी जाणीव असणेही सुखद वाटत होते. मग काहीतरी करायचे ठरवले आणि पुन्हा संपर्क केला.

त्या रात्री लायशा भरभरून बोलली. कितीतरी वेळ बोलली. ती घटस्फोटिता होती. मूलबाळ नव्हते. राहत्या जागेचा प्रश्न येत होता. माझे पाच हजार तिने कोणालातरी डिपॉझिटचा एक भाग म्हणून दिलेले होते. आता त्याही जागेत प्रश्न येऊ लागला होता. ती फ्लॅट शोधत होती. वन रूम किचन! गतायुष्याबाबत ती काहीही बोलली नसली तरी त्या दिवशीचा आमचा फोनकॉल आम्हाला आधीपेक्षा खूपच जवळ आणून गेला.

स्त्रीला व्यक्त होईपर्यंत व्यक्त व्हायचे नसते आणि व्यक्त झाल्यानंतर थांबायचे नसते असे काहीतरी असावे. नंतर लायशा राजधानी एक्स्प्रेसमध्ये बसली.

आम्ही पुण्यात कुठेही फिरलो. कधी निरुद्देश तर कधी जागा वगैरे पाहण्यासाठी! असेच कधीतरी जवळ आलो.

दोन मनांमधील दरी संपवण्याचे चॅलेंज फार लोभस असते. त्यासाठी झगडण्यात खूप मजा येते. पण मग नंतर असे का वाटते की हे ते नव्हतेच जे आपण प्राप्त करू इच्छित होतो?

जन्माच्या शिकवणीला नशिबाचाच मास्तर का मिळतो काय माहीत?

लायशाने पसंत केलेल्या एका मांजरी गावाजवळच्या फ्लॅटसाठी तिने एक लाख रुपयांची मागणी केली. जी पुरवणे अशक्य असल्याने मी ठामपणे नाही म्हणालो. कोणताही वाद झाला नाही. काही कारणच नव्हते वाद होण्याचे. या नात्यात कमिटमेंट असली तर इतकीच होती की दोघांनाही वाटले तर जीव उधळायचा एकमेकांवर, नाहीतर काही नाही. मलाही अजिबात वाईट वाटले नाही मी तिला नाही म्हणालो याचे.

पण त्यानंतर लायशाने माझ्याशी संपर्क टाळणे हे मला हालवून गेलेले नसले तरीही दुखवून मात्र गेले.

याचा अर्थ मी एक आर्थिक आधारच होतो? जो, जर मी दिलाच नाही, तर मी नकोच होतो?

ती मुळातच तशी होती? की साडे तीन हजार देणारी खरी लायशा होती? की ते माझा विश्वास संपादन करण्यासाठीचे नाटक होते?

लायशाच्या स्मृतींवरही काळ हेच औषध असावे असे मला का वाटत नव्हते? किंबहुना, ते त्यावरील औषध बनू नये असे का वाटत होते?

दोन मने जवळ आल्यानंतर त्यांच्यात अश्या कोणत्या एलिमेंट्सची देवाणघेवाण झाली जी विसरायची इच्छा होत नव्हती?

जगात शारीरिक आणि मानसिक यापलीकडच्याही काही गरजा असाव्यात का?

मला नेमके कधी असे वाटायला लागले की लायशा आता नाही भेटली तरी चालेल? कोठवर असे वाटत होते की तिने असे तरी नसावे?

तिने मला आर्थिक आधार मानू नये या माझ्या अप्रकट मागणीमागची भूमिका नेमकी काय होती? मी इतर तिला असे काय भिन्न देऊ शकणार होतो की तिने मला तेही समजू नये?

जसे दहा हजाराऐवजी पाचच देऊ शकतो असे म्हणालो होतो तसे एक लाखाऐवजी वीस हजारच देईन असे का म्हणालो नव्हतो? माझ्याहीदृष्टीने कुठेतरी लायशाची किंमत 'इतक्या इतक्या रकमेइतकीच' अशीच होत होती का?

हे नाते ही निव्वळ एक तडजोड होती का? दोघांसाठीही काहीतरी फायदा आहे तोवर नाते आणि नंतर कोणताही रागलोभ मनात न ठेवता अंतर पाळणे!

की तिच्यामते तिने सर्वस्व उधळल्यानंतर तिची ही मागणी मला क्षुल्लक वाटायला हवी होती?

हा एकविसाव्वा विबासं!

बाविसाव्वा असा आहे जो मी खूप इच्छा असूनही कदापिही लिहू धजणार नाही.

तेविसाव्वा लिहिण्याची इच्छा मनात नाही.

ह्यानंतर थेट चोविसाव्वा विबासं लिहून ही 'पुण्यगाथा' संपवणार आहे.

ही मालिका लिहिताना व्यक्तींची नावे बदलावी लागली, काहीवेळा प्रसंगही काही प्रमाणात! काही वेळा गावेही बदलावी लागली. आकाशात उडणार्‍या पतंगाच्या नशिबात जो क्षण. जे कोऑर्डिनेट्स आणि जी हवा येईल ती तशीच्यातशी अनुभवत मी उडत राहिलो. कधीतरी छाटला जाईन! त्यावेळी या एकवीस आणि यानंतर लिहिणार नसलेल्या तेवीस आणि लिहिणार असलेल्या चोविसाव्या व्यक्तींच्या डोळ्यात कदाचित एकही अश्रू येणार नाही. कदाचित त्यांना माहीतही होणार नाही की एक असा असा आपल्या आयुष्यात आला होता तो असा असा गेला. माझ्यासाठी रडणारे डोळे माझ्या घरीच असतील.

आणि दोन डोळे असतील.... जे रडल्याचे दाखवणार नाहीत.... ते वेगळे!

लायशा सिक्वेरा!

लायशानंतर माझ्या आयुष्यातील एकच विबासं लिहावासा वाटू शकतो, तो म्हणजे चोविसाव्वा विबासं! थोडक्यात ...... 'गझल'!!!

कोणाचे लिंग कोणते हेही आठवू नये अशी एक अवस्था काही प्रणयांमध्ये येते. समाधीपेक्षा फार वेगळी नसावी ती! तेथे कोणी स्त्री नसते, कोणी पुरुष नसतो. श्वास असतात, नि:श्वास असतात आणि मागे पडत चाललेल्या क्षणांची अनुभुती असते.

आपण सगळे त्याची यथेच्छ थट्टा करायला सरावलेलो आहोत. पण आयुष्य हीच एक थट्टा आहे. स्वतःला जिवंत समजणार्‍याची आयुष्याने केलेली थट्टा! जन्मापासून मरेपर्यंत आपले आयुष्य म्हणजे एक लांबलचक प्रेतयात्रा आहे, प्रत्यक्ष प्रेतयात्रा ही फक्त एक फॉर्मॅलिटी! आपल्याला कोणाची थट्टा करण्याचा अधिकार आहेच कुठे? आपण फक्त एक शिकवणी लावलेली आहे आणि शिकवण घेत राहायचे आहे.

लायशा सिक्वेरा! लायशाने माझ्या मनात सांस्कृतीक उलथापालथी केल्या आणि माझ्या परिभाषा बदलून दाखवल्या.

तडजोड हा पाया इथे प्रत्येक नाते राखतो
हेही कळत नाही मला मी हीच शिकवण मानतो

-'बेफिकीर'!

(नावे काल्पनिक)

===========================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो - http://www.maayboli.com/node/31976

आवाहने मानायचो ज्यांना प्रवेशाची कधी
आलिंगनांना त्या तुझ्या मी आज कुंपण मानतो - http://www.maayboli.com/node/32642

शिखरावरी आरंभुनी गाठेल तळ... कळते तरी
माझ्या तुझ्या नात्यास मी अनिवार्य घसरण मानतो - http://www.maayboli.com/node/33399

थेंबाप्रमाणे क्षुद्र मी अन तू समुद्रासारखी
मोडायला विश्वास मी नात्यास आंदण मानतो - http://www.maayboli.com/node/34260

तू भार नात्याचा तुझ्या नेलास तेव्हापासुनी
मी एकही ओझे न असण्यालाच दडपण मानतो - http://www.maayboli.com/node/36341

त्या दोन अश्रूंची बचत आहे पुरेशी त्यास ... जो
या राहिलेल्या जीवनाला शुद्ध उधळण मानतो - http://www.maayboli.com/node/39414

मी स्त्री कधी बनलोच तर बदलेन इथली संस्कृती
प्रसवेन त्या मर्दास जो पुल्लिंग वेसण मानतो - http://www.maayboli.com/node/39478

तू भेटली नसतीस तर मी गोठलो असतो पुरा
मुक्कामस्थानी पोचणे आता पदार्पण मानतो - http://www.maayboli.com/node/43059

====================================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आपण जसे आहोत तसे अधूनमधूनच वागलेले बरे पडते. कधीच नाही वागलो तर आपण आपल्याला फार कोणीतरी वाटायला लागतो आणि सारखेच वागलो तर जगात आणि आपल्यात काही फरकच राहात नाही."
>> सुपर्ब. अशी वाक्य तुम्ही लेखात मस्त टाकतात!

मस्त लिहिलयं..
स्त्रीला व्यक्त होईपर्यंत व्यक्त व्हायचे नसते आणि व्यक्त झाल्यानंतर थांबायचे नसते असे काहीतरी असावे>>

सही

लेखाचे कंटेंट्स म्हणावे तितके प्रभावी नाहीत. पण लिखाणाचा फ्लो आणि काही वाक्य अफलातून आहेत. अशी वाक्य फक्त तुम्हीच लिहू शकता.

खास 'बेफिकीर' ठसा असणारी अनेक विधाने आवडली .
प्रत्येक ा वेगवेगळ्या व्यक्तिरेखेला फार उत्तमपणे मांडलंत. पुढील ललिताच्या प्रतिक्षेत ....

तेवीसावा पण लिहा हो. बिंधास. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.

घडले परंतू लिहीणे टाळणे बरे नव्हे
वाचकांना इतके असे छळणे बरे नव्हे

पांगारा | 15 October, 2013 - 13:21

तेवीसावा पण लिहा हो. बिंधास. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.<<<

पांगारा, तुम्ही पाठीशी असणे ही महाभयानक बाब समजतो मी. Proud