गणेशविसर्जन आणि एक पर्यावरणपूरक अनुकरणीय उपक्रम

Submitted by मी-भास्कर on 17 September, 2013 - 00:42

उद्या गणेशविसर्जन. त्यानिमित्त एका उपक्रमाची ही माहिती.
माझ्या एका स्नेह्याने यावर्षीच्या गणेशोत्सवात केलेला हा उपक्रम मायबोलीच्या वाचकांना माहीत असावा म्हणून हा लेख. हा मित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा अभ्यासक. पर्यावरणवादी आणि त्यासाठी कांहीना कांही परिश्रम घेणारा. रूढार्थाने मुळीच धार्मिक नसलेला. शाडूची गणेशमूर्ती मिळाली नाही तर धातूचा गणपती बसवून त्याशेजारी सुपारीचा गणपती ठेवून त्या सुपारी-गणपतीचे विसर्जन करणारा. यावर्षीचा त्याचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे म्हणून देत आहे. याबाबतची त्यांची भूमिका खाली देत आहे.
शाडूच्या छोट्या गणेशमूर्ति करणे मूर्तिकारांना इच्छा असूनही आर्थिक दृष्ट्या परवडत नाही असे अनेक मूर्तीकार म्हणतात. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती सरसकत बसवल्या जातात. त्यामुळे होणारे प्रदूषण सर्वांना आता माहीत आहे. शाडूच्या मोठ्या मुर्ति घेणे गरीब व मध्यमवर्गाला शक्य नसते. पर्यावरण वाचवायचे असेल तर मातीची मूर्तिच श्रेयस्कर हे खरेच!
पण ही माती मिळविण्यासाठी पृथ्वीचा पृष्ठभाग सतत खरवडून त्याची धूप करणेच आहे आणि नंतर शाडूच्या मूर्ति मोठ्या प्रमाणात पाण्यात सोडल्या तर पाण्यात गाळ वाढवणेच आहे. शाडूमातीचा पुनर्वापर करणे हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. त्यासाठी आवारातच एका मोठ्या बादलीत मूर्ती विसर्जित करावी. काही तासातच तिचे मूर्तीस्वरूप जाऊन मातीचा ढिगारा उरतो. बादलीतील निर्माल्य वगैरे काढून टाकावे आणि वरचे निव्वळ शंख पाणी निथळून टाकावे. तळाशी असलेली माती सुकू द्यावी आणि पुढील वर्षासाठी कापडात गुंडाळून ठेवावी. पुढील वर्षी पाणी घालून चांगली मळावी. उत्तम गणेशमूर्ती करता येईल. जमत असेल तर नैसर्गिक रंग वापरून रंगवावी.
न रंगवताच पूजा केली तर उत्तमच.
त्यांच्या या मूर्तीच्या फोटोसह माहिती दिव्य मराठी मध्ये आली आहे. तिची लिन्क अशी:
तेथे जाऊन सिटी हा पर्याय निवडून पान ६ पहावे.

http://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/260/08092013/0/1/
याशिवाय अशी मूर्ती करून पाहावी असे त्यांना जी लींक पाहून वाटले ती त्यांनी दिली आहे . सर्वांनी अवश्य पहावी.
making of clay ganapati : 4 min LINK

http://www.youtube.com/watch?v=TZgSH_kp-cQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बागेतल्या मातीची मूर्ती बनवते. त्यात गेरू मिसळून (ते पर्यावरण पूरक आहे याची खात्री नाही.) नंतर बादलीत विसर्जन आणि माती परत झाडांना.

wisarjan.jpg

माझ्या माहेरी आम्ही सिल्व्हर मेटलचा गणपती बसवतो. त्याचे बादलीत विसर्जन करतो. आणि तोच परत वापरतो.

फुले आणि इतर निर्माल्य घरातल्या झाडांना घालतो.

प्राचीजी
आपली मूर्ती आणि उपक्रम छानच आहे. गेरूबद्दल मलाही माहीत नाही.
काळ्या मातीची मूर्ती सुकल्यावर भेगा पडत नाहीत का? कि गेरूमुळे तो प्रस्न मिटतो? ज्यांच्याकडे १० दिवस गणपती असतो त्यांच्या मनात अशी धाकधूक असते म्हणून विचारले.

मी ५ दिवस गणपती बसवते.फार नाजूक कलाकुसर करता येत नाही. केली तर भेगा जाऊ शकतात. पण अशी साधी मूर्ती भेगा न पडता व्यवस्थित राहते. गेरूने पुरेसा चिकट पणा येतो.

अरे वा! आम्ही गणपतीची मूर्ती पाण्यात शिरवत नाही. गौरींसारखी उचलून ठेवतो. पुढच्या वर्षी पुन्हा तीच वापरतो. निर्माल्य कंपोस्टमध्ये टाकतो.

धातूची मुर्ती वापरुन सुपारीचे विसर्जन हा पर्याय सगळ्यात स्वस्त व चांगला आहे. शाडूची मुर्ती दिसायला अनाकर्षक असते म्हणुन लोक प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती घेतात. त्या एकदम चमकदार दिसतात. आता सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरुप काही धार्मिक राहिले नाही त्यामुळे त्याविषयी न बोललेचे बर.

गणपती नुसता नावाला
चैन पाहिजे आम्हाला

धातूची मूर्ती वापरून सुपारीचा पर्याय छान उपक्रम आहे, मी आणि बहिणीने भावाला हे सुचवले, बहिणीने सासरीपण सुचविले पण बऱ्याच जणांना मूर्तीच आणायची असते, पण भाऊ माझा नेहेमी शाडूची मूर्तीच आणतो हे एक बरे.

@प्रकाश घाटपांडे | 17 September, 2013 - 16:39नवीन
माझ्या स्नेह्याप्रमाणेच मीही शाडूची छोटी मूर्ती न मिळाल्यास धातूची मुर्ती वापरुन सुपारीचे विसर्जन हा पर्याय वापरला आहे. पण पुढील वर्षी मीही मूर्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अन्जू | 17 September, 2013 - 16:54
पण भाऊ माझा नेहेमी शाडूची मूर्तीच आणतो हे एक बरे.
>>
ही बाब चांगलीच. शाडूच्या गणपतीवरील रंग देखील पाणी प्रदूषित करतातच. त्यासाठी बादलीत विसर्जन आणि त्याचे पाणी झाडांना देणे उत्तम.
पण शाडूचाही पुनर्वापर होणे आणखी चांगले. यासाठी हा लेख.

हो बरोबर मी-भास्कर हेपण भावाला सांगतो आम्ही कि आपण घरीच विसर्जन करूया, पण सध्यातरी तलावात करतो विसर्जन, हा लेख त्याला वाचायला देणार आहे, होईल बदल हि आशा.

अन्जू | 17 September, 2013 - 17:23
, होईल बदल हि आशा
<<
नक्कीच होईल बदल कारण शाडूची मूर्ती आवर्जून आणणारा तुमचा भाऊ नक्कीच पर्यावरणाला मदत करतोच आहे. आज ना उद्या त्यालाही पुनर्वापराचे महत्व जाणवेल.
जाता जाता हाताने अशा शाडूपासून गणपती करणे किती सोपे आहे ते पाहाण्यासाठी माझ्या मित्राने दिलेली ही लिन्क सर्वांनी जरूर पहावी. मूळ लेखातही ती आता टाकत आहे.
making of clay ganapati : 4 min LINK

http://www.youtube.com/watch?v=TZgSH_kp-cQ

प्रिया७ | 17 September, 2013 - 19:54
माति नसेल तर हळदिचा सुद्धा गणपति बनवता येतो.हळद आणि पाणि वापरुन.
<<
सुंदर आहे हळदीपासून बनवलेला गणपती.
लिंकबद्दल धन्यवाद!
गणेशभक्तांना पुन्हा आवाहन करतॉ कि त्यांनी शाडूचे रिसायकलींग करण्याचे मनावर घ्यावेच!

मायबोलीवरील सश्रद्ध / भाविक/ गणेशभक्त लोकांनी जरी यातून स्फुर्ती घेउन स्वतःत काही बदल केले तरी हा धागा सार्थकी लागला असे म्हणता येईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सोवाला शुभेच्छा!