संयम

Submitted by विद्या भुतकर on 15 September, 2013 - 23:54

सकाळी ७ चा गजर झाला आणि आरती घाईघाईने उठली. आज औफिसमध्ये एक महत्त्वाची मिटींग होती. पटापट आवरून तिने कंपनीची बस पकडली. ती बसमध्येच कामांची यादी उघडून बसली. मिटींगनंतर जो काही निर्णय होईल तो सांगण्यासाठी सिनीयर म्यनेजर बरोबर अजून एक मिटींग. वैतागून तिने डायरी बंद केली. या मिटिंगमुळे काम करायला वेळच मिळायचा नाही, मग संध्याकाळी उशीरपर्यंत थांबून कामं पूर्ण करायला लागायची. असो. आरती एका सॊफ्ट्वेअर कंपनीत नोकरी करत होती आणि बाकीच्या लाखो लोकांप्रमाणेच तिलाही दिवसाचे १२-१४ तास नोकरीत घालवायची सवय लावून घ्यायला लागली होती. तशी ५-६ तर वर्षात कुणालाही होतेच म्हणा.एकेक पायरी चढत ती आज प्रोजेक्ट म्यनेजर झाली होती.
कंपनीच्या मुंबई शाखेच्या नेटवर्क यंत्रणेसाठी एका कंपनीची गरज होती. आज-काल या मोठ्या कंपन्या असेच करतात ना, काही काम छोट्या कंपनीला देऊन टाकायचे. तर आज काही छोट्या कंपन्यांचे प्रमुख आपले मुद्दे मिटिंगमध्ये मांडणार होते. त्यापैकी एका कंपनीची निवड होणार होती. आरती निवड समिती मध्ये असल्याने आज तिथे हजर असणं तिला आवश्यक होतं. काही महत्वाचे मुद्दे तिने काढून ठेवले होते. सगळे जण एका रुममध्ये जमले आणि बरोबर ९ वाजता एका कंपनीचा प्रमुख आपले प्रेझेंटेशन घेऊन समोर उभा राहिला. त्याने तयारी तरी चांगली केली होती. आपला टाय सावरत त्याने आजपर्य़ंत त्यांच्या कंपनीने केलेली कामे दाखवायला सुरुवात केली. मग त्यांना मिळालेले प्रशस्तीपत्र, त्यांच्या वेगवेगळ्या सुविधांचे दरपत्रक, इति. सगळ्यात शेवटी प्रश्नोत्तरे. सर्वांचा साधारण हाच साचा होता. दुपारपर्यंतचा वेळ कसाबसा गेला,जेवणानंतर मात्र आरतीला पेंग आवरेना. अगदी तिची मान खाली पडणार, तेवढ्यात 'तो' आला आणि तिची झोप उडाली......
'तो', अगदी त्याला दिलेल्या वेळेवर हजर झाला होता, आपल्या एका हातात संगणक व दुसर्या हातात कसलीशी फाईल घेऊन. तिला एकदम 'धस्स' झालं होतं. त्याने मस्त काळा सुट, शुभ्र शर्ट,लाल टाय घातला होता. त्याच्या उंचीमुळे अजूनच शोभून दिसत होता त्याला तो सूट. मग त्याने हसतच सर्वांशी हात मिळवला, तिच्याशीही व स्वत:ची ओळख करून दिली.I am अविनाश.....from ....., तिला पुढचं काही ऎकू आलं नाही, हातही हवेतच राहीला नंतर थोडा वेळ. मग त्याचं प्रेझेंटेशन सुरु झालं. अगदी खेळकरपणे, स्पष्ट शब्दात त्याने स्वत:च्या कंपनीची माहीती दिली, त्यांचं काम पाहून तर सगळेच प्रभावित झाले होते. मग त्याने आपल्याला आरतीच्या कंपनीबद्दल काय माहिती आहे, त्यांचं सध्याचं नेटवर्क, त्यातल्या त्रुटी, सुधारणा आणि ते करण्यासाठी लागणारे वेळेचे नियोजनही दाखवले तेव्हा मात्र त्यालाच हे काम मिळणार यात शंका राहिली नव्हती,तो गेल्यानंतर निवडसमितीने थोडी चर्चा केली आणि आपला निर्णय पक्का केला. पण.... आरतीला उगाचच अस्वस्थ होत होतं. एकीकडे आनंद होता त्याचं यश पाहून आणि थोडी अनिच्छाही....तिला तो पुन्हा एकदा इतक्या जवळ नको होता......

कसाबसा दिवस संपवून ती घरी निघाली. बसचा प्रवास तसा वैतागवाणाच, पण आज तिचं मन मागं पळत होतं.... ७-८ कदाचित १० वर्षं मागं, जेव्हा कॊलेजमध्ये ते दोघे एकमेकांना पहिल्य़ांदा भेटले.
"असा एखादा दिवस येतो
काही विशेष न वाटता संपणारा
पण नंतर मात्र
खूप काही देऊन जाणारा अन....घेऊनही...
असाच होता तो दिवस
तुझी माझी ओळख होण्याचा
तशी नेहेमीचीच होती पद्धत भेटण्याची
तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती
पुढील सुखद भविष्याची....
जशा होऊ लागल्या
नियमित आपल्या भेटी
मन शोधू लागलं
शब्द तुझ्याशी बोलण्यासाठी
तू असायचास तुझ्याच विश्वात रमलेला...
वाटायचं काहीच अडत नसेल
तुझं माझ्यावाचून
मनातल्या गोष्टी राहायच्या मनातच राहून"

तिच्या जुन्या एका कवितेतील शब्द तिच्या ओठावर आले आणि ती काहीतरी आठवून एकटीच हसली.त्याचं ते मित्रांच्या गर्दीतून सुटका करून घेत,थापा मारत तिच्याकडे येणं तिला फार आवडायचं.
Happy

"अखेर तो दिवस आला...
मला उंच आकाशात घेऊन जाणारा
प्रशस्त लाटांवर मनसोक्त उडवणारा...
आणि आनंदाची भरती आणणारा
तुझ्या मनातील गुपित मी समजले होते
तुझी पसंद तर मीच होते.....
ठाऊक नाही मला
तुझ्या स्वप्नातील परी कशी आहे
पण मी तरी केव्हांपासून तुझीच आहे
तुझ्या होकाराने,
तुझ्या सोबतीने मला खूप काही दिलं
तेव्हापासून सुरवंटाचं फुलपाखरू झालं..."

आरतीच्या डोळ्यांत पाणी दाटलं. तिला आठवत होतं, त्याचं मनमोकळं हसू, काही करून दाखवण्याची जिद्द आणि तिच्यावरचं प्रेम....त्यांचे मित्र-मैत्रिणी म्हणायचे 'You are made for each other'. तसेच ते होतेही, एकमेकांना पूरक, एकमेकांना पूर्ण करणारे.काही गोष्टींवर त्यांचे वादही व्हायचे म्हणा, उशीरा येणं, नीट न आवरणं, कुठल्याही बाबतीत गंभीर नसणं हा त्याचा स्वभाव तिला आवडायचा नाही तर तिचं अगदीच नीटनेटकं राहणं, उगाचच वाद घालणं आणि स्वत:च्या करिअरबद्दल अजिबात विचार न करणं त्याला आवडायचं नाही. तिला वाटायचं तो नोकरी करेलच ना, मी मस्त घरी राहून एक चांगली गॄहीणी होणार, त्याचं घर सांभाळणार.... आपलं छोटसं जग फुलवणार. कॊलेजच्या शेवटच्या वर्षी मात्र त्याने नोकरी न करता मी स्वत: व्यवसाय करणार हे सांगितलं तेव्हा वादाला तोंड फुटलं. ते वर्षही संपलं पण त्याच्या त्या हट्टाला, त्याच्या अपयशाचा राग तिच्यावर काढण्याला ती कंटाळली आणि तो ही तिच्या स्वप्नाळू स्वभावाला आणि ते दोघे दुरावले !

"स्वप्नांची जी दुनिया त्यांनी सजविली होती
तिथले काटे त्यांनी पाहिलेच नव्हते.
वास्तवाचे भान त्यांना होतेच कुठे?
स्वप्नांचे रंग केव्हाच उडून गेले
विरहाचे काटे पंखांना फाडून गेले
फुलपाखरू आता स्वत:लाच विचारत राही.....
प्रेम करून त्याला मिळालं का काही?"

खूप दिवसांनी तिची उशी आसवांनी भिजली होती आणि तिला जाणवलं की किती बदलली होती ती या ४-५ वर्षात ! ती रडत नसली तरी मनमोकळं हसलीही नव्हती. तिला जुनी ती आठवून वाटलं मी ती नाहीयेच जिला अविनाश भेटला होता, जी त्याला आवडायची.
दुसया दिवशी सकाळी डोळ्यांत कालची रात्र अजून तशीच होती, आठवणींची. एकीकडे तो भेटावा असही वाटत होतं पण भेटला तर काय बोलणार हे ही कळत नव्हतं. नजर पुन्हा एकदा भिरभिरत होती आणि कान कुणाच्यातरी चाहुलीकडे लागले होते. तो आज आला नव्हता. तिने त्यांच्या समितीमधल्या माणसाकडे उगाचच चौकशी केली कालच्या मिटींगबद्दल... आडोश्याने त्याच्याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला. विशेष काही माहिती न मिळाल्याने निराश होऊन ती कामाला लागली. कशीबशी रोजची कामे उरकून आज ५ वाजताच घरी जायचा तिने निर्णय घेतला. दुपार उलटून गेली, एकदम तिला आवाज आला, 'खूप काम आहे का?' तिला तो आवाज ऎकून श्वास एकदम थांबतो की काय असं वाटलं. किती तरी वेळा तिने त्याचा आवाज आठवण्याचा प्रयत्न केला होता, आणि तो कधी ऎकू यावा म्हणून तिचे कान अगदी आतूर झाले होते. तिने आपला कापरा आवाज सांभाळून उत्तर दिलं 'नाही,असंच काही नाही.' त्याच्या कडे पाहणंही किती अशक्य होतं तिच्यासाठी. विश्वासच होतं नव्हता की तोच आहे, ज्याची आठवण नकॊ म्हणून तिने कित्येक वर्षात त्याचा एकही फोटॊ पाहिला नव्हता, त्याचे डॊळे पुन्हा एकदा माझ्या मनात काय चाललंय याचा वेध घेतील की काय असं वाटून तिने चेहरा संगणकाकडे वळवला.
त्याने मग स्वता:च शेजारची खुर्ची ओढली आणि तो तिच्या जवळ बसला. आपल्या श्वासांचा आवाजही त्याला ऎकू जाईल की काय या भीतीने तिला काहीच सुचत नव्हतं. तो म्हणाला, 'बस का आता ओळख पण देणार नाही का? माहितेय आपण प्रोजेक्ट म्यनेजर आहात इथे. पण म्हणून जुन्या मित्रांना विसरायचं?'. ती कसंबसं हसली. तो,' चल, सोड ते काम आता, किती लक्ष आहे ते दिसतंय मला तुझं. आपण मस्तपैकी चहा घेऊ खाली जाऊन.' त्याचं ते हक्काने बोलणं काही बदललं नव्हतं. तिने पटकन संगणकाला कुलूप लावलं आणि ते दोघं लिफ्टने खाली जावू लागले. त्याच्या जवळिकीनं तिला अजूनच अस्वस्थ केलं होतं. क्य़ंटिनमध्ये 'दोन चहा' सांगून ते एका टेबलपाशी बसले. कोण बोलणार, काय बोलणार, तिला ओळखीचे लोक येत-जाताना उगाचच चोरट्यासारखं वाटत होतं.

'बदललेली नाहीस तू अजिबातच', तो हसून म्हणाला.
ती,'ह्म्म्म?'.
तो,' अगं, मी बरोबर असताना आजही चोरट्य़ासारखी होणारी तुझी नजर तशीच आहे.'

ती गप्प. 'कालच्या कामाचं काय झालं?' काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली. तो उत्साहाने सांगू लागला की आज 'डील' कशी 'फायनल' झाली ते. त्याच्या डोळ्यांतली चमक अजून तशीच होती आणि एखादी गोष्ट सांगायची त्याची 'स्टाइल' सुध्दा. त्याची गोष्ट संपली, तसाच चहाही.

ती,' मला निघायला हवं, सहाची बस पकडता येईल म्हणजे'.

तो बरं म्हणाला खरं,पण बसमध्ये बसल्यावर तिला त्याचा तो हिरमुसला चेहेरा आठवला आणि कसं हसू फुटलं. Happy आज जुन्या आठवणी जरा जास्तच वेगात होत्या कालच्या पेक्षा. त्याचं हसणं, दिसणं, रुसणं,बोलणं सगळं-सगळं तिला डोळ्यात साठवायचं होतं,पुन:पुन्हा आठ्वायचं होतं. कॊण जाणे परत कधी भेट होईल. रात्र स्वप्नात सरली आणि सकाळ सौंदर्यप्रसाधनात गेली. पुन्हा एकदा प्रेमात पडावंस वाटत होतं. त्यात जर गेल्यागेल्याच अविबरोबर मिटींग असेल तर? Happy का नाही वाटणार? तिला असं आवरून आलेलं पाहून त्याने पुन्हा एकदा 'ते' स्माईल दिलं होतं.मिटींगमध्ये लक्ष होतं कुणाचं?

१२ वाजता त्यानेच विचारलं,' जेवायला कुठे जाता येईल इथे?'

ती,' मी डबा आणलाय, प्रॊब्लेम नसेल तर वाटूनच खावू.'

त्याल एकदम तिच्या त्या' स्वप्नातल्या घरकुलाची' आठवण झाली. 'मी रोज तुला डबा बनवून देत जाईन, तुला काय हवं ते सांग ना?........' आणि बरंच काही. आज जेवताना बोलण्याची तिची वेळ होती. ते वेगळे झाल्यानंतर तिने काय केलं,मुंबईला कशी आली, घरी सर्व कसे आहेत, मग त्याची कहाणी, त्याच्या व्यव्सायातील अपयशाची, खाच-खळग्य़ांची आणि यशाचीही....तो मध्येच म्हणाला, 'जेवण मस्त झालंय. मजा आली.' त्याच्या चेहेर्यावरचे तृप्तीचे भाव तिला सुख देऊन गेले. त्याचा फार अभिमान वाटत होता तिला. 'बरीच कामं आहेत', असं म्हणून दोघे उठले. दिवसभरात एकमेकांना काम करताना पाहून झालेले प्रत्येक बदल ते टिपत होते. त्याचा कामातला नीटनेटके पणा पाहून ती हसली. तो,'तू नसताना, तू सांगितलेल्या गोष्टीच जास्त शिकवून गेल्या. नसूनही सोबतच होतीस तू माझ्या.' ती अवघडली.

चार दिवस उलटले, अगदी पटकन उडून गेले. संध्याकाळी त्याला भेटणं आता अपरिहार्य होतं. पण तो आज आला नाही, आणि पुढचे चार दिवसही. तिची अस्वस्थता वाढतच होती. शेवटी नाईलाजाने तिने त्याच्या कंपनीत फोन केला.त्याचा मोबाईल नंबरही आपण घेतला नव्हता याची चिडचिड करत तिने तोही मागून घेतला. त्याचा फोनही लागला नाही दिवस्भरात. बसमध्ये बसलेली ती खाली उतरली, बरीच फोनाफोनी करून तिने त्याचा पत्ता घेतला आणि कसलाही विचार न करता ती रिक्षात बसली. तासाभराने त्याच्या घरी पोचल्यावर जेव्हा तिने त्याला पाहिले, पळतच जाऊन त्याला मिठी मारली होती. त्याच्या चेहेर्यावर मिष्कील हसू होतं. तिने चिडचिड केल्यावर सांगावंच लागलं त्याला....

"मला माहीत होतं तू येणार ते,म्हणूनच तर घरी थांबलॊ होतो....तू किती बदलली आहेस ते पहायचं होतं. आधी दोन तासात आली असतीस आज चार दिवस लागले. Happy आणि आधीचाच मी असतो तर लगेच येऊन भांडलो पण असतो.अपेक्षांभंग झाला तर त्रास होतोच, पण कोलेजातल्या प्रेमकथा आयुष्याच्या गणितात बसत नाहीत एवढं तर नक्की कळलंय मला आणि तुलाही. पण गणित बदललं म्हणून प्रेम कमी होतं नाही.माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्यासोबतच आयुष्य जगायचं आहे."

त्याच्या मिठीत विसावल्यावर तिला जाणवलं, ते खरंच 'Made for each other' होते. काळाने त्यांना 'संयम' मात्र जरूर शिकवला होता.

-विद्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users