शहर - २ (स्फुट )

Submitted by उद्दाम हसेन on 3 September, 2013 - 14:44

तू ओळखशील का मला ?

या प्रश्नाशी थबकलो परवा. आरशातल्या किती तरी बदलाच्या खुणा रोजच्या सवयीच्या झाल्यात. काही वाटत नाही त्याचं. पण इतक्या वर्षांनी कुणी पाहीलं तर ? अवघड आहे. बदल अटळ असतात अशी मनाची समजूत काढत बसतो.

तू तशीच असणार.. खात्रीने !

नाहीच बदलत काही माणसं. सत्य तरी कुठे बदलतं ? त्याचे भ्रम फसवे असतात. ते दडपल्यासारखं वाटतं. दृष्टीकोण बदलतात आणि अनेक कंगोरे दिसू लागतात. आपण त्या प्रत्येकाला सत्य समजतो.
एक तुझं सत्य, एक माझं सत्य, एक त्यांचं सत्य आणि एक.... सत्य !
नागडं उघडं फक्त सत्य. न बदलणारं.
आणि तू पण न बदलणा-या सत्याकडची.

हा फ्लायओव्हर झालाय ना तिथं होती बाग. सांगून खरं वाटायचं नाही. काम चालू होतं तेव्हां उखडली गेली. दंगल झाली. पण तरी वस्ती होती.
शेवटच्या चाळीतली सत्ताराची हमिदा आलेली संध्याकाळी या बाजूला.
नंतर आलीच नाही पुन्हा घरी.
पोलीस व्हॅन्स आलेल्या. चौकशी, लाठीचार्ज. इथंच सापडली होती ना ?
छिन्नविछिन्न अब्रूच्या कलेवरात अवघडलेली. कुणी काय म्हटलं, कुणी काय.
सगळंच खरं वाटत होतं.
तू हळहळलेलीस. पेटून उठलेलीस..
सत्यासाठी !

नको म्हणाले होते सगळे.
मोठे लोक आहेत. काही होणार नाही. आणि तुझा निर्धार पक्का होत गेलेला.

फ्लायओव्हर पूर्ण झालाय आता.
बेफाट वाहनं धावतात. जबरदस्त वेग आलाय शहराला. कुणाला वेळ नाही. कुणालाच. थांबणा-या क्षणांसाठी कुणीच थांबत नाही.

मी तरी कसा अपवाद असेन ?
हारणा-या बाजूला किती काळ थांबायचं ?

शेवटी, हे शहर थांबत नाही कुणासाठी..
अगदी सत्यासाठीही..

तू खरंच ओळखशील मला ?

- Kiran..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users