परमपूज्य आचार्य श्री शंकराचार्य कृत कनकधारास्तोत्र चा मराठी अनुवाद

Submitted by विनायक. दि.पत्की. on 12 August, 2013 - 05:58

प्रत्येक जण समाधानाचा (वैभवाचा) भक्त असतोच.म्हणजेच कोणी कितीही मोठा वा छोटा असो सर्व जण वैभव देवतेचे (महालक्ष्मीचे) भक्त असतातच .आपण सर्व जण त्या मंगलमय महालक्ष्मी चे भक्त आहोतच. आता प्रत्येकाची वैभवाची व्याख्या वेगवेगळी असू शकते त्या नुसार माता लक्ष्मी हि अनेक रूपे धारण करून आहे.जसे कि धनलक्ष्मी,सौभाग्यलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,वैभवलक्ष्मी,संतानलक्ष्मी,वैराग्यलक्ष्मी,... या प्रमाणे ज्याला जे हवे आहे ,जे रूप आवडेल त्या सर्व ठिकाणी ती श्री लक्ष्मी माताच प्रत्येक भक्ताला त्या रुपात आनंद देतच असते तिच्या कृपावृष्टीत अखंड वृद्धी होत राहो. जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होवो (जसे कि ऐकण्यात /वाचण्यात आले कि स्वीस बँकेत पडून असलेला भारतीयांचा पैसा जर पूर्ण भारतात आणता आला तर प्रत्येक भारतीयाला ३ लाख रुपये मिळतील व भारताला नेत्र दीपक प्रगती साधता येईल तेव्हा आमच्या नेत्यांना या भागीरथी प्रयत्नांना यश येवो सर्व भारतीय सुखी होवोत हि जी अप्राप्त लक्ष्मी परकीयांच्या ताब्यात आहे तिची प्राप्ती होवो ) या अत्यंत पवित्र भावनेने जर सर्वांनी याचे नित्य भक्ती पूर्वक पठण केले तर ती दयाळू माता आपल्या सर्वांवर निश्चितच कृपा करेल. सर्वत्र दारिद्रयाचे निर्मुलन होऊन सुख शांती नांदो हा भाव जागृत होउन माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी सर्वांवर रहावी या साठीच परमपूज्य आचार्य श्री शंकराचार्यांनी कनकधारास्तोत्राची रचना केली आहे असे दिसते. याचे नित्य पठण करून अनुभव घेऊ या . मुळ स्तोत्र संस्कृत मध्ये जे आहे त्याचा मराठी अनुवाद स्तोत्ररूपी करण्याचा हा माझा प्रयत्न आहे.एकंदरीत स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे . सुज्ञ/तज्ञ मान्यवरांनी आवशक त्या गोष्टी जरूर सांगाव्यात
परमपूज्य आचार्य श्री शंकराचार्य कृत कनकधारास्तोत्र चा मराठी अनुवाद
उमलत्या कळ्यांनी तमाल अलंकृत | जैसे भ्रमरी तेथे होते आश्रित || .
श्रीहरी रोमांच आभूषणांनी पुलकित | तेथे लक्ष्मी कटाक्षलीला तद्वत नित्य वर्षत ||
मंगलाधीष्ठीत लक्ष्मीची ती कटाक्षलीला | तद्वतच राहो मजवरी नित्यमंगला ||१||
गुंजारव विकसित कमलावरी भ्रमराचे | क्षीरकन्या अवलोकित मुखकमल मुरारीचे ||
असावा तोची कटाक्ष लज्जायुक्त | प्राप्त होण्या मज धनवैभव नित्य ||२||
श्रीहरी देई शोभासामर्थ्य देवाधीपतीस | लक्ष्मी देई आनंद त्या मुररिपू श्रीहरीस ||
त्याच अत्यानंदी नयन कटाक्षाने| तू क्षणीक पहावे मजकडे कृपादृष्टीने||३||
आनंदकंद मुकुंद निद्रिस्त शेषावर | अनिमेश लक्ष्मी लुब्ध त्या सौंदर्यावर ||
तेच आनंदविभोर अर्धोन्मीलित नयन | करोत मला ऐश्वर्य संपन्न ||४||
मधू दैत्याच्या वध करी | तो नीलकौस्थुब विभूषित श्रीहरी ||
वक्षी शोभतसे इंद्रनिलमयी हारावली | हृदयी त्या निर्मिते प्रेम कमलनिवासिनी.||
त्याच कलमनिवासिनीची कटाक्षमला | सदोदित कल्याणकारी असावी मजला ||५||
तेजपुंज घननील कैटभारीवक्षी विराजे| श्री लक्ष्मी विद्द्युल्तेपरी तेथेची साजे ||
भार्गवकन्या विश्वमाता परमपूजनीय मूर्ती | करो सदोदित माझ्या कल्याणाची पूर्ती ||६||
सागर कन्या लक्ष्मीचा मंदालस | अर्धोन्मीलित दृष्टीप्रभाव आहेच खास ||
मधूमर्दनकारी श्रीहरी मांगल्याधिष्ट | त्या हृदयी प्रथमच मदन समाविष्ट ||
त्या लक्ष्मीचीच मृदू,सोम्य,दृष्टी,|करो मजवर हमेशा दयाद्रकृपा वृष्टी ||७||
हे लक्ष्मी हरीप्रणयिनी तुझी दया | असे अनुकूल पवन रूपी माया.||
मायेने कर हा दुष्कर्मी उन्हाळा दूर | त्यात दारिद्रयाने विषादग्रस्ताची भर ||
कृपेसाठी आर्त मी चातकशिशु सहान | तू मेघ वर्षावे धनरूपी जलधारा समान ||८||
तुझी दयाद्र दृष्टी देण्या स्वर्गपद सक्षम |असो इष्ट भक्त कोणी मंद वा अकार्यक्षम ||
तुझी कृपादृष्टी कमळांतरगत कोमलते समान |हे पद्मासना देवी आता करी समृद्धी महान||९||
महालक्ष्मी तू वाग्देवता सृष्टीउत्पन्न काळी |तूच वैष्णवीशक्ती पालन क्रीडेचे वेळी ||
तू पत्नी सुंदर गरुडध्वज भगवान विष्णूंची |शाकंबरी प्रलयकाळी चंद्रशेखर शंकराची ||
त्रिभुवन गुरु भगवान नारायण | त्यांच्या समवेतच तू विराजमान ||
त्यांच्या नित्ययौवना कोमलांगी प्रेमिकेला | नमस्कार माझा त्या श्री लक्ष्मीला ||१०||
नमस्कार त्या लक्ष्मीस | रमणीयगुण महासागरास ||
जी देते शुभ कर्माचे फल उत्तम | वेदविद्या स्वरूप अशी ती सर्वोत्तम ||
नमस्कार रतीरुपस्थित शुद्धप्रेमानंद मातेस | कमलसदनात असे जीचा नित्य निवास ||
नमस्कार नानाविधीशक्ती रूपअधिष्टित मातेस | पुरूषोत्तमाच्या प्राणप्रिय पत्नीस ||
नमस्कार सर्वसमृद्धीस्वरुप विद्यमान मातेस | कमलकांती आरक्तवर्ण मुखप्रभा लक्ष्मीस ||११||
नमस्कार क्षीरसागर सम्भूता सोम,सुधा भगिनीस | नमस्कार नारायणाच्या प्रियअर्धांगिनीस ||१२||
पूज्य कमलाक्षी वंदने तुझ्या चरणीची | नांदीच साम्राज्यसंपत्ती ,इंद्रीयानंदाची ||
जडो छंद वंदनाचा तुझे मंगलचरण | मिळेल मोक्ष वैभव होते पापहरण ||१३||
लाभे कृपाकटाक्ष विधीपूर्वक उपासनेला | प्रसंन्नता तुझी देते पूर्णत्व मनोरथाला ||
त्या श्रीहरी हृदयेश्व्ररीचे गुण मी गातो | श्री लक्ष्मीला मी अनन्यतेने भजतो ||१४||
कमल निवासिनी हरिप्रिय कांते | धवलवस्त्र, गंधमाला तुला शोभते ||
हे देवी लक्ष्मी कमलधारिणी सौंदर्यवती |वैभव प्रदायिनी प्रसन्न हो मजवरती ||१५||
जलनिर्मळ स्वर्गगंगेचे स्वर्ण कलशात धरुनी |दिग्गज करिती अभिषेक तुजवरती नित्य दिनी ||
सागर कन्या जी विश्वाधीपती श्रीहरीची गृहिणी | तिला प्रात:काळी मी वंदितो प्रतिदिनी ||१६||
देवी श्रीलक्ष्मी पुंडरीकनयन श्रीहरीची प्रियकांता |तू महापूर करुणेचा मी अग्रगण्य दरिद्री आता ||
मी गरीब तुझ्या दयेला योग्य आहे |तू मज कडे आता कृपा दृष्टीने पाहे ||१७||
जे नित्य पठीती हे स्तोत्र भगवती श्री लक्ष्मीचे |वेद्त्रयी स्वरूपा त्रिभुवन माता वाढवी ऐश्वर्य तयांचे ||
पावती श्रेष्ठता सद् गुणे होती भाग्यवान |विद्वाना त हि मिळेल त्यांना मोठा मान ||१८||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कनकधारा स्तोत्र मराठीत आणल्याबद्दल धन्यवाद !!

कनक धारा स्तोत्र पं. पु. शंकराचार्यांनी रचण्यामागची कथा विषेश आहे.

शंकराचार्य नेहेमी प्रमाने भिक्षा मागण्यासाठी एका घरी गेले असता एका वृद्धेने दार ऊघडले, भिक्षा द्यायला तिच्याकडे काहीही नव्ह्ते, त्यामुळे हिरमूसलेली ती वृद्धा, स्वामींना पसरदारी घेउन गेली, तेथे एका आवळ्याच्या झाडाला काही आवळे होते , तेच तीने स्वामींना अर्पण केले,

त्या स्त्रीची गरीबी पाहुन स्वामींनी तिथेच श्री लक्ष्मी मातेवर स्तोत्र लिहीले, लक्ष्मिमाता प्रसन्न होऊन त्या जागी स्वर्णमुद्रांचावर्षाव झाला.

उत्तम. आवडले...

काही सूचना.
तद्वतच राहो मज नित्यमंगला |१| - येथे "मजवरी" हवे आहे असे वाटते.
करोत मला ऐश्वर्य सम्पनास पात्र |४| - येथे सम्पन्न हवे आहे का?

अधिक नंतर सांगतो.

रश्मी..,limbutimbu ,विवेक नाईक,सुसुकु,
सप्रेम नमस्कार. तुमचा उत्तम प्रतिसाद निश्चितच आपल्या सर्वानाच वैभव संपन्न करो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी विनंती,सुसुकु च्या सुचनेचे मनपूर्वक स्वागत करून बदल साधला आहे ,
धन्यवाद