गुणगुणारा भोवरा

Submitted by मधुरा आपटे on 9 August, 2013 - 07:01

दोस्तांनो तुमची शाळा किती छान आणि रंगेबीरंगी असते की नाही? सगळीकडे छान छान चित्र, त्या चित्रातले छान छान रंग, मस्त असतात नै? पण तुमच्या शाळेत एक खास गोष्ट असते. कोणती माहिती आहे? खेळण्यांचं कपाट! वेगवेगळी खेळणी त्या कपाटात असतात. ससे असतात, बाहूल्या असतात, भातुकली असते. हो की नाही? पण ह्या गोष्टीतल्या कपाटात काय आहे माहिती आहे? गुणगुणारा भोवरा. एका पायावर फिरणारा, लाल, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाचा तो भोवरा कपाटातल्या सगळ्या खेळण्यांचा खूप लाडका होता. एका पायावर फिरताना तो गुणगुणायचा. आणि ते त्याचं गुणगुणं सगळ्या खेळण्यांना फार आवडायचं. ती सगळी खेळणी त्या भोव-याच्या पाठीवर बसायची आणि भोवरा जोरात एक गिरकी घेऊन सगळ्यांना फिरवून आणायचा. सगळ्या खेळण्यांना त्याच्या पाठिवर बसून फिरायला फार आवडायचं. छोटू ससा, चिंटू माकड, बाहूली ताई, टेडी बिअर, भूभू कुत्रा सगळे त्या भोव-याचे खूप चांगले दोस्त होते. तुम्ही कसे, खेळून झालं की आपापली खेळणी कपाटात ठेवून देता की नाही? तसेच या गोष्टीतली मुलं पण करायची. शाळा संपली की सगळी मूलं ती खेळणी कपाटात ठेवून द्यायची. आणि सगळे आपापल्या घरी गेले की ती खेळणी कपाटातुन खाली उतरायची. आणि खेळायला लागायची. कारण त्यांना पण तुमच्यासारखं खेळायला फार आवडायचं!

एके दिवशी काय झालं माहिती आहे. शाळेतुन मुलं घरी गेली आणि सगळी खेळणी नेहमीप्रमाणे खाली खेळायला आली. सगळी खेळणी त्या गुणगुणा-या भोव-याच्या पाठीवर बसली. आणि भोव-याने एक छान गिरकी घेतली. पण अरेच्चा! भोवरा काही नेहमीप्रमाणे गुणगुणलाच नाही. भोव-याने परत एकदा गिरकी घेतली. पण भोवरा तरी गुणगुणलाच नाही. हे कसं झालं? सगळी खेळणी आश्चर्याने भोव-याकडे बघायला लागली. त्यांना काही कळेच ना की भोव-याला नक्की काय झालं? आज तो गुणगुणत का नाही? सगळे विचार करायला लागले. त्यांनी भोव-याला विचारलं, ‘अरे भोव-या, काय झालं तुला? तु आज गुणगुणत का नाही?’
‘अरे हा टेडी बिअर बसला होता ना काल त्याच्या पाठीवर. पाठ मोडली असेल त्याची.’ चिंटू माकड टेडीला चिडवण्याच्या सुरात म्हणाला.
‘आणि तुझ्या भल्या मोठ्या शेपटीला अडकून काल भोवरा पडला होता. पाय दुखत असेल त्याचा.’ टेडी रागातच चिंटूला म्हणाला.
‘अरे, तुम्ही भांडू नका. भोव-या, सांग ना! आज गुणगुणत का नाहीयेस तु?’ बाहूलीताईने काळजीच्या सुरात भोवर्‍याला विचारलं.
‘मला ही काही कळत नाहीये गं!’ भोवरा जड आवाजात काकुळतीने म्हणाला. ‘माझं गुणगुणच बंद झालय. मी कितीही प्रयत्न केला ना, तरी गुणगुणता येत नाहीय मला’ त्याचा आवाज बसला होता. त्यामुळे त्याला नीट बोलताही येत नव्हतं. बिच्चारा भोवरा! खूप उदास झाला होता तो. त्याचं गुणगुणच बंद झालं होतं ना! ‘अरेच्चा, आता काय करायचं?’ सगळ्याच खेळण्यांना प्रश्न पडला. जरका भोवरा गुणगुणलाच नाही. तर त्याच्या पाठीवर बसून फिरण्यात काही मजाच नाही. मग सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण भोव-याला त्याचं गुणगुणणं परत करायचं. कारण भोवरा गुणगुणलाच नाही तर तो आनंदी रहाणार नाही. आणि आपल्याबरोबर खेळू देखील शकणार नाही. पण ह्याचं गुणगुणणं आणणार कुठुन?
‘मला माहिती आहे, भोव-याचं गुणगुणणं आपल्याला कुठे मिळेल ते.’ बाहूलीताई डोळे मिचकावत सगळ्यांना म्हणाली. ‘आपल्या शाळेच्या समोरच्या झाडावर, मधमाश्यांचं पोळं आहे. त्या मध गोळा करताना नेहमी गुणगुणत असतात. आपण त्यांच्या राणीकडे जाऊ. त्या देतील त्यांचं गुणगुणं भोव-याला.’ सगळ्यांनी आनंदाने माना डोलावल्या. मग खेळण्यांनी ठरवलं की बाहूली ताई, छोटू ससा, चिंटू माकड, टेडी बिअर आणि भूभू कुत्रा ह्या सगळ्यांनी मधमाश्यांकडे जाऊन भोव-याचं गुणगुणं आणायचं. आणि बाकीच्यांनी तोपर्यंत भोव-याची देखभाल करायची. मग एकेक करुन सगळे शाळेच्या खिडकीतुन पाईप उतरुन खाली आले. मधमाश्यांकडे गेले. आणि मधमाश्यांच्या पोळ्याच्या दारावर बाहूलीताईने टक टक केलं. एका शिपाई मधमाशीने दार उघडलं. ‘काय हवं आहे तुम्हाला?’
बाहूलीताई म्हणाली, आम्हाला मधमाश्यांच्या राणीला भेटायचं आहे. आमचं खुप महत्त्वाचं काम आहे तिच्याकडे’. ‘ठिक आहे.’ असं म्हणून शिपाई मधमाशी सगळ्या खेळण्यांना राणी मधमाशीकडे घेऊन गेली. सगळ्या खेळण्यांनी राणी मधमाशीला अभिवादन केलं आणि सांगितलं की ‘आमचा मित्र भोवरा आता गुणुगुणु शकत नाही. तेव्हा मधमाश्यांनी त्यांचं थोडसं गुणगुणं भोव-याला द्यावं. जेणेकरुन तो परत पहिल्यासारखा होईल.’
राणी मधमाशी म्हणाली, ‘आम्ही नक्की आमचं गुणगुणं भोव-याला देऊ. पण त्याआधी तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल.’
‘कोणतं राणीसाहेब?’ भूभू कुत्र्याने विचारलं. सगळ्यांनाच उत्सुकता होती की राणी मधमाशी आता काय काम सांगणार.
राणी मधमाशी म्हणाली की ‘आमच्या झाडावर टोक टोक नावाचा सुतारपक्षी येतो. तो आम्हा मधमाश्यांना खूप त्रास देतो. तेव्हा तुम्ही सगळेजण त्याच्याकडून वचन घेऊन या की तो यापूढे परत कधी आम्हाला त्रास देणार नाही. तरच मी भोव-याला आमचं गुणगुणणं देईन.’
सगळे विचारात पडले. आता काय करायचं? पण टोक टोक सुतार पक्ष्याकडून वचन आणण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी सगळे तयार झाले आणि बुंध्याला असलेल्या त्याच्या ढोलीत गेले. टोक टोकने सगळ्यांचं अगदी आदराने स्वागत केलं. खेळण्यांनी सगळी घडलेली गोष्ट सांगितली. आणि त्यावर चिंटू माकड म्हणाला, ‘हे बघ टोक टोक. आमच्या मित्राच्या गुणगुण्याचा प्रश्न आहे रे! तु आम्हाला वचन नाही दिलस तर भोवरा कधीच गुणुगुणु शकणार नाही.’
टोक टोकने विचार केला की वचन द्यायला काहीच हरकत नाही. पण त्याबदल्यात त्याने खेळण्यांना एक काम करायला सांगितलं की खेळण्यांनी विसराळू खारुताईकडून फळं आणून दिली पाहिजेत. सगळे तयार झाले आणि तडक विसराळू खारुताईकडे गेले. सगळे तिच्या ढोलीत गेले आणि बघतात तर काय, ढोलीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. सगळ्या सामानाची उलथापालथ झाली होती. खारुताई तिच्या ढोलीत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. खारुताई तिच्या नावाप्रमाणे खरच खूप विसराळू होती. ती झाडावरची फळं, दाणे घेऊन यायची आणि लपवून ठेवून द्यायची. पण त्यानंतर मात्र तिला आठवायचच नाही की तिने फळं आणि दाणे कुठे ठेवलेत. ती दरवेळी विसरायची. सगळ्या खेळण्यांनी तिला आपल्या मित्राची हकिकत सांगितली. आणि खारुताईने टोक टोकला फळं आणून देणं किती गरजेचं आहे, हे ही सांगितलं.
‘मी फळं आणि दाणे दिले असते रे, पण मला माहितीच नाहीय की मी फळं आणि दाणे कुठे ठेवलेत. कारण मला आठवतच नाहीय’ विसराळू खारुताई काकुळतीने म्हणाली.
‘मग आम्ही तुला मदत करु. आम्ही सगळे तुला फळं आणि दाणे शोधण्यात नक्की मदत करु.’ छोटू सश्याने खारुताईला सांगितलं.
‘सांग बघू, कुठुन शोधायला सुरुवात करायची ते.’ टेडी बिअर म्हणाला. मग खारुताईने ती जिथुन फळं आणि दाणे आणते त्या सगळ्या जागा सांगितल्या.
‘हं. म्हणजे त्याच्या आसपासच कुठेतरी तु लपवलेलं असणार.’ छोटू ससा विचार करत म्हणाला. छोटूने एक युक्ती शोधली. त्याने त्याच्या दोस्तांना सांगितलं ‘हे बघा, आपण जरका वेगवेगळे होऊन शोधलं तर आपल्याला खारुताईने लपवलेली फळं आणि दाणे पटकन मिळतील. चिंटू माकड आणि टेडी बिअर तुम्ही झाडावर शोधा. मी आणि भूभू कुत्रा जमिनीवर शोधू. आणि बाहूलीताई तु खारुताईच्या ढोलीत शोध.’ सगळे छोटू सशाच्या म्हणण्याप्रमाणे कामाला लागले. चिंटू माकड आणि टेडी बिअर एकेक झाडावरच्या ढोलीतून शोधायला लागले. आणि छोटू ससा आणि भूभू कुत्रा जमिनीवर शेंगदाणे शोधत होते. खारुताईच्या जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत बरीच फळं चिंटू माकड आणि टेडी बिअरला मिळाली. त्यात पेरु होते, सफरचंद होती, मोसंबी होती. चिंटू आणि टेडीने ती सगळी फळं गोळा करुन आणली. तर छोटू सशाला आणि भूभू कुत्र्याला झाडाच्या मागच्या जागेत एका बुटात लपवलेल्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या. आणि बाहूलीताईला खारुताईच्या स्वयंपाकघरातच खूप सारी फळं आणि दाणे मिळाले. जी खारुताईने दुपारच्या जेवणासाठी आणली होती. मग सगळ्यांनी ती फळं आणि दाणे एकत्र केले. खारुताईची ढोली स्वच्छ केली. आणि ढोलीतच तिला ती सारी फळं आणि दाणे ठेवण्यासाठी जागा करुन दिली. मग त्यातली थोडीशी फळं घेऊन बाहूलीताई, छोटू ससा, टेडी बिअर, चिंटू माकड आणि भूभू कुत्रा, टोक टोक सुतार पक्षाकडे आले. टोक टोकने मग मधमाश्यांना कधीही त्रास देणार नाही असं वचन दिलं. मग ते सगळे राणी मधमाशी कडे आले. तिला टोक टोकने दिलेलं वचन बघून खूप आनंद झाला. तिने थोडासा मध आणि गुणगुणं परत आणण्यासाठी मधमाश्यांची खास पिवळी भूकटी खेळण्यांना दिली. आणि त्यांना सांगितलं की ‘ मध आणि ही पिवळी भुकटी एकत्र करुन भोव-याला खायला द्या. त्याचं गुणगुणं नक्की परत येईल. आणि तो परत पहिल्यासारखा गुणगुणायला लागेल.’
सगळेजण ते जिन्नस घेऊन शाळेत परतले. बाहूलीताईने मध आणि ती पिवळी भुकटी एकत्र करुन भोव-याला खायला दिली. आणि काय आश्चर्य त्याचं गुणगुणं परत आलं. तो परत पहिल्यासारखा गुणुगुणु लागला, गिरक्या घेऊ लागल्या. त्याने सगळ्या खेळण्यांना पाठीवरती घेतलं आणि गुणगुणत फिरु लागला. तुम्हीही तुमच्या शाळेतल्या खेळण्यांच्या कपाटाला कान लावून बघा. भोव-याचं गुणगुणं कदाचित तुम्हालाही ऐकु येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुरा, गोष्ट एकदम मस्त आहे. मनोरंजक. छोट्या दोस्तांसाठी असूनही मलापण मजा आली वाचायला.

बायदवे, गुनगुना रहे हैं भवरे.. वरुन गुणगुणणारा भोवरा सुचले का? Happy