मुंबईतील राजकारण्यांनी मुंबईकरांच्या आणि विशेषत: मराठी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. लोकांच्या भावनांना हात घालून सत्ता सिंहासन मिळवता येईल अशी या राजकारण्यांची पक्की धारणा दिसते. देशातील परीस्थिती ज्याप्रमाणे बदलते आहे त्याप्रमाणे मतदारही झपाट्याने बदलतो आहे. दहशतीच्या मार्गाने मुंबईचे प्रश्नतर सुटणार नाहीतच परंतु हे राजकारणी सत्ता सिंहासनापासून अधिक दूर फेकले जातील.
भारताने जेव्हापासून जागतीकीकरणाचा मार्ग स्वाकारला आहे तेव्हापासून भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. जागतीकीकरणामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात बेरोजगारीचं प्रमाण गेल्या १०/१२ वर्षात कमी झालं आहे. ९८ च्या सुमारास जेव्हा मी पदवीधर झालो तेव्हा वाणिज्य पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसत. आज वाणिज्य पदवीधरांना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात. मग गेल्या वर्षभरात असे काय घडले कि अचानक मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न वर उफाळून आला? मुंबईमध्ये किती बेरोजगार मराठी तरुण आहेत? मुंबईतील बिहारी व उत्तरप्रदेशीय कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या करतात? ते ज्या प्रकारची कामे करतात ती कामे करायला मराठी तरुण पुरेश्या संख्येने उपलब्ध आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधायच्या भानगडीत न पडता राजकारणी लोकं उठसुठ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात. हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! कुठल्या स्तराला गेलय आपलं राजकारण? अशा रीतीने मानवतेचा बळी देऊन मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न सुटणार आहे का? त्यापेक्षा हे परप्रांतीय मुंबईत का येतात? याची मूळ कारणे कोणती आणि त्यावर समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तोडगे कोणते? याचा विचार झाला पाहिजे. उठसुठ लोकांना मारहाण करुन आणि स्वत:च्या लोकांच्या करातून उभारलेल्या मालमत्तेचं नुकसान करुन हा प्रश्न सुटणार नाही. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.
महाराष्ट्राला उदारमतवादी समाजसुधारकांची थोर परंपरा आहे. गोखले, आगरकर, फुले, कर्वे पिता पुत्र, रानडे, लोकहितवादी अशी कितीतरी नावं घेता येतील. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या जोडीने समाजसुधारणेमध्ये पुढे होता. अशा या सुधारकांमुळे महाराष्ट्राला आज संपूर्ण देशामध्ये पुरोगामी म्हणून अोळखले जाते. आज आपण महाराष्ट्राची ही परंपरा विसरलो आहोत. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वसा घेतलाय असे हे लोक शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत. यांच्या विरुध्द जरा कोणी काही बोललं कि त्यांच्या तोंडाला काळं फासलं जातं नाहीतर सार्वजानिक मालमत्तेची नासधूस केली जाते. ही लक्षणं एका प्रगतीशील पुरोगामी राज्याची नसून अधोगतीची आहेत. मराठी लोकांनी कुठल्या रस्त्यानी जायचं याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबईतील परप्रांतीयाच्या प्रश्नाप्रमाणेच अमेरीकेत मेक्सिकन लोकांच्या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. उपविजीकेनिमित्त हजारो मेक्सिकन लोकं दरवर्ष डोंगर दऱ्या तुडवून अवैध मार्गाने अमेरीका-मेक्सिको सीमा पार करतात आणि अमेरीकेत येऊन वसतात. परंतु आपल्याप्रमाणे तिथे मेक्सिकन लोकांना पकडून मारलं जात नाही! अमेरीकन अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी ज्याप्रमाणे भारतीय अभियंत्यांची गरज आहे, त्याप्रमाणे मेक्सिकन मजूरांचीही आहे याचं अमेरीकेला पक्कं भान आहे. म्हणूनच वेगवेगळे नविन कायदे करुन, जास्त काळ राहिलेल्या मेक्सिकन लोकांना नागरीकत्व देऊन आणि मेक्सिकोला आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अमेरीकेतही अनेक विचारप्रवाह आहेत आणि त्यात मेक्सिकन लोकांना परत मायदेशी परत पाठवावे असा प्रचार करणारे लोकंही आहेत. परंतु हे लोक सर्व मर्यादा सोडून मारहाण व जाळपोळ करताना दिसत नाहीत. प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.
ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण कमी होत अाहे, त्याप्रमाणे अमेरीकेतही गोऱ्या लोकांचं प्रमाण कमी होत अाहे. दरवर्षी जगभरातून हजारो भारतीय, चीनी, मेक्सिकन, आफ्रिकन लोकं अमेरीकेत जातात आणि कायमचं तिथले होतात. अमेरीकेतील सर्वात प्रगत अशा कॅलिफोर्निया राज्यात गोऱ्या लोकांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालं अाहे. अमेरीकेत २०४२ सालापर्यंत गोऱ्यांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा खाली जाईल असे अंदाज समाजशास्त्रज्ञ मांडत आहेत. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.
भारतातील आणि जगातीतील परीस्थिती झपाट्याने बदलते आहे. ज्या समाजाची आर्थिक परीस्थिती चांगली त्याच्या भाषेचं, त्यांच्या संस्कृतीचं प्राबल्य वाढणार आहे. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय. मराठी माणसाने इतरांची मारहाण करण्यापेक्षा मराठी बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र देवताच्या उपासनेला आम्हाला परप्रांतियांच्या रक्ताची आहुती देण्याची गरज नाही. महाराष्ट्रची अस्मिता एवढी कोती नाही आणि काही लाख परप्रांतियामुळे धोक्यात येण्याएवढी लेचीपेची तर मुळीच नाही. महाराष्ट्राने बदलत्या परीस्थितीचा स्वीकार करुन संपूर्ण भारतापुढे आदर्श बनले पाहिजे. त्यातच मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या प्रगतीचं गुपित दडलं आहे.

१. मराठी माणसाने कष्ट करुन स्वत:ची आर्थिक प्रगती केली तर त्याच्या भाषेला आणि त्याच्या संस्कृतीला जगात नक्कीच पत प्राप्त होईल. मराठी चित्रपटांनी केलेल्या अलिकडच्या प्रगतीने आणि मराठी वाहिन्यांच्या वाढलेल्या संख्येने हे सिद्ध केलंय.........
चित्रपट्/वाहिन्या याना भाषेची पत मोजण्याची फूटपट्टी असा दर्जा देणं कितपत योग्य आहे.. ?
२. अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत.
.. मग आता मुम्बईच्या लोकानी महापौरपदी एखाद्या भैय्याला बसविल्याशिवाय मुंबईवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब होणार नाही का ?
रस्त्यारस्त्यावर उघडलेल्या मॅालमध्ये अनेक मराठी तरुण/तरुणी काम करताना आढळतात.......................
स्वतः लॉस एंजिलिस मध्ये रहायचे आणि मुंबईत किती मॉल आहेत ( रस्त्यारस्त्यावर !!!! ) , त्यात किती मराठी लोक काम करतात ( किती पगार मिळतो हो ?? ) आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगारी कशी हटली आहे यावर एवढा मोठा मुक्तछंद लिहिणं .... लई झ्याक साहेब.. सत्कार करायला हवा एकदा तुमचा .. खरंच ,.. अगदी सच्चे मनसे |
मराठी चित्रपट आणि वाहिन्या यातून येळ मिळालाच कवा तर लॉस यंजेलातच बसून हे बी वाचा...
http://www.maayboli.com/node/2025
हे प्रकरण इतकं पराकोटीला जातं की भर दिवसा एका उत्तर प्रदेशीय तरुणाला लोकलमध्ये ठार मारलं जातं! >>>>
सत्य परिस्थिती काय आहे ते माहिती आहे का आपल्याला????
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
बावळट लेख आहे.
लेख पटला नाहि.
शिवाजी महाराजांनी असे प्रश्न कसे हाताळले असते याचा यत्किंचीतही विचार करताना दिसत नाहीत>>>>
हा विनोद आहे का? अहो, दर दिवसाला परिस्थिती बदलते आहे इथे. आज योजलेले उपाय उद्या कुचकामी ठरताहेत. आज काढलेली बजेट्स उद्या दुप्पट होताहेत. शिवाजी महाराजांनी त्या काळी केलेले राज्य, राजकारण, समाजकारण मार्गदर्शक ठरेल, यात शंकाच नाही; पण आंधळेपणाने तेच उपाय आजही लागू करावेत म्हणताय?
स्थलांतरितांचा प्रश्न अमेरिकेतही आहे, हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त अमेरिका आणि महाराष्ट्रातच नाही, तर तो जगातल्या सर्व प्रांतांत आहे. उपर्यांचा भुमीपुत्रांना जिथे जिथे त्रास होतो आहे- तिथे तिथे आहे.
हे 'राज' कारण तुम्हाला फोल वाटत असले, तरी विशिष्ठ परिस्थिती आल्यामुळे ते होते आहे. या वादाचा आम्ही इथे असल्यामुळे प्रत्यक्ष फटका बसतो आहे. तुम्ही इथे येऊन, ही परिस्थिती भोगून पोस्ट लिहिली तर ती वास्तववादी ठरेल, वरच्यासारखी पुस्तकातली 'हितोपदेशाची गोष्ट' ठरणार नाही.
कृपया तिथली वर्तमानपत्रे वा भंकस संकेतस्थळे वाचून इथल्या घटनांबद्दल मत बनवू नका.
आपण सद्यस्थितीबद्दलचे आपले आकलन आणि मत फारच ठामपणे मांडले आहे....
---------------------------------------
"The trouble with the world is that the stupid are cocksure and the intelligent are full of doubt." - Bertrand Russell
विपुराणिक सोडून सगळ्यांना अनुमोदन. काही दिवसांपुर्वी अशाच प्रकारे लिहिलं गेलं होतं मायबोलीवर. मी प्रतिक्रिया दिली होती. पण काय झालं कुणास ठाउक २-३ तासातच ते मायबोलीवरुन गायबच झालं, नामोनिशान नाही.
जे लोक आज भारतात नाहीत, ते सगळे बहुधा राज/मनसे /मराठीवाद याना विरोधच करतात. आपल्या नोकर्या जातात की काय याचे टेन्शन.. बाकी काय ! उत्तर प्रदेश च्या बी बी वरही असेच होत होते... त्यामुळे मनसे/राज/ उ प्र/ या असल्याना विरोधाचे पोस्ट आले की मी आधी लिहिणार्याचा आय डी वाचतो... हे सगळे न्यु जर्सी/ एल ए/ सॅन फ्रान्सिस्को.... असलेच कुठले तरी असतात.... अर्थात याला सन्माननीय अपवाद असतील ही ! पण मूळ पोटदुखी स्वतःच्या नोकरीची चिन्ता हीच असते... याना अमेरिकेच्या काय मुम्बईच्या काय कुठल्याच समाजाशी देणे घेणे नसते.... आज 'लॉस एंजेल' मध्ये बसून समानतेच्या गप्पा मारताहेत , उद्या रिसेशन वाढून ' लॉस' मध्ये आले की हेच लोक मुम्बईत येतील आणि तेंव्हा राजला हेच लोक 'एंजेल' म्हणतील... ...
बर्याच महाराष्ट्रीय लोकांनी कष्ट करून आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. पण भाषा नि संस्कृति यांचा काही प्रसार होत नाही. कारण खुद्द महाराष्ट्रीय लोक आपणहून मराठी बोलण्याचे टाळून, इतर भाषांमधून बोलतात, स्वतःची संस्कृति सोडून 'करवा चौथ, पैसे दो जूते लो, नि लग्नांमधे पंजाबी इश्टाईल 'डांसेस' 'करण्यात धन्यता मानतात. छठ पूजेचे कौतुक करतात. स्वतःच्या संस्कृतीचे जे प्रतिक, गणेशोत्सव, त्यात दारु पिऊन धिंगाणा घालतात, अचकट विचकट नाच, असे सगळे चालू असते.
ते सगळे सुधारले तर एकदा लोकांना कळेल की महाराष्ट्रीय संस्कृति काय आहे.
खर म्हनजे परप्रातिय लोकामुळे कोनत्या मरटि माणसाचा रोजगार जातो
हे आपन बघायला हावे .
पानिपुरि , मजुरि, मिस्त्रि ,बानघ्काम , पेन्टिग, साफसफाइ,घरकाम्,हमालि, ड्राविन्ग, इत्यादि कामे मराटि मानसतिल कोनति लोक करतात ?
खालच्या जातीतील . मुळात ति पन कामासाटि आपला गाव सोडुन आलेलि आसतात याचापन आपन विचार करायला हावा?
वैभवनी काही प्रश्न विचारले आहेत ते दूर असल्यामुळे मलाही पडले आहेतः
(१) मुंबईमध्ये महाराष्ट्रियनांचे प्रमाण (टक्केवारी) किति आहे?
(२) त्यातील मुंबईबाहेरचे किति आहेत?
(3) महाराष्ट्रियन लोक कोणत्या नोकर्या/उद्योग करतात?
अर्थात सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हाणामारी व्यतिरिक्त इतर उपाय आहेत काय? उदा. उपलब्ध नोकर्यांसंबंधी ईच्छुकांपर्यंत माहिति पोचवणे?
अनेक ठिकाणी हे प्रश्न सोडुन जास्त भावनीक पातळिवरच चर्चा चालते. या प्रश्नांची उत्तरे कोणी पुरवु शकेल तर आभारी राहीन. धन्यवाद.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
<< अशा या बदलत्या काळात जाळपोळ आणि भांडणं तर सोडाच पण अमेरीका एका कृष्णवर्णीय माणसाला निर्विवाद बहुमत देऊन आपला राष्ट्रध्यक्ष बनवते! प्रगतीपथावर असलेल्या अाणि प्रगल्भ समाजाची ही लक्षणं आहेत. >>
ही तुलना जरा चुकिची आहे असं वाटतं...... अमेरिकन लोकांनी आपल्या देशातला वर्णद्वेष कमी व्हावा, किंवा झालाय हे दाखवण्यासाठी त्याला निवडून नाही दिले... अमेरिकन अर्थव्यवस्था खालावली आणि लोकांच्या (भूमिपुत्रांच्या) पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला... आणि ओबामाने वेळोवेळी हेच ओरडून सांगितले की आउट्सोर्सिंग कमी करण्यासाठी तो प्रयत्न करेल आणि अमेरिकेत नोकर्या उपलब्ध करेल...म्हणून लोकांनी दिले त्याला निवडून... मुद्दा हा की पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला कि हे होणारच...
<<उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही. >>
हो ना... पण मुंबईच्या निमित्ताने लालुंच्या बिहारमध्ये लोकांना नोकर्या मिळत नाहीत हे एका अर्थाने उघडच झालं ना.... आता उपाययोजना त्यांनी केली पाहिजे...महाराष्ट्राने नाही...
आपण महाराष्ट्रीय पुरोगामी, सुधारक, फुले-आंबेडकर-कर्वेंचा वारसा (???) सांगणारे ना....
मग आपणच बिहारची काळजी करायची.
बिहारी-यु.पी. वाल्यांना ईकडे बोलावुन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची स्वतः ऊपाशी राहुन....
आमच्या मुख्यंमंत्र्यानी रोज ऊठसुठ म्याडमचे पाय धरायचे, खुर्ची वाचवण्यातच धन्यता मानायची. (हे मराठे म्हणे...)
.... अगदी चव्हाणांपासुन देशमुखांपर्यंत सर्वांनी हेच केलेय.
यांचा रोम जळत असताना बासरी वाजवणारा निरो झालाय.
यांना काय रे सामान्य माणसाला काय भोगावे लागते ते?
आज कॉलेजेस, रस्त्यावरेचे धंदे, आय टी, इंडस्ट्रिज सगळी कडे मराठी माणुस नाकारला जातोय.....
कानडि, यु.पी., बिहारी, बांगलादेशी हेच सगळीकडे दिसतायत.
राज हे फक्त हे निमित्त आहे. कदाचित त्याचा मार्ग हा चुकीचा असु शकतो, पण मग ईतर काय मार्ग आहेत का?
>>>>>.. मग आता मुम्बईच्या लोकानी महापौरपदी एखाद्या भैय्याला बसविल्याशिवाय मुंबईवर प्रगल्भतेचे शिक्कामोर्तब होणार नाही का ?
<<<<
नाहीरे जगमोहन प्यारे.... आता देशमुखांना घरी पाठवुन लालु ला बसवा, म्हणजे महाराष्ट्र अधिक प्रगल्भ होईल, मग त्याची बायको मुखमंत्री होईल,
मग तर एका स्त्री ला सी.एम. केले म्हणुन जगात ऊदो उदो होईल.....
मुळात भूमिपुत्र आणि परप्रांतिय हा वाद रोजगार आणि जीवनावश्यक सोयी-सुविधांवर ताण आला की उफळून येतो.
प्रतिक्रिया द्यायला थोडा उशिर झाला असेल मला, पण हे इथे सांगणं गरजेचं वाटतं.
आपण (मराठी माणूस असं म्हणूयात का?) इतर राज्यात किंवा परदेशात गेलो की तिथले नियम पाळून रहातो.अमेरिकेत गेल्यावर, रस्त्याने जाताना उजवीकडून चालणे इथपासून ते lift ल elevator म्हणणे इथपर्यन्त आपण स्वतःला बदलतो, तिथल्या समाजाशी जुळवून घेतो.तिथल्या वास्तव्यात कर भरण्याचंही कर्तव्य पार पाडतो.
यातली कोणती गोष्ट बिहारी/उ.प्र. चे लोक करताना दिस्तात?
अमेरिकेची अर्थव्यवस्था परप्रांतीयांवर बव्हंशी अवलंबून आहे, पण ती सकारात्मक अर्थाने.म्हणजे हे लोक ती व्यवस्था मजबूत करतात्.तिथे काम करून मिळलेला पैसा बराचसा तिथे रहूनच वापरतात.भारतात्(महराष्ट्रात) पैसा पाठव्ण्याचं प्रमाण कमी.
थोड्क्यात, एकूण नागरी जीवनावर ताण येईल असं काहीही तिथे रहाणारी मराठी माणसं करत नाहीत.
आपल्याकडची परिस्थिती नेमकी उलट आहे.महाराष्ट्रात येऊन बेकायदेशीर झोपड्या उभारायच्या, मग वीज्-पाण्याचं कनेक्शन घ्ययचं, शहराची शिस्त बिघडवायची,संस्कृती तर दूरच राहूदेत, समाजजीवनाशीही जुळवून घ्यायचं नाही...आणि मुख्य म्हणजे, नागरी सुविधांवर ताण आला तरी बेफिकीर रहायचं...
मग याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर काय चुकलं?
..प्रज्ञा
हे काय... फक्त इतर लोक प्रतिक्रिया देत आहेत.... मूळ ज्या पुराणिक बुवानी हे एकोणिसावे पुराण लिहायला घेतले ते कुठे गायबच झालेत......
एक करता येईल. सरकारमधील, मोठ्या उद्योगधंद्यांमधील मराठी लोकांनी खास महाराष्ट्रीय तरुणांसाठी वेळोवेळी मराठीतून भाषणे देऊन, कुठे संधी उपलब्ध आहेत, त्यांचा फायदा कसा घ्यावा हे सांगितले तर तरुणांना मार्गदर्शन होईल. उदा. नोकर्या कुठे उपलब्ध आहेत, त्या मिळवण्यासाठी लायकी काय, ती कशी प्राप्त करावी, बायो डेटा कसा लिहावा, मुलाखती कश्या द्याव्या, networking कसे करावे, इ. माहिती पुरवता येईल.
(इथे नोकरी मिळवताना networking मुळे ३७ टक्के नोकर्या मिळतात, तर जाहीराती, फोन, इंटरनेट इ. सर्व मार्गांनी मिळून त्यापेक्षा कमी टक्के नोकर्या मिळतात.)
सध्या मी हे कार्य आमच्या न्यू जर्सीतल्या नोकरी शोधू इच्छिणार्यांसाठी करतो .
आम्हा २०० लोकांचा एक समूह हे काम संपूर्णपणे विनाशुल्क करतो. त्या साठी आम्हाला जागा , फुकट, सरकारने दिली आहे. (फुकट कसली, कोट्यवधी डॉलर
उकळतात नोकरी देणार्यांकडून नि करणार्यांकडून, मग फुकट जागाच काय, इतरहि काही व्यवस्था या राज्याने फुकट करायला पाहिजे, पण ते असो. आधी आम्ही आम्हाला काय करायचे ते करतो. कदाचित् तुमच्या राज्यांत कर कमी असल्यामुळे सरकारला परवडत नसेल)
हे काम करायची मला आवड आहे नि महाराष्ट्रात येऊन ते विनाशुल्क करायला मी तयार आहे, पण "तुम्हाला काय इथली माहिती नाही, ते सगळे तुमच्या अमेरिकेत ठेवा. इथे वशिला नि पैसे लागतात!" "तुम्हाला काय वाटते, तुम्ही अमेरिकेतून आला म्हणून जास्त शहाणे झालात का? आम्हाला नका शिकवू तुमचा शहाणपणा. (डॉलर्स किती देता ते द्या, नि परत जा)"
असो. त्यांचे म्हणणे खरे आहे. मी गप्प बसतो.
सध्या मी हे कार्य आमच्या न्यू जर्सीतल्या नोकरी शोधू इच्छिणार्यांसाठी करतो .
? तेव्हढीच महाराष्ट्राची सेवा करण्याचे पुण्य पदरी (खात्यात) जमा होईल.
--- तुम्हाला पाटणा, रांची मधे उपशाखा काढता येणार नाही कां
उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जिथपर्यंत रोजगाराच्या संधी मिळत नाहीत तोपर्यंत हे स्थलांतर थांबणार नाही.
--- हे मान्य आहे, मग या साठी कोणि प्रयत्न करायला हवेत? काय प्रयत्न करायला हवेत? उ प्र ने तर अनेक वर्षे प्रधानमंत्री पद उपभोगले... मग विकास का नाही झाला करवला गेला?
तुम्हाला पाटणा, रांची मधे उपशाखा काढता येणार नाही कां ? तेव्हढीच महाराष्ट्राची सेवा करण्याचे पुण्य पदरी (खात्यात) जमा होईल.
पाटणा, रांची? कळले नाही. मी असे महाराष्ट्रात करण्याबद्दल बोलत होतो.
तुमच्या लिखाणाचा अर्थ कळला नाही. ही काय थट्टा, उपहास, गंमत असे काही आहे का? एव्हढे का माझे लिहीणे हास्यास्पद होते? असेल तर जाऊ द्या.
मग या साठी कोणि प्रयत्न करायला हवेत?
खरेच आहे. दुसर्या कुणि प्रयत्न केले तरच. आमचे आम्हाला काही जमत नाही बॉ.
आम्ही फक्त कुणि काही म्हंटले की त्याची कुचेष्टा करतो.
शिवाय अमेरिकेहून काही सूचना नकोत, फक्त डॉलर किती देता ते द्या, नि तोंड बंद ठेवा!
झक्कींचे मुद्दे अजिबात न पटून त्या मुद्द्यांना विरोध करणारे पोस्ट मी इथे लिहिले होते.
पार्श्वभूमी काहीही असली, तरी मुद्दे पटणे, ना पटणे हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. पण मुद्द्यांना मुद्देसूद विरोध करणे आणि त्यावरील प्रतिक्रियेची परिणती सरसकट त्या विशिष्ट व्यक्तीवरच व्यक्तिगत टीका करण्यत होणे- यामधली अगदी अस्पष्ट असणारी सीमारेषा माझ्याकडून अनावधानाने पार केली गेली, जे पुर्णपणे चुकीचे आहे. ही चुक कबूल करून सांगतो, की यात वैयकिक टीकेचा किंवा हेटाळणीचा अजिबात हेतू नव्हता.
याबद्दल झक्की आणि संबंधितांची मी माफी मागतो आहे.
प्रज्ञा, तुमचा नियम पाळण्या न पाळण्याबद्दलचा मुद्दा अगदी योग्य आहे. त्या बाबत सर्व-सामान्यांना काही करता येवु शकेल का? (स्वतः देखिल नियम न तोडता - ईतरांना मारहाण करुन?)
दूर असल्यामुळे इतर आकडे देखिल मला माहित नहित, पण जाणुन घ्यायची इच्छा आहे. उदा. पोलिसांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत? नगरसेवकांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत? (टक्केवारीनी) वर्तमान्पत्रांमध्ये (ईग्रजी आणि मराठी) लिहिणारे किति मराठी आहेत?
कुठे सापडतील हे आकडे?
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
बाहेर गेल्यावर 'आकडेवारीत' बोलण्याचा काय रोग लागतो, काय कळत नाय!!!
नगरसेवकांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत?>>>>
यामुळेच 'इथे' येऊन पोस्ट लिहा असे आम्ही म्हणतो आहोत. नगरसेवक कोण निवडून देतात, हे आपल्याला माहिती आहे काय? कमीत कमी 'बहूसंख्य' लोक निवडून देतात, हे तरी?
पोलिसांमध्ये महाराष्ट्रियन किति आहेत?>>>>
तुम्हाला इथल्या 'राज्य करण्याच्या' पध्दतीबद्दल काही माहिती आहे काय? इथले पोलिस मुळचे राहणारे बँकॉकचे असले, तरी त्यांच्यावर आबा, अन त्यांच्यावर त्यांचे 'बाबा' राज्य करतात, हे आपणास माहिती आहे काय? पोलिस कुठलेही असले तरी ते इथले गुलाम असतात, हे आपणास माहिती आहे काय?
इथल्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये लिहिणारे बहूसंख्य मराठीच आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांची भुमिका जगजाहीर आहे.
उगीच फक्त एखाद्या पोस्ट्साठी फक्त 'आकडेवारी'त बोलून 'मुद्देसूद' बोलण्याचा आव आणू नये. तिथल्या परिस्थितीत राहून इथल्या अवस्थे(वा दुरवस्थे) बद्दल कॉमेंटस कृपया करू नयेत. वरती लिहिल्याप्रमाणे बाहेरची वर्तमानपत्रे आणि बकवास संकेतस्थळे वाचून इथले मराठीच फक्त आग्यावेताळ आहेत, अन उरलेल्या जगभरातले सर्व मराठी 'ग्लोबल', 'समजदार' आणि शहाणे आहेत, असे 'एक्स्पर्ट ओपिनियन' देऊ नये.
बुश अन ओबामा पासून ते लालू अन एखाद्या भंकस अबू आझमीने फालतू सल्ले देण्याचा आम्हाला कंटाळा आलेला आहे, त्यात तुमची भर नको.
कृपया व्यक्तिगत घेऊ नका..
--
मी काव्यविभोर अन कडकलक्ष्मी कचराघंटागाडी तु!
माझ्या छिन्नमनस्क स्वप्नांची खळाखळा भरलेली चुळ तु!!
या लेखाकडे 'अमेरिकेत राहून केलेला उपदेश' अश्याच पद्धतीने का पहातायत? लेख उत्तम आहे अशातला भाग नाही. 'पूर्ण' नाही वाटला. आशिष विचारत आहे ती माहिती घेऊन पुढे अजून काही लिहिणार आहेत का? लिहावं. परंपरा, शिवाजी महाराज, अस्मिता या शब्दांमुळे त्या राजकारण्यांसारखा हा लेखही भावनेला हात घालणाराच वाटतो. या परिस्थितीवरच्या उपायांवर अजून काही सविस्तर लिहिला आलं तर पहा. अमेरिकेचंही मेक्सिकन लोकांचं उदाहरण बरोबर आहे, बाकी कृष्णवर्णीय प्रेसिडेण्ट वगैरे अनावश्यक वाटले.
ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहे तितकाही वाईट मला हा लेख किंवा त्यामागचा उद्देश वाटला नाही. आणि झक्कींनी काय चूक लिहिलंय? बरोबर आहे की!
लेखातल्या मुद्द्यांशी मी सहमत नाही.. पण..
लालू ला अनुमोदन.. लेखामधला अभ्यास कमी आहे हे खरय.. काही काही मुद्दे बरे आहेत..
आणि झक्कींनी लिहिलेलं मला तरी काही चुकीचं वाटलं नाही...
हो, लालू आणि ऍडमला अनुमोदन.
आणि झक्कींची ज्या प्रकारे हेटाळणी केली आहे, ते ही मला पटलं नाही. मुद्दे खोडा पटत नसतील तर. असं बोलायचं काय कारण?
साजिर्या लेका असे तावातावात नको लिहूस.
हे काय मराठी विरोधी लोक नाहीत. अरे झक्कींचे पोस्ट वेगळे होते, त्यांना असे म्हणायचे होते की काही करायाला गेले की भारतात लोक शहाने समजतात आणि स्वतचीच टिमकी वाजवतात, लोक ऐकायला तयार नसतात. हे बर्याच अंशी खरे आहे की.
झक्की उदय ने हे उपरोधात्मक लिहीले नाही तर तो म्हणाला की अशी शाखा जर रांची वा पाटण्यात निघाली तर तिकडच्या लोकांना तिकडेच रोजगार मिळेल, त्यामूळे तुम्हाला महाराष्ट्रावरचा बोजा हटविन्याचे पुण्य मिळेल. त्याची लिहीन्याची इश्टाईल जरा वेगळी आहे.
पुरानिक येथील रिसेशन डिप्रेशन मध्ये बदलले तर इथल्या भारतीयांवर हल्ले होनार यात वाद नाही. शेवटी कल्चर पेक्षा भाकरी श्रेष्ट असते.
खरतर काल मी ऐक पोस्ट लिहून इथे टाकले नाही कारण मग मायबोलीवर 'नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणून आरती व्हायची.
आज लिहीतोच आहे तर ...
आजकाल मी मराठी म्हणले की लोकांचा माझ्याकडे पाहन्याचा दृष्टीकोनच बदलतोय.त्यांचा भुवया वर जाताना लगेच दिसतात. त्यांना वाटतय की मी माझ्या डाव्या खिशात पिस्तुल लपवून आजुबाजुला कोण हिंदी फिरतोय त्याचावर ते चालवनार व माझे मराठीपण सिध्द करनार. हे म्हणजे मी काल पर्यंत हिंदू आहे असे सांगीतल्यावर काही मंडळी तसे करयाची. पण बघा ना राव मी मराठी म्हणल, मी हिंदू म्हणल की तुम्ही लोक माझ्याक्डे हा आततायी आहे, मारपिट करनारा आहे असे म्हणून बघनार नाहीका? माझा संबध लगेच राज ठाकरेंशी लावून तुम्ही मोकळे होनार. काय आजकाल फॅशनच आहे तशी नाहीतर फुकटात हिंदी वा इंग्रजी मिडीयात प्रसिध्दी कशी मिळनार?
( पण तेच लोक रोज बॉम्ब स्फोट करनार्या लोकांना आततायी म्हणत नाहीत तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायामूळे ते लोक असे वागतात अश्या टाईप चे कॉलम चालवून दुहेरी प्रसिध्दी मिळवतात, असो ).
ह्या मिडीयाने ने तर उत आणलाय. सध्या रोजच्या बॉम्बस्फोटांना कोणी विचारत नाही त्यामूळे आपल्या टिव्हीचा टिआरपी वाढन्यासाठी त्यांनी 'राज' ला हाती धरलेय. तिकडे घरात कूणी पादले तरी लोक राजच्या नावावर बोंबा मारत आहेत पण हे कळत नाही की काल रात्री आपण जरा जास्तच छोले खाल्ले होते. त्याच काय रुट कॉज ऍनॅलिसीस की काय तो म्हणतात ते करायला कोणी तयारच नाही, कारण तो करुन प्रसिध्द करायला वेळ लागतो महाराजा, मग काय घे तलवार अन चालव 'राज' वर. जो होईंगा वो देखा जाईंगा.
हां हां तूमच्या मनातल मी ओळखल बरका, आत्ता तूम्ही हाच विचार करत आहात की केदार जोशी त्या 'राज'च्या पिद्दू आहे. नाही साहेब. आपण चुकलात, मी वर लिहील्याप्रमाने आपण चुकीच्या प्रसिध्दीचे बळी आहात.
हिंसक आंदोलनाचं मी कधीही समर्थन करनार नाही. कारण हा काही स्वातंत्र्य संग्राम नाही. पण हिंदी आणि ईंग्लीश चॅनल्स ने जे चालवल आहे ते मनसेच्या हिंसक कारवायांपेक्षा जास्त आहे. तो पवनकुमार पाय घसरुन पडतो आणि रेल्वेखाली मरतो आणी हे हिदी ईंग्लीश चॅनल वाले राजला खुनी ठरवतात ही कुठली पत्रकारिता? आणि तेव्हा मग हे मराठी विरोधक का नाही विरोध करत अशा कृत्यांचा? की हा संधीसाधूपणा? ही अपप्रसिध्दी मुद्दामहुन केली जात आहे. " राज ठाकरे मला तुमची लाज वाटते" असे लेख लिहीनार्यांनी लगेच मग "राज चे ह्या घटनेत काहीच चुकले नाही" असे लेख का लिहीले नाही? अहो ह्या मिडीयाने तर युनेस्को ने जन गण मन ला सर्वात चांगले राष्ट्रगित ठरविले ह्या धांदात खोट्यालाही प्रसिद्धी दिली.
मी कॉमन मराठी आहे.(हो आता कॉमन, यो, रॉक्स, यु नो) हे शब्द मराठीच झालेत. मला राडा करायला आवडत नाही, खरच सांगतोय. राडा करुन काही साध्य होत नाही असे बापू म्हणून गेले पण बापू तुम्ही चुकलात. 'राज' ने राडा करुन बरच काही साध्य केलयं त्याने १९४७ पासुन चालू असलेल्या प्रश्नावरचा अंगार पुन्हा भडकवला आहे. त्यामूळे विलासराव साहेब , राणेसाहेब, पवारसाहेब व असे अनेक साहेब ऐकत्र येउन मराठी ह्या प्रश्नावर चर्चा करनार आहेत. मला तुम्हीच सांगा राव मग 'राज' चा मुद्दा फालतू असेल तर ह्या मोठ्या साहेंबांनी ऐकत्र यायची गरज काय? आता आली का मेख लक्षात?
बर ऐवढेच नाही तर काल दिवशी आपले म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल उदगारते झाले की बाहेरच्या प्रांतियांनी महाराष्ट्रात दखल द्यायची गरज नाही. म्हणजे लक्ष हो. मग असे का घडले बर. 'राज'च्या लढाईनंतर आता क्रेडीट घ्यायला तर सर्व ऐकत्र येत नाहीत नं. हो निवडनुका जवळच आल्यात. पुढच्या वर्षी.
कौतीकराव ठाले पाटलांनी मसापच्या भाषनात यशवंतरांवावर तलवार चालविली, त्यांनी जे म्हणले ते आपल्यातरी आवडले बॉ. की "यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला हा भ्रम आहे. तो मंगलकलश नव्हता, कुंकू लावलेला तांब्या होता. त्यातला नारळ कर्नाटकास, पाने गुजरातला तर गंध मध्यप्रदेशास गेला."
आता मला सांगा राजचे आंदोलन कितीतरी नंतर चालू झाले पण मराठी साहित्यीक लोकांना देखील हा प्रॉब्लेम आधीच कळला मग राज्यकर्त्यांना का नाही? ओ हो, त्यांनी मतासाठी दुर्लक्ष केले. ही बाब माझ्या ध्यान्यातच येत नाही. काय की पिंड कार्यकर्त्याचा आहे ना.
पार थोरल्या साहेबांपासुन पक्षी (यशवंतराव) धाकट्या पर्यंत ( पक्षी विलासराव, शरदराव, अनेक रा) हा मुद्दा चालूच आहे. मग इथे न्याय नको का मिळायला. आम्ही कष्टाने मिळवू ते तुम्ही पायदळी तूडवानार हा कुठला न्याय?
त्याही आधी संयुक्त महाराष्ट करन्यासाठी स्वतंत्र्य भारतात रक्तदान करावे लागले, आता त्याच रक्ताला ... ऐनीवे आपल्याला सवयच आहे.
आय ऍम ऑल फॉर भारतीयता आणी विवीधतेत ऐकता. पण मग अहो आमच्या घरी तुम्ही रहायला आल्यावर निदान झोपलेले अथंरुन तर गोळा करुन ठेवा की. ही अपेक्षा काही चुकीची नाही.
राडा करुन या सर्व लोकांचे लक्ष राज ने मराठी लोकांच्या प्रश्नाकडे वळवलय पण आता खरच राडा थांबवायला हवा हे देखील माझे मत आहे.
काहीतरी वेगळे विधायक ह्या प्रश्नातून त्याने उभे केले पाहीजे. शेवटी आपण सर्व भारतीय आहोत हे विसरता कामा नये. वेगळा महाराष्ट्र अश्या पुंग्या वाजविनारे लोक दुर्दैवी आहेत. आपण सर्व भारतीय आहोत व राहनार. मला हिंदी वा कुठल्याही भाषिकांविषयी द्वेश नाही असले तर ते प्रेम वा आपुलकीच.
पण अहो आम्ही सरकारला नियमीत टॅक्स देतो, तुम्ही पण द्या.
आम्ही दुसरीकडे गेल्यावर अरेरावी करत नाही, तुम्ही पण नका करु.
आम्ही चुपचाप सरकारी नौकर्यांच्या नियमावली बदलत नाही, तुम्ही पण नका करु.
आम्ही महाराष्ट्रात इतर व्यवसाय, नौकर्या उपलब्ध केल्यात, तुम्ही पण तुमच्या राज्यात करा.
ऐकाच शहराने पहिले आम भारतीयांचा लोंढा स्विकारला आता ऐकच राज्य करतेय. ह्यातून फक्त ते राज्य कोलमडेल आणि असमतोल निर्मान होइल. बाकी काही नाही, त्यामूळे तुम्ही पण तुमच्या राज्याला सुधारण्याचे प्रयत्न करा, आम्हीही मदत करु. शेवटी आपण सर्व भारतीय आहोत व सर्व भारतीय माझे बंधू आहेत हे शाळेतच शिकवीलेले आमच्या ध्यानी आहे. इतके दिवस तुमचे ऐकले आता काही दिवस तुम्ही आमचे ऐका.
राजदिप सारखे पत्रकार लिहीतात की फक्त अशिक्षीत मराठी लोक राजच्या मागे आहेत. राजदिपा, कुठल्यारे विश्वात राहतोस तू. अरे इकडे बघ मायबोलीवर येऊन, शिकलेले, पैशेवाले मराठीपण, मराठी विषयावर लिहीतात, मराठी ह्या विषयावर कितीतरी ब्लॉग रोज लिहीले जातात. 'राज'ला कमी लेखायचे म्हणून काहीही ठोकून द्यायचे, अरे हो, त्यांना बहुतेक मराठी वाचता येत नसेल त्यामूळे ते ठोकुन दिले वाटतं.
सहज जाता जाता, उत्तर प्रदेश व बिहारात मराठी लोकांना सध्या उपद्रव पोचविला जातो अश्या बातम्या आम्ही पेपरात वाचल्या, पण काय हो मग त्यांना त्रास देताना कुठे गेले तुमचे देशप्रेम, तेव्हा नाही का तुम्ही चुक करत, आम्हाला सांगता उदार व्हा, मग उदार मनाने तेथल्या मराठी माणसांना का नाही माफ करत. आणि हो मिडीयावाले ह्या बातम्या व्यवस्तिथ का दाखवत नाहीत, फक्त मराठी पेपरातच का वाचायला भेटतात?
पण आता मात्र हिंसक आंदोलन नकोय. राज आता जर तूम्ही जाळपोळ केली तर परत एकदा मूळ मुद्दा दुर्लक्षीला जाणार व मराठी लोकांची बदनामी होणार. तूम्ही जे केलय त्यामूळेच सर्वपक्षीय बैठका वैगरे होत आहेत. आता काही तरी विधायक होउदेत.
मी हे सर्व परिस्तिथीची दुसरी बाजु म्हणून लिहीले आहे. दरवेळी मराठी लोकांवर केद्रांने अन्याय केला आहे. इच्छूकांना संदेह असेल तर त्यांनी रोजचे पेपर चाळावेत त्यात बरच काही लिहून येत असत. मी वर दोन तिन उदा आधीच दिली आहेत.
अरे जावा जावा देखील भांडन करतात, हे तर फक्त राज्यांमधील भांडन आहे. शमेल आज ना उद्या. पण आता महा सरकारने त्या बिलांमधल्या दुरुस्ता तवा गरम आहे तो पर्यंत करुन घ्याव्यात. नाहीतर ... ... उगीच भांडने होतील हो. आणि आम्हाला ते नकोयत. तूम्ही राज च्या नावावर काय ती कुप्रसिध्दी करायची ती करा आम्ही काय डोळे मिटून दुध पित नाही आहोत. ( हे फक्त आपल्या सर्व ताटाखालच्या मांजराना होत, म्हणजे साहेबांना)
आता बघुया येत्या काही दिवसांत सर्व साहेब आणि राव ऐकत्र जमनार आहेत ते मराठी लोकांसाठी साठी काय करत आहेत, ते दिसेलच. ह्या ऐकाच उदा वरुन हे 'राज'कारण 'फोल' न्हवते हे दिसुन येईल.
तुमच्या लिखाणाचा अर्थ कळला नाही. ही काय थट्टा, उपहास, गंमत असे काही आहे का? एव्हढे का माझे लिहीणे हास्यास्पद होते?
--- थट्टा वा उपहास नाही (माझे धाडशी नाही तसे, काय बिशाद आहे?).... केदारने पुर्णतः उकल केली आहे.
साजिर्याला बहुतेक असं म्हणायचं आहे की मूळ प्रश्न हा मराठी माणसाला नोकरी न मिळण्याचा आहे, नोकरी कशी मिळवावी हा नाहीये... पण स्वाती म्हणाली ते बरोबर आहे.... मुद्दे पटत नसतील तर ते खोडून काढावेत... हेटाळणीवजा लिहू नये...
<<त्या 'डॉलर्स' बद्दल अजूनही तुम्हाला अभिमान आहे? तुमचा मान सांगताहात की अपमान..???>>
साजिर्या, अरे अभिमानाचा प्रश्न नाहिये, पण अजूनही १ डॉलर = ४६ रूपये आहेच... तेव्हा एखाद्याला मदत करावी वाटली तर काय चुकलं... पण असं काही करायला गेलं की भारतात 'डॉलर तेवढे द्या, सल्ले नका देऊ' असं उत्तर येतं असं झक्कींना म्हणायचं आहे.... असो.. हा विषय वेगळा आहे...
केदार, मस्त पोस्ट आहे... इथे या लेखाला प्रतिक्रिया लिहिणार्या प्रत्येकाला जे वाटतं ते अगदी योग्य शब्दात लिहिलंयस...
लालू, केदारजोशी, स्वाति, adm या सर्वांना धन्यवाद.
असो. मला वाटले मराठी लोकांना नोकर्या मिळणे कठिण जाते म्हणून मी सुचवले. इतर प्रांतातील लोक काय करतात माहित नाही. पण बहुधा त्यांना या नोकर्या सहज मिळत असाव्यात.
केदार, चान्गली पोस्ट!
काही अजुन मुद्दे मनात आहेत
फाळणी नन्तर सिन्धी लोक पुण्यामुम्बई व महाराष्ट्रात अनेक शहरात स्थाईक झाले, त्यान्च्या बद्दल कधी असला ओरडा ऐकायला मिळाला नाही, वा ते ही स्वतःची सन्स्कृती जपुनही इतरान्ना काट्यासारखे खुपले नाहीत!
पन्जाबी/सरदारजी, गुजराथी, मारवाडी लोक तर महाराष्ट्रात व्यापारउदिमाच्या निमित्ताने कित्यक दशके (की खरे तर शतके?) स्थाईक हेत, त्यान्च्या परम्परा उत्सव सणसूद साजरे करत, पण तेही कधी बोचले नाहीत
मात्र पन्चवीस तीस वर्षान्पुर्वी, असेच बाहेरून (सरकारी व खाजगी नोकरभरतीच्या व्यवस्थेतून) लादलेले साऊथ इन्डीयनाबद्दल त्यावेळेस शिवसेनेला रान उठवावे लागले होते! तसेच काहीसे आत्ता युपीबिहारीन्बद्दल होत आहे, यान्च्याबद्दलच असे का होते याचा विचारही न करता, केवळ राज ला बळीचा बकरा करणे कितपत योग्य हे? राजचा मूळ मुद्दा, रेल्वेच्या भरतीच्या जाहिराती महाराष्ट्रात प्रसारीतच होत नाहीत, जागान्ची सन्ख्या कमी, या मुद्द्याना कोणतेही प्रशासकीय वा मिडियाकडून उत्तर का नाही दिले जात?
अन उपदेशाचे डोस, केवळ मराठी माणसालाच का पाजले जातात? त्या युपीबिहारीन्ना अन त्यान्च्या नेत्यान्ना का पाजले जात नाहीत?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
केदार, नेहमीप्रमाणेच मुद्देसूद पोस्ट.
लालू, स्वाती अनुमोदन.
झक्की हे सर्वच दृष्टीने माझ्यापेक्षा वरच्या योग्यतेचे आहेत, त्यांची किंवा त्यांच्या पोस्टच्या 'हेटाळणी'चा प्रश्नच उद्भवत नाही..
खरे तर संपूर्ण प्रतिक्रियेला पुराणिकांच्या लेखनाची पार्श्वभूमी होती, पण त्यामुळे माझी पोस्ट भडक झाली असेल, तर झक्की आणि इतर लोकांनी माफ करावे.
केदार, धन्यवाद..
माझ्या लेखात प्रामुख्याने मी २ मुद्दे मांडले आहेत.
१) जागतिकीकरण - त्यातून निर्माण झालेले स्थलांतर - त्यातून उत्पन्न झालेला भूमिपूत्र वि. परप्रांतिय वाद - मुंबईतील त्याच्या गांभिर्यची सत्यापसत्यता
२) परप्रांतियांचा विरोध करण्यासाठी वापरलेल्या हिंसक मार्गचा विरोध
अनेक लोकांना असे वाटते की माझा पहिल्या मुद्दयाबाबतचा माझा अभ्यास कमी आहे. आणि असेलही. परंतु बहुतेक लोकं मला दुसऱ्या मुद्दयाबाबतीत तरी साथ देतील अशी आशा आहे.
लोकांचे स्थलांतर नुसते उत्तर प्रदेश - मुंबई, मेक्सिको - अमेरीका पुरते मर्यादित नसून जगात अनेक ठिकाणी चालू अाहे. खुद्द भारतातही बांगलादेश - आसाम, बांगलादेश - मुंबई अशी अनेक उदाहरणे अाढळून येतील. जगातील इतर लोकं याचा सामना कसा करतात हे आपण पाहिलं पाहिजे, जगापासून शिकलं पाहिजे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं गुंडगिरी करतात की नाही हे मला ठाऊक नाही कारण गेली ८ वर्षे मी अमेरीकेत राहत आहे आणि माझ्या मुंबईतील अाईवडीलांना प्रत्यक्ष अनुभव असा नाही. पण जर ते गुंडगिरी करत असतीलच तर त्यांना हिंसा सोडून इतर कुठल्या मार्गाने उत्तर देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कायद्याच्या कक्षेत राहून त्याचा विरोध करणे अशक्य आहे असे मला वाटत नाही.
हिंसेने कुठलेच प्रश्न पूर्णपणे, कायमचे सुटत नाहीत. मागे जेम्स लेन नावाच्या इतिहास संशोधकाने शिवाजीविषयी काही लिहीलं म्हणून आपण आपल्याच भांडारकर प्राच्यविद्दया संस्थेची वाट लावली. त्यातून काय साध्य झालं? आपलंच नुकसान झालं. "राज" कारणातून झालेल्या हिंसेमुळे महाराष्ट्राची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात (खरी वा खोटी) बदनामी झाली हे तर खरं आहे ना? लॅास एंजलिसमध्ये मला कितीतरी भारतीयांनी या प्रकरणाबद्दल जाब विचारला.
जर मुंबईत परीस्थिती गंभीर असेलच तर हिंसेऐवजी पुढील पैकी काही मार्ग चोखाळता येतील:
१) मंत्रालयावर मोठ्या संख्येने मोर्चा नेऊन सरकारला निवेदन देणे.
२) आपल्या आमदार/खासदारांना मोठ्या संख्येने पत्रं पाठवणे, फोन करणे.
३) ज्या दुकानांवर मराठीत पाट्या नाहीत त्या समोर त्यांच्या मालमत्तेचं नुकसान न करता निदर्शने करणे अथवा बहिष्कार टाकणे
४) रेल्वे भरतीत स्थानिक लोकांना प्राधान्य दिले गेले नाही तर रेल रोको आंदोलन करणे.
५) अगदी गरज वाटलीच तर परप्रांतियाशी शांततामय असहकार पुकारणे (उदा.- आमची गिरगावातली जागा आम्ही कमी पैसे घेऊन, पण मराठी माणसालाच विकली).
अशा प्रकारे तळागाळातल्या लोकांनी मिळून चळवळ उभी केली तर राज्यकर्तेही नमतील आणि प्रसारमाध्यमांनाही लोकांची सकारात्मक दखल घ्यावा लागेल. मूळ प्रश्नाकडे देशाचं लक्षं वेधलं जाईल.
आणि शेवटी एक उत्सुकता म्हणून - आपल्यापैकी ज्यांना कोणाला एखाद्या उत्तर प्रदेशिय किंवा बिहारी माणसाच्या गुंडगिरीचा प्रत्यक्ष अनुभव आला असेल तर त्याने/तिने ता इथे लिहावा अगर मला पाठवावा. मी ते संकलित करीन - त्याचा वापर मी जे लोकं आम्हाला लॅास एंजलिस मध्ये जाब विचारतात त्यांची तोंडं बंद करण्यासाठी वापर करीन.
केदार फारच मुद्देसूद पोस्ट....
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
१. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकं गुंडगिरी करतात की नाही हे मला ठाऊक नाही कारण गेली ८ वर्षे मी अमेरीकेत राहत आहे आणि माझ्या मुंबईतील अाईवडीलांना प्रत्यक्ष अनुभव असा नाही. .........
आणि मुम्बईत पावलापावलावर मॉल आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बेरोजगारी हटलेली आहे, हे कसे समजले... ?
२. जर मुंबईत परीस्थिती गंभीर असेलच तर हिंसेऐवजी पुढील पैकी काही मार्ग चोखाळता येतील:.........
हे सगळे मार्ग सगळे चोखाळत असतातच की, त्यात विशेष काय... आणि तुम्ही असे आणि दहा मार्ग चोखाळायला सांगाल .. उंटावरून शेळ्या हाकायला... तेही प्रत्यक्ष नव्हे तर कसे हाकायचे एवढे मायबोलीवर लिहायला तुमचे काय जातंय म्हणा....
३. "राज" कारणातून झालेल्या हिंसेमुळे महाराष्ट्राची भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात (खरी वा खोटी) बदनामी झाली हे तर खरं आहे ना? लॅास एंजलिसमध्ये मला कितीतरी भारतीयांनी या प्रकरणाबद्दल जाब विचारला.
बदनामी झालेली नाही, जाणीव पूर्वक केली गेलेली आहे... महाराश्ट्रात हिंसाचार असतो असा.... जणु बिहार, यू पी म्हणजे नंदनवनच आहे....
.....आणि मुळात या सगळ्याशी तुमचा संबंध फक्त जाब विचारण्यार्याना उत्तर देऊन स्वतःची कातडी वाचवण्यापुरताच आहे, हेही सिद्ध झाले....
व्हीपुराणिक, आपल्या मतान्चा आदर ठेवुन......
जागतिकीकरणाचे परीणाम गेल्या दशकभरातले, पण त्या आधीही या देशाने, फाळणी निमित्ताने, त्याही आधी प्लेगसदृश साथिंमुळे, पुर्/भुकम्प इत्यादी नैसर्गिक सन्कटादरम्यान, युद्धे/दन्गली मुळे मोठ्याप्रमाणावर स्थलान्तर अनुभवले आहेच शिवाय पोटापाण्याकरता प्रगतशील महाराष्ट्राकडे धाव घेणारे देखिल सामावुन घेतले अन पचवले देखिल आहेत, अन हे सान्गण्यात फुशारकी नाही की बहुतान्श महत्वाची स्थलान्तरे महाराष्ट्रातच झालेली आहेत!
माझ्या आधीच्या पोस्ट मधील मुद्दा पुन्हा मान्डावा लागतोय की त्या त्या वेळेस तो तो जनसमुह महाराष्ट्राने जर पचवला, तर पन्चवीस वर्षान्पूर्वी साऊथ इन्डियन आणि आता युपीबिहारीन्बद्दलच नेमके असे काय घडते आहे की जेणेकरुन ते "पचले" (अर्थात सामावले) जात नाहीत?
शिवाय, आपण म्हणता त्याप्रमाणे हा केवळ "स्थानिक भुमिपुत्र व बाहेरचे" यातिल पोटापाण्याच्याच अस्तित्वाच्या लढाईचा केवळ वाद नसुन "जे मराठी ते महाराष्ट्रिय व बाहेरचे" यान्च्यातील सर्व स्तरावरील अस्मितेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे!
दुसरे गृहितक आपण मान्डता की "परप्रान्तियान्चा विरोध हिन्सक मार्गाने का?" व याबद्दलचे "मिडिया" मार्फतचे ऐकिव्/वाचिक दाखले देता! तुम्हाला "हिन्सक मार्ग" म्हणजे खरोखर माहित आहे का? त्याची तुमची व्याख्या काय? त्या व्याख्येत महाराष्ट्रातील सद्यस्थिती बसते का? की मिडीया बोम्बलते म्हणून त्यान्च्या शन्खात आपणही आपला सूर मिसळायचा?
तुम्ही दिलेल्या लोकल ट्रेनमधिल उदाहरणात तर स्पष्ट पणे रेल्वे पोलिसान्नी निवेदन केलेले आहे की ती "हत्या" (खरे तर सदोष मनुष्य वध) बसण्याच्या जागेवरील भाण्डणातून झालेली आहे! त्यात भाषिक वादाचा सम्बन्ध नाही, अन हे निवेदन लालुप्रसादाच्या रेल्वेपोलिसान्नि दिलेले आहे!
मला विचाराल, अन आकडेवारी गोळाकराल तर कळेल की विदर्भात नागपुर मनमाड मार्गावर असा कित्येक घटना पुर्वी घडल्याहेत, अजुनही घडतील कदाचित, पण लगेच त्याचा सम्बन्ध "राज" च्या राजकारणाशी लावणे, गृहितक मान्डून मराठी माणसान्ना साप साप म्हणून धोपटल्याप्रमाणे करणे हे कितपत योग्य हे?
कुर्ल्याला गावठी कट्टा घेवुन गोळीबारी करणार्या "राज" बाबत तेवढे आपण बोलला नाहीत अजुन, जरी मिडीया, तो ठरवुन केलेला एन्काऊण्टर्/खून वगैरे प्रचार करत्ये! (आता चक्क चक्क मिडीयाच्या स्क्रीनवरच, भर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी हातात बन्दुक घेवुन, एकास ओलीस ठेवुन, एकास गोळीबाराने जखमी करुन, धमकाविणारा माथेफिरू युवक ज्यान्नी ज्यान्नी बघितला हे, त्यान्ना आश्चर्य वाटणार नाही की पोलिसान्नी उपलब्ध हत्यारानिशी (बहुदा थ्रीनॉट्थ्री) त्याचा प्रतिकार केला, ज्यात तो ठार झाला! त्यान्ना याचेही आश्चर्य वाटणार नाही की पोलिस त्याला "अहिन्सावादी मार्गाने" हारतुरे घेवुन परावृत्त करायला गेले नाहीत!
पण मिडीयाला काय त्याचे? बसच्या खिडकीत बसलेल्या त्या माथेफिरूच्या डोक्यातच गोळी का बसली, अन थ्रीनॉटथ्रीचीच का बसली, अन अमक्याच अन्तरावरुन का झाडली याची चिकित्सा करून टीआरपी वाढवण्याच्या धन्द्याला जर कित्येक "सुशिक्षीत अडाणी" लोक बळी पडत अस्तिल तर ब्रह्मदेवच येऊदे बोवा महाराष्ट्र पोलिसान्ना वाचवायला!
आणि काय हो? आपण सुचविलेले पाच उपाय करण्यास माणसे कुठून गोळा करायची? इथे काय (तिकडच्यासारखे) "पेड व्हॉलेन्टियर्स" ठेवायची पद्धत नाही, परवडणारही नाही!
अन रेल रोको सारखे उपक्रम करायचे तर त्यास "जीवावर उदार" माणसे किती सन्ख्येने लागतील? ती कुठून कशी आणायची/गोळा करायची याचेही बहुमुल्य मार्गदर्शन केलेत तर बरे होईल.
शिवाय, असा गोळा केलेला मॉब, जर हाताबाहेर गेला, हिन्सक बनला तर तो तसा बनु नये म्हणून वा बनल्यास कुणी कसे कन्ट्रोल करायचे अस्ते याचेही प्रशिक्षण/मार्गदर्शन आपल्याकडून झाले तर बरेच होईल
रेल रोको केला अस्ता, किती प्रवाशान्ना कसा त्रास झाला, किती "राष्ट्रिय सम्पत्तीचे नुकसान" झाले याची आकडेवारी घेवुन लान्डग्याकोल्ह्याप्रमाणे तुटून पडणार्या, लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तम्भ(?) मिडीयाला कसे थोपवायचे हे ही आपल्याकडून कळले तर बरे!
गुन्डगिरीचा प्रश्ण आपण विचारलाहेत, पण त्यास उत्तर देण्याआधी, वरील प्रश्णान्बाबतची आपली भुमिका समजली, तर "व्हाईटकॉलर्ड वा छूपी अशा सन्ख्यात्मक गुन्डगिरीची" बक्कळ उदाहरणे आपणास सान्गता येतिल.
रहाता राहिला प्रश्न, तिथे तिकडे तुम्हाला जाब विचारणार्यान्चा! मराठीपण विसरलेले नसाल, तर त्यान्ना ठणकावून सान्गा ना, की मला का जाब विचारता? हव तर महाराष्ट्रात जावुन खरी परिस्थिती समजुन घेवुन "राज"लाच जाब विचारा, कसे?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सर्व स्तरावरील अस्मितेच्या अस्तित्वाचा
तसले काही महाराष्ट्रातल्या लोकांमधे नाहीये. महाराष्ट्राची अस्मिता? त्यांना स्वतःची भाषा, स्वतःचे आचारविचार हे इतर भाषा, इतरांचे आचार विचार या पेक्षा लाजीरवाणे वाटतात. गणेशोत्सव महाराष्ट्रीय. त्यात दारू पिऊन, अचकट विचकट नाचत हिंदी सिनेमातली गाणी नि नाच करायचे, ही का महाराष्ट्रीय आस्मिता?
महाराष्ट्रात आज सर्वात जास्त पैसा आहे, पैसा मिळवायला जास्तीत जास्त वाव आहे. कदाचित् शिक्षणहि जास्त चांगले मिळत असावे. रहाणीमानहि बरे असावे. सुरक्षितताहि असावी. त्यापेक्षाहि लोक अत्यंत सहनशील. हिंदी शिकतील, तुमच्यासारखे आचार विचार करतील, स्वतः चे सगळे सोडून तुमची नोकरी करायला येतील. पुनः भाषेची अडचण कुठेच नाही. मग का नाही सगळे लोक महाराष्ट्रात येणार?
खरे तर अमेरिकेतहि याच कारणासाठी जगातले सर्व लोक येतात, भारतीय सोडून इतर अनेक देशातले लोक शिकलेले नसतात, विशेषतः मेक्सिको, क्यूबा, प्योर्टो रिको येथून आलेले लोक हलक्या दर्जाची कामे करतात. पण आजकाल लॉस एन्जल्स, मायामी इथे गेलात तर या देशाची भाषा इंग्रजी आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सर्वत्र सरकारी कामकाजात इंग्रजी बरोबर स्पॅनिशमधेहि कागदपत्रे असतात. पण याचा अर्थ असा नव्हे की इंग्रजी बोलणारे सर्व लोक इंग्रजी सोडून इतर भाषा बोलतात. त्या लोकांना जर काम पाहिजे असेल, तर मोडके तोडके का होईना, इंग्रजीच बोलावे लागते, इथल्या लोकांप्रमाणेच इथले सण, इथल्या चालीरीतींप्रमाणे वागावे लागते.
महाराष्ट्रात तसे नाही. तुम्ही आमची भाषा शिकायची गरज नाही, कारण आम्हालाच मराठी भाषा बोलायला लाज वाटते, आमचे खेळ, आमच्या चालीरिती पाळायची लाज आहे.
अमेरिकेत येऊन मराठी शाळांची संख्या वाढते आहे, पण महाराष्ट्रात म्हणे मराठी माध्यमाच्या शाळा तर बंदच होताहेत, पण मराठी शिकायलाहि फारसे विद्यार्थी जात नाहीत म्हणे.
<<अमेरिकेत येऊन मराठी शाळांची संख्या वाढते आहे, पण महाराष्ट्रात म्हणे मराठी माध्यमाच्या शाळा तर बंदच होताहेत >>
इथे अमेरिकेत मराठी शाळा आहेत? ऐकावं ते नवलच...
<<पण मराठी शिकायलाहि फारसे विद्यार्थी जात नाहीत म्हणे.>>
हो, हे खरे आहे.... माझ्या ओळखीच्या काही लोकांनी हट्टाने आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले आहे... पण त्यांचं म्हणणं असं आहे की रिझर्वेशन च्या नावाखाली कोणालाही नोकर्या देऊ केल्या आहेत, त्यामुळे या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा अतिशय खालावला आहे.... कोण घेणार मग प्रवेश तिथे...इंग्रजी माध्यमाच्या शाळा या प्रायव्हेट असल्यामुळे तिथे बरे शिक्षक असतात (म्हणे).... अर्थात याला 'इंग्रजी' म्हणजे 'चांगलं' ही भावना सुद्धा कारणीभूत आहे...
असो... झक्क