भाग २ पुढील शिक्षा . . . . || कृष्णम् वंदे जगद्गुरुम ||

Submitted by परब्रम्ह on 6 July, 2013 - 07:04

|| श्री गणेशाय नम: ||

" यशोदा ! अगं यशोदे ! ! "

कलत्या दुपारच्या वेळेस यशोदेने घराबाहेर गौळणी आल्या आहेत हे ओळखले.

"अगं यशोदे ! जरा ऐकते का आम्ही आता काय सांगतो आहोत ? ह्या तुझ्या कृष्णाने तर" . . . .

गौळणींच्या हाकेने घरात काही कामात गढलेली यशोदा लगबगीने बाहेर आली, पुढे होऊ घातलेल्या आपल्या सुपुत्राच्या तक्रारींनी आधीच त्रस्त झालेल्या यशोदेने विचारले, " काय झालं ? अश्या सगळ्या एकत्र जमून आल्या आहात आज पुन्हा ? माझ्या कृष्णाने पुन्हा काही खोडकरपणा केला आहे का ? "

" ऐकलं का ? गौळणी आपसात मोठ्ठ्या स्वरात बोलु लागल्या, एकत्र नाही येणार तर तू आमचं ऐकुन कसं घेशील ? "
"तुझ्या लाडक्याला तू मागे समजावुन सांगितलेस तेव्हापासुन तो आमच्या घरात शिरुन घट फोडुन त्यातले लोणी खायचे सोडुन देऊन आता तर आणखीनच जास्त खोडकर झालाय बरं ?
आता तो आम्हाला आमच्या मार्गात गाठुन म्हणतो सगळे घट आम्हाला द्या, आम्हाला त्यातले लोणी खायचे आहे, आणी नाहीच देऊ केले तर आमचे घट हिसकावुन घेतो, फोडतो आणी सारे लोणी आपल्या सहकार्‍यां बरोबर खाउन टाकतो."
ईतकेच नाही तर आताशा तो नदीच्या आजुबाजुला असतो कधी-कधी भर दुपारी, आणी आम्ही आमचे घट पाण्याने भरुन यायला निघालो ना, कि प्यायला पाणी मागतो चक्क हातांची ओंजळ समोर धरुन, पण हे काय गं यशोदा ? नदी वरुन थोडे दूर आले की गाठतो आम्हाला, आणी मग पाणी पाजुन पुन्हा आम्ही का नदीवर जाऊन घट भरुन घेऊन यायचे ?
कान्हा ! नदी ही काय जवळच आहे ना रे ? मग तुम्ही सगळे तिथे जाऊन पाणी का पीत नाही ? सारखे पाणी भरुन आम्हाला कष्ट होतात ना रे ! "
"असे आम्ही प्रेमाने जरी बोललो तरी हिसकावुन घेतो घट, पाणी पीतो आणी ते रिकामे करुन आमच्या हातात देऊन चालता होतो. "
" आणी बरं का तो राम ( हे भगवान बलरामाला उद्देशुन ), ही त्याच्याच जोडीला राहुन त्याला आणखीन प्रोत्साहन देतो, आता आम्ही काय करावे गं ? तुझ्या कडुनच आता काही निर्णय होऊ दे, पाहुया आता काय उपाय करुन ह्यातुन आम्हाला सोडवतेस ते ?"
गौळणींचा विश्वास आणी पुत्राबद्दलचे वात्सल्य, दोन्हीकडुन यशोदा आता कर्तव्य आणी माया ह्यात अडकली होती.
अखेर कर्तव्याचीच जय होऊन ती कृष्णाला शोधायला निघाली. तो काय ? गोकुळाच्या गायी आणी वासरे ह्यांच्या गळ्यांतील छोट्या छोट्या घंटांचा मंजुळ ध्वनि कानांवर आलाच, सगळे घरांकडेच परतत होते आणी हे दोघे रामकृष्ण महावीर येतच होते समोरुन हसत खेळत आपल्या सवंगड्यांबरोबर.
आई आपल्या दिशेने तरातरा चालत येत असलेली पाहुन काहीतरी गडबड आहे ह्या शंकेने कृष्ण ही जलद चालत आईकडे आला, " आई काय झाले गं ? अशी लगबगीने कुठे निघालीस ? आणी चिंतित का दिसत आहेस ? "
यशोदा तर आपल्या त्या मेघवर्णी श्याम मूर्तीच्या अतिसुंदर रुपाकडे पाहुन न कळत संम्मोहित
झाल्यासारखी, त्या धुळीने भरल्येल्या मनोहर चेहेर्‍याकडे पाहात काय बोलायचे होते तेच विसरली.

तेव्हढ्यात त्याचे लक्ष रामाने आपल्या घरा जवळच उभ्या असलेल्या गौळणींकडे वळवले आणी झटक्यात सगळे चित्र स्पष्ट झाले.
गौर निताई . . . . ! धूम पळत सुटले घराच्या दिशेने, क्षणभर थांबून त्यांनी असे निरखून पाहिले त्या गौळणींकडे कि त्यांना वाटले रामकृष्ण सुचवित आहेत, आमची चहाडी केलीत ना ?
पण अचानक दोघांनी एक मंद स्मित केलं आणी पळाले घरात.

गौळणींना कळेचना कि आपण ईथे येऊन चुक केली ? कि ठीक केलं ? आता ह्या अतिसुंदर निरागस रामकृष्णांना काय शिक्षा मिळेल ? आपलंच चुकलं !

"अगं मागतात पाणी आणी लोणी तर देऊया, पण उगीचच यशोदेला त्रास आणी ह्या नयन मनोहर जोडीला ही त्रासच ना ? अगं ह्यांच्या जन्मापासुन तर आपल्यावर आलेली सर्व संकटे कशी एखाद्या वादळात वाळुन पडलेली पाने उडत जावीत तशी दूर केलीत ह्या दोघांनी ?

हो ना गं, मी तर म्हणतच होते कि नको जाऊन यशोदे कडे कागाळ्या करु, पण माझं ऐकेल कोण ?"

गौळणी आल्या होत्या कागाळ्या घेऊन आणी परतत होत्या आता पश्चाताप घेऊन.

"कृष्णा ! कुठे पळतोस ? थांब तुला दाखवतेच, मी आज तुला सोडणार नाही, असे म्हणत यशोदा घरात वेगाने शिरली पण तिच्या बाजुनेच कृष्ण झटकन घराबाहेर पळाला, हे तिच्या लक्षातच आले नाही.

सगळ्या घरात शोधुन पाहिले, कृष्ण कुठेच दिसला नाही ! असे कसे झाले ? माझ्या डोळ्यांसमोर घरात गेला ना ? काय रे रामा ? कुठे लपुन बसला आहे रे तो ?

बलरामाने आपला सुंदर चेहेरा आणी त्यावर आणखीन भुवया चढवुन मिस्किल भाव दर्शवत स्मित करीत तिला सुचविले कि तो बाहेर पळाला . . . .क्षणा-क्षणाला हे दोघेही किती संम्मोहित करतात ! भगवंताचीच कृपा आहे कि ह्या दोघांच्या रुपाने तोच सर्वगुण संपन्न होऊन अवतरला असावा . . . .

हा गौरकाय बलराम दिवसभर निलांबर नेसुन सर्वांनाच किती सहाय्य करतो सर्व कामांमध्ये ! स्वभावाने सर्वानाच अतिप्रीय वाटतो आणी हा कृष्ण, आपल्या पितांबराला आवरत आवरत नेहेमी बागडत असतो सगळीकडे आणी किती मधुर भाष्य ह्यांचे ?
नाही, नाही हे काही कुठल्याच शिक्षेचे पात्र नाहिच, ह्या गौळणीच उगीच नेहेमी मला ह्यांच्या कागाळ्या सांगुन त्रास देतात.

यशोदा पुन्हा घराबाहेर आली . . . ."कृष्णा ! कुठे आहेस रे ?"

अंगणात ठेवलेल्या ओखळीच्या मागुन लपुन हे महाशय हळुच डोकावुन पाहात होते, कि आता आई काय करेल ?
त्याला तसे पाहातांना पाहुन यशोदा भानावर आली, कश्याकरता ती बाहेर आली हे ध्यानात आले आणी, "थांब मी तुला त्या ओखळीलाच बांधुन ठेवते, म्हणजे जायचा नाहीस कुठे तू, ही शिक्षा तुला बरी आहे".

निघाला तो भगवान श्रीकृष्ण त्या ओखळीच्या मागुन आणी उभा राहिला आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवुन तिच्यासमोर ! काय वर्णावे ते सौंदर्य ! जणु काय म्हणत आहे , असं का ? चल मग दाखव मला पकडुन.

सगळ्या अंगणात यशोदा त्याच्या मागे धावत होती पकडण्यासाठी आणी हा तर हातिच येत नव्हता, "अरे रामा ! असा काय नुसता उभा राहुन पाहातो आहेस मिस्किलपणे ? माझी अवस्था काय झाली बघ ना रे ! ये ना पकड त्याला आता तूच, आणी आण माझ्याजवळ !"
"मोठी आई ! बलराम यशोदेला उद्देशुन बोलला, तुमच्या हाती जो येत नाही तो माझ्या हाती कसा येणार ?"
यशोदा आता कृष्णाच्या मागे धाऊन खूप थकली, घामाने चींब झाली, पाय उचलेनासे झाले, धाप लागली होती जोराची, गलित गात्र होऊन बसली आपल्या ओसरीच्या पायरीवर आणी मोठ्या मायेने आणी कौतुकाने कृष्णाला म्हणाली !
"आईची परिक्षा पाहातोस ? किती छळशील ? आता काहिच त्राण नाही राहिले रे कान्हा ! हात जोडते तुला, ये नारे बाळा माझ्याजवळ आता !"
क्षणभरासाठेच तिने डोळे मिटुन आपल्या चेहेर्‍यावरुन हाताचा तळवा कपाळापासुन गळ्यापर्यंत फिरवुन घाम पुसण्याचा प्रयत्न केला . . . . . .
" आई !" कृष्ण समोर उभा होता, त्याने आपल्या आईच्या चेहेर्‍यावरुन आपला सुंदरसा रक्तवर्णी तळवा मायेने फिरवला, आणी यशोदेचे सगळे त्राण परत आले, त्या नुसत्या स्पर्शानेच तिच्या रोमा रोमात पुनःश्च प्राण फुंकले जणु, तिने झटकन त्या त्रीभुवनसुंदराला आपल्या हातांच्या मिठित गच्च धरुन ठेवले, " का रे एव्हढा छळतोस मला नेहेमी ? कशी मी तुला काही शिक्षा करु शकेन बरे ? त्या गौळणी काहीबाही सांगतात आणी मला राग येतो त्यांचा तुझी कागाळी घेऊन आल्या कि !"

" आई ! त्या गौळणी ना खोटं बोलतात, आम्ही नाही काहिच करीत, त्याच आम्हाला पाणी नाही पाजत, आई ! आम्ही सगळ्या गायींना, वासरांना किती दूर घेऊन जातो त्यांना रोज चांगला हिरवा गार चारा मिळावा म्हणुन, त्यांना सांभाळतांना किती त्रास होतो ! मग आम्ही रानफळे खातो, घरुन घेऊन गेलेल्या शिदोर्‍या सोडुन जेवतो, मग तहान नाही का लागणार आई ?
आणी त्या लोणी घेऊन जातात तेव्हा त्यातले थोडेसे मागितले तर काय बिघडते ? त्या आम्हाला चिडवतात, मग आम्ही ते हिसकावुन घेतले तर त्यात काय चुक होते ? "

"हो का ? इति यशोदा, अस्सं, म्हणुनच बरंका त्या कागाळ्या करतात ते ठीकच आहे.
आणी वरुन आता मला मोहात पाडतोस ना गोड गोड बोलुन ? कान्हा ! हे ठीक नाही, असं करु नये !

" नाही, आमची काहिच चुक नसतांना आम्हाला का म्हणुन शिक्षा व्हावी ? " असे म्हणत कृष्ण तिच्या पासुन थोडासा दूर झाला, तरी यशोदेने पुन्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, एका हाताने झटकन त्याचा हात धरला आणी दुसर्‍या हाताने जवळच पडलेली एक वासराची बांधायची दोरी हातात आली.

"आज मी तुला बांधुनच ठेवते थांब, म्हणजे तुला कळेल काय चुक आहे ते", कृष्णाला धरुन ती त्याला ओखळीकडे घेऊन आली, आणी त्या दोरीने तिने कृष्णाला आणी ओखळीला वेढा देऊन गाठ बांधायचा प्रयत्न केला पण दोरी थोडीशी कमीच पडली, " रामा ! ती तिकडे दोरी पडली आहे ती दे बरं !' बलरामाने एक-एक करीत तीच काय ! जितक्या दोर्‍या यशोदेने मागितल्या त्या सर्व आणुन दिल्या पण तरीही दोरी कमीच पडे !

"कृष्णा ! हे रे काय ? आईची परिक्षा पाहातोस ? अरे, खूप वेळ झाला आता, मी ही खूप थकले आहे, आता तुझी माया थांबव आणी बांधुन घे स्वतःला ! नको अंत पाहूस असा ! "

"अगं आई ! दोरी केव्हढी मोठी केली आहेस बघ सगळे तुकडे बांधुन, बांध कि आता ! "

आणी तो चराचराचा स्वामी, भगवान नारायण बांधला गेला. आणी त्याची माता यशोदा आता पूर्ण निश्चींतीने पुढील कार्ये करण्यास मोकळी झाली.
----------------------------------------
मला उमजला तसा अर्थ . . . .

भगवान श्रीकृष्ण हा स्वतः परब्रह्मच, मग हा स्वत: उपस्थीत असतांना गौळणींनी केलेल्या श्रम-कर्मांची फळे ( लोणी ), हे आणखीन कुठे न्यायची काय आवश्यकता ? त्यांच्या कर्मांची फळे स्वत: भगवान मागतो ह्यापेक्षा आणखीन काय चांगले भाग्य असणार ? त्याचेच आहे, तोच मागतो आहे ना !
पण अज्ञानामुळे नाही दिले, तर हातुन काढुन घेतले ही परमकृपाच आहे, कारण त्यानंतर कोणत्याही जन्माची संभावना निर्माण न होता त्या सगळ्या गौळणी केव्हाच मोक्ष पाऊन गेल्या होत्या, बाकी काय जी कार्ये त्या करीत होत्या ते फक्त प्रारब्ध मात्र राहिले होते.

पाणी पाजणे . . . .भर दुपारी ( आजकालच्या कालमाना प्रमाणे ), सहसा १२ ते २ दुपार ही घोर वेळ असते, ह्या वेळी नदी, तलाव, समुद्र किनारा, झरे अश्या ठीकाणी जाऊ नये, ह्यावेळेस जाऊन त्या गौळणी पाणी भरुन घरी घेऊन जातात, ते पाणीही त्यांच्या घरी पोहोचु नये, यासाठी हा हट्ट.
भक्ताच्या न कळत भगवान नेहेमी त्यांच्या भक्तांना संकटांपासुन दूर ठेवतो, वेळी बळजबरी करावी लागली तरी, कारण ते भक्तांच्या कल्याणाकरीताच असते.
घट फोडुन देणे . . . . .तुमचे कार्य फळ मी प्राप्त करुन तृप्त झाली आहे, आता ह्या पात्रांची आवश्यकता नाही. कारण तुमचे सर्वोपरी परमकल्याण झाले आहे.

प्रत्येक वेळेस कृष्णाने प्रत्येकिचे प्रत्येक घट फोडले असे नाही. एक घट फुटला कि त्या व्यक्तिचे जीवन कार्य संपूर्ण सफळ, मुक्त झाले ते, राहिले ते फक्त प्रारब्ध.

परंतु आजकाल जशी कथा कथन केली जाते त्याने असेच प्रतित होते कि जितक्या वेळेस सगळ्यांनी जितके नविन घट आणले, तितक्या वेळेस, कृष्णाने ते फोडुन नष्ट केले असावेत. . . .खरे तर असे नाही आहे.

यशोदा . . . . परब्रह्माची ह्या अवतारात माता, "मी तुला पकडते", हा तिचा अहंभाव असल्याने तिच्या हाती तो भगवान आलाच नाही, परमतत्वाला कोण कसे काय पकडणार ?

त्याला पकडण्यासाठी घरात ( म्हणजे अंतरंगात ) शिरली, पण अहंभावाने बुद्धीवर आवरण आल्यामुळे भगवान केव्हा समोरुन ( अंतरंगातुन अंतर्धान, असुनही मिळणार नाही ), गेले हे कळालेच नाही.
अहंभाव ठेवुन मला पकडण्यास आलात तर मी कधीच हाती येत नाही ( मग ईथे माता का असेना ? हाच तो आणखीन एक अनासक्तिचा भाव, माता असली तरीही अहंभाव ठेवुन चालणार नाही, तो तसा नाहिच,
आपली सर्वच कर्तव्ये आणी कार्ये श्रीकृष्णाने ह्या अवतारात सुद्धा संपूर्ण रितीने केली, आणी ईतक्या अत्त्युच्च कोटीच्या सफलतेने केली, कि हे सर्व करतांना तो कश्यातही, कोणातही, कश्यासाठी ही आसक्त झाला नाही, हे बहुधा फारच थोड्या जणांना त्यावेळेस ज्ञात असावे, कारण तसे आहे हे त्याच्या कोणत्याही वर्तनाने कधीच प्रतीत झाले नाही, कारण तसे नव्हतेच.
कर्म योगी खरा ) . . . .

बलरामा कडुन सहाय्याची अपेक्षा . . . . तोही भगवान शेष ! स्वयं महामायेच्या, मातेच्या हाती येत नाही, तर माझ्याकडुन कसा सहाय्य करुनही येणार नाहीच !
आणी हो ! भगवंताची लीला ही अनुभवायला मिळतच होती ना ! मग त्यात खंड नसता का पडला ? Happy

हाती आलाच नाही . . . . अंत रंगातुन जो निघाला, तो अंगणात ( बाह्य विश्व ) सगळी कडे कष्ट करुनही मिळाला नाहीच.

पूर्ण थकुन बोलावले तेव्हा . . . . पण काया, वाचा, मन, इंद्रीये, बुद्धी ह्या सर्वांनी मला एकाग्र होऊन शरण याल तर मी तत्काळ तिथेच उपस्थित होऊन हाती दिसेन, हेच भगवंताला सुचवायचे होते.

दोरीने बांधणे . . . . .पुनःश्च अहंभाव, दोरी म्हणजे ईथे भौतिक बंधन आणी तेही, परब्रह्माला ! गोपाल हा सर्व इंद्रीयांचा स्वामी . . . . दोरी हे त्याचे बंधन होणारच कसे ?
सर्व व्याप्त परमेश्वराला बांधण्यासाठी दोरी नाही, आपला भक्ति भाव अथवा, आपला भगवंताबद्दलचा परमावधीचा भक्तिभाव आणी तोसुद्धा कोणत्याही फलाशेविना, आवश्यक आहे, आणी तो असला अथवा आला, कि भगवान आपल्याआपण आपल्या बंधनात येतो, पण आपल्याला ईतर सर्व बंधनांतुन मुक्त करतो.
-------------------------
त. टी. : भगवान शेष, ज्याच्या शरीरावर भगवान महाविष्णु शयन करतो, ह्याने विनंती केली होती कि,
तुमचे अवतार कार्य पाहाण्यासाठी माझी तुमच्या बरोबर येण्याची ईच्छा आहे, तेव्हा भगवान विष्णुने हे मान्य केले.
श्रीराम अवतारात हा शेषनाग लक्ष्मणाच्या रुपाने आला, भगवान राम जेव्हा शरयु नदीत जलसमाधीच्याद्वारे आपल्या परमधामास ( वैकुंठ ), गमन करण्यासाठी निघाले तेव्हा पुन:श्च पुढच्या अवतारात मला ज्येष्ठ बंधु म्हणुन येऊ द्या द्यावे ह्या विनंतीस मान्य करुन भगवान श्रीकृष्ण बलरामाचे कनिष्ठ बंधु म्हणुन अवतरले.
---------------------------------------

मला हे ज्ञात आहे कि वरील इतिहास सर्वांना ज्ञातच असेल, ( तेव्हा ह्यात काय नविन आहे ? ज्ञान द्या, ज्ञान असे काही शेरे मिळणार असतीलच Happy ), तरीही, हे वरील सर्व इतिहास मी जेव्हा माझ्या कारण मिमांसक दृष्टीकोणातुन पाहिला तेव्हा भगवंताशी अचानक जास्त जवळीक निर्माण होऊन, आता सर्व ठीकाणी एकच परमतत्व भरुन राहिले आहे आणी ते कसे जाणवुन घेऊ शकतो ह्याची प्रचिती आली.
जाणवतो ही आहेच, त्याच्याच प्रेरणेने हे लिखाण होतच असते, कारण मला माझे अनुभव वाटुन ध्यायचे असतात.
हे वरील केवळ उदाहरण आहे . . . . कारण सर्व काळ जेव्हा हीच दृष्टी ठेवुन कर्मे केली तेव्हा सगळे उमजले.
नितांत विश्वास, श्रद्धा, भावना, बुद्धी ह्या सर्वांच्या तीव्रतेने केंद्रित करुन केलेल्या भक्तिला त्याचा प्रतिसाद त्याच्याच सान्निध्याने प्राप्त झाला आहे.

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

या वाक्यावरून कळकळ हा शब्द योजवासा वाटला :

>> ... त्याच्याच प्रेरणेने हे लिखाण होतच असते, कारण मला माझे अनुभव वाटुन
>> ध्यायचे असतात.

अर्थात, माझी शब्दनिवड चुकीची वा न पटणारी असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

मला तरी ही गोष्ट, गोष्ट म्हणूनच आवडते. त्यातील तुम्ही सांगितलेला अर्थ फारसा रूचत नाही...

- आईही घोर वेळ म्हणून दुपारी (१२ ते ४) नदीवर जावू द्यायची नाही. घोर वेळ कोणती आणि का?

परब्रम्ह जी,
सप्रेम नमस्कार,
|| कृष्णम् वंदे जगद्गुरुम || दोन्ही लेख अध्यात्मीक दृष्टीने खूप बोधप्रद वाटले आणि माझ्या मनात त्या नारायणा बद्दल जे चिंतन सुरु झाले ते लिहण्याचा मोह आवरत नाही म्हणून लिहीत आहे .
सर्व भाक्तांच्याच हृदयात स्थित असलेले श्री गोपालकृष्ण :-
लहान मुलांना पाहिल्यावर कठोरातल्या कठोर व्यक्तीला देखील काही क्षण भुरळ पडतेच ते निरागस,गोंडस,निर्मळ,सुंदर,रूप फक्त मानवतच नव्हे तर समस्त प्राणी मात्रांसाठी लागू पडते कारण कोणतेही पिल्लू गोंडसच दिसते. हाच भाव परमेश्वरा बाबत असावा हि शिकवण देण्यासाठी सुद्धा गोपालकृष्ण अवतरले असावेत.परमेश्वराला अत्यंत निर्मळ,निरागस प्रेमच आवडते त्याला भेसळ आवडत नाही.गोपालकृष्णाने ज्या काही लीला केल्या त्या अत्यंत निरागस पणेच केल्या(१६ सहस्त्र बायका असून ब्रम्हचारी असणारे श्री कृष्ण जगतगुरू च आहेत साधकाने हि गोष्ट पक्की लक्षात ठेवावी ).त्या सर्व मानवाला उपदेशासाठीच होत्या.भक्ती मार्ग बालपणापासुनच सुरु व्हावा तो गोंडस रुपातच रहावा तर प्रौढ पणी रामा सारखा मर्यादा पुरुषोत्तमाप्रमाणे असावा म्हणजे कृष्ण मीच, राम मीच,मग कृष्ण लीलात गैर काय? काहीही कपट नाही .कारण जर समस्त जणांच्या कल्याणासाठी,आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रसंगी सर्वोत्कृष्ट मार्ग कोठून जातो हे त्या परमात्म्याशिवाय कोण जाणण्यास समर्थ आहे ?त्या लीलांमध्ये कोठे हि स्वार्थ ,विषय वासना नसते,मग कृष्ण लीलांना गैर म्हणता येत नाहीच.सर्वांनी स्व:त मधील नारायणाचे दर्शन घेण्याच्या प्रयत्नातच आयुष्य वेचावे व आपत्या प्रमाणेच निर्मळ,निरागस,प्रेम परमेश्वरी शक्ती वर करावे हेच भगवान श्री कृष्णांच्या अवताराचे सार मला मनोमन पटले आहे.:) . धन्यवाद.

विनायक,

ईतके उत्कृष्ट विचार जाणुन खूप आनंद झाला . . . .

अशी उच्च पातळीची विचार सरणी आपणास लाभली आहे, आणी त्यात आपले भगवान नारायणा बद्दलचे भक्तिभाव जाणुन मी धन्य पावलो . . . .

सर्वांनी स्व:त मधील नारायणाचे दर्शन घेण्याच्या प्रयत्नातच आयुष्य वेचावे

खरंच जर असं झालं तर कलियुगाचा आणी त्यातील कलींचा अंत होण्यास वेळ लागणार नाही . . . .

हीच तर आमची ईच्छा आहे आणी त्यासाठीच आम्ही नेहेमी प्रयत्न करीतच असतो . . . .जगावे, सर्वांनी संपूर्ण सुखाने आणी समाधानाने जगावे, पण स्वतःला ओळखुन . . . .

नमस्कार . . . .

परब्रम्ह जी,
सप्रेम नमस्कार,
खरंच जर असं झालं तर कलियुगाचा आणी त्यातील कलींचा अंत होण्यास वेळ लागणार नाही . .
हेच माझे पण विचर आहेत . याचा निर्धार घरोघरी होण्या साठीच http://www.maayboli.com/node/43278 हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे व त्याचे चिंतन व्हावे व अनुभव घ्यावा व आपण सर्वांनी असेच सोबत चालावे अशी माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे.

vinayak aaNi prbrmha,

vichaar khoopch chaaMgle aahet,