शाळेत जाताना ....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 July, 2013 - 03:20

शाळेत जाताना ....

नव्वा नव्वा ड्रेस
नि नव्वे नव्वे शूज
आज स्वारी आहे
एकदम खूष खूष

नव्वी नव्वी शाळा
नि नव्या नव्या टीचर
हरबर्‍याचे झाड
आज पार आभाळभर

दारातच शाळेच्या
गर्दी केवढी तरी
खेळ, गाणी, डबा
लालूच भारी भारी

हात सुटता आईचा
अवसान सारे गेले
हरबर्‍याचे झाड पार
भुईसपाट झाले

बावरलेले मन
नि भिरभिरणारे डोळे
इवल्याशा पायात
बळ कुठुन आले

गाणी-खेळ मजेचे
होते भारी भारी
घंटा झाली तरी
खेळण्यात दंग स्वारी ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम छान.

हात सुटता आईचा
अवसान सारे गेले
हरबर्‍याचे झाड पार
भुईसपाट झाले >> मस्त !

छानेय पण मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला ( वय वर्ष पाच) ऐकवली तर तो "हरबारा कुठाय? मला दे आत्ताच्या आत्ता" असं म्हणुन मागे लागलाय Uhoh
लहान मुलं कशातुन काय घेतील त्याचा नेम नाही. Sad

हरबार्‍याचं झाड प्रकार त्याला झेपला नसल्याने असं झालं असावं Happy