हसून पाहिलेस तू ....

Submitted by वैवकु on 10 June, 2013 - 02:07

हसून पाहिलेस तू म्हणून संभ्रमात मी
असेनका खराखुरा जसा तुझ्या मनात मी

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी

नसूनही ..तुला हवे असेल तर तसे समज
कसा असेन कवडसा ...नसेन जर उन्हात मी

तरून जायचे असेल तर बुडून जायचे
खरा प्रकार शोधला तुझ्यात पोहण्यात मी

अजून एव्हढ्यात मी तुला कुठे मिळायला
अजून चाल वैभवा तुझ्यात खूप आत मी

कधी तरी स्वतः विना जगास पाह विठ्ठला
तुझ्यासवेच नांदतो ...इथे चराचरात "मी" !!

___________________________________________________

दिनांक ९-६-२०१३ पुण्यात झालेल्या 'मराठी कविता समूहा'च्या वार्षिक संमेलनात सादर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह...

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी

हटके शेर...

हसून पाहिलेस तू म्हणून संभ्रमात मी
असेनका खराखुरा जसा तुझ्या मनात मी>>> पहिली ओळ आवडली.

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी>>> खूप चांगला खयाल, शब्दक्रम सुधारता येऊ शकेल.

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी>>> खयाल छान, खुशाल हा शब्द चपखल वाटला नाही.

तरून जायचे असेल तर बुडून जायचे
खरा प्रकार शोधला तुझ्यात पोहण्यात मी>>> छान

अजून एव्हढ्यात मी तुला कुठे मिळायला
अजून चाल वैभवा तुझ्यात खूप आत मी>>> व्वा!

कधी तरी स्वतः विना जगास पाह विठ्ठला
तुझ्यासवेच नांदतो ...इथे चराचरात "मी" !!>>> वा

चांगली गझल, पुढील लेखनाकरीता शुभेच्छा!

फोनवर ऐकलीच होती ...
आता प्रत्यक्ष वाचनात काही औरच मजा आली..

अख्खी गझल खुबसुरत आणि आशयगर्भ !!

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी>>सोनेरी शेर!

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी >> खल्लास!

तरून जायचे असेल तर बुडून जायचे
खरा प्रकार शोधला तुझ्यात पोहण्यात मी>>सगळ्यात जास्त आवडला!

आपली गझल अशीच बहरत जावो..
अनेकानेक शुभेच्छा! Happy

वैभव, तुमचा हा जुनाट होन जुन्या खजिन्यातील सुवर्णमुद्रा आहे बरं का ! फारच सुंदर.
तुमचे 'दिलाय' वगैरे शब्द्प्रयोग खूप आवडतात.. ते असेच प्रचलित होवोत.. किती कामाचे आहेत ते कवितेचे तालतोल सांभाळताना.
शुभेच्छा.

छान..... वेगळेच खयाल
"जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी

अजून एव्हढ्यात मी तुला कुठे मिळायला
अजून चाल वैभवा तुझ्यात खूप आत मी" >>>> हे शेर सर्वात विशेष.

सर्वांचे मनःपूर्वक व विशेष आभार

काही मुद्दे जे आवश्यक आहेत ते आवर्जून सांगीतल्याबद्दल धन्स कणखरजी

मस्त मस्त गझल<< प्रतिसाद आवडला नाही बेफीजी का कुणास ठावूक पण नाही आवडला या प्रतिसादामुळे मी विचारात पडलो आहे ...मला समजला नसेल प्रतिसाद तर क्षमस्व चूक भूल देणे घेणे

जुनाट होन हा विकून टाक
संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात
मी>>>मस्त ....

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच
काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात
मी>>>> व्वा... सुरेख....

नसूनही ..तुला हवे असेल तर तसे
समज
कसा असेन कवडसा ...नसेन जर
उन्हात मी>>>>अप्रतिम....

'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी
.
तरून जायचे असेल तर बुडून जायचे
खरा प्रकार शोधला तुझ्यात पोहण्यात मी

आवडलेत. मस्त शेर.

जुनाट होन हा विकून टाक संकटामधे
तुलातरी फळेन जो कुठे न वापरात मी

होन म्हणजे काय? हा शब्दच मी ऐकला नाही. त्यामुळे या शेराचा आस्वाद नाही घेता आला.

।धन्स मुटे सर
होन (माझ्या माहीतीप्रमाणे)= सोन्याची मुद्रा/नाणे जी शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात प्रचलित केली होती / वापरात आणली होती
माझ्या माहितीप्रमाणे हा अस्सल मराठी शब्द आहे त्यास तद्दन एतद्देशीय संदर्भ आहे
आणि हा शब्दही खरोखरच हल्ली वापरातून जाऊ लागलाय आपल्या Sad

अजून एव्हढ्यात मी तुला कुठे मिळायला
अजून चाल वैभवा तुझ्यात खूप आत मी
कधी तरी स्वतः विना जगास पाह विठ्ठला
तुझ्यासवेच नांदतो ...इथे चराचरात "मी" !!

या ओळी विशेष आवडल्या ,कळसाचे शेर .

छान गझल . आवडली !!
<'फुटेल की उडेल'ची तुला उगाच काळजी
फुगा दिलाय सोडुनी खुशाल अंबरात मी > मस्त शेर.