उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग ४

Submitted by शापित गंधर्व on 27 May, 2013 - 15:58

आधिचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग १
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग २
उत्तुंग स्वप्न - एव्हरेस्ट बेसकँप ट्रेक - भाग ३

१२ एप्रिल २०१३

दारावर पडणार्‍या थापांनी झोपमोड झाली. घड्याळात बघितले तर ६:३०. दारात सुशिल होता.

काय प्लॅन? आज विश्रांती घ्यायची की पुढे जायच?
अत्ताच उठलोय, सांगतो तुला थोड्या वेळात.
पुढे जाणार असाल तर लवकर आवरा. आणि हो, पाहिजे असेल तर आज इथेच अंघोळ करुन घ्या, ३०० रुपयात होईल. पुढे फार महाग पडेल आणि शॉवर पण नाही मिळणार.
ओके सांगतो तुला.

दरवाजा बंद करुन आत वळलो तर संदिप पण जागा झाला होता.

कसं वाटतय?
डोकं थोड जड आहे पण ट्रेक करु शकेन. तु?
मी गुटगुटित :-). चल मग आवर लवकर. अंघोळ करायची का? सुशिल म्हणतोय ३०० रुपयात होईल.
ह्म्म्म. ऐकलं मी ते. करुया. फ्रेश वाटेल जरा
.

दोघांनी आवरायाला सुरवात केली. थंडी मुळे फोन आणि कॅमेर्‍याच्या बॅटरीज लवकर डाऊन होतात. म्ह्णुन रात्री झोपतांना आम्ही त्या स्लिपींग बॅग मधे घेऊन झोपायचो. सकाळी त्या कुठल्यात्री कोपर्यात गेलेल्या असायच्या. त्या शोधुन स्लिपींग बॅग पॅक करायची म्हणजे एक मोठ्ठच काम होतं. रोज सकाळी १०/१५ मिनिट मोडायचे त्यात. कशी तरी स्लिपींग बॅग त्या छोट्याश्या पिशवीत कोंबली आणि रिसेप्शन वर जाऊन शॉवर रुम ची चावी घेऊन आलो. संदिपने सुशिलला बोलवुन आजचा प्लॅन सांगितला. रात्री चर्चा केल्या प्रमाणे एक बॅग इथे ठेवता येईल का ते पण विचारुन घेतलं. येतांना आम्ही याच हॉटेल मधे थांबणार होतो त्यामुळे बॅग इथे ठेवणं शक्य होतं. दोघांनी मस्त गरम पाण्याने अंघोळ केली आणि फ्रेश झालो. पुढ्च्या प्रवासात आवश्यक असलेले सामान एक बॅग मधे भरले आणि बाकीचे दुसर्‍या. रुम लॉक करुन हॉटेलच्या डायनिंग एरियात आलो. सुशिल तिथेच होता. त्याच्या कडे रुमची चावी दिली, कुठली बॅग सोबत घ्यायची आणि कुठली हॉटेल मधे ठेवायची या सुचना दिल्या आणि नाश्त्याची ऑर्डर दिली. नेपाळ मधे आल्या पासुन आम्ही भारतिय चलन वापरत होतो. १.६ चा कनव्हर्जन रेट मिळत होता. (५०० आणि १००० च्या भारतिय नोटा इथे चालत नाहित). सुशिल ने सांगितलं की इथुन पुढे भारतिय चलन चालेल पण रेट १.४ चा मिळेल. म्हणुन मग त्या हॉटेल मधेच १०,०००/- भारतिय रुपये नेपाळी रुपयात बदलुन घेतले. १६,०००/- नेपाळी रुपये मिळाले. (हे १६,००० आम्हाला पुढचे चार दिवसही पुरले नाहीत Sad ).

ट्रेकचा तिसरा दिवस - नामचे बाजार ते तेंगबोचे
प्रचि १ - नामचे लॉज - डायनिंग एरीया.

सुशिल ने आमच्या सोबतच नाष्ता केला. आम्हि बिल पे करुन बाहेर आलो तर सुशिल बॅग घेऊन तयारच होता. आज आम्ही ७ किलोमिटर चा टप्पा पार करणार होतो. ३४५० मिटर वरुन ३८७५ मीटर म्हणजे ४२५ मिटर उंची गाठणार होतो. सधारण ५ तास लगणार होते. बाप्पाच नाव घेऊन आजच्या ट्रेकला सुरवात केली तेंव्हा ९:०० वाजले होते. वातावरण खुप छान आणि प्रसन्न होतं. थंडी अजिबात जाणवत नव्हती. बर्‍याचश्या पायर्‍या चढुन वर एका टेकडि वर पोहोचलो. मागे वळुन बघितलं तर संपुर्ण नामचे बाजार दिसत होतं. नामचे बाजार या भागातील (एव्हरेस्ट रिजन) सगळ्यात मोठे खेडे आहे. आणि समोर दिसणार्‍या दृष्याने ते सिध्द पण होत होते. टेकडिवर वसलेले ते टुमदार शहर सकाळच्या प्रसन्न वातावरणात आणखिनच विलोभनिय दिसत होते.

प्रचि २ - टेकडि वरुन दिसणारे नामचे बाजार
प्रचि ३
प्रचि ४

अजुन पर्यंत आम्हाला एव्हरेस्ट चे दर्शन झाले नव्हते. काल नामचे बाजार आधि एका ठिकाणी ते होण्याचि शक्यता होती पण खराब हवामानामुळे ते झाले नव्हते. सुशिल ने दुरवर एक वळण दाखवले व तिथुन एव्हरेस्ट चे दर्शन होईल असे सांगितले. लगेच आमची पावले भराभर पडु लागली. गेल्या दोन दिवसांपेक्षा आजचा रस्ता खुप चांगला होता. अगदी ठरवुन बांधल्या सारखा. संदिपने ते बोलुन दाखवल्यावर सुशिल ने सांगितले की एक ६०/६५ वर्षाचा म्हातारा माणुस गेल्या ३/४ वर्षापासुन हे काम करतो आहे. पर्यटाकां कडुन मिळणार्‍या देणग्यांच्या जोरावर त्याचे हे काम चालु आहे. नेपाळ सरकार कडुन त्याला कसली ही मदत मिळत नाही.

प्रचि ४ - समोर दुरवर जे वळण दिसतय तिथुन आम्हाला एव्हरेस्ट चे दर्शन होणार होते
प्रचि ५ - या बांधलेल्या पायर्‍या बघुनच संदिपने रस्त्या बद्दल चौकशी केली होती
प्रचि ६ - याक

थोड्याच वेळात आम्हि त्या वळणावर पोहोचलो जिथुन एव्हरेस्ट चे दर्शन होणार होते. अहाहा. एव्हरेस्ट च्या पहिल्या दर्शनाने अगदी मंत्रमुग्ध वगैरे नाही झालो पण एकदम सही (म्हणजे काय ते शब्दात नाही सांगु शकत) वाटलं. ज्याच्या पायथ्याशी आम्ही जाणार होतो तो पर्वतांचा राजा मान उंचावुन आम्हाला खुणावत होता. ५/१० मिनिटे तिथेच थांबुन मनभरुन तो नजारा डोळ्यात साठवुन घेतला. ट्रेक संपवुन परत येणारे सगळेच ट्रेकर्स एव्हरेस्ट चे शेवटचे दर्शन म्हणुन सारखे सारखे मागे वळुन बघत होते. कादाचित परत याचे दर्शन कधी होणार असा विचार करत आसवेत.

प्रचि ७ - एव्हरेस्ट चे पहिले दर्शन
प्रचि ८

पुढे गेल्यावर एका ठिकाणि रस्त्याचे काम चालु असलेले दिसले आणि थोडेच पुढे सुशिल ने सांगितलेला तो म्हातारा डोनेशन बॉक्स घेऊन बसलेला दिसला. १०० रुपायची देणगी त्या बॉक्स मधे टाकुन आम्ही पुढे सरकलो.

प्रचि ९ - काम चालु , रस्ता पण चालु Happy
प्रचि १०
प्रचि ११ - हाच तो म्हातारा
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४

कालच्या सारखेच आज पण बरेच ट्रेकर्स, सामान वाहुन नेणारे हमाल, याक्स कधितरी एखादा घोडेवाला असे बरेच लोक दिसत होते. ट्रेक मस्त सुरु होता. आज विषेश म्हणजे आमच्या पाठी वर कसलेच ओझे नव्हते. अगदी पाण्याच्या बाटल्या पण सुशिल कडच्या बॅगेत ठेवल्या होत्या. त्यामुळे श्वास/धाप लागणे असले प्रकार अजुन तरी चालु झाले नव्हते. दोन अडिच तास अश्या सुखाने चाललेल्या ट्रेक ला मधेच गालबोट लागले. एका ठिकाणी संदिप आणि सुशिल पुढे निघुन गेले आणि फोटो काढण्याच्या नादात मी मागे राहुन गेलो. ते इतके पुढे निघुन गेले की नजरे आड झाले. त्यांना गाठाण्या साठी मी भराभर पळत होतो आणि उतारावर एका दगडावरुन माझा पाय घसरला. काय होतय हे कळायच्या आतच मी दोन तिन कोलांट्या उड्या खाऊन जमिनिवर लोटांगण घातले होते. गळ्यातला कॅमेरा बाजुच्या दगडावर जोरात आपटला. तिथुन जाणार्‍या ट्रेकरने मला हात देऊन उठवले. सरळ उभा रहायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी गुढग्यातुन एक जोरदार कळ उठली. जॅकेट, जिन्स आणि आतल्या थर्मोकॉट मुळे खरचटलं नव्हत पण मुका मार लागला असावा. खुप ठणकतं होतं. हातातल्या काठीच्या मदतिने मी परत चालायला सुरवात केली. साधारण विस एक मिनिट चालल्यावर संदिप आणि सुशिल नजरेस पडले. एका ठिकाणी माझी वाट पहात बसले होते. लांबुनच माझ्या चाली वरुन मी लंगडतोय हे दोघंच्याही लक्षात आलं असाव कारण सुशिल लगेच पाण्याची बाटली घेऊन माझ्या कडे येतांना दिसला. त्याच्या मदतीने संदिप बसला होता त्या जागेपर्यंत पोहोचलो. झालेला प्रकार त्याना सांगितला तर आमच्या पेक्षा सुशिलच जास्त टेंशन मधे आला. आजचा प्रवास इथेच थांबवुया म्हणायला लागला, किंवा घोडा तरी घ्या. उगाच असाच ट्रेक करत राहिलात तर खुप त्रास होईल भलती रिस्क घेऊ नका. काय करावं काही कळत नव्हतं. जिथे थांबलो होतो ति जागा पण अशी होती की तिथे आम्हि काहिच करुच शकत नव्हतो. तिथुन अर्ध्या तासाच्या अंतरावर एक खेडे होते. जेवणा साठी तिथे थांबु आणि मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरले आणि आम्ही परत चालायला सुरवात केली. गुढगा अजुनही ठणकतच होता. सुशिल आणि संदिप आता माझ्या सोबत सोबतच चालत होते. फोटोग्राफी पुर्णपणे बंद झाली होती. गराज पडेल तिथे थांबा घेत घेत अखेर ४०/४५ मिनिटांनी आम्ही पुढ्च्या खेड्यात पोहोचलो. सुशिल ने त्याच्या ओळखीच्या हॉटेल मधे नेले. गेल्या गेल्या पहिले जिन्स आणि थर्मोकॉट काढुन कुठे जखम झाली आहे का ते तपासले. सुदैवाने तसे काही झाले नव्हते पण गुढगा चांगलाच सुजला होता आणि पोटरी जवळ रक्त साकळलं होत. संदिपने संपुर्ण सुजलेल्या भागावर पेनकिलर स्प्रे मारला आणि गुढगा क्रेप बँडेजने घट्ट बांधुन दिला. तिथेच जेवण करुन थोडावेळ आराम केला. सुशिलचं म्हणणं होतं की आज आपण इथे मुकाम करावा तर संदिपने निर्णय माझ्यावर सोडला होता. एक मन म्हणत होतं की उगाच रिस्क घेऊ नकोस तर दुसरं म्हणत होतं की आज विचलित झालास तर बेसकँप पर्यंत कधिच पोहोचु शकणार नहीस Sad . पेनकिलर स्प्रे मुळे किंवा घट्ट बांधल्या मुळे असेल पण आता ठणका जरा कमी झाला होता. मनाचा हिय्या करुन मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही परत ट्रेक ला सुरवात केली तेंव्हा दुपारचे दोन वाजले होते आणि आम्ही फक्त निम्मे अंतर पार केले होते. अजुन तिन साडे तिन तासाचा प्रवास बाकी होता.
सुरवातिची १५/२० मिनिटे हातातल्या काठिचा आणि संदिपचा आधार घेत चाललो पण नंतर एक र्‍हिदम मिळत गेला आणि संदिपच्या आधाराची गरज भासेनासी झाली. चालण्याचा वेग कमी झाल्या मुळे विश्रांती थांबे कमी होत होते आणि श्वासोश्वासाचा त्रासही. थोडयाच वेळात मी ट्रेकचा आनंद परत घेऊ लागलो. अजुबाच्या निसर्गाचा परिणाम असावा तो. एका ठिकाणी फोटो साठी कॅमेरा बाहेर काढला तर फोटोच निघेना. लेन्स मधुन नुसताच घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज येत होता. मघाशी मी पडलो तेंव्हा बहुतेक कॅमेरा कुठे तरी दगडावर आपटला होता. झालं, म्हटलं कॅमेरा खराब झाला असेल तर बाकीच्या ट्रेकचा पार विचका होणार. त्याच टेंशन मधे उरलेला ट्रेक पुर्ण केला. साधारण पाच च्या सुमारास आम्ही तेंगबोचे ला पोहोचलो. सगळ्यात आधी रूमवर जाऊन पायाची हालत तपासली. सुज आणि साकळलेलं रक्त तसचं होतं. परत एकदा पेन किलर स्प्रे मारला आणि क्रेप बँडेज ने गढगा घट्ट बांधुन घेतला. जो होगा सो देखा जायेगा म्हणत परत खाली डायनिंग एरियात आलो. दिवसभराच्या ट्रेक मधे भेटलेले बरेचसे चेहरे तिथे दिसत होते. त्यात एक गुजराथी जोडपे पण होते. मुळचे मुंबईचे पण सध्या अमेरीकेत स्थाईक झालेले. दुपारी जेवायला थंबलो होतो त्या हॉटेल मधे हे दोघे भेटले होते. त्यांनी आपुलकी ने माझ्या पायाची चौकशी केली आणि योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला.
संदिप आणि मी दोघांनी गरमागरम ब्लॅक-टी घेतला आणि गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. गावं कसलं, अगदी छोटसं खेड होतं ते. इन मिन चार पाच लॉज होते तिथे. घरं तर दिसलिच नाहित. पण तेंगबोचे प्रसिध्द आहे ते इथल्या मॉनेस्ट्री मुळे. एव्हरेस्ट रिजन मधे दोनच मोठ्या मॉनेस्ट्री आहेत. एक थामे ला आणि एक तेंगबोचे ला. १९१६ मधे लामा गुलु यांनी बांधलेली ही मॉनेस्ट्री १९३४ च्या भुकंपात पार ढासळुन गेली होती. पुढे काहि वर्षांनी स्थानिक लोकांच्या पुढाकाराने मॉनेस्ट्री परत बांधली गेली. पण १९८९ मधे ती मॉनेस्ट्री परत एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही स्थानिक, ट्रेकर्स आणि विदेशी देणग्यांच्या जोरावर ती परत एकदा बांधली गेली.

प्रचि १५ - तेंगबोचे खेडे - डाव्या बाजुला मॉनेस्ट्री आहे आणि उजव्या बाजुला एक लॉज. बास्स एव्हडेच काय ते गाव.
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८

सकाळी ट्रेक सुरु केल्या पासुन दुधखोसी नदि बरोबरच अमादबलमही सतत आमची सोबत करत होता. चढाईसाठी एव्हरेस्ट पेक्षाही कठीण असणारा हा महाकाय त्या संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाला होता.

प्रचि १९ - अमादबलम
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २१

मॉनेस्ट्री आणि आजुबाजुच्या परिसराचा फेरफटका करुन लॉज वर परतलो तर सगळे ट्रेकर्स आपापल्या पध्दतिने संध्याकाळचा आनंद घेत होते. कोणि शेकोटी समोर बसुन उब घेत होतं, कुणि पुस्तक वाचत होतं तर कुणि चक्क पत्यांचा डाव मांडला होता. आम्ही पण मग त्यांना सामिल झालो.

प्रचि २३ - लॉजचा डायनिंग एरीया
प्रचि २४ - डाव रंगला

टिप - प्रचि १५ ते प्रचि २४ पॉईंटशुट कॅमेर्याने काढले आहेत. क्वालिटी सांभाळुन घ्या Happy

जेवण करुन रुमवर परतलो आणि सगळ्यात पहिले नादुरुस्त झालेला कॅमेरा हातात घेतला. बॅटरी आणि मेमरी कार्ड चेंज करुन बघितलं तरी परत घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र. लेन्स क्लिन केली, मिररवर ब्लोअर मारुन बघितला पण घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र शिवाय काहिच नाही. ओब्जेक्ट कॅच न झाल्यामुळे फोटोच निघत नव्हता. लेन्स पुर्णपणे नादुरुस्त झली होती. सुदैवाने माझ्या कडे दुसरी लेन्स होती. ती अटॅच करुन बघितली तर खच्याक Happy सुदैवाने कॅमेरा परत काम करु लागला होता.
आल्या पासुन घरी फोन करायचा प्रयत्न करत होतो पण रेंजच मिळत नव्ह्ती. संदिप सतत प्रयत्न करत होता पण काहि उपयोग झाला नाही. मग परत एकदा पेन किलर स्प्रे मारुन आणि डायमॉक्स घेऊन झोपेच्या आधिन झालो.

१३ एप्रिल २०१३

डायमॉक्स घेऊनही काही फायदा झाला नव्हता. दोघंही रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर करत होतो. मधेच झोप लागायची पण १५/२० मिनिटांनी श्वासोश्वासाचा त्रास चालु व्हायचा आणि झोपमोड व्हायची. मग परत या कुशीवरुन त्या कुशीवर. डोक तर सतत जड झालेलं आणि मधुन मधुन चक्कर पण. स्लिपिंगबॅग मधे नुसतच पडुन रहण्याचा कंटाळा आला होता. बाहेर पहाटेचा उजेड दिसायला लागल्यावर उठलो आणि फ्रेश व्हायला गेलो. ब्रश करतांना घाश्यातुन आणि नाकातुन थोडं रक्त पडलं. रुमवर येऊन संदिपला सांगितलं तर त्याने हा अनुभव कालच घेतला होता. थंडित असं होतच म्हणाला. त्याने पण आवरलं आणि आम्ही खाली डायनिंग एरियात आलो. ब्रेकफास्टला वेळ होता म्हणुन एक एक कप चहा घेऊन बाहेर पाडलो. प्रसन्न वातवरण होत. सुर्य दिसत नसला तरी वारावरण उबदार होतं. त्या उबदार वातावरणात मॉनेस्ट्री आणि आजुबाजुचा परिसर काल संध्याकाळ पेक्षा वेगळाच भासत होता.

प्रचि २५ - मॉनेस्ट्री प्रवेशद्वार
प्रचि २६ - मॉनेस्ट्री
प्रचि २७ - स्तुप
प्रचि २८ - तेंगबोचे खेडे
प्रचि २९ - तेंगबोचे कँप साईट
प्रचि ३० - सुर्य चुल

थोडिफार फोटोग्राफी करुन लॉजवर परतलो. ब्रेकफास्ट केला आणि बाप्पाचं नाव घेऊन आजच्या ट्रेकला सुरवात केली.

ट्रेकचा चौथा दिवस - तेंगबोचे ते डिंगबोचे

आज आम्ही ९ किलोमिटर चा टप्पा पार करणार होतो. ३८७५ मिटर वरुन ४४१० मीटर म्हणजे ५३५ मिटर उंची गाठणार होतो. सधारण ६ तास लगणार होते. जमेची बाजु ही होती की उद्या आमचा रेस्ट डे असणार होता. त्या मुळे आजच्या ट्रेकच काही टेंशन वाटत नव्हतं. पानबोचे पर्यंत तर अगदि पिस ऑफ केक वाटला ट्रेक. अगदी दिड तासातच आम्ही पानबोचेला पोहोचलो. त्या नंतर मात्र चांगलिच दमछाक झाली. जस जसे वर चढत होतो तस तसा श्वास घ्यायला त्रास होत होता. पानबोचे पर्यंत दिसणारी उंच झाडांची जागा आता खुरट्या झुडपांनी घेतली होती. आणि सगळी कडे पठार आणि त्यावर पर्वतांवरुन घसरत येण्यार्या मातिचे ढिगारे दिसत होते.
डिंगबोचेच्या साधरण १ किलोमिटर आधि एक वाट उजव्या बाजुला उतरुन दुधखोसी नदिच्या पलिकडे अमादबलमच्या बेसकॅंप कडे जात होती.
दुपारी जेवणाचा वगळता आम्ही कुठलाही मोठा थांबा घेतला नाही. त्यामुळे तिन वाजायच्या आधिच आम्ही डिंगबोचे ला पोहोचलो. तेंगबोचेच्या तुलनेत डिंगबोचे खुपच मोठे आहे. गावा भोवताली बरीच शेत जमीन दिसत होती. सुशिलने ने माहिती दिली की डिंगबोचे हे शेवटचे खेडे आहे जिथे शेती केली जाऊ शकते. थंड हवामान आणि सतत च्या हिमवृष्टी मुळे पुढ्च्या खेड्यांमधे कुठलेली पिके घेता येत नाहीत. त्यामुळे डिंगबोचे मधे बरेच लोक शेतिचा व्यवसाय करतात. बटाटा, पालेभाज्या आणि भात ही मुख्य पिके.
रुम वर जाऊन सामान टाकलं आणि थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो तर सगळ गाव सामसुन होत. थंडी जास्त असल्यामुळे सगळ्यांनी घरात/लॉज मधेच रहाणे पसंत केले असावे. आम्ही पण मग जास्त वेळ बाहेर न घालवता लॉज वर परतलो. जेवणा आधिचा वेळ गप्पा मारत आणि पुस्तक वाच घालवला. उद्या रेस्ट डे असल्या मुळे झोपायला जायचि तशी घाई नव्हती म्ह्णुन मग जेवण पण जरा उशिराच घेतले. जेवण झाल्यावर पायाला क्रेप बँडेज बांधले, एक-एक डाय॑मॉक्स घेतली आणि झोपी गेलो.

प्रचि ३१ - ऑल सेट फॉर द रोड Wink
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६ - चढाई साठी एव्हरेस्ट पेक्षा कठिण असणारा अमादबलम
प्रचि ३७ - दुधखोसी नदिच्या पलिकडे अमादबलमच्या बेसकॅंप कडे जाणारी वाट
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४० - डिंगबोचे चे पहिले दर्शन

||क्रमशः||

पुढिल भागातः

याच साठी केला होता अट्टाहास

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कर मंडळी ____/|\____
हा भाग यायला खुपच उशिर झाला याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. अजुन दोन भागात ही मालिका संपवायचा मानस आहे. पुढिल दोन्ही भाग शक्य तितक्या लवकर टाकायचा प्रयत्न करतो.

हुश्श!!!! आला एकदाचा पुढचा भाग. Happy
वाट पहायला लावली पण वृतांत आणि फोटो झक्कास!!!
थोडा वेळ लागला तरी चालेल पण वृत्तांत असाच डिट्टेलवार लिही Happy

वाट पहायला लावली पण वृतांत आणि फोटो झक्कास!!!
थोडा वेळ लागला तरी चालेल पण वृत्तांत असाच डिट्टेलवार लिही >>> जिप्सी + १

सुंदर!
हा भागही आवडला.
काल लेक ब्रिगेट मुईर या एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या ऑस्ट्रेलियन स्त्रीचे एक पुस्तक वाचत होती तेव्हा तुमच्या लेखमालेची आठवण झाली होती.

सह्ही रे सह्हीच!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Happy

मस्त.

तेंगबोचे गाव आणि त्या मॉनेस्ट्रीचे प्रवेशद्वार यांचे वेगवेगळ्या वेळी फोटो काढायची कल्पना एक्दम भारी. पॉईंट आणि शूटची कामगिरी SLR पेक्षा उजवी दिसतेय. वक्त वक्त की बात है Happy

वाह, झक्कास वर्णन! पायाला झालेली दुखापत आणि त्याही परिस्थितीत तु दाखवलेल्या धाडसाबद्दल तुझं खुप खुप कौतुक __/\__!!!!!!!!!!!!! Happy

मस्त. फोटो खूप सुरेख आलेत. तू बरा झाला असशीलच पण आता कॅमेरा कसाय? Happy
तू आधी हा भाग तुझ्या एका जून्या धाग्यावर लिहून ठेवला होतास ना तेव्हा वाचला होता (लेखन अप्रकाशित ठेवायची सोय प्रवासाचे अनुभव ग्रूपमध्ये नाही)