सांग ना - काय हवं ?

Submitted by अनुराधा म्हापणकर on 11 May, 2013 - 06:58

उगवती शुक्राची चांदणी देशील की
अढळ ध्रुवतारा..
कवेत घेऊन येशील का माझ्यासाठी
तो बेभान उनाड वारा

कातरवेळंच दाटलेलं क्षितीज
आणून देशील
चांदणरातीचं चमचमतं आभाळ
पेलून घेशील

सागरातली उसळलेली भरशील का
ओंजळीत एक लाट
की हिरव्या शेतातली आणून देशील
नागमोडी एक वाट

आणशील का ते चंद्रबिंब
पूर्ण गोल पुनवेचे
आणशील कोवळे किरण
तांबूस पिवळ्या पूर्वेचे

गवताच्या पातीवरला दवबिंदू
अलगद झेलशील ?
डोळ्यांच्याच भाषेत माझ्याशी
नजरेनं बोलशील ?

घेशील का आणाभाका
देशील का वचन
अबोल भावनेतही माझं
वाचशील का रे मन
.
भारावल्यासारखा तिच्याकडे तो
पाहात उभा राहिला
पहिल्या रात्रीच उभ्या संसाराचा
चित्रपट त्याने पाहिला
.
.
पुन्हा कधीच त्याने तिला
"काय हवं"- प्रश्न विचारला नाही
कवयित्रीशी झालं होतं लग्न
तो कधीकध्धीच विसरला नाही

- अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या सहा कडव्यानंतर, कदाचित शेवटची दोन कडवी रसभंग करणारी वाटू शकतात, याची पूर्ण कल्पना आहे. परंतु, ही कविता लिहिताना.. "कल्पनेतलं जग".. आणि "वास्तव" (fantacy & reality) याची सांगड घालायचं कुठेतरी मनात होतं.. त्याहूनही पलिकडे सांगायचं तर, कवीचं विश्व आणि सर्वसाधारण (म्हणजे कवी नसलेले) माणसाचं विश्व वेगळं दाखवण्याचा प्रयास म्हणा हवं तर ! गोड मानून घ्या रसिकहो !!

फेस्बुकावर कोण काही म्हटलय म्हणून उगाच स्वता:च्या कवितेस अंडर एस्टिमेट करणारा प्रतिसाद मायबोलीवर डकवत जाऊ नका मॅडम Happy

असो
आता मीही तुमच्या या प्रतिसादातील ओळींवर तिथे जे लिहिले तेच इथे डकवतो ..................
___________________________________________________--
रसभंग वगैरे काहीही नाही आहे
उलट अतीशय दमदार कलाटणी देवून कवितेचा अतीशय परिणामकारक समारोप साधलाय
कविता 'हटके' झालीये
मलातरी या कवितेत काही तृटी दिसत नाहीत

मला आवड्ली
मायबोलीवर प्रतिसाद दिलाच आहे

~वैवकु