मी मन:शांती अशी हरवू कशाला?

Submitted by कर्दनकाळ on 22 April, 2013 - 00:06

गझल
मी मन:शांती अशी हरवू कशाला?
तोतयांचे चोचले पुरवू कशाला?

चार चिंध्या या यशाच्या, कनवटीला!
तीच ती झालर पुन्हा मिरवू कशाला?

जे मला घातक, कशाला ते करू मी?
ओल रागाची उरी मुरवू कशाला?

शायरीने माझिया ओथंबलो मी!
मी कुणाची शायरी गिरवू कशाला?

प्रीय मजला भाकरी, चटणीच घरची!
फुकटचे मिष्टान्न मी जिरवू कशाला?

जाणते दुनिया, मलाही ज्ञात आहे....
मोल माझे काय, मी ठरवू कशाला?

आतला आवाज माझा ऐकतो मी!
कौल हा माझाच मी फिरवू कशाला?

घेउनी पाऊस आले मेघ दारी....
होउनी वारा तयां विरवू कशाला?

सारखी आक्रंदते प्रत्येक पेशी.....
मागते मुक्ती, तिला झुरवू कशाला?

लागते भांडू स्वत:चे मन स्वत:शी!
ही स्मृतीसंमेलने भरवू कशाला?

*********कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्त, गझलियत, काफिया, रद्दीफ हे जाणकार पाहतीलच. पण मला तरी एकूण एक शेर आवडले. आतून आलेली शायरी वाटली.

अतीशय उत्तम
बघूया काय होते ते नंतरची मला आजवर तुमची सर्वाधिक आवडलेली गझल
अतीशयच आवडली

मला प्रत्येक शेर अगदी जसाच्यातसा जगून पाहता येत आहे
खूपच आवडली

धन्यवाद किरण!
मतल्यातील मिस-यांत -हस्व अलामत जर वेगवेगळ्या वापरल्या असतील, तर इतर शेरांतही वेगवेगळ्या -हस्व अलामती चालतात!
टीप: दीर्घ अलामतींत(आ, ई, ऊ, ओ, ऐ) ते चालत नाही!
********इति कर्दनकाळ

चार चिंध्या या यशाच्या, कनवटीला!
तीच ती झालर पुन्हा मिरवू कशाला?

आतला आवाज माझा ऐकतो मी!
कौल हा माझाच मी फिरवू कशाला

सुंदर

सारखी आक्रंदते प्रत्येक पेशी.....
मागते मुक्ती, तिला झुरवू कशाला?

लागते भांडू स्वत:चे मन स्वत:शी!
ही स्मृतीसंमेलने भरवू कशाला?<<< व्वा वा

बाकीचे शेर प्रामाणिक आहेतच