ज्ञात नाही

Submitted by फूल on 18 April, 2013 - 18:51

काल होतो आज आहे पण उद्याचे ज्ञात नाही
चालले तिकडेच सारे कोण पुढले? ज्ञात नाही

जन्म झाला मीच दिधला मीच मी हा व्यर्थ चाळा
देह नाही वस्त्र जळले प्राण कोठे ज्ञात नाही

उमलणार्या त्या कळीला कोण सांगे फूल व्हाया?
ध्यास धरणे फक्त हाती घडविण्याचे ज्ञात नाही

योजना मी लाख केल्या शाश्वती नव्हतीच कसली
योजण्याचे काम माझे भोगण्याचे ज्ञात नाही

चोचले देहास सारे मानण्याचा प्रश्न आहे
मानता मी देह नाही कर्म माझे ज्ञात नाही

जिंकली सारी सुखे मी संपताना उमगले की
सौख्य दाता तोच होता कळविण्याचे ज्ञात नाही

दान केले साथ केली धर्म नाही जाणला मी
पुण्य कसले पाप कसले मोजण्याचे ज्ञात नाही

समरसूनी जीवनी ह्या मीच मजला ज्ञात होतो
म्हणत होतो मीच कर्ता कोण मी? हे ज्ञात नाही

सौख्य गेले दु:ख आले दु:ख गेले सौख्य आले
भोगताना तोष झाला सोसण्याचे ज्ञात नाही

-फूल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दान केले साथ केली धर्म नाही जाणला मी
पुण्य कसले पाप कसले मोजण्याचे ज्ञात नाही

समरसूनी जीवनी ह्या मीच मजला ज्ञात होतो
म्हणत होतो मीच कर्ता कोण मी? हे ज्ञात नाही<<<

छान!

'ए'कारान्त स्वरकाफियाची गझल झाली आहे. वृत्त बरोबर आहे. खयाल अधिक थेट होणे आवश्यक आहे. तो सरावाचा भाग आहे. अनेक शेरांमध्ये मांडलेले विचार आपल्या विचारधारेची वेगळी शैली दाखवत आहेत, जे पाहून बरे वाटत आहे.

आपण विपू केलीत म्हणून विस्तृत लिहिले, गझललेखनास शुभेच्छा!

-'बेफिकीर'!