चालला आहे कशाचा खल अता - तरही

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2013 - 07:10

या वेळेसच्या तरहीसाठी माझा नम्र सहभाग! ओळीसाठी डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार!

-'बेफिकीर'!

============

बदलुनी बघतील बहुधा दल अता
चालला आहे कशाचा खल अता

जलसमाधी मूर्ख नेत्यांना मिळो
रंग मेघांचा बनो श्यामल अता

उत्तरे सुस्पष्ट नाही देत ती
लोकशाहीची नको दलदल अता

सापडत नाही कशी माणूसकी?
पेटवा काँक्रीटचे जंगल अता

भाबडा ओवीतुनी रांगायचा
झिंगतो गझलेमधे विठ्ठल अता

जाहले असले तुझे बरळून तर
बोल तू काहीतरी अस्सल अता

भटजयंतीची पुरे ही नाटके
गझल म्हणजे फक्त शब्दच्छल अता

घे नशीबा नेमकी काही दिशा
दोन आठ्यांच्यात बस चपखल अता

जीवनाची शांत संध्याका़ळ ही
आठवांची होउदे दंगल अता

बास झाले विविध गुणदर्शन तुझे
'बेफिकिर' घे शाल अन श्रीफल अता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर शेरही आवडलेच पण ;
................................................
भाबडा ओवीतुनी रांगायचा
झिंगतो गझलेमधे विठ्ठल अता
>>>>>>>

जान् कुर्बान बेफीजी .....................

_________/\_________



(....याच साठी केला होता अटटाहास !!!!)

उत्तरे सुस्पष्ट नाही देत ती
लोकशाहीची नको दलदल अता

सापडत नाही कशी माणूसकी?
पेटवा काँक्रीटचे जंगल अता

जीवनाची शांत संध्याका़ळ ही
आठवांची होउदे दंगल अता

बास झाले विविध गुणदर्शन तुझे
'बेफिकिर' घे शाल अन श्रीफल अता

हे शेर जास्त आवडले!

दलदल, दंगल व श्रीफळ काफिया भन्नाटच आहेत!............आमच्या नजरेतून सुटल्याबद्दल हळहळलो!

रदीफ बदलला तरी चालतो का, भूषणराव? कारण नाखुशीनेच आम्ही तो रदीफ वापरला, कारण दिलेल्या ओळीत तो होता!

घे नशीबा नेमकी काही दिशा
दोन आठ्यांच्यात बस चपखल अता
>>
वाह!

पण मला एक शंका आहे
एकदा मी ऐकलेलं की तरही म्हणजे जी ओळ दिलिये ती तशीच्या तशी वापरुन गझल रचणं
आणि इथे "चालला आहे कशाचा खल इथे " अशी ओळ दिली आहे.. मग इथे ऐवजी आता चालतं का?
(बहुदा प्रोंनी वरती तेच विचारलय पण काफिये,रदिफ असलं काही मला कळत नसल्याने तो प्रश्न सेमच आहे का माहीत नाही म्हणुन परत विचारते..)
टिप : हा प्रश्न भूषणदादासाठी आहे.. इतर कोणाची उत्तर द्यायची इच्छा असल्यास सरळ शब्दात आणि योग्य ते उत्तर देणार असाल तरच द्यावे...समजदारोंको इशारा काफी!

रिया Happy

मला वाटले तो शब्द 'अता' असाच आहे तरहीमध्ये! आणि मला हेही वाटले की वैवकुंनी 'अता'चे 'इथे' करण्याची डॉक्टरांकडून परवानगी मागीतली. म्हणून मी 'अता' असा शब्द घेऊन गझल रचली. Happy

कर्दनकाळजी, तरहीची ओळ जशीच्या तशीच घ्यायची असते हे मान्य आहे. मला वाटले की 'अता' अशी रदीफ तरहीत दिलेली आहे आणि मी तरहीचा धागा पुन्हा उघडून पाहण्याचा कंटाळा केला एवढेच! Happy

सर्वांचा आभारी आहे.

-'बेफिकीर'!

धन्यवाद भूषणराव! कारण 'इथे' या स्थळवाचक रदीफामुळे प्रत्येक शेरास मर्यादा पडत होती! म्हणून विचारले!

टीप: सहसा अशा मर्यादा पाडणा-या रदीफा आम्ही टाळतो!

अवांतर: आमच्या (गरिबाची) तरही पाहिलीत का??

कर्दनकाळ गरीब नसतात, गझल पाहतो. धन्यवाद!

>>>कारण 'इथे' या स्थळवाचक रदीफामुळे प्रत्येक शेरास मर्यादा पडत होती! म्हणून विचारले!

टीप: सहसा असे मर्यादा पाडणारे काफिये आम्ही टाळतो!
<<<

अश्या रदीफा टाळता की काफिये?

भूषण जी, गझल खूप खूप आवडली.

काफिया..खूप मस्त योजलेले आहेत.

'इथे ' घ्यावा की 'अता' हा रदीफ !

देवसर तुमचा हा प्रॉब्लेम आधीपासूनच आहे

मगे मी बेफीजींच्या 'तुला दुरून पाहणे....' च्यावेळी "भेटणे" असे केले तर तुम्हीही तसेच केले होते मग जेंव्हा विशय निघाला तेंव्हा मीही असेच म्हणत होतो मलाही आधीच खटकलेच होते वगैरे सांगायला सुरुवात केलेलीत

या तरहीच्या वेळी सर्वात आधी मीच ते पाहिले की '...कशाचा खल अता' अशीच ओळ होती
मग मी डॉ . साहेबांशी फोनवर बोललो तेंव्हा आमचे ठरले की अता ऐवजी इथे हवे म्हणून

मग मी इथे असे घेवून तरही करायला सुरुवात केली जेव्हा ती इथे पेश केली तेंव्हा मी परवानगी घेतली आहे असे खाली लिहिले होते (बेफीजींनी बहुतेक तेव्हाच माझी तरही वाचली असावी मग त्यांनी तरही करायला घेताना अता अशी रदीफ घेतली असावी )

पण ५ च मिनिटातच मी जेव्हा पुन्हा तरहीचा धागा वाचला (मागे 'भेटणे'चा अनुभव होताच म्हणून) तेव्हा तिथे "इथे" अशी रदीफ वाचून मझी टिप्पणी संपादित केली मी ...इतकेच

असा आहे हा किस्सा !!

कोणीही चुकीचे वगैरे नाही तुम्हीही नाहीच

आता मला सांगा "इथे" मुळे स्थलवाचकतेचे बंधन येत असेल तर "अता" मुळे कालवाचकतेचे येतेच कि नै ? मग हा मुद्दा काढून काही प्राप्त होण्यासारखे आहे काय ?? उगाच मी कसा बरोबर आहे मला शायरीतले कसे आपोआप व आधीच कळते हे तुम्ही का सांगताय(तेही नंतर..आफ्टर थॉट की काय ते हेच!!)

असो !!

जाउद्या सोडा हा विषय
(आजकाल तुम्ही असे वागून फक्त , बेफीजींना मस्का मारताय असे माझे वैयक्तिक मत होत चालले आहे )

Happy

भाबडा ओवीतुनी रांगायचा
झिंगतो गझलेमधे विठ्ठल अता..... क्या बात!

जाहले असले तुझे बरळून तर
बोल तू काहीतरी अस्सल अता....... वाह वा !

घे नशीबा नेमकी काही दिशा
दोन आठ्यांच्यात बस चपखल अता ... हासिल-ए-गझल

आजकाल तुम्ही असे वागून फक्त , बेफीजींना मस्का मारताय असे माझे वैयक्तिक मत होत चालले आहे <<<<<

म्हस्काबन वगैरेंच्या कुबड्या फक्त साहित्यिक विकलांगांना लागतात, त्यामुळे आम्हास काही माहीत नाही बाबा तुझ्याएवढे!

तर आता मी श्रीयुत मिलिंद पाध्ये ह्यांना विनंती करतो की त्यांनी नारळ आणि श्रीफळ देवुन बेफीकीर ह्यांचा सत्कार करावा ....

अख्खी गझल आवडेश Happy

त्यातही विठ्ठल, अस्सल एकदम भारी !!

पण मला सगळ्यात जास्त आवडलेला शेर म्हणजे

जीवनाची शांत संध्याका़ळ ही
आठवांची होउदे दंगल अता.......... खूप खूप भावला !!

गझल आवडली !

जलसमाधी मूर्ख नेत्यांना मिळो
रंग मेघांचा बनो श्यामल अता>> येथे पहिल्या ओळीचा दुसर्‍या ओळीशी थेट संबंध लक्षात येत नाही कॄपया सांगणार काय?

तिलकधारी आला आहे.

जीवनाची शांत संध्याका़ळ ही
आठवांची होउदे दंगल अता

चांगला शेर आहे.

तरहीची ओळ हवी तशी बदलायला ही मोगलाई नव्हे. मतला असंबद्ध आहे, जर चित्र पाहिले नसले तर!

तिलकधारी निघत आहे.

जलसमाधी मूर्ख नेत्यांना मिळो
रंग मेघांचा बनो श्यामल अता>>>

हा शेर दुष्काळावर असावा. इथे मूर्ख नेत्याना ढगात पाठवायचा प्लान दिसतो आहे (माझी बालबुद्धी)

Happy

Pages