मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय असं मला तरी ह्या बिल्डिंग हेरिटेज मध्ये येतात असं वाट्तं. ह्या स्टाईलच्या बिल्डिंगना आर्ट डेको असं म्हणतात.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/once-upon-a-time-in-girgaon-664636/

आजच्या लोकसत्ताच्या 'बुकमार्क'मधे (पान ८) साठच्या दशकातल्या गिरगावबद्दलच्या एका इंग्रजी पुस्तकाबद्दल आलं आहे.
The Mumbai Midway. लेखक - प्रदीप कीर्तिकर.
हे पुस्तक फक्त आणि फक्त गिरगावबद्दल आहे. वर्णनावरून इण्टरेस्टिंग वाटतंय. (पण इंग्रजीत का लिहिलं असावं?)
त्या माहितीतही हे नवल व्यक्त केलं गेलंय, की गिरगावबद्दल सांगण्याच्या उत्साहाला इंग्रजी शब्दसंपदेमुळे मर्यादा आली आहे असं वाटतं.
तरीही हे पुस्तक वाचावंसं वाटतंय वर्णनावरून...

अभिषेक,

प्रकाशचित्रात रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले दिसते. तरीही कोळशाचे इंजिन लावायचे कारण काय असावे? बहुतेक विरारला इंजिन बदलायची सोय नसावी.

रच्याकने : भाईंदर पूल म्हणजे आज ज्याला वसईची खाडी म्हंटले जाते तिच्यावरचा पूल आहे.

आ.न.,
-गा.पै.

गापै, असेल, किंवा मधे थांबवायची नसल्याने आधीच कोळशाचे इंजिन लावले असेल. मात्र मुंबईत कधीपर्यंत कोळशाच्या इंजिनाची शेड होती कोणास ठाऊक. आता (पुणे मार्गे) दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांना मुंबईपासूनच डिझेल इंजिन लावलेले सर्रास दिसते. १०-१५ वर्षांपूर्वी क्वचितच ते दिसे (पुण्यात लावायचे).

अभिषेक, मस्त आहेत ही प्रचि.

माझ्या बहिणीच्या घरातल्या पुस्तकांच्या खजिन्यातून माझ्या हाती एक पुस्तक लागलंय :
मुंबईचे वर्णन. लेखक - गोविंद नारायण माडगांवकर. प्रकाशक - वरदा बुक्स.

पहिली आवृत्ती १८६३ सालची होती. ती कोणी प्रकाशित केली होती याची कल्पना नाही. मग दुसरी आवृत्ती १९६१ सालची असून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयाने प्रकाशित केली.)

आताची तिसरी आवृती १९९२ सालची आहे. मुखपृष्ठ श्री. वसंत सहस्त्रबुद्धे. किंमत ऋ. २००.

विशेष म्हणजे या पुस्तकाची स्वामित्व हक्क आता खुले आहेत अशी टीप छापलेली आहे. मी आता पुस्तक वाचायला घेते आणि काही रोचक माहिती असेल तर इथे टाकते. Happy

मामी, भारी आहे ते पुस्तक. अजिबात कोणाला देउ नकोस. आणि द्यायचच असेल तर मला विसरू नको Wink
जयकर मधे कित्ती वर्षापूर्वी वाचलेलं. खुप सुंदर आहे.

मामी, रोचक माहितीची वाट पाहतोय.

जाई, भाऊचा धक्का... मस्तच लेख, आणि धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
मी माझगावचा, भाऊचा धक्का हाकेच्या अंतरावर, त्यामुळे गंमतीने होणार्‍या प्रांतवादात याचा उल्लेख होतच असतो. त्यात आता ही माहिती कामी येईलच. पण भाऊंचे आणि भाऊच्या धक्क्याचे महत्व जाणून अभिमानही वाटला.

अवांतर - आमच्याकडे माझ्या वडीलांना भाऊ म्हणतात, त्यामुळे भाऊचा धक्का म्हणजे त्यांचा धक्का हे विशेष फेमस Happy

मस्त लेख आहे.

भाऊचा धक्का ही जागा माझ्यासाठी अतिस्पेशल वगैरे आहे. Happy यावर्षी मुंबईला आले होते तेव्हा तीनचार वेळेला तरी धक्क्यावर जाणं झालंच.

मस्त! Happy

फेसबुक वरुन साभार...
https://www.facebook.com/photo.php?fbid=732266646843544&set=a.2853831415...

Bhau Torsekar
शिवसेना पुरस्कृत वडापाव

दोन दिवसांपुर्वी एका झकपक खाऊ गाडीवर गरमागरम भजी-वडे बघितले आणि मोहात पडलो. सहज विचारले, तर वडापावचे बारा रुपये बोलला. मी बघतच राहिलो. किंमती व महागाई वाढलीय हे ठाऊक आहे. पण तरीही दहा रुपये वडापाव अधूमधून खातो. एकदम १२ रुपये? माझ्या चेहर्‍यावरचा अचंबा व अबोल होण्याने गाडीवाला गोंधळला. त्याने दोन शब्द ऐकवले. महागाई, पोलिसांचे हप्ते, बरेच काही. मी त्याची समजूत घातली. तो लूटमार करतोय असे मला अजिबात वाटलेले नाही, याबद्दल त्याची खात्री पटावी म्हणून समजावले. अखेरीस त्याचे समाधान व्हावे म्हणून त्याला मी खाल्लेल्या पहिल्या वडापावची किंमत सांगितली आणि माझ्या थोबड्यावरचा अचंबा उडी मारून त्याच्या चेहर्‍यावर जाऊन चिकटला. पहिल्या वडापावपासून आज शंभरपट किंमत झाली म्हणून मी गडबडलो होतो. ते ऐकताच त्याने आपले टेकायचे टेबल समोर केले आणि म्हणाला काका बसा, आपल्या खात्यात खावा, पण ती पहिल्या वडापावची गोष्ट सांगा. तळणार्‍याला माझ्यासाठी खास ताजा वडा तळायची आर्डर देऊन त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला.

वडापावचा जन्म होण्याआधी मुंबईत उसळपाव किंवा मिसळपाव यांची सद्दी होती. पण शिवसेनेचा उदय झाला आणि तिने उडीपी हॉटेलवर आक्रमण केल्यानंतर वडापाव उदयास आला. सेना-उडीपी संघर्षानंतर सेनेने पहिल्या महापालिका निवडणूका लढवल्या. त्यात भायखळा भागातून चंद्रकांत आळेकर नावाचा शाखाप्रमुख लढलेला होता. पण त्याला पराभवाची चव चाखावी लागली. त्याच काळात लुंगीवाल्यांच्या तावडीतून मुंबई मुक्त करण्याचे पर्याय अनेक शिवसैनिक शोधू लागले होते. लालबागच्या बंडू शिंगरेने शहाळी सोलून विकणारे तरूण समोर आणले; तर आळेकरने उडीपीला पर्याय म्हणून बटाटेवडा पाव असा स्वस्तातला खाद्यपदार्थ शोधून काढला. महापालिकेचा उमेदवार म्हणून आळेकरचा आपल्या भागात गवगवा झालेला होता. त्याने भायखळा स्थानकाच्या पश्चिमेला एक ढकलगाडी उभी केली आणि त्यावरच भजी वडे तळणारी कढई मांडून खाद्यपदार्थाचा स्टॉल सुरू केला. त्यावर पालिका पथकाची धाड येऊ नये, म्हणून एक फ़लक लावला. ‘शिवसेना पुरस्कृत वडापाव’. त्या काळात सेनेचा इतका दबदबा होता, की पालिकेची गाडी अशा फ़लकाला हात लावायला धजावत नसे. सहाजिकच विनापरवाना तिथे आळेकरचा धंदा सुरू झाला. हॉटेलात तेव्हा उसळपाव मिसळपाव २५ ते ३० पैशात मिळायचे. तुलनेने १२ पैशातला वडापाव ही अवाढव्य स्वस्ताई होती. भायखळा स्थानकात येणारे-जाणारे दहापंधरा पैसे वाचवून खाऊ घालणार्‍या आळेकरला दुवा देऊ लागले आणि बघता बघता त्याच्या गाडीभोवती अहोरात्र गर्दी-झुंबड दिसू लागली. अर्थात तेव्हाचा १२ पैशातला वडापाव एक खाल्लातरी पोटभर व्हायचा. आता दोन खावे लागतात, तेव्हा तितके पोट भरते.

आळेकरांच्या त्या यशाने सभोवारच्या भागात वडापावची साथ पसरू लागली आणि पुढल्या दोनतीन वर्षात मुंबईभर ‘शिवसेना पुरस्कृत वडापाव’ असे फ़लक झळकणार्‍या गाड्यांचे पेव फ़ुटले. एका बाजूला बेकार मराठी मुलांना अल्प भांडवलात त्यातून रोजगार मिळाला होता. पण त्याचवेळी मुंबईतल्या कष्टकरी लोकांना स्वस्तातली अन्न सुरक्षा मिळू लागली होती. शिवसेना आणि वडापाव हे एक समिकरण होऊन गेले. मात्र तेव्हा शिवसेना राजकारणात थेट उतरली नव्हती. लौकरच आलेल्या १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत मग सेनेने उडी घेतली आणि इंदिरा लाटेत मार खाल्ला. तेव्हा त्याच सेनेच्या वडापावची खुप राजकीय टवाळी झाली होती. कारण तेव्हा सेनेने निवडणूक चिन्ह म्हणून ढाल-तलवार हे चित्र निवडले होते. तिचे उमेदवार पराभूत झाल्यावर त्याच चिन्हाला ‘वडा मिरची’ म्हणून हिणवायची स्पर्धाच लागली होती. पण वडापावच्या लोकप्रियतेला कधी ओहोटी लागली नाही. गेल्या अर्धशतकात वडापाव देशभर पसतला आणि एक मराठी खाद्यपदार्थ म्हणून मान्यता पावला. आरंभी दहा पैशातला वडा आणि दोन पैशाचा पाव होता. मग तेलाची महागाई वा टंचाई यामुळे वडा महागला आणि बारा, मग पंधरा पैसे होऊन एकूण वडापावची किंमत वीस पैशावर गेली. त्यालाही दोनचार वर्षे लागली होती.

१९७८ सालात विधानसभा निवडणूका संपल्यावर आपल्या चांगल्या परिचयाचे काही आमदार असल्याने मंत्रालयाकडे जाणेयेणे व्हायचे. तेव्हा आमदार निवासाखाली एक टेबल मांडून वडापाव विकणारे चौघेजण होते. टेबलावर फ़ळी ठेवून मांडलेल्या दुकानात एकजण सर्व तळणे वगैरे करायचा आणि तिघे ग्राहकांना माल द्यायचे. तेव्हापर्यंत पन्नास पैशात बिनपावाचे तीन वडे त्यांनी दिलेले आठवतात. तेव्हा विकासाची गती गोगलगाईसारखी मंद होतीच. पण महागाई सुद्धा किती मागसलेली संथगतीने चालणारी होती त्या काळात, असे आता वाटते. दोनपाच पैशाने किंमती वाढायला वर्ष दीडदोन वर्षे खर्ची पडायची. पावाचा आकार लहान होत गेला, तरी दिर्घकाळ पाव पाच पैशालाच मिळायचा. वडा महाग होत गेला तरी पावाच्या किंमती कितीतरी वर्षे स्थीर होत्या म्हणायला हरकत नाही. खरे सांगायचे तर वडापाव विकणारे किंवा कुठलाही धंदा व्यापार करणारेही नुसती कमाई करायला व्याप मांडायचे नाहीत. आपल्याला रोजगार मिळावा, त्यातून आपल्या घरातली चुल वेळच्या वेळी पेटावी आणि ग्राहक म्हणून आपल्याकडे येणार्‍यांना अभिमानाने पोटभर खाता यावे अशी धारणा असावी. तेव्हा अन्न सुरक्षा हा जागतिक विषय झालेला नव्हता. १९८५-९० पर्यंत तरी महागाई अशीच संथगतीने चालली होती. मग आर्थिक सुधारणा आल्या, अर्थकारण मुक्त झाले आणि माणसा माणसातले नातेच इतके महाग होत गेले, की बाकीच्या किंमती कितीही वाढल्याचे कुणाला सोयरसुतक राहिले नाही. एका बाजूला सरकार व राजकारणी लोकांना काहीतरी फ़ुकट किंवा स्वस्त देण्याची भाषा वापरू लागले आणि दुसरीकडे सामान्य जनता घोटभर पाणी वा पोटभर अन्नाला महाग होत गेली. १९९५ सालात शिवसेनेची सत्ता आल्यावर अवघ्या एका रुपयातली मनोहर जोशींची झुणका भाकर आली आणि चंद्रकांत आळेकरचा वडापावही गरीबाला परवडणारा राहिला नाही.

इंद्रा, फोटो आणि वडापाव लई भारी!!

भायखळा स्टेशनचा 'ग्रॅज्युएट वडापाव'वाला सध्या प्रसिद्ध आहे.

हो... दोन वर्षा पुर्वी तो परळ स्टेशनच्या बाहेर गाडी लावायचा... आता बंद झाला.

जशी मिसळ खाण्याची प्रसिद्ध ठिकाणं आहेत तशीच वडापावची.. त्यातले काही..
१. दादर टिटि वरुन हिंदमाता कडे जातना शिंदे वाडी सिग्नल जवळचा बेर्डे गादी वाल्याचा वडापाव
२. त्याच रोड वर पुढे गेल्यावर परळ टिटिचा फ्लाय ओव्हर उतरल्यावर लगेच डावीकडे सेनेचा वडापाव वाला आहे.
३. किर्ती कॉलेजचा वडापाव तर सगळ्यांनाच माहित आहे.
४. माटुंगा पश्चिमेला टि. एच. कटारिया रोड वरिल मार्केट मधला वडापाव
५. आमच्या भोईवाडा नाक्यावरचा भोलाचा वडापाव.

यादी बरिच मोठी आहे.. बाकी तुम्ही भरा.

Pages