देव्यपराधक्षमापनस्तोत्र

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 April, 2013 - 07:31

देव्यपराधक्षमापनस्तोत्र (रुपांतरीत )
माते मी न जाणतो मंत्र,यंत्र,आणिक स्तुती.
न ये मजला मुद्रा,आवाहन, वा आहुती ||१||
मला न ठाऊक व्याकुळ विलाप,आणि ध्यान.
हे जगदंबे मला नसे स्तोत्र,कथादिंचे हि ज्ञान.||२||
ठाऊक मजला ते एकच तुझे अनुसरण,
त्या योगे मजला न होते आप्पत्ती चे स्मरण ||३||
मी अज्ञानी न जाणतो विधिवत तुझी पूजा,
मी पामर,आळशी, परी तू न धरी मनी भाव दुजा ||४||
क्षमा असावी माते पडत आहे तव सेवेत खंड
दुष्ट बालक मी तुझा, परी माता न करे तया दंड ||५||
जगी या असतील तव पुत्र अनेक सत्कर्मी
मी चंचल बालक, हीन मनाचा, असेन दुष्कर्मी ||६||
परी माते आता तुला न शोभे माझा त्याग,
आता या दुष्टालाही क्षमा करणे तुला आहे भाग||७||
माता न कधी दुष्ट परी दुष्ट हे बालक
काय वर्णू तुझी माया, तू असे माझी पालक||८||
मी स्वार्थी,कधी न तुला संपत्ती अर्पितसे
मनोभावे तुझी सेवा हि कधी न करीतसे||९||
सेवा सरकारची हाच माझा दुसरा आधार
त्याची न करू सेवा तर मी होईल निराधार||१०||
निराधारावर आता जर तू न करशील दया
तर या शरणागतास कोण लावील माया ?||११||
नाम मंत्र तव करीतसे चांडाळास वाचस्पती
दरिद्री हि होतसे योगी तव कृपेने हे आदीशक्ती||१२||
तुझ्या नामस्मरणाचा हि मिळतो मोठा मेवा
थोर थाट तयाचा जे करिती तव विधिवत सेवा||१३||
सर्पमाल्य धारी भास्मांकित जो महादेव
हे पार्वती माते तू त्याची शक्ती रूपी ठेव||१४||
हे शीतला माते नसे कामना मोक्षाची,आणिक वैभवाची
याचना माझी मृडानी,रुद्राणी,शिव भवानी या जपाची||१५||
न घडे विधियुक्त पूजा न घडे आराधना
कठोर वाणी सतत जपते अपराधाची भावना||१६||
परी तू दयाळू माते तुझी दयाच थोर
आश्रय दाते आता या दुष्टाला नसे घोर ||१७||
संकट ग्रस्त मी परी तू न समजावे स्वार्थी मला
विनवीत असे भू भूक्षित बालक माहेश्वरी तुजला ||१८||
कृपा तुझी असावी या बालकावरी परिपूर्ण
योग्य ते करावे पतीताचे, तू माता विश्वाची संपूर्ण ||१९||
देवपराध क्षमापन स्तोत्र रुपान्तरीयले विनायकाने
कृपा दृष्टीने आता पावन करावे जगन्मातेने ||२०||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम !

एक छोटी सूचना - "हमखास||१२||' या अरबी शब्दाऐवजी अन्य प्राकृत किंवा मराठी शब्द वापरला तर उत्तम. तसेच या धाग्याच्या मथळ्यामध्येदेखील दुरुस्ती अपेक्षित आहे.

(हा धागा वाचणाऱ्यांसाठी आचार्यकृत मुळ संस्कृत देव्यपराधक्षमापन स्तोत्र व त्याचा अर्थ देत आहे.)

।। अथ देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्‌ ।।
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम्‌।।१।।
ना मंत्र ना यंत्र. इतकेच काय पण तुझी स्तुतीही मला माहीत नाही. ना आवाहन ना ध्यान. मला तुझ्या स्तवनपर कथाही माहीत नाहीत. तुझ्या मुद्रा माहीत नाहीत. तुझ्यापुढे व्याकूळ कसे व्हावे हेही मला समजत नाही. पण आई! सर्व क्लेशांचा नाश होण्यासाठी तुझ्याकडे हट्ट कसा करावा हे मात्र मला चांगले कळ्ते.
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत्‌।
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।२।।
पूजाविधीचे अज्ञान, द्रव्याचा अभाव आणि अंगातील आळस ह्यामुळे माझ्याकडून विधिपूर्वक पूजन शक्य नसल्यामुळे तुझ्या चरणसेवेत जो खंड पडतो त्याबद्दल तू मला क्षमा करावीस. कारण आई! सकलांचा उद्धार करणाऱ्या शिवे! एक वेळ कुपुत्र जन्मास येईल पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही.
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।३।।
आई ! ह्या पृथ्वीतलावर तुझे कितीतरी पुत्र असून ते सरळमार्गी आहेत. पण त्यांपैकी मी मात्र एक नाठाळ पुत्र आहे. शिवे! माझा त्याग करणे हे मात्र तुला शोभत नाही. कारण एक वेळ कुपुत्र जन्मास येईल पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही.
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।४।।
हे जगज्जननी आई! मी तुझी चरणसेवा तर कधीच केली नाही. हे देवी! मी तुला भरभरून धनही देऊ शकलो नाही. तरीही तुझी माझ्यावर अनुपम प्रीती आहे. कारण एक वेळ कुपुत्र जन्मास येईल पण कुमाता मात्र कधीच असू शकत नाही.
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम्‌।।५।।
अनेक प्रकारची प्रापंचिक कामे करावी लागत असल्यामुळे मी अन्य देवांनाही सोडून दिले आहे. आता तर माझ्या वयाची पन्नाशी उलटली आहे. आई! आता तुझी माझ्यावर कृपा झाली नाही, तर हे गणेशजननी ! मी पामराने कोणास शरण जावे?
श्र्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ।।६।।
अगदी अडाणी चांडालदेखील उत्तम वक्ता होतो, भणंग कंगालदेखील कोट्यवधी सुवर्णमुद्रा घेऊन विहार करतो. हे मनुवर्णे, अपर्णे! ह्या गोष्टी केवळ तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानात शिरले तरी घडून येतात मग हे आई! संपूर्ण मंत्राच्या जपविधीचे कोणते फळ मिळेल हे कोणास ठाऊक?
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम्‌।।७।।
सर्वांगास भस्म चोपडणारा, सर्पगरल गटागटा पिणारा, सदैव वस्त्रहीन अवस्थेत राहणारा, जटा वाढवलेला, गळ्यात सर्पाधिपतीचा हार घालून मिरवणारा पशूंचा पालक, हातात नरकपाळ बाळगणारा असा तो भूतगणांचा म्होरक्या (शिव) "जगदीश' हे बिरुद मिरवतो. हे भवानी! हे केवळ तुझा हात धरून गेल्याचे फळ आहे !
न मोक्षस्याकाङ्क्षा न च विभववाञ्छापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै मृडानि रुद्राणि शिव शिव भवानीति जपतः।।८।।
मला ना मोक्षाची आकांक्षा, ना वैभवाची वांछा ना विज्ञानाची अपेक्षा आहे. हे शशिवदने! मला सुखाचीदेखील इच्छा नाही. आई ! माझी तुझ्याकडे एकच विनवणी आहे की माझा जन्म "मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी' असा जप करत व्यतीत व्हावा.
नाराधितासि विधिना विविधोपचारैः किं रूक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः।
श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाथे धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव।।९।।
विविध उपचारयुक्त विधींनी मी ना कधी तुझी आराधना केली. रूक्षचिंतनयुक्त वाणीने मी कोणते बरे अपराध केले नाहीत? हे श्यामलवर्णे! तरीदेखील अशा ह्या अनाथ बालकावर तुझी कृपा असावी ना! आई! खरंच हे फक्त तुलाच शोभून दिसते.
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवे शिवे।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।१०।।
हे करुणासिंधु दुर्गे! अगदी संकटात सापडलो तरच मी तुझी आठवण काढतो. हे शिवे! ही माझी लबाडी आहे असे मुळीच समजू नकोस. कारण तहानभुकेने कासावीस झाल्यावरच तान्ही बाळे आपल्या आईची आठवण काढतात ना?
जगदम्ब विचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि।
अपराधपरंपरावृतं न हि माता समुपेक्षते सुतम्‌।।११।।
जगदंबे ! माझ्यावर तुझी पुरेपूर कृपा आहे ह्यात आश्र्चर्य वाटण्याजोगे असे ते काय? कारण अपराधावर अपराध करूनदेखील माता आपल्या मुलाची कधीच आबाळ करत नसते.
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु।।१२।।
माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापनाशिनी कोणी नाही. हे जाणून हे महादेवी ! तुला जे योग्य वाटेल ते कर.
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य-श्रीमच्छंकराचार्य- विरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम्‌।।

विनायक. दि.पत्की.,

सुंदर स्तोत्र आहे. या स्तोत्रात देवीची स्तुती कमी असून स्वत:ची निंदा अधिक आहे. असंच दुसरं स्तोत्र म्हणजे भवान्यष्टकम्. तेही शंकराचार्यांनी रचलेलं आहे. इथे मजकूर मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

Mandar Katre, गामा_पैलवान(भवान्यष्टकम् बद्द्ल विशेश धन्यवाद),limbutimb,,वैभव वसंतराव कु..,नितीनचंद्र,
या सर्वाना मनःपुर्वक धन्यवाद

या स्तोत्रात देवीची स्तुती कमी असून स्वत:ची निंदा अधिक आहे.
ह्याच कारण स्तोत्र म्हणणारा देवीकडे क्षमा मागत आहे . माझ्या माहितीप्रमाणे हे स्तोत्र श्री दुर्गा सप्तसती मध्ये आहे.

छान जमला आहे मराठी अनुवाद Happy

हरिहर,
अनुवादात एकच बदल सुचवतो.
>>तो भूतगणांचा म्होरक्या (शिव) "जगदीश' हे बिरुद मिरवतो. हे भवानी! हे केवळ तुझा हात धरून गेल्याचे फळ आहे !

हात धरून गेल्याचे असे म्हणण्यापेक्षा, हे केवळ शिवाने तुझ्याशी लग्न केल्याचे फळ आहे.
पाणिग्रहण= लग्न.