घर कितीक वेळेला मीच मोडले माझे!

Submitted by गझलप्रेमी on 24 March, 2013 - 10:57

गझल
घर कितीक वेळेला मीच मोडले माझे!
भोव-यामधे तारू मीच सोडले माझे!!

त्या प्रभावळीमध्ये मीच शोभलो असतो.....
मीहुनी विनाकारण नाव खोडले माझे!

लागला मला जेव्हा पैलतीर खुणवाया.....
मी प्रसन्न चित्ताने पाश तोडले माझे!

ना कुणी तसूभरही शेवटी बदलले रे!
जन्मभर उगा डोके मीच फोडले माझे!!

जाहलो बहिष्कृत मी शेवटी अशासाठी.....
का भटांसवे गेले नाव जोडले माझे?

लागतेच पुण्याई सद्गुरू मिळायाला!
ना फुका भटांसंगे नाव जोडले माझे!!

.......................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users