’निराकार’ - उषा मेहता

Submitted by संयोजक on 26 February, 2013 - 01:18

Mabhadi LogoPNG.png

'निराकार' हा इंदिरा संतांचा शेवटचा काव्यसंग्रह. त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने प्रसिद्ध झालेला. बर्‍याच अवधीनंतर हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत असल्याने इंदिराबाईंच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यावर समीक्षकांनी आणि वाचकांनी या कवितांचं कौतुक केलं, पण 'हा माझा शेवटचा संग्रह असेल' हे इंदिराबाईंनी लिहिलेलं वाचून अनेक हेलावले.

उषा मेहता यांनी 'मानाचं पान' या सदरात 'ललित' मासिकात या काव्यसंग्रहाचं सुरेख रसग्रहण केलं होतं.तेच रसग्रहण इथे पुनर्मुद्रित करत आहोत.

***

'निराकार' हा इंदिरा संतांचा दहावा कवितासंग्रह. अलीकडेच बेळगावात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्याचे प्रकाशन झाले. गेली अनेक वर्षे इंदिराबाईंचे वास्तव्य बेळगावातच आहे. पण प्रकृतीअस्वाथ्यामुळे स्वतः इंदिराबाई या प्रकाशनसमारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. वयोमानानुसार हे स्वाभाविकच म्हणायचे. त्यामुळे रसिक वाचकांची निराशा झाली असेल. मात्र 'निराकार' मधून ज्या इंदिरा भेटल्या त्या पूर्वपरिचित 'इंदिरा'च, स्निग्ध-शांत-सहजपणानं आपल्या शब्दांमधून सौंदर्याच्या विविध छटा विकसित करत जाणार्‍या, रूपरसगंधाचा नैसर्गिक प्रत्यय अंतर्मनापर्यंत देत राहणार्‍या, मानवी एकाकीपणातील तडफड जाणवून निसर्गाच्या उत्कट आणि तरल अनुभवांमधून 'निराकार'कडे वाटचाल करीत राहणार्‍या इंदिराबाई. या संग्रहातल्या त्यांच्या कवितांचे रंग जरा अधिकउणे, गडदफिके भासतीलही. पण 'त्याच इंदिरा' आपल्या मितभाषी कवितेतून खूप काही सांगून -सुचवून जाणार्‍या. शब्दानुभावातून चैतन्याचा प्रत्यय देणार्‍या 'निराकार'मध्ये भेटत आहेत.

निसर्गानुभावाची विविध चित्रे त्या रेखाटतात, रंगवतात आणि या चित्रांमधून हृद्य असा आशय सहजपणे उमलून येतो. निसर्गाबद्दलची तरल जाणीव हा इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा सहजभाव आहे. रोजच्या जगण्यामध्ये निसर्गच त्यांना सोबत करत असतो. निसर्गामधून त्या आपल्या मनाची सुखदु:खे व्यक्त होताना पाहतात.
एक साधेसे उदहरण -
आज
झुंझरक्यात पाहिलेला एक काळाभोर ढग
काळज्ञानासारखा ओथंबून आलेला.....

किंवा

आज जिवाला वेढणारी ही हवा....
जाईचा बहरलेला ताटवा...
फुलांचा वास...
जसे श्वासनि श्वास..!

'सुरंगीची फुले' या कवितेत त्यांनी म्हंटले आहे,

या जाळीदार धुक्यातून
पुढे येणारे क्षण कुसुमित होऊन येतात
सुरंगीच्या मधुर मोहक फुलासारखे
घमघमतात....

निसर्गाची अशी अनेक रूपचित्रे, काही भासचित्रे, काही भयचित्रे, त्या चित्रित करतात आणि म्हणतात,

ही रंग रेषांची चित्रे की
जीवनातील चित्रविचित्रे ? की
अंतरंगाला जाणवलेली आपली स्वतःची रूपचित्रे?

'चंद्रपान'मध्ये त्या आपल्याला आलेल्या शिणवट्याचे वर्णन करून आपल्या संभ्रमचित्ताचे, निलाकाशात दिसलेल्या चंद्रपानाचे वर्णन करतात,

चंद्रवर्णी अक्षरे डौलदार रेखलेली
जशी मोगरीची फुले उभ्या देठातून
ओवलेली
हे तर काय, एक चंद्राचे पान
क्षणभर मी अनभान....!
थकलेल्या डोळ्यांना हा भ्रम
की माझ्या धूसर संवेदनांचा हा संभ्रम...?

हे चंद्रपान म्हणजे त्यांना त्यांच्या मनोमनातील कवितेचे उमटलेले आत्मरूपही वाटते. 'जास्वंद'मध्ये पांढर्‍याशुभ्र गोंडस ढगांनी आकाशात खेळ मांडला असताना चारसहा फुलचुक्यांचे सीत्कार, त्यांचे सर्रकन, भर्रकन उडून जाणे; त्या हा खेळ आता आपल्या नजरेसमोर घडल्यासारखं टिपतात आणि शेवटी केशर पिवळ्या परागांनी सजलेली आणि कळसावर ती जास्वंदही बघताबघता त्या गोंडस ढगांबरोबर खेळायला निघून जाते. अशी कितीतरी, प्रसन्न निसर्गचित्रे त्यांच्या शब्दांतून सजीव होऊन प्रसन्नतेचा शिडकावा करीत गेली आहेत. त्याचबरोबर काही चित्रांमधून निसर्गाच्या भव्य, रुद्र स्वरूपाचाही उत्कट प्रत्यय त्यांनी दिलेला आहे. 'भैरवघाटा'चं हे चित्र पाहा,

आकाशाला टेकलेली पहाडांची रांग...
नजरेला अंधारी आणणारी दरड अथांग....
पहाडाच्या आधाराची ही पायवाट...
की ढोरवाट...
हा तर भैरवघाट!

हा भैरवघाट भयभीषण असला तरी त्याच आकर्षणही तसंच जबरदस्त आहे. धुक्याच्या वेटाळ्यातून, उन्हाच्या वाफाळ्यातून, वावटळीच्या हिसक्यांमधून जाताना भयाने अंग गोठून जाते. पण शेवटी त्या वेटाळ्यात कलंडणं अपरिहार्यच आणि मग खोल दरीतून एक शीळ ऐकू येते.

खोलातून वर येणारी
पाखरशीळ......श्वास कशी
कानातून गुंजत गेली..... मायेची हाकच वाटली !

तळातील खळाळाची गाज हळुवार पडसादासारखी
घुमघुमत साथीला आली :
'ये. ये. ये.'
आणि पंचप्राण
भरभरुन ओसंडू लागले.

निसर्गाच्या हाकेला 'ओ' देऊन त्या 'निराकारा'त विलीन होऊन जाण्याची ओढ आणखीही काही कवितांमधून उत्कटपणे जाणवत राहते. एका कवितेत त्या म्हणतात,

पार-अपार आभाळ
जन्मोजन्मीची ओळख
थेंब पावसाचे यावे
तशी आली त्याची हाक.

या हाकेतून 'त्या'च्या शब्दांचे हेलावे गुंजतात, हेलाव्यांतून आमंत्रणाची लाघवे चमकतात! अंतर्मनात सतत प्रियकराच्या विरहाची वेदना निनादत राहणारी. त्याला भेटण्याची तीव्रतम आस लागून राहिलेली. 'गुलाबास'मध्ये त्या म्हणतात,

'तू माझा एकच तारा
कुठे असशील? कुठे तरी...
सैरावैरा.....
तुझा पसाभर गुलबास ओंजळीत घेऊन
मी निघणार आहे....

तो गेल्यावर या विरहिणीची अवस्था कशी नि काय झाली? इंदिराबाई त्याला सांगतात,

तू नाहीसा झालास.....
इथल्या बारा दिशांनी मला घेरले..
अंतराळीची...
पोलादी पुतळी झाले...!
पण त्याच्या भेटीसाठी
आत वितळणार आहे...
तेजाळणार आहे..
इथून निघणार आहे....'

'रिक्ता' या कवितेत त्या प्रियकराचे वर्णन करतात,

देवचाफ्याच्या फुलासारखे
तुझे प्रसन्न व्यक्तिमत्त्व...
टपोर मोगर्‍यासारखे..
तुझ्या डोळ्यातील झोत...
पारिजातकासारखे
तुझे रंगमधुर बोलणे
रानगुलबासारखा
तुझा मुखसुंदर स्वभाव

त्यांच्या सहजीवनातील समरसता व्यक्त करतात,

तुझ्या-माझ्या सहवासाच्या
किती थोड्या आठवणी..
काळजाच्या संदुकीत
फुले ठेविली जपूनी

पण म्हणूनच त्याचा विरह सोसता सोसवत नाही. मन घायाळ होऊन जाते आणि शेवटी इंद्रायणीच्या वाहाणीचा आसरा शोधते,

तिच्या कुशीत शिरता
हुंदक्यांनी मी दाटते
माझे सांभाळ हे प्राण
तुझ्या ओटीत टाकते
डोळा दाटला काळोख
मौन दाटले प्राणात
आणि परतले भाग
रिक्त कशी रिक्त रिक्त

प्रीतीमधलं घायाळपण काय असतं ते पुरेपूर जाणवून देणारी अशी ही इंदिराबाईंची अभिव्यक्ती आहे,
मीराबाईची आठवण करून देणारी. स्वतः बद्दल त्या अजून एका कवितेत म्हणतात,

माझ्या जिवाची चढण
किती कठीण कठीण
आणि अजाण पाऊले
मेंदी स्वप्नांची रेखून!

पण त्या स्वप्नांची दीपमाळ आता विझलेली आहे. ती दीपमाळ आता खडकाचा खांब झालेली आहे. तरीही भास होतच राहतात. त्याच्याविना सार्‍या जन्माचा उन्हाळा झाल्याने मन त्रासून, विटून गेले आहे. भोवर्‍यासारखे शून्य बिंदूला शोधात गरगर फिरत राहिले आहे आणि तरीही प्रियकर भेटीसाठी किती स्वप्नील भासांमध्ये हरवून जात आहे.

लाटा लहरी झुलल्या
पाण्यातील निळाईत
इथे तिथे फुलवत
उभे कमळांचे बेट !
डोळे मिटले क्षणात
झाली विजेची पाऊले..
चमकून निळाईत
कळाईत हरवले...

निसर्गाची साथसंगत आणि प्रियकराच्या सतत येणार्‍या आठवणी यांनी इंदिराबाईंचे भावविश्व व्यापून राहिले असले तरी वास्तवाचे त्यांचे भानही हरवले नाही. वेगवेगळ्या नात्यांमधून मायेने-प्रेमाने, गरजेने-सक्तीने एक अष्टकमळ घडवले असले तरी अखेर तो एक पाकळ्यांचाच पसारा आहे, हे त्या जाणून आहेत. पण त्यांचा किनारा हा वेगळाच आहे. तो वेगळा किनारा गाठण्यासाठीच त्यांचा 'शिकारा' निघालेला आहे.

वेगळा प्रवाह
वेगळा किनारा
वेगळे डोल-झोल
आणि वेगळा किनारा

सामाजिक कुरूपतेचही त्यांना यथार्थ भान आहेच. 'अगतिक'मध्ये त्या लिहितात,

पहाटे पहाटे...कुठची पाखरे भर्र, भर्र
दारांखिडक्यांतून आत शिरतात
इथेतिथे घराच्या नजरेवर बसतात
पंखांवरील दुश्चिन्हांच्या नक्षीवर सूर धरतात
कसे भेसूर अभद्रसे गळे काढतात
ऐकता ऐकता घर झाकोळते...काजळते...भिते,
संतापते, चिडते, शेवटी असह्य होऊन त्या
वार्ताविहंगमांचे पंख चिमटून पुटपुटते;
"चिंता करतो विश्वाची!"
आणि पूर्वेकडे पाहते, अधीर होऊन.... आधारासाठी

इंदिराबाईंच्या कवितेचा हा नेहमीचा स्वर नाही. हा अस्वस्थतेतून आलेला उद्गार, पण शेवटी आधार 'पूर्वे'चाच, निसर्गाचाच. दिवस बदलताहेत, माणसं बदलताहेत, नैसर्गिक वातावरणाचा विध्वंस होत आहे, याची जाणीव त्यांच्या आणखीनही कवितांमधून व्यक्त होते. 'घुसमट'मध्ये सात वर्षांचा नंदू पेपर वाचायला लागतो आणि परगावी गेलेल्या बाबांच्या आणि घरी यायला उशीर झालेल्या ताईच्या काळजीत कसा घुसमटून जातो ते इंदिराबाई नेमकेपणाने व्यक्त करतात. कोवळ्या वयाच्या, निर्मल मनाच्या या मुलाला परिस्थितीने कसे आत्ताच घेरून टाकले आहे, म्हणून ही आई व्याकूळ होते. म्हणते 'बाळाचे बाळपण कोमेजायला लागले!' 'विनाशाची नांदी', 'भयभीषणाचा बाजार', 'बोरवनातील शबरी' अशा काही कवितांमधून इंदिराबाईंनी कुरूप वास्तवतेचे चित्रण समर्थपणे केलेले दिसते.

लहान मुले हा इंदिराबाईंच्या अत्यंत कौतुकाचा विषय. यापूर्वीच्या त्यांच्या संग्रहांमधून लहान मुलांच्या संदर्भातल्या अनेक कविता आपण वाचलेल्या आहेत. 'निराकार'मध्येही 'गोष्टाळे', 'बाळभेट', 'मी घेतलेले वास' या कविता आल्या आहेत. 'पाठवणी'सारख्या कवितेमध्ये त्यांच्यावरचा 'स्त्रीगीतां'चा संस्कार लक्षात येतो. काही कविता आपल्या 'मना'ला उद्देशून आहेत आणि या मनाचे छंद पुरवण्यात इंदिराबाई तत्पर आहेत. 'महावस्त्र'मध्ये त्यांनी म्हटले आहे,

वर्तमानाचा आस्वाद
सहा रसांच्या फुलांचा
फुले वेचावी, खुडावी
हाच नाद जीवनाचा.

'घरंगळ'मध्ये त्या म्हणतात,

चित्र नि:शब्द अबोध
मालवला भूतकाळ
आता हाच वर्तमान
धूरकातरशी वेळ
तशी हीच घरंगळ

या संग्रहाच्या आरंभी 'निराकारा' कडे जाताना...' असा वासंती मुजुमदार यांचा लेख आहे. 'निराकार'च्या संदर्भात तो महत्त्वाचा आहे. त्यात वासंतीबाईंनी इंदिराबाईंच्या आधीच्या संग्रहांमधील कवितांच्या आधारे इंदिराबाईंच्या काव्याबद्दल त्यांना जाणवलेले विशेष सांगितले आहेत आणि त्याचबरोबर इंदिराबाईंशी त्यांच्या कवितेसंबंधी झालेल्या अनौपचारिक संभाषणांतील काही महत्त्वाची उद्धृते दिली आहेत. 'कविता म्हणजे नेमकं काय लिहिता तुम्ही?' या प्रश्नावर त्या म्हणतात, 'शब्द, अर्थ, प्रतिमा, लय, नाद, यांची समग्र जाणीव मी व्यक्त करते. त्या आशयाला शोभेल असं ते सगळं रसायन असतं.' त्यांच्या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलही त्या विस्ताराने सांगतात. एखाद्या कवितेमधले काही विशिष्ठ शब्द कविता आकार घेताना आपोआप कवितेत येतात, पण अशा शब्दांबद्दलही इंदिराबाई अतिशय सावध असतात. त्या शब्दाची कवितेतील अपरिहार्यता त्यांना जाणवलेली असते.
आपल्या पूर्वीच्या संग्रहातील कवितांमधील प्रतिमांबद्दल बोलताना त्या म्हणतात, 'एखादी भावजाणीव शब्दरूप धरीत असता ज्या प्रतिमा मी वेचल्या, त्यांचे नावीन्य, त्यांची विविधता आणि त्यांची भान शोषून घेण्याची शक्ती ही माझ्या 'या' काव्य संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल.'

इंदिराबाईंनी आपले 'निराकार'संबंधीचे मनोगत इतके लघुरूपात व्यक्त केले आहे, ते वेचताना त्यांच्यातील समंजसतेचा, प्रगल्भतेचा आणि मुख्य म्हणजे वाचकांवरच्या प्रेमाचा प्रत्यय येतो आणि जीव गलबलतोही. त्या म्हणतात,

'यापुढे
माझ्या हातून कवितालेखन
होईलसे वाटत नाही.
हीच माझी
शेवटची भेट समजावी,
मानून घ्यावी,
अशी
रसिक वाचकांना
विनंती'

आपण मनात त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो आणि म्हणतो, कवींना वृत्तीचे चिरयौवन तर लाभलेलेच असते, इंदिराबाई लिहितीलच आणखी कविता.

'निराकार'मध्ये एकूण ५३ कविता समाविष्ट आहेत आणि त्यांचे स्वरूप हे इंदिराबाईंच्या आधीच्या कवितांप्रमाणे अत्यंत सतेज, टवटवीत आहे. इंदिराबाईंच्या 'कविते'चे मराठीत अनन्यसाधारण असे स्थान आहे. माधव आचवल, सुनीता जोशी, श्री. पु.भागवत अशा अनेकांची या कवितेबद्दल गौरवाने लिहिले आहे, तिची समीक्षा केली आहे. इंदिराबाईंना त्यांच्या काव्यनिर्मितीबद्दल 'जनस्थान पुरस्कार'सारखे पुरस्कार लाभलेले आहेत.

श्री. पु. भागवत जनस्थान पुरस्कार सोहळ्यातल्या आपल्या व्याख्यानात इंदिराबाईंच्या कवितेचं ऋण व्यक्त करताना म्हणाले होते, 'पैशाचं कर्ज काय किंवा अन्य लौकिक ऋण काय, ती फेडता येतात, पण सौंदर्यदानाचं अलौकिक ऋण कधी फेडता येत नाही. ते फेडून अळणी होण्याचा विचारही करू नये. शेवटच्या श्वासापर्यंत त्या ऋणातच राहावं आणि आपल्या वंशजांसाठीही ते जपून ठेवावं. व्यक्तीनंही आणि समाजानंही. गाढ कृतज्ञताभावानं. कृतज्ञता ही व्यक्तीच्या तशीच समाजाच्याही निरामयतेची साक्ष असते.'

***

हा लेख मायबोलीवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. अशोक कोठावळे (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई) यांचे मन:पूर्वक आभार.

या लेखातील कविता व कवितांच्या ओळी मायबोलीवर पुनर्मुद्रित व प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल सौ. वीणा संत आणि पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, यांचे आभार.

या लेखातल्या सर्व कवितांवर प्रताधिकार - सौ. वीणा संत, बेळगाव.

***
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहिलंय - सावकाश, चवीचवीने वाचावं लागणार .....

अवांतर - ते शीर्षकात इंदिरा संतांचे नाव दिल्यास वाचकांची सोय होईल असे वाटते.

'पैशाचं कर्ज काय किंवा अन्य लौकिक ऋण काय, ती फेडता येतात, पण सौंदर्यदानाचं अलौकिक ऋण कधी फेडता येत नाही. ते फेडून अळणी होण्याचा विचारही करू नये.

हे आवडलं.