काय पो छे : हृदयस्पर्शी

Submitted by अमेय२८०८०७ on 24 February, 2013 - 11:17

kai-po-che-poster_13558304010.jpg

चेतन भगतच्या कादंबर्‍या न आवडणार्‍या माणसांचे संमेलन भरले तर मी आवर्जून जाईन. 'टू स्टेट्स'चा काही भाग वगळला तर त्याचे लिखाण 'साहित्य' म्हणून फारसे भावलेले नाही. समस्या-भावनांचे त्याच्या लिखाणात अतिसुलभीकरण होते असे मला वाटते. अशा स्थितीत त्याच्या कादंबर्‍यावरील चित्रपट पहावे की नको अशा द्विधेत मी नेहेमी सापडतो. 'थ्री इडियट्स' च्या वेळी राजू हिरानीच्या हाताळणीवर लेखकापेक्षा जास्त विश्वास असल्याने पहायला गेलो.चित्रपटाची व्याप्ती आणि मूळ लेखनाच्याही पुढे जाणारी संकल्पना पाहून राजूने लेखकाला दिलेले 'नाममात्र' श्रेय योग्यच होते याची खात्री पटली. 'कॉल सेंटर...' वरील चित्रपट पाहण्याचे धाडस झाले नाही (आणि ती कादंबरीसुद्धा वरवरच वाचलेली आहे).
'काय पो छे' बघायला जाताना सुद्धा काही अशीच अवस्था होती. थ्री मिस्टेक्स वाचली होती, आवडली नव्हती. या चित्रपटाचा दिग्दर्शक चांगला आहे हे माहिती होते पण एक राजकुमार यादव सोडला तर इतर कलाकारांविषयी फारसे ऐकले नव्हते. मात्र चित्रपटाने सुखद धक्का दिला. वादग्रस्त घटनांचा 'बॅकड्रॉप' असूनही अत्यंत संतुलितपणे चित्रित केलेला हा चित्रपट पाहून बर्‍याच दिवसांनी मॉलमधून बाहेर पडताना निराशा झाली नाही. राजू हिरानीप्रमाणेच अभिषेक कपूर या दिग्दर्शकाने देखील चित्रपटाला मूळ संहितेच्यापेक्षा जास्त उंचीवर नेले आहे.
ही कहाणी अहमदाबादमधील तीन मित्रांची आहे. इशान, ओमी आणि गोविंद हे तीन सर्वस्वी भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले जिगरी दोस्त. शालेय शिक्षणाची समाप्ती आणि उपजीविकेची सुरूवात या दोहोंमधील चमत्कारिक काळातील तरुणाईची ही कहाणी आहे.
गोविंद हा त्यांतला 'आन्तर्प्रान्यूर' म्हणावा असा. स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठे होण्याचे स्वप्न बाळगणारा, तोपर्यंत शिकवण्या चालवून, बारीक सारीक धंदे करून पोट चालवणारा. इशान एका सुखवस्तू कुटुंबातला क्रिकेटवेडा, प्रशिक्षक होऊन क्रिकेटलाच वाहून घ्यायची 'पॅशन' असलेला. ओमी एका देवळाच्या महंताचा मुलगा - त्याच्या वडिलांविषयी समाजात असलेला आदर राजकीय मतांत बदलण्यासाठी आतुर असलेल्या मामाच्या विचाराने चालणारा - पण मैत्रीची गरजही असलेला.
गोविंदच्या पुढाकाराने एक छोटेखानी खेळ-साहित्य विकणारे दुकान सुरू करून तिघेही श्रीगणेशा (की जय कृष्णा ?) करतात. इशान दुकानाच्या मागेच आपली पहिली 'अ‍ॅकॅडमी' चालू करतो. ओमीने दुकानाची मोक्याची जागा मिळवण्यासाठी मामाला साकडे घालून आपला वाटा उचललेला असतो. लवकरच नव्याने चालू होणार्‍या मॉलमध्ये एक शानदार जागा पटकावून मोठे दुकान घालण्याचे स्वप्नही पुरे होण्याची चिन्हे दिसू लागतात. प्रत्येक प्रशिक्षकाला एका चांगल्या चेल्याचा शोध असतो. तसा एक दहा बारा वर्षांचा हिरा लवकरच इशानलाही गवसतो. धर्माने मुस्लिम असलेला अली नावाचा हा तुफानी फटकेबाज फलंदाज नैसर्गिक गुणांनी समृद्ध आहेच पण त्याच्या तंत्राला पैलू पाडले तर तो पुढेमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळू शकेल हा विश्वास वाटून इशान त्याच्यावर मेहनत चालू करतो.
अलिचे वडिल हे ओमीच्या मामाच्या विरोधी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असतात. इशानचे अलिशी जवळिकीने वागणे मामाना थोडेसे जाचत असते.
चित्रपटाचे पुढील कथानक म्हणजे या तिघांच्या मैत्रीला काही नैसर्गिक (भूकंप) आणि सामाजिक (गुजरातचे कुप्रसिद्ध दंगे) आपत्तींच्या निमित्ताने कुठल्या दिव्यांतून जावे लागते, निखऴ मैत्रीच्यापेक्षा इतर निकषांवर आयुष्याला कशी वळणे लागतात आणि या सर्वाचा परिपाक काय होतो याची खिळवून ठेवणारी कहाणी आहे. इशानची बहीण विद्या आणि गोविंद यांची फुलत असलेली प्रेमकहाणी हेही एक उपकथानक मूळ चित्रपटाचा वेग आणि उद्देश याला अजिबात धक्का न लावता छान रंगवले आहे.
चित्रपट गतिमान आहे. तारुण्यावस्थेतील मैत्रीची दास्तान दाखवणार्‍या बाकी चित्रपटांप्रमाणेच यातही पंचेस, विनोद, मौज मस्ती छान दाखवलीय. तितक्याच समर्थपणे गंभीर घटनांनाही व्यक्त केले गेले आहे. इशानची भूमिका करणार्‍या सुशान्त राजपूत या नव्या अभिनेत्याला सगळ्यात ताकदीची आणि विविध रंगछटा दाखवायचा वाव असलेली भूमिका मिळाली आहे आणि त्याने खरंच संधीचं सोनं केलंय. राजकुमार यादवचा व्यवसायाच्या बाबतीत धाडसी, आग्रही परंतु प्रेम वगैरे हळूवार भावनांच्या बाबतीत 'झीरो' असलेला गोविंदही झकास. रगिणी एम एम एस, शैतान, एल एस डी मध्येही हा आवडला होता. ओमी झालेल्या अमित सादचा अभिनय त्या मानाने एकसुरी वाटतो. अमृता पुरी विद्याच्या भूमिकेत भाव खाऊन जाते. तिचे मोहक दिसणे, बोलणे फार आवडण्याजोगे. ती 'आयशा' मध्ये हाय फाय बनायची इच्छा असलेल्या 'पंजाबी फटाका' मुलीच्या भूमिकेतही आधी आवडली होती.
राजकीय आणि धार्मिक प्रश्नांवर कुणाचीही बाजू घेऊन भाष्य करण्याचे दिग्दर्शकाने जाणून टाळले आहे. काहींना ती पळवाट वाटेल पण तो या चित्रकृतीचा आत्माच नाही. चित्रपटाचा उद्देश हा मैत्रीच्या - विविध कारणांमुळे होणार्‍या - ताण तणावांना दाखवणे आणि आयुष्यातील निर्णय कोणकोणत्या अपरिहार्य कारणांमुळे घेतले जातात आणि जीवनाला त्यातून कसे वेगळेच वळण लागू शकते हे दाखवणे आहे, जो अत्यंत सफल झालाय.
'काय पो छे' ने ( गुजराती स्वैर अनुवाद ...पतंग कापला रे) एक चांगला चित्रपट पाहण्याचे सुख तर दिलेच. शिवाय एरवी पॉपकॉर्न खाऊन आणि कोल्ड्रिंक पिऊन अंमळ जड पोटाने मध्यंतरानंतर एखादी डुलकी मारण्याच्या माझ्या सवयीने त्रस्त पत्नीही मी पूर्ण जागा राहून चित्रपटाचा आस्वाद घेतोय म्हणून खूश झाली. हे पुण्यही कमी नाही. त्या जोरावर पुढची काही पापे मी 'वळती' करून घेऊ शकतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला चित्रपट असावा ! अगदी मटा ,लोकसत्ता वगैरेंनीही 3.5 स्टार दिले आहेत..............

सगळ्या माध्यमातून वाखाणणी झाली आहे.......................!

बघण्याचा योग कधी येतो ते पाहूया...........................!

ओह, तो मधला 'मानव' आहे का? पवित्र रिश्तामध्ये तरी त्याला अ‍ॅक्टींगशी काही देणं घेणं नव्हतं. ह्या पिक्चरमध्ये जमलीय का?

हायला ! सायोचाच प्रश्न..
तो माठ माणुस काम करतो व्यवस्थित ?

चेतन भगतच्या कादंबर्‍या न आवडणार्‍या माणसांचे संमेलन भरले तर मी आवर्जून जाईन.>> +१
छान परिचय अमेय. पाहणार.

पाहिला आणि आवडला.
सुशांतचे काम जमलेय. "रिश्तों का मांझा" गाणं सहीये. खूप वेळ मनात रेंगाळत राहातं.

चेतन भगतची थ्री मिस्टेक्स वाचली होती. दोन मिस्टेक्स कळल्या, तिसरी कोणती ते कळलेच नाही. थ्री मिस्टेक्स फारशी आवडली नसल्याने परत वाचून तिसरी मिस्टेक शोधावेसे वाटले नाही. विषय निघालाच आहे तर कोणी थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ वाचली असेल तर प्लीजजजजजज मला तिसरी मिस्टेक कोणती ते सांगाव..........

चित्रपट खरं तर त्याच्या चिवित्र नावाच्या उत्सुकतेने आणि अमित त्रिवेदी च्या अप्रतिम संगीतामुळे पाहायला जाणार होतो.
कायपो छे -
ह्यात 'कायपो छे' हा ग्रामीण गुजराथी बोली मधला उच्चार आहे......कि कसा ??
कारण हेच गुजराथी मध्ये लिहिताना 'કાપ્યો છે' असं लिहितात.त्याचा मराठीत उच्चाराचा अनुवाद 'काप्यो छे' असा होतो.
मग हे 'कायपो छे' काय ??....मला पाहिल्यापासून हा प्रश्नाचं उत्तर हवंय पण कुणी अस्सल गुजराथी सुद्धा ह्याचं उत्तर देऊ शकला नाही Sad :P.
असो खूप छान लिहिलंय ...उत्सुकता ताणली गेलीय अजून Happy

मस्त लिहिलंय. बघायचा विचार आहे.

'काय पो छे' नाव जरा मजेशीरच वाटतं. एस्टीस्टँडवरल्या कळकट हाटेलातला कळकट चहा प्यायला कळकट टेबलावर बसावं. त्या टेबलावर आजच्या (आणि कदाचित कालच्याही) आतापर्यंत येऊन खाऊन गेलेल्या गिर्‍हाइकांच्या आठवणी दाटून आलेल्या दिसाव्यात. आपण गल्ल्यावरच्या मालकांना 'इथे जरा फडका मारून घ्यायला सांगा' अशी अजीजीनं विनवणी करावी. आणि त्या विनवणीला उत्तर म्हणून एका बाब्यानं येऊन त्याच्यामते ऑलरेडी स्वच्छ असलेल्या त्या टेबलावर 'नक्की कुठे फडका मारून हवाय?' म्हणून प्रश्न विचारला तर तो 'काय पोछे' असू शकतो.

मलाही खूप आवडला सिनेमा.
पवित्र रिश्ता मुळे अज्जिबात म्हणजे अगदीच नाही आवडायचा सुशन्त मानव म्हणून , पण 'झलक दिखलाजा' पासून मत बदलल, उत्क्रुष्ट डान्सर आहे तो!
ती पवित्र रिश्ता इतकी पकाउ आहे कि अमितभ सुध्दा आवडेनासा होइल त्यात काम केल तर !
काय पो चे मधे मस्त काम केलय , त्या रोल ला फिट आहे!
गोविंद चा रोल केलेला अ‍ॅक्टर पण आवडला.
मस्तं जमलाय सिनेमा !

गुजराती लोक कायपो छे म्हणतानाच ऐकलंय. चित्रपटाच्या शीर्षकात काय आणि पो कापून दूर केलेत का?

पतंग उडवताना पतंग कापला तर गुजराती लोक काय पो छे ( मी पतंग कापला) असे ओरडतात.

काय पो छे या नावानेच या विषयावर मायबोलीवरच एक छान लेखही आहे. ( आमच्यासरख्या एक तास झालेल्या आय डी लाही हे ज्ञान आहे.)

" कोणी थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ वाचली असेल तर प्लीजजजजजज मला तिसरी मिस्टेक कोणती ते सांगाव.." > > ते पुस्तक वाचणं हीच तिसरी मिस्टेक Happy

चेतन भगतच्या कादंबर्‍या न आवडणार्‍या माणसांचे संमेलन भरले तर मी आवर्जून जाईन. >> अनेकवेळा अनुमोदन !!

'फाईव्ह पॉईण्ट्स सम्वन' मी कसं बसं २५ पानं वाचलं आणि ठेवून दिलं. आता परत वाचायची इच्छा होत नाही !!

संयत परीक्षण! खूप आवडले.

----------------------------------------------

@अव्या खलिफा,

आत्ताच हाती आलेल्या माहितीवरून -

हा फरक प्रमाण भाषा आणि बोली भाषा ह्यातला फरक आहे. मूळ शब्द 'काप्यो छे' असा आहे, हे मान्य. पण जसं आपण बोलताना 'नाही आहे' असं न बोलताना 'नाहीये' असं म्हणतो, तसं बोली भाषेत 'काय्पो छे' म्हटलं जातं. सौराष्ट्र वगैरे भागात बोलली जाणारी गुजराती भाषा जरा वेगळी आहे. जसं, आपल्याकडे पुण्यात-मुंबईत बोलली जाणारी मराठी, विदर्भातील मराठी, मराठवाड्यातली मराठी... असे अनेक प्रकार आहेत, तसंच काहीसं !!

इन एनी केस 'काय पो छे' असे तीन शब्द नसून, अ‍ॅक्च्युअली दोनच शब्द आहेत - हे मॉरल ऑफ द स्टोरी!

वक्के ....... Happy
आता तूर्तास तरी समाधान झालंय, बरेच शब्द आहेत त्यांचे आव्यो-आयवो, नाख्यू-नायख्यू ......अपभ्रंश च असावा.
धन्यवाद