सदस्य प्रवेश |
गणपती आले रशियाला!!!!!समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम || इथे फोटो पहा- http://picasaweb.google.com/chinya1985 आमच्या होस्टेलमधे आम्ही गेली चार वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहोत. रशियामधील सारातोव्ह नावाच्या शहरात मी पाचव्या वर्षात मेडिकलचे शिक्षण घेत आहे. चार वर्षापुर्वी आम्ही ३-४ जणांनी गणपती बसवला होता. मराठी मुलेही तेंव्हा बोटावर मोजण्याइतकी होती. पण या वर्षी मात्र गणेशोत्सव मोठा करायचाच असे खुप आधीच ठरवले होते. उत्सवाच्या तयारीला सुरुवात सुट्टित भारतात जाण्यापुर्वी म्हणजेच जुनच्या शेवटच्या आठवड्यात झाली होती. भारतातुन काय काय कोणी कोणी आणायचे हे तेंव्हाच ठरवले . दररोज आरती ,प्रसाद ,गणपती अथर्वशीर्षाचे पठण आणि एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचा असे ठरले. इथे भारतीय फार नसल्याने भारतीय वस्तू मिळणारी दुकानेही नाहित त्यामुळे गणेशोत्सवाची जवळपास सर्व खरेदी भारतातुन करावी लागली. आमच्या इथे दक्षिण भारतिय जास्त आणि त्यांचा ओढा जास्त करुन ख्रिश्चन धर्माकडे आहे त्यामुळे त्यांना व इतरांना बोलावण्यासाठी निमंत्रण पत्रिका छापुन आणायचे ठरले. भारतात गेल्यावर सर्वात आधी निमंत्रण पत्रिका छापल्या त्यानंतर सजावटीच्या आणि प्रसादाच्या सामानाची खरेदी केली आणि प्रवासात काय होईल सांगता येत नाही म्हणुन भारतातुन २ मुर्ती आम्ही घेउन आलो. इथे आल्यावर ८-१० जणांनी मिळुन गणपती होस्टेलमधील सभागृहात बसवायचा की एखाद्याच्या खोलीमधे बसवायचा यावर चर्चा झाली .शेवटी रशियन माणसे सभागृहात आपले नियम पाळणार नाहित म्हणुन मोठ्या खोलीत गणपती बसवायचा ठरले. भारतातुन येताना थर्माकॉल आणने शक्य नव्हते त्यामुळे उत्सवाच्या ४-५ दिवस आधी त्याचा शोध घेणे चालु झाले. इथल्या लोकांना थर्माकॉल सजावटीसाठि वापरता येतो हे माहितच नव्हते त्यामुळे तर आणखीनच पंचायत! जिथे थर्माकॉल दिसले ते इतके जाड होते की त्यातुन कुठलीच सजावट शक्य नव्हती. शेवटी टाइल्स , वॉलपेपर्स मिळणार्या दुकानात पातळ थर्माकॉल मिळाले मात्र ते फारच पातळ असल्याने त्यांचा वापरही मर्यादीत करता येणार होता. तिच वेळ चमकी शोधताना आली. जिथे जिथे चमकी सापडे ती कॉस्मेटिक म्हणुन वापरता येणारी किंवा डींकात मिसळलेली होती. शेवटी त्यालाही पर्याय मिळाला. गणरायाला 'विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता' म्हणतात . म्हणजे आधी तोच विघ्न आणतो आणि मग भक्तांच्या प्रार्थनेला साद देउन तोच ती विघ्ने दूर करतो याची आम्हाला प्रचिती आली. पुर्ण होस्टेल १० दिवस गणेशमय झाले पाहिजे असे आम्हाला वाटत होते. खास भारतिल 'लुक' यावा म्हणुन आम्ही भारतातुनच १००० च्या आसपास पताका घेउन आलो होतो. त्या पताका दोर्याला चिकटवायचे काम मात्र इथे करायचे होते. ते केल्यानंतर पाठदुखी हा प्रकार काय असतो हे कळले. खळ वगैरे नसल्याने 'फेविस्टिक्'ने हे काम करावे लागले. त्यानंतर पुर्ण रुम सजावी म्हणुन भारतातुन आणलेल्या पोस्टर्सवर सजावटिचे काम केले. प्रत्येक पोस्टरला ड्रॉइंगपेपरवरती रंगीत क्रेपपेपर लावून त्यावर महिरप करण्यात आला. त्यानंतर गणपती कमळात बसवायचा म्हणुन थर्माकॉलच्या सहाय्याने कमळ बनवले. १३ तारिख आली पण गणपतीचे कोलाज आणि ओंकारस्वरुप गणपती बनवण्याचे कामही सुरु झाले नव्हते. कोलाजसाठी लागणारे फोटो तर इंटरनेटवरुन मिळाले होते मात्र आमच्यापैकी कुणाकडेही प्रिंटर नसल्याने त्यालाही सुरुवात झालेली नव्हती. मोठा ओंकारस्वरुप गणपती (म्हणजे ६-७ थर्माकॉल शीट्स) बनवण्यास आधी तो मोठ्या ५-६ ड्रॉइंगपेपरवर काढण्यात आला ,मग थर्माकॉलवर ट्रेस करुन ,तिथे काढून तो कापण्यात आला व नंतर रंगवण्यात आला. त्यासाठी २ दिवस एक मित्र ८-८ तास गुडघ्यावर बसुन काम करत होता. कोलाज बनवताना अजुन एक विघ्न आले-प्रिंटरची व्यवस्था झाली पण तो रंगित नव्हता . अजुन एक विघ्न म्हणजे गणेशोत्सवाच्या ३ दिवस आधी मी आजारी पडलो पण त्यावेळी काम इतके राहिले होते की झोपायलाही पुरेसा वेळ मिळत नसे शिवाय दिवसा कॉलेजला जाणे अत्यावश्यक होते. पण गणरायाच्या कृपेने दरवेळी ७-८ दिवस राहणारे दुखणे २-३ दिवसातच संपले. जास्तित जास्त लोकांना येता यावे म्हणुन पुर्ण रुम रीकामी करण्यात आली . १४-१५ तारखेला तर श्वास घेण्यासही वेळ नव्हता .सर्व सजावट या दिवशी करण्यात आली तसेच होस्टेलच्या पुर्ण कॉरीडॉरला पताका लावण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. १५ तारखेला प्रसादासाठी १३० च्या आसपास मोदक व शिरा करण्यात आला. पहिल्या दिवशी जवळजवळ १०० लोकांनी दर्शन घेतले. गर्दी होईल हे माहित होते मात्र इतका प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आमचे कॉलेज सकाळीच असल्याने पहाटेच उठुन स्नान करुन पुजा करावी लागत असे. गणेशोत्सवाच्या तयारीमुळे रात्री २-३ वाजता झोपुन परत ३-४ तासांनी उठावे लागत असे. दिवसभर कॉलेज असल्याने दिवसा झोपणे शक्य नव्हते. परत आल्यावर पुजेची तयारी ,प्रसाद बनवणे यामुळे क्षणभर उसंत मिळत नसे. गणेशोत्सवाच्या आधी सजावटीत वेळ गेल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरु झाली नव्हती. त्यामुळे त्या तयारीसाठी वेळ द्यावा लागत होता. १६ तारखेला बेसनाचे लाडु हा प्रसाद होता . जवळजवळ ५० मुळे पुजेसाठी आले होते. ३ आरत्या , घालिन लोटांगण, मंत्रपुष्पांजली यात सर्वजण रममाण होत. त्यानंतर गणपतीबाप्पा मोरया च्या गजरात सर्व जण उत्साहात येत. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष पठण होत असे. त्या दिवशी हरे कृष्ण म्हणजेच इस्कॉनच्या भक्तांनी येउन किर्तन केले. अनेक जण भारतिय असुनही किर्तनाला प्रथमच आले होते. जवळपास १ तास चाललेल्या किर्तनात सर्वजण इतके रममाण झाले की झाले वेळेचेही भान राहिले नाही. सर्व रुम जणुकाही वैकुंठात परिवर्तित झाली होती. बर्याच भारतियांना असा अनुभव प्रथमच आला होता. भगवानांच्या नामातली गोडी अनेकांना जन्मानुजन्माच्या प्रतिक्षेनंतर अनुभवण्यास मिळाली. १७ तारखेला नारळाच्या वड्या हा प्रसाद आणि गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ असा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यानंतर २ दिवस अष्टविनायक दर्शन आणि हलवा,खीर असा प्रसाद होता. ६व्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम होता. मोठ्या उत्साहात 'अष्टविनायका तुझा महिमा','प्रथम तुला वंदितो',आणि हिंदी 'मोरया' ही गाणी विद्यार्थ्यांनी म्हटली. प्रसादासाठी बासुंदी होती. त्यानंतरच्या २ दिवशी प्रजापती ब्रह्मकुमारीच्या येथील प्रतिनिधींनी ध्यानाचा कार्यक्रम घेतला,एका रशियनने भारतिय शास्त्रिय संगीताचा कार्यक्रम घेतला.खिरापत व राजगीर्याचा शीरा असा प्रसाद दाखवण्यात आला. ९व्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा इस्कॉनच्या भक्तांनी किर्तन घेतले. जवळजवळ २ तासांच्या किर्तनाला पहिल्यापेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्या भक्तांनीही सर्वांसाठी प्रसाद बनवुन आणला होता. आम्ही भोपळ्याचा शीरा हा प्रसाद केला होता. १०व्या दिवशी विद्यालयाची डीन ,इतर शिक्षक,तसेच येथील टी.व्ही.चे पत्रकार येणार असल्याने खास कार्यक्रम ठेवण्यात आला. प्रसादासाठी गुलाबजाम्,नारळाचे लाडु तसेच दक्षिण भारतिय पध्दतीचा चण्याचा प्रसाद बनवण्यात आला. सांस्कृतीक कार्यक्रमात गणेश व गणेशोत्सवाची माहिती, 'तु वेडा कुंभार्','चिक मोत्याची माळ' ,'मोरया' या गीतांचे गायन तसेच 'राधा कैसे ना जले ' वर नृत्य तर गणेशजन्मावर एक छोटस नाटक बसवण्यात आल होत. पुर्ण गणेशोत्सवादरम्यान अनेक रशियन पाहुण्यांनी भेट दिली आणि आम्ही केलेल्या सजावटीला दाद दिली. अनेकांचा विश्वासच बसत नव्हता की रशियात अशा प्रकारचा सोहळा आणि सजावट होऊ शकते. गणपती असा का हा तर प्रत्येकाचा आवडता प्रश्न होता. मला नाही वाटत की आम्ही दिलेला प्रसाद कोणी रशियन विसरु शकेल. विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण होस्टेलला प्रत्येक रुममधे जाउन प्रसाद देण्याचे ठरले होते. ३००हुन जास्त मोदक,शीरा आणि मसाला दुध बनवण्यात आले होते. पुजा झाल्यावर आणि अथर्वशीर्षाची २१ आवर्तने झाल्यावर नाचत ,गात आणि 'गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या'च्या नार्यांनी सर्व होस्टेलचा परिसर दुमदुमुन गेला. संध्याकाळी ७ नंतर व्होल्गा नदीवर ५० च्या आसपास भारतिय पोषाख घातलेल्या विद्यार्थ्यांनी गणपती विसर्जन केले नंतर पुर्ण होस्टेलला प्रसाद देण्यात आला. हा सर्व सोहळा आम्ही ठरवलेल्या सोहळ्यापेक्षा कितीतरी पटीनी चांगला झाला होता. बहुतेक पहिल्यांदाच आमच्या होस्टेलमधील मराठी माणसे एकत्र आली होती. अनेक अडचणी येऊनही उत्सव व्यवस्थित पार पडला. हा सर्व उत्सव यशस्वी बनवण्यात अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावला, आळस न करता पडेल ते काम वाटेल त्या वेळी पुर्ण केले. विसर्जनानंतर सर्वजणांनी एकत्र येउन भोजन केले.सर्व जण आनंदी आणि समाधानी होते. आत्तापर्यंत अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा केला पण हा गणेशोत्सव संपुर्ण आयुष्यात विसरणे शक्य होणार नाही. कुठलेही काम करताना होणारा आनंद त्याच्या पुर्तीनंतर होणार्या आनंदापेक्षा कितीतरी मोठा असतो असे ऐकले होते, वाचले होते पण यावेळी त्याची प्रतिची आली. पण कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड झाला की दुग्धशर्करा योग होतो. आमच्यासाठी हा तसाच योग होता.१५ दिवस पुर्ण भारावुन जाउन काम चालू होते. फक्त एकच विचार मनात येत असे तो म्हणजे गणपती!!परवा विसर्जन झाले आहे पण काल आणि आजचा दिवस संपता संपत नाही आहे. काहीतरी महत्त्वाचे जणुकाही हरवले आहे. मन भरुन येते,कंठ दाटून येतो. ज्या रुममधे गणपती होता ती रुम पुर्वीसारखी केली आहे.आता तिथे पाय ठेववत नाही. पहाटेच जाग येते ,जातायेता पाय त्या रुमकडे वळतात. काल रात्रीच होस्टेलमधल्या पताका काढल्या. पुर्ण कॉरिडॉर भकास दिसत आहे. असे क्षण मोजकेच असतात हवे तेंव्हा ते येत नाहित आणि गेल्यानंतर आठवणीने नकळत डोळ्यात पाणी आणतात. बहुतेक यालाच जीवन म्हणतात. -चिन्मय कुलकर्णी
गुरु., 09/27/2007 - 13:16 chinya1985
|
चिन्या सही. अमेरिका आता दुसरा भारत झाला आहे त्यामुळे इथे गणेशोत्सव करने सोपे. पण रशीयातही! सही.
धन्यवाद केदार!!!!इथे भारतिय जास्त करुन युनिव्हर्सिटितच भेटतात. इथे गणेशोत्सव काय काहिहि भारतिय करण अवघड आहे. इथल्या लोकांन भारताबद्दल फार कमी माहिति आहे.
इथे स्पर्धा चालु आहे का?? तिथे कुणालाही एंट्री करता येते का??कशी करायची???
वा! किती कष्ट घेऊन बसवलात गणपती! तुमच्या प्रचंड उत्साहाला दाद! गणपतीची मूर्ती आणि सजावट एकदम प्रसन्न आहे आणि लिहिलंय पण सुरेख. पण गणपतीला 'विघ्नकर्ता' मात्र म्हणत नाहीत हं, गणपती म्हणजे फक्त सुखकर्ता आणि दु:खहर्ता / विघ्नहर्ताच.
चिन्म्य,
तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. मी सगळे फोटो बघीतले, सजावट, खुपच छान. एवढा सगळ्यांसाठी प्रसाद हे सगळे तुम्ही एवढ्या प्रतिकुल परिस्थीतीत केलेत त्याबद्दल अभिनंदन. ईथे अमेरीकेत सुद्धा सगळे असुन्ही वेळेअभावी महाराष्ट्र मंडळात फक्त १ दिवसाचाच सार्वजनिक गणपती बसवतात. त्यामुळे रशिया मध्ये १० दिवस सगळे साग्रसंगीत केलेत हे नक्कीच खुप कौतुकास्पद आहे.
छान वाटले वाचून. काही गोष्टी उपलब्ध नसताना एवढे सगळे केलेत म्हणजे कौतुक करावे तेवढे थोडे आहे!
फोटोची लिन्क जरा नीट दिसेल अशी दे. रुनी ने लिहिले म्हणून मी शोधली.
-लालू
खरंच दाद देण्यासारखी कामगिरी आहे ही..रशियामध्ये १० दिवस साग्रसंगीत गणेशोत्सवाचा सोहळा!!! खूपच अप्रूप आणि अभिमान वाटला मला तुम्हा सर्वांचा
चिन्या,
रशियासाऱख्या देशात तुम्ही इतक्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केलात हे वाचुन खूपच छान वाटले..
आण खूप अभिमानही वाटला की तिथे जाऊनही आपली परंपरा जपली जातेय.. आणि परदेशातल्या लोकांनाही
त्याची ओळख होतेय.... तुझे खास अभिनन्दन रे...
चिन्या मस्त रे.

विद्यार्थी दशेत पण तुम्ही इतके छान काम केलत.
मला व्यक्तीशः तु आणि त्या कामात जितक्या लोकानी झटुन भाग घेतला त्यांचा अभिमान वाटतोय.
चिन्मय
तुम्हा सर्वांचं कौतुक करावं तेव्हढं थोडं आहे. प्रतिकूल परिस्थितीत, तुटपुंज्या सामग्रीत अन विद्यार्थी दशेतल्या आर्थिक अडचणींवर मात करून तुम्ही हा इतका छान सोहळा केलात. खरंच धन्य आहे तुमची!
फुलपाखरू कोषातून बाहेर येताना जी धडपड करतं त्यानेच त्याच्या पंखांना बळ येत म्हणतात. तुमचे प्रयत्न सुद्धा तसेच ठरोत अन तुमच्या सर्वांच्या पंखांमधे बळ येवो.
"पुढच्या वर्षी लवकर या"
चिन्या तुमचे आणि तुमच्या सहकार्यांचे हार्दिक अभिनंदन!
फारच कौतुकास्पद आहे हे. आपली परंपरा जपणे, त्यात इतरानाही सहभागी करून घेणे आणि तेही college वगैरे सांभाळून म्हणजे सोपे काम नाही.
साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा केल्यावर रशियात येऊन गणाधीषही खूप खूष झाले असतील.
अतिशय कौतुकस्पद आहे रशिया मधे इतका निगुतिने गणेशोत्सव साजरा केलात हे.
धन्यवाद चाफा!!!आम्हा सर्वांनाही विश्वास बसत नाही आहे की इतक्या सगळ्यांनी इतक्या उत्साहाने एकत्र येऊन काम केले आहे.
गणेशाला विघ्नेश म्हणतात म्हणजे तो विघ्नांचा देव आहे. तोच विघ्न आणतो आणि तोच काढतो असा याचा अर्थ होतो. याबद्दल सर्च केल्यावर पुढील माहिती विकिपिडिआ वर मिळाली-
He is the Lord of Obstacles both of a material and spiritual order.[106] He can place obstacles in the path of those who need to be checked, and can remove blockages just as easily. The Sanskrit terms vighnakartā ("obstacle-creator") and vighnahartā ("obstacle-destroyer") summarize the dual roles. [107] Both functions are vital to his character, as Robert Brown explains:
Even after the Purāṇic Gaṇeśa is well-defined, in art Gaṇeśa remained predominantly important for his dual role as creator and remover of obstacles, thus having both a negative and a positive aspect.[108]
Paul Courtright says that:
Gaṇeśa is also called Vighneśvara or Vighnarāja, the Lord of Obstacles. His task in the divine scheme of things, his dharma, is to place and remove obstacles. It is his particular territory, the reason for his creation.[109]
धन्यवाद रुनी!!!!
४ वर्षापुर्वी जो गणेशोत्सव साजरा केला होता तेंव्हाच एक स्वप्न मनात बाळगले होते की एकदातरी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करायचा. या वर्षी ते स्वप्न पुर्ण झाले. आत्ताच शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने सगळ्यांना अभ्यासाचे टेन्शन नव्हते तसेच भारतातुन आल्यावर तयारीसाठी १५ दिवस मिळाले त्यामुळे हे शक्य झाले. पहिल्या वर्षापासुन १० दिवसांचा गणपती ठेवल्याने किती दिवस गणपती ठेवायचा हा प्रश्नच नव्हता. पुढच्या वर्षी याहुन मोठा गणेशोत्सव करायचा असे सर्वांनी ठरवले आहे.बघु काय होते ते.
धन्यवाद लालु!!इथल्या सजावटीच्या गोष्टी वापरल्या असत्या तर ते ख्रिसमस सजावटीप्रमाणेच दिसले असते म्हणुन भारतातुनच खास सजावटीचे सामान आणायचा प्रयत्न केला. तुमच्या सांगण्याप्रमाणे फोटोची लिंक दिली आहे. आता ठिक आहे का??
धन्यवाद रविशा!!!
सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी माणसाने एकत्र येउन काम केले. तरिही सर्वांचा सहभाग नव्हता पण ते तर नॉरमल आहे मराठी लोकांसाठी.
धन्यवाद मयुरेश!!!
आमच्या इथे ३० हुन जास्त रशियन येऊन गेले व सर्वांसाठि हे अविस्मरणिय होते. प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालयातिल पाहुण्यांना तर तिथे त्यांचे गुरु आले आहेत असे वाटले.
धन्यवाद झकासराव!!!
आधी लेख लिहिताना ज्यांनी चांगले काम केले आहे त्यांची नावे लिहावी असे वाटले मात्र नंतर नावेच जास्त झाली असती म्हणुन कुणाचेच नाव लिहिले नाही.अनेकांनी मनापासुन काम केले.
धन्यवाद शोनू!!!
फुलपाखरेच्या उदाहरणासाठी परत एकदा आभार्!!आमच्यापैकी सगळे विद्यार्थी असल्याने कोणीच कमवत नाही. आर्थिक सपोर्टसाठि आमच्या पालकांना श्रेय द्यायला हवे.
धन्यवाद झेलम!!!
रशियात येउन गणाधीश नक्किच खुश झाले असतिल. प्रत्येक देशात ,प्रत्येक शहरात गणपती बाप्पा मोरया चा जयघोष झाला पाहिजे.
धन्यवाद हवा हवाइ!!
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या सहकार्यांना कळवेल. त्यांचा आनंद द्विगुणित होईल.
मस्त रे.... पुढच्या वर्षी देखील असाच साजरा करा
पताका वैगेरे म्हणजे चागलेच जोरदार प्लानिग केले होते की 
धन्यवाद माणुस!!!
उत्सव भारतिय दिसला पाहिजे अशी काळजी घ्यायची होती म्हणुन पताका वगैरे आणल्या होत्या. शिवाय आमचे सांस्कृतिक कार्यक्रमही गणपती किंवा देवाशी संबंधीतच होते.
मस्तच रे! एक तर छान साजरा केलात आणि ते इथे सान्गितलेत हे बरे केले!
आयला, आपण तिथ असायला हवे होतो प्रत्यक्ष अनुभवयला अस सारख वाटतय!
गणपती बाप्पा मोरया!
चिन्मय, तुमचं आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप कौतुक वाटलं. तुमचा उत्साह आणि विघ्नहर्त्याची कृपा यामुळेच ते शक्य झालं! अभिनंदन! इथे शेअर केल्याबद्दल खास आभार.
चिन्मय खरच, कवतुक करायला शब्दहि कमि आहेत. सगळ चित्र डोळ्यापुडे उभ राहतय... तुमच्या सरख्यांमुळेच भारत मातेचि मान गर्वाने उंच होते..... यु आर ग्रेट.
धन्यवाद लिंबुटिंबु!!!
खुपच मजा आली या वर्षी गणेशोत्सवात. आम्हाला सगळ्यांना विसर्जनानंतरचे २-३ दिवस करमत नव्हत.
धन्यवाद पसज!!!
विघ्नहर्त्याच्या कृपेनेच हे शक्य होऊ शकल. सर्वजण एकत्र आले हे माझ्यादृष्टीने सर्वात महत्वाचे आहे.
इथे इंग्रजी शब्द कसे टाकायचे??? <> मधे लिहिल तरी मराठिच येतय कि.
धन्यवाद शामली!!!
ग्रेट वगैरे काही नाही. त्यात काय मोठ केल आहे???जे सगळ्यांनी करायला हव तेच केलय आम्ही.
Ctrl + \ ने बदला
अरे ही सुचना लक्षात घे रे
आलं लक्षात्.आभार
चिनु मला खरंच अभिमान वाटला. दुनियाभरचे लोक आपल्या देशात येतात त्यांची संस्कॄती ठेउन जातात. मग ख्रिसमसच्या रात्री ईथे धिंगाणा घालणारे तरुण सापडतात. त्यांना भारतात राहुन गणपतीचे आकर्षण फक्त बाजुच्या गल्लीला खुन्नस देणे आणि डी.जे. चा धुडगुस घालणे ईतकेच असते ( बरेच विषयांतर झाले पण हे पोस्ट वाचताना या सगळ्या भावना उफाळुन आल्या दोस्त ) त्यामुळे तुम्ही मंडळींनी केलेल्या गणेशोत्सवाची सगळी माहीती, तुमचे कष्ट, सगळॅ वाचताना सगळ्यात जास्त वाटला तो आभिमान! रशिया सारख्या देशात राहुन तुम्ही केलेल्या या उपक्रमाबद्दल तुम्हा सर्व मंडळीं ना सलाम.
धन्यवाद चाफा!!!
माझ्याही भावना काहिशा अशाच आहेत्.रशियन लोकांनी केलेल्या किर्तनानंतर जो transcendental अनुभव मुलांना आला त्यानंतर बर्याच जणांना कमीपणा वाटला की आपण भारतिय असुन्,तिथेच जन्मुन ,तिथेच राहुनही कधी किर्तनातली गोडी अनुभवली नाही आणि या लोकांनी इथे राहुन त्यात इतकी प्रगती केली.आम्ही गणेशोत्सवातील कार्यक्रमांमधे सर्व कार्यक्रम गणपती किंवा देवाशी संबंधीत असेच ठेवले होते.
ज्या श्रद्धेने तुम्ही गणेशोत्सव साजरा केला हे खुप कौतुकास्पद आहे. नाहीतर भारतात सुद्धा बर्याच ठिकाणी गणेत्सोवाचे संयोजक पैसे मिळवणे आणि दारू पिणे हेच करतात. पहील्या दिवशी गणपतीची गाणी सोडली तर नंतर नको त्या गाण्यांचा गोंगाट असतो.
गणेशोत्सवाचे पावित्र्य तुम्ही सांभळले हे खुप भावले. सजावट तर फारच छान!
अभिनंदन!!!
धन्यवाद्!!!!गणेशोत्सवाच पावित्र्य राखायचच हा आमचा पहिला नियम होता. मग गणेशोत्सव थोडा छोटा झाला तरी चालेल. आम्ही जर नियम सैल केले असते तर काही जणांनी भारतासारखच दारु वगैरे पिऊन नाचण वगैरे केल असत . पण ते आम्ही होऊ दिल नाही. शिवाय सर्व सांस्कृतीक कार्यक्रम देवाशी संबंधीतच होते. कुठेही थिल्लरपणा होणार नाही याची काळजी घेतली. आम्ही सर्वांकडुन देणग्या पण घेतल्या नाहीत . जे आयोजक होते त्या १२-१३ जणांनीच सर्व खर्च केला.