हातावरील रेषा जावे बघून मागे..

Submitted by रसप on 3 February, 2013 - 23:38

हातावरील रेषा जावे बघून मागे
वेचून राहिलेले यावे फिरून मागे

अर्धा तुझा भरावा पेला म्हणून आलो
पाहून धुंद तुजला फिरलो तिथून मागे

दु:खांस अडविण्याला मी लावली कवाडे
फिरली सुखेच सारी दारावरून मागे

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?

माझी मलाच 'जीतू' सोबत न राहिली रे !
माझीच सावली बघ.. हसते बघून मागे

....रसप....
३ फेब्रुवारी २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/02/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिरली सुखेच सारी दारावरून मागे>>> मस्त मिसरा!

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?>>> अ‍ॅटीट्यूड आवडला

साधर्म्य असलेला एक माझा शेर सहज आठवला

कधी भेटलो शेवटी, याद नाही
कशाला जुने पाठ घोकायचे मी

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?

माझी मलाच 'जीतू' सोबत न राहिली रे !
माझीच सावली बघ.. हसते बघून मागे<<<

मस्त शेर

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?

शेर छान आहे.
दुसरी ओळ जास्त आवडली.
खरेतर पहिल्या ओळीमुळे शेर मर्यादित झाला.

माझी कुणास बहुधा येतेय आठवण ती.....
काहून मी तरीही पाहू वळून मागे ???

असा केला तर रे ................?

चू भू दे घे ............... Happy

@वैवकु...

'समीर' ह्यांचे बोलणे पटते.. म्हणून व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने तसा विचार केला.

-----------------------

@उमेश भाऊ..

काय म्हणताय ? टोटल लागली नाही ! Sad

उमेश भाऊ "नितू" बद्दल बोलताय्त

मी तिच्या नव्या रचनेवर इथे माबोवर प्रतिसाद दिलाय तो वाचला आसेल त्यांनी Happy

Happy लोक वैवकु ला म्हणूनच सर म्हणायला लागलेत.
दु:खांस अडविण्याला मी लावली कवाडे
फिरली सुखेच सारी दारावरून मागे>>>>
ये ब्बात..एकदम राजेंद्र कृष्ण.....

गझल मस्त झाली आहे..

दु:खांस अडविण्याला मी लावली कवाडे
फिरली सुखेच सारी दारावरून मागे
चांगला शेर...

आता तुला न माझी येईल आठवणही
मीही कशास आता पाहू वळून मागे ?

सुरेख..

मक्त्यातील 'रे' भरीचा वाटला...