बोरं पुराण.

Submitted by सुलेखा on 31 January, 2013 - 02:49

boranchee patadee..JPG
बोरं नांव उच्चारल्यावर आंबट-चिंबट बोरं अगदी सहज डोळ्यासमोर येतात .शाळेच्या बाहेर बोरं,विलायती इमली,हिरव्या कंच चिंचा ,खिरण्या,करवंद असा रानमेवा विकणारे दादा-मावशी आठवायला लागतात."पॉकेटमनी"मिळत नसल्याने कधी विकत घेतले नाही.पण वडिल या हंगामी चीजा आणायचे त्यामुळे भरपूर आस्वाद घेतला.चिंचा,शेतूत,पेरु ,सीताफळ आणि रामफळाचे झाड आमच्या अंगणातच होते.मोठ्या टपोर्‍या जांभळाचे झाड जवळच्या घरात होते.लहान गाव असल्याने बोरं ,करवंद,खिरण्या ,बालम काकडी,चिबुड हा रानमेवा मुबलक मिळायचा.
बोराचे मुळ स्थान भारत आहे.प्राचीन काळी रामराज्याच्या काळातही बोरे लोकांना माहीत होती.बोराच्या झाडाची लागवड चीन,आफ्रिका,श्रीलंका,ऑस्ट्रेलिया देशातही होते.बोराचे झाड नैसर्गिकरीत्या उगवते तसेच कलम करुन बागाही केल्या जातात.कलम केलेल्या बोराच्या झाडाची उंची,घेर,पाने,फळे यात बराच फरक आढळतो.थंडीच्या ऋतुत बोरांचा हंगाम सुरु होतो.बोराचे झाड काटेरी तसेच बिनकाटेरीही असते.बोराची फुले हिरवीपिवळी,तुर्‍या‍सारखी झुबकेदार,अप्रिय वासाची असतात.साधारण बोराच्या तीन प्रमुख जाती असतात. मोठ्या हरभर्‍याच्या एवढे चणीबोर /चणीमणी बोर,मध्यम आकाराचे आंबटगोड चवीचे कोलबोर आणि मोठ्या आकाराचे गोड चवीचे सौवीरबोर.याशिवाय प्रदेशागणिक काशीबोर,अजमेरी बोर,राजबोर,सुरती बोर,अमदाबादी बोर,भावनगरी बोरं,मेहरुण बोर,जळगाव बोर अशा अनेक नांवाने प्रख्यात आहेत.यापैकी सुरत जवळच्या रांदेर आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात जी बोरं होतात त्यांना "सुरती बोरं "असे म्हणतात.ही बोरं सुकल्यावर अधिक स्वादिष्ट लागतात.सुकलेली बोरं मुंबई,गुजरात सह भारताच्या इतर शहरात बरीच खपतात.बोराच्या बगिच्यातुन चांगले उत्पन्न मिळते. बोराची फुले आणि पाने यांचा रंगकामात उपयोग केला जातो. ही पाने रेशमाच्या किड्यांना खाऊ घालतात.तसेच गुरांना औषधी म्हणुन खाऊ घालतात. त्यामुळे गुजरात मध्ये कलमी बोरांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. बोराच्या झाडाच्या सालीत पुष्कळ प्रमाणात टॅनिन अ‍ॅसिड असते.बिया,पाने व साल औषधासाठी वापरतात.
पिकलेली बोरं मधुर,आंबट,उष्ण,पाचक,कफकारक आणि रुचकर असतात.अतिसार आणि रक्तदोष दूर करतात.पित्त-वायु नाशक,मलावरोध दूर करणारी आहेत.आयुर्वेदानुसार आणखी बर्‍याच विकारांवर बोराची पाने फळे,साल आणि मूळ वापरतात.चणीबोरे कुटुन त्याचे बोरकुट करतात.या बोरकुटात थोडेसे तिखट-मीठ मिसळुन खाल्ले तर मस्त चव येते.
गुजरात,म.प्र.राजस्थान मधे बोरांचा स्वयंपाकघरात घरगुती वापर केला जातो.आंबटगोड चवीची बोरं पाण्यात स्वच्छ धुवुन मीठ लावुन उन्हात वाळवतात .यापासुन बोरदाल बनवतात. कसुरी मेथी किंवा हिरवी मेथी नेहमीच्या फोडणीत घालुन तूर [किंवा तूर+ मूग ]डाळ करतात त्यात ही सुकलेली बोरं आंबटपणासाठी घालतात.ही दाल चांगली उकळली कि बोरं फुलतात्.दाल ला एक छान वेगळीच चव येते.तसेच ही आंबटगोड बोरं धुवुन ती ओली असतानाच त्यावर अंदाजे साधे मीठ,काळें मीठ,जिरेपुड -मिरेपुड व पिठीसाखर पसरुन रुंद तोंडाच्या बाटलीत भरुन ५-६ दिवस उन्हात ठेवायचे.साखरेचा पाक तयार होवुन त्यात ही बोरं मुरतात व अप्रतिम चव येते.फ्रीज मधे बाटली ठेवल्यास बोर ओलसर रहातात.जेव्हा तापामुळे डोकेदुखीमुळे जेव्हा तोंडात अरुचि निर्माण होते तेव्हा या बोराने उत्तम चव येते.
हे बोराचे पुराण लोणच्याशिवाय "अधुरे" आहे. बोरं छान धुवुन पुसुन घ्यायची.सुरीने एक लहान चिर देवुन थोडे मीठ लावुन ठेवायची.हे लोणचे बिनातेलाचे आहे ,पाण्यात करायचे आहे.तेल फक्त २ चमचे मोहोरी,हिंग,मेथीदाणा परतुन घेण्यापुरते वापरायचे आहे.- त्याची बारीक पुड करुन घ्यायची ..आता मोहोरीची डाळ फक्त एकदाच मिक्सरमधे फिरवुन बारीक करायची.त्यात हळद, तिखट,मीठ,बडीशोप,वाटलेली हिंग-मेथी आणि एक ग्लासभर उकळुन थंड केलेले पाणी घालायचे..हँड मिक्सर किंवा मोठ्या चमच्याने [डाव]हे मिश्रण छान हलके होईपर्यंत फेटायचे .त्यात मीठ लावलेली बोरं मिसळुन २ ते ३ दिवस एका पातेल्यात्च झाकुन ठेवायची दररोज एकदा सर्व मिश्रण ढवळायचे.आता मुरल्यामुळे लोणच्याचे आकारमान कमी झालेले दिसेल .हे लोणचे बाटलीत भरुन ठेवावे.फ्रीज बाहेरही छान टिकते.चवीत बदल म्हणुन हे लोणचे छान लागते.अर्थात बोरं आणि बोरांचा सुवास आवडत असेल तरच हे सांगणे नलगे.
borache lonache--1.JPGberrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr achaaaaaaaaaar.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलंय.
या बोर पुराणात खानदेश स्पेशल पाकातली बोरांचा उल्लेख मस्ट. अमेझिंग प्रकार आहे. तिकडच्या कोणीतरी लिहा रे. हॉस्टेलवर खूप वेळा खायला मिळायची, आता कुठे विकत मिळतात का शोधायला हवे.

अरे वा ! बोराचे खुप प्रकार !
नागपुरला बोरकूट फार प्रिय. आणि ती सुकवलेली बोरे मला प्रिय. फोटोत दाखवली आहेत तशी सर्व पिकलेली न घेता, मला हिरवी पिवळी जास्त आवडतात.

बोराच्या बाबतीत तरी फार हळहळण्यासारखी परिस्थिती नाही. कारण ओमान, केनया, नायजेरिया, अंगोला
सर्वच देशात बोराची झाडे आहेत, आणि मला ती मनसोक्त खाता आली.