बाफों की रानी, धागों का राजा

Submitted by एक प्रतिसादक on 30 January, 2013 - 02:50

( डिसक्लेमर : या लेखातील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. वास्तवाशी त्याचा कुठलाही संबंध नाही. यातल्या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यास तो योगायोग समजावा. मात्र कुणी स्वतःवर ओढून घ्यायचंच ठरवल्यास लेखक त्याला जबाबदार नाही)

मार्कंडेयाचं आज पुन्हा बायकोशी भांडण झालं. नेहमीचंच होतं. कामावरून आला कि चहा न सांगता मिळाला पाहीजे हे हजारदा सांगूनही आज काही त्याला चहा मिळाला नव्हता. एक तर कामाचा ताण, उपरसे बॉससे परेशान त्यामुळं भडास काढायला निमित्त हवंच होतं. ते मिळून गेलं. चहावरून त्याने बोलायला सुरूवात केली खरी, पण आज बायकोही ऐकून घेत नव्हती. आताच कुठूनसं तिला करीयर करता न आल्याचं दु:खं आठवून वादास सुरूवात झाली.

गजलक्ष्मी एक यशस्वी गृहीणी. गृहीणी असण्यात खूष असणारी. मनासारखा पहिला मुलगा झाल्याने कोडकौतुक भलतेच केलेले. आता पोरगं ऐकत नाही, जेवत नाही आणि अभ्यासही करत नाही म्हणून नव-याचे बोल ऐकायला मिळत असल्यानं उठता बसता मुलाला धपाटे घालायला सुरूवात केलीय.

झुणझुणबाला ही एक यशस्वी उद्योजिका. स्वतःच्या पायांवर उभी असल्याने तडजोड मान्य नसणारी. तिचा स्वतःबद्दलचा अभिमान कधी दुराभिमानाकडे झुकला हे तिचं तिलाही कळालेलं नाही. स्पष्टवक्तेपणा कधी फटकळपणात रूपांतरीत झाला हे ही कळालं नाही. हल्ली बरेच लोक टाळू लागलेत हे जाणवत असल्याने चिडचिड होऊ लागलीय. घरात, बाहेर सर्वत्र चिडचिड वाढलीय. त्याचा परिणाम म्हणून कुणी काही बोलायला आलं कि अपमानास्पद बोलून समोरच्याला दुखावून स्वतःचे प्रॉब्लेम्स आणखीन वाढवून घेणारी. कारण त्या परत्येक कृतीची बोच मनाला लागतेय हेच तिच्या लक्षात येत नाही.

भणभण गणगे उपेक्षित तरूण. दुर्गम भागातून आलेला. आत्मविश्वास कमी असल्याने बोलायला चाचरणारा. मत द्यायला घाबरणारा. अबोलसा युवक.

झंपकराव हे मिस्कील व्यक्तीमत्व. कधीच गंभीर न झालेला हा इसम कधीही दु:खी झालेला नाही. कुठल्याही गोष्टीत हसण्याचं मटेरियल शोधायची सवय असल्याने हल्ली टवाळ म्हणून कुचेष्टा सुरू झालेली. त्यामुळे नाही म्हटलं तरी अस्वस्थ.

हे वेगवेगळ्या गावात राहणारे, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक. तसं यांच्यात कसलंच नातं नाही. कुणीच कुणाला ओळखतही नाई. एकमेकांच्या सुखदु:खाशी कसलंही घेणंदेणं नसणारे, प्रेम नसणारे हे लोक. एक समान धागा आहे. हे सर्व मराठी बोलतात. हो आणि अजाणतेपणी ते एकमेकांशी जोडले गेलेत. एका सोशल नेटवर्किंग साईटवर. विरंगुळा म्हणून शिरलेले आणि आता एक महत्वाचा भाग झालेले.

मार्कंडेयाचा आयडी आहे ड्रीम लव्हर. कुठला तरी बाफ आलाय पहिल्या पानावर. विषय आहे बायकोला समान दर्जा देऊ करण्याचा. मार्कंडेयाची उत्सुकता वाढते. आपले अनुभव लिहायची खुमखुमी आलेली असते. त्याला तसंही कुणी ओळखत नसतं. पण प्रतिसाद वाचताक्षणी आदर्श वागणूक काय असावी याचा बोध त्याला होतो. आता काय लिहीलेलं बरं दिसेल याचा विचार करून एक प्रगल्भ पोस्ट त्याच्या बोटांतून उतरते. बाफचा तो किंग बनून जातो. अनेक +१ आणि अनुमोदनं मिळाल्यावर एका समाधानाने तो झोपायला जातो. या खेळात आता तो पारंगत झालाय.

विश्वशांती या नावाने गजलक्ष्मीने मुलांचा सांभाळ या विषयावर लिहीताना त्यांना मारहाण करू नये असा सल्ला दिलाय. मुलांकडे लक्ष पुरवणं ही पालकांची जबाबदारी आहे, नवरा लक्ष देत नसेल तर त्याला ठामपणे दिवसातून मुलांसाठी वेळ काढायला लावण्यासाठी काही टीप्सपण तिने दिल्यात..

झुणझुणबालाच्या पोस्टस नात्यांमधला गहीरेपणा आणि गुंतागुंत स्पष्ट करताहेत. एखाद्या समुपदेशकालाही उपयोग होईल असं तिचं लिखाण आहे.

भणभण भणगे ने स्पष्टवक्ता या नावाने ग्रामीण भागातून येऊनही शहरी लोकांची मने जिंकणा-या पोस्टस लिहील्यात. ही नवी संस्कृती किती चटकन आत्मसात केलीय हे त्याच्या पोस्टमधून समोर येतंय. शुद्ध भाषेच्या महत्वाबद्दल त्याने जे काही लिहीलंय ते प्रत्येकाने डाऊनलोड केलंय..

तरीही कुणीच समाधानी नाही !

वापरायचं नाव जरी काहीही असलं तरी प्रोफाईलला ओळख खरी दिलेली आहे. हल्ली हल्ली एखाद दुसरं गटगही झालंय. प्रत्येकाने आपली इमेज छान सांभाळलेली आहे. पण व्यक्त होण्याचं काय ? काहीतरी आतच राहून जातंय..

आणि त्यांना उपाय सापडला. ड्युआयडी !!

आणि आता खरी खरी चर्चा चालू झालीये.... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली ड्यूआयडी बद्दल मला फारसे माहीत नाही इथे काय दंगे चालतात ते, मात्र ऑर्कुट समूहांवर माझे आतापर्यंत ८०+ प्रोफाईल झाले आहेत. बरेचसे गाजलेही आहेत. असे प्रोफाईल काढण्यामागे टाईमपास करने, नवनवीन धागे काढणे, समूहाचा टीआरपी वाढवणे, संचालकांशी बंडखोरी केल्यामुळे प्रवेश नाकारलेल्या समूहात घुसणे वगैरे वगैरे असे बरेच उदात्त हेतू असतात... केवळ विचार बेधडकपणे नाव न लपवता मांडता येत नाही हेच एक कारण नसते.. उलट असे काही असेल तर मी माझे ओरिजिनल प्रोफाईल वापरणेच जास्त पसंद करेन. कारण जे काही मी लिहितो त्याचे श्रेय फेकला गेलेले मला कधीही आवडणार नाही.. आणि याच कारणामुळे मी कालांतराने माझे प्रत्येक फेक हे माझेच होते हे उघड करतो.. त्याचुमुळे मी त्या फेकमधून असेही काही करत नाही की जेव्हा उद्या सर्वांना समजेल की ते माझेच होते तेव्हा मला त्याची जबाबदारी घ्यायला लाज वाटेल.. असो.. सध्या मी ऑर्कुटवर नसून मायबोलीवर आहे त्यामुळे हा लेख नक्की काय कोणाला उद्देशून आहे की नाही हे माहीत नसल्याने इथेच थांबतो.. काही लोक फेक प्रोफाइल्सचा गैरवापर करतात त्यामुळे सरसकट सारेच फेक बदनाम होतात त्यामुळेच हे लिहावेसे वाटले बस्स.. Happy

धन्यवाद मुग्धानन्द

उद्या येतो म्हटलं होतं पण येताच आलं नाही Lol
तुमचा अभिषेक - याचुमुळे मी त्या फेकमधून असेही काही करत नाही की जेव्हा उद्या सर्वांना समजेल की ते माझेच होते तेव्हा मला त्याची जबाबदारी घ्यायला लाज वाटेल. >>> यासाठी जोरदार अनुमोदन.

फेक प्रोफाईल लपून राहत नाही. जेव्हां गंमत म्हणून बनवलेले असते आणि सर्वांना विश्वासात घेऊन ते चालवले जाते तेव्हा प्रश्नच येत नाही. फेक प्रोफाईलचा उपयोग कविता, चांगले लेख, छान छान पोस्टस, पुरूषाने स्त्री चे प्रोफाईल आव्हान म्हणून बनवणे (समजून घेण्यासाठी) , स्त्री ने असंच करणे अशासाठी केला गेला असेल तेव्हांही ते उघडकीला आल्यावर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण फेक प्रोफाईलचा वापर जेव्हां गरळ ओकण्यासाठी, विद्वेष पसरवण्यासाठी, भावना भडकवण्यासाठी केला गेला असेल तेव्हां मात्र असे प्रोफाईल उघडकीला आल्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात ओरिजिनल आयडीच निर्लज्ज असेल तर त्याला फरक पडणार नाही पण इतरांना पडेल. बरेचदा फेक प्रोफाईल कुणाचे आहे हे अनेकांच्या लक्षात आलेले आहे हेच ते चालवणा-याच्या लक्षात आलेले नसते.

अवांतर : दुर्दैवाने फेक प्रोफाईलच्या गैरवापरात स्त्री आणि पुरूष सारखेच सहभागी आहेत. फेक प्रोफाईलने काय करू नये हे अर्थातच ओरिजिनल प्रोफाईललाही लागू होत असल्याने आम्ही ओरिजिनल आयडीने लिहीतो म्हणून काहीही लिहायचे, कुणाचाही अपमान करण्याचे, कुणाला मूर्ख म्हणण्याचे लायसेन्स आम्हाला प्राप्त झालेय असा त्याचा अर्थ होत नाही. अगदी तुमची स्वतःची वेबसाईट असली तरीही आणि स्वतःचा ब्लॉग असला तरीही ! कारण तुमचे लिखाण तुम्ही नेटवर जेव्हां प्रसारीत करता तेव्हां ते सर्वांसाठी असते. तुम्हाला नेटवर तुमची वैयक्तिक मते व्यक्त करणे तेव्हांच शक्य होईल जेव्हां ते संस्थळ, ग्रुप क्लोज असेल.

लोला Happy धन्यवाद.
साती - खरंय. पण आशय पोहोचला ना ? Wink ( आवरतो, नाही तर लिखाण टीचभर आणि चर्चा हातभर अशातली गत व्हायची Lol )