असेच काहीतरी..

Submitted by ज्ञानेश on 24 January, 2013 - 03:23

काल माझ्या एका मित्राच्या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत स्मशानापर्यंत गेलो. श्रद्धांजलीच्या भाषणात एकाने उल्लेख केला की ते ९३ वर्षांचे होते.
मी मनात हिशेब केला. ९३ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म साधारण १९२० च्या आसपास झालेला असावा. या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी काय काय पाहिले असेल?

# त्यांचे बालपण म्हणजे टिळकयुगाच्या अस्ताचा आणि गांधीयुगाच्या उदयाचा काळ. अनेक महान नेते त्यावेळी ’घडत’ होते.
# भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फासावर चढवले असेल त्यावेळी ते अवघ्या ११-१२ वर्षाचे असतील.
# कॉंग्रेस पक्षाचे पहिले अधिवेशन १९३६ साली जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर इथे झाले होते. त्या अधिवेशनात गांधी, नेहरूंसह कॉंग्रेसचे जवळपास सर्व नेते उपस्थित होते. आजोबा तेव्हा १६ वर्षाचे असतील. त्यांनी त्या अधिवेशनाला हजेरी लावली असेल का?
# गांधीजींनी ’चले जाव’ चा नारा दिला त्यावेळी ते २२ वर्षाचे असतील, आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तेव्हा तरणेबांड २७ वर्षीय युवक ! फाळणी, गांधीहत्या आणि अशा प्रसंगी धुमसलेल्या अनेक दंगलींचे ते साक्षीदार असतील.
# हिरोशिमा-नागासाकी आणि हिटलर- चर्चिल - स्टालिनसह संपूर्ण दुसरे महायुद्ध त्यांच्या तरूणपणात घडले असेल.
# त्यांनी गांधी, नेहरू, पटेल, लालबहादुर शास्त्री या सगळ्यांची कारकीर्द पाहिली असेल.
# त्यांच्यानंतर जन्मलेले बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, अटलबिहारी वाजपेयी, राज-दिलीप-देव या सगळ्यांची कारकीर्द अगदी सुरूवातीपासून त्यांनी पाहिली असेल.
# त्यापुढच्या काही दशकांतले राजेश खन्ना, अमिताभ, इंदिरा गांधी, शरद पवार, विनोबा भावे, सुनील गावस्कर, पु. ल. देशपाडे, भीमसेन जोशी यांना त्यांनी घडतांना पाहिले असेल.
# वयाची पन्नाशी उलटल्यानंतर त्यांनी आणिबाणी आणि जयप्रकाश नारायण यांची ’संपूर्ण क्रांती’ अनुभवली असेल.
# राजीव गांधींचा उदय आणि हत्या, नरसिंहराव सरकार आणि उदारीकरणाची प्रक्रिया, बाबरीचे पतन आणि बॉम्बस्फोट, दंगली, मंडल आयोग, अनुराधा पौडवाल-उदीत नारायण, शाहरुख-सलमान-आमिर, विलासराव, मुंडे, राणे, भुजबळादींचे उदयास्त वगैरे त्यांनी आपल्या वार्धक्यात पाहिले असतील.
# त्यानंतर एकविसावे शतक ! ९-११, बुश-बराक-ओसामा , फेसबुक-ट्विटर, सोनिया-मनमोहन-राहुल , सचिन तेंडुलकर- धोनी-कोहली , अजितदादा-सुप्रियाताई-राज ठाकरे, रितिक-कत्रिना-रणबीर , मिक्का-सोनू निगम-श्रेया घोषाल आणि अगदी पूनम पांडेपर्यंत अनेक प्रकार त्यांनी पाहिले (!) असतील.

ह्या यादीत कितीही भर घालता येईल. सारांश असा, की काळाचा आणि अनुभवाचा केवढा विस्तीर्ण पट एका माणसाच्या आयुष्यात सामावला गेला असेल ! असा विचार केला तर आजोबांच्या जागी एखादे इतिहासाचे पुस्तकच सरणावर गेले आहे की काय असे वाटू लागते.

माझ्या घरात माझेही आजोबा राहतात. तेसुद्धा ८६+ वर्षांचे आहेत, ठणठणीत आहेत. त्यांना एकदा मी विचारले होते की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात तुम्ही का भाग घेतला नाही? ते म्हणाले- "मला दिवसभर शेतात इतके काम करावे लागायचे की घरी यायला रात्र व्हायची. जेवण झाल्याबरोबर झोप लागायची. काम नाही केले तर बाप खायला द्यायचा नाही. तेव्हा कोणाकडे एवढा वेळ होता? आणि आम्हाला अशा गोष्टी कधी माहीतसुद्धा पडल्या नाहीत. तुम्ही पुस्तके शिकलात म्हणून तुम्हाला माहिती पडले, एवढेच."

खरं सांगायचं तर त्या पिढीला खरोखर बरंच काही माहिती पडत नसणार. माझ्या (आणि मित्राच्याही) आजोबांनी कधी सिनेमे पाहिले नाहीत, क्रिकेट मॅचेस पाहिल्या नाहीत, पुस्तकेच काय, वृत्तपत्रेही फारशी वाचली नाहीत आणि गाणीही ऐकली नाहीत. त्यांनी काय काय मिस केले हेही त्यांना माहित नाही. त्यांनी शेतामध्ये काबाडकष्ट केले, संसार केले, भजन-कीर्तने ऐकली, वार्‍या-तीर्थयात्रा केल्या आणि डोळे मिटले. सर्वार्थाने अत्यंत "खाजगी" आयुष्य जगलेल्या त्या पिढीला माझी श्रद्धांजली.

आपण माहितीच्या विस्फोटात राहतो. गरज असो वा नसो, इच्छा असो वा नसो, वेळ असो वा नसो- आपल्याला सगळ्या गोष्टींबद्दल सगळे काही ’माहिती’ पडत जाते, आणि फेसबुकादी माध्यामांमुळे आपल्याबद्दलचे सारे काही सगळ्या जगाला माहिती पडत जाते !

आपले म्हातारपण कसे असेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचारात पाडलंत ज्ञानेश. छान लिहीलंय.
>> गरज असो वा नसो, इच्छा असो वा नसो, वेळ असो वा नसो- आपल्याला सगळ्या गोष्टींबद्दल सगळे काही ’माहिती’ पडत जाते, आणि फेसबुकादी माध्यामांमुळे आपल्याबद्दलचे सारे काही सगळ्या जगाला माहिती पडत जाते !
आपली पिढी या सगळ्यापासून लांब कसं रहावं याचा विचार करत करत अजूनच आत खचत चाल्लीय असं वाटतंय Happy असो. When in rome, dress like romans! 'माहीती' पडलंय पण वळत नाही अजून Happy

छान आहे हे चिंतन.

आमच्या आधीच्या पिढीनं खूपच स्थित्यंतरं पाहिली असं म्हणता येईल. साधा रेडियोही अप्रुपाचा होता. तिथपासून ते आताच्या इंटरनेट, स्काईप पर्यंत तंत्रज्ञानाची झेप या पिढीनं पचवली आहे. स्वातंत्र्यापूर्वीची/नंतरची टंचाई ते आताची मॉलसंस्कृती हा प्रवास त्यांनी केला आहे. परदेशात बोटीनं जाणारी लोकं, त्यांची एरोग्राम वर महिन्यातून एखाद वेळा येणारी चिठी ते दिवसातून पन्नास फोनही सहज शक्य असणारी स्थिती.... किती किती बदललं. आपल्यालाही जाणवतं मग आधीच्या पिढीला तर किती जाणवत असेल.

आपले म्हातारपण त्यामानानं सहज असेल असं वाटतंय. औषधोपचार बर्‍यापैकी उपलब्ध आहेत पण आजारपणातल्या गुंतागुंतीही निर्माण होतायत. जीवनशैलीमुळे होणारे आजार प्रबळ झाले आहेत.

जगभर प्रवासाची सोय झाली आहे. एकट्यानं किंवा समवयस्कांबरोबर आहे ते जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक जीवनात बरेच काही बदल घडत आहेत त्यांच्याशी जुळवून घेणारे काळाच्या बरोबर राहतील (हे कोणत्याही काळात लागू होतं म्हणा).

तंत्रज्ञानात खूप काही मूलगामी बदल होतील असं वाटत नाही. अपवाद मंगळावरचा टुरीझम सहजशक्य झाला तर, टेलिपोर्टेशनची शक्यता खरीच अस्तित्वात आली तर वगैरे.

आपले आजोबा लोक फार लकी होते यार, त्यांनी बरीच स्थित्यंतरे पाहिली अन अनुभवली असणार.
आपण मात्र आता तंत्रज्ञान एके तंत्रज्ञान यातच प्रगती होताना बघणार..
आता फक्त विमानांचे वेग वाढणार, नेटचा स्पीड वाढणार, मोबाईलचे नवनवीन मॉडेल निघणार, खिशात ठेवता येतील असे कॉम्युटर निघतील, आमची मुंबई लोकल वीस-पंचवीस डब्यांची होणार, चाराचे बाराट्रॅक होणार, त्यातील सहा खालून तर सहा उड्डाणपूलावरून.. झोपडपट्टीतील लहान लहान मुलेही फाडफाड ईंग्लिश बोलू लागणार.. क्रिकेटचे सामने पाच-पाच ओवरचे होणार.. चीअर्सगर्लचे कपडेही त्यात गुणोत्तरात छोटे होणार.. हे सारे आपण लाईव्ह आपल्या मोबाईलमध्ये कधीही कुठेही बघू शकणार.. वगैरे वगैरे वगैरे वगैरे.. बास्स.. मजा नाही यात राव..

तसे आपणही काही कमी पाहिलय असं नाही
# आपले बालपण म्हणजे राजीवयुगाच्या अस्ताचा आणि ?? उदयाचा काळ. अनेक महान नेते त्यावेळी ’घडत’ होते.
# अयोध्याकांड झाले तेव्हा आपण ६-७ वर्शाचे असु .
# कारगिल्चे युध्द झाले त्यावेळी आपण अवघ्या १५-१६ वर्षाचे असतील.
# २००१ साली ९-११ चा प्रसंग पाहिला आपण १७-१८ वर्शाचे असताना. "आता अमेरिकेला कळेल दहस्हत्वाद म्हणजे काय " हा विचार अनेकांच्या मनात आला असेल काय ?
# नंतर फेसबुकाने मानवी जीवनाला नवीन पैलु दिला तेव्हा आपण १८-२० वर्शाचे असु
# ऐन तारुण्यात २३-२४ चे असताना आपण मुंबई वरचा भ्याड हल्ला पाहिला अन त्याला आपल्या सैन्याने दिलेले सडेतोड उत्तरही पाहिले. दहशत्वाद विरोधी लढ्याचे नेत्रुत्व इस्त्रायल/अमेरिके कडुन भारताकडे आल्याच्या त्या मंगल क्षणाचे आपण साक्षीदार!!
#त्यानंतर आण्णा समर्थकांनी लोकशाही हाणुन पाडायचा निष्फळ प्रयत्न आपण पाहिला ,
# पंतप्रधान आपल्या अलौकिक भाषण सामर्थ्याने देशाला मत्रमुग्ध कर असल्याचे आपण सध्या पाहात आहोत
.
.
पुढेही अशा अनेक सुंदर गोष्टी आपल्यालाही पहायला मिळतीलच ...

आगळावेगळा आणि सुंदर विषय.

माझे वय ४२ पूर्ण. आजोबा आजीने ब-याच कुप्रथा नोंदवल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्या काळचे साक्षीदार नाहीसे झाले होते. ऑर्कूटवर एका मित्राने लिहील्याचं आठवतंय कि आज नव्वदीच्या घरातली पिढी हा चालताबोलता ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन ठेवायला हव्यात. एक महतवाचा दस्तावेज तयार होईल.

>>ऑर्कूटवर एका मित्राने लिहील्याचं आठवतंय कि आज नव्वदीच्या घरातली पिढी हा चालताबोलता ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन ठेवायला हव्यात. एक महतवाचा दस्तावेज तयार होईल.

अनुमोदन! मागच्या १५ऑगस्टला स्वातंत्र्यसैनिक असलेल्या स्त्री-पुरुषांच्या मुलाखती एका टीव्ही चॅनेलवर दाखवल्या होत्या. तेव्हा त्या पाहून मलाही असंच वाटलं होतं.

मस्त! खूप सुंदर लिहिलं आहे आणि विषयही एकदम मस्त आहे.

खरंच, इतिहासाचे पुस्तकच!

असे अनेकदा मनात येते खरे जुन्या खोडांना पाहिले, भेटले की!

सर्वांना दीर्घायू लाभो.

उत्तम चिंतन! धन्यवाद!

-'बेफिकीर'!

आम्हाला अशा गोष्टी कधी माहीतसुद्धा पडल्या नाहीत>> +१.

त्याकाळी गावोगावी कोणतीही बातमी पोचण फार्च मुश्किल असणार.
फार लांब कशाला, राजीव गांधी बॉम्बस्फोटात गेले ही बातमी माझ्या मावशीच्या गावी देखील ७-८ तासानी आलेली.
गाव कोल्हापुरापासुन फक्त २५ किमी. टि व्ही नीट दिसत नसत. क्वचितच नीटपणे दुर्दर्शन दिसायच. नॅशनल नेटवर्क.

आज नव्वदीच्या घरातली पिढी हा चालताबोलता ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन ठेवायला हव्यात. एक महतवाचा दस्तावेज तयार होईल.>>>> +१

अशाच काही हजार पौर्णिमा पाहिलेल्या लोकांच्या मुलाखतींसाठी पहा हा दुवा....

http://thousandfullmoons.blogspot.in/2011/04/thousand-full-moons-project...

एक्क्याऐंशी वा अधिक वय असलेल्या लोकांच्या ह्या घरगुती मुलाखती अगदी वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात.

गैरलागू / अ-स्थानी वाटल्यास उडवून टा़कावा.

आपल्या आयुष्यात फार भराभर बदल झाले. आपल्याला ते नवीन होते म्हणून प्रत्येक वेळी आपण हरखलो / भांबावलो. आता यापुढे कदाचित बदल होणे अप्रुपाचेही राहणार नाही ( एवढ्या संख्येत ते होतील.)

अगदी बर्‍याचदा वाटले खरे असेच...
माझे स्वतःचेच आजी आजोबा दोघेही नव्वदी पार करूनच पॅवेलियनमध्ये परतले ..
इतिहासात त्यांनी काय काय पाहिले ते त्यांचे त्यांनाच ठाऊक मात्र बर्‍याच पंतवंडांची तोंडे बघून गेले..
नाहीतर आज तिशी उलटली की अर्धे आयुष्य जगल्यासारखे वाटते.. Sad

गोपाळ गोडसे नव्वदीत असतानाच त्यांची मुलाखत घेतली गेली. त युट्यूब वर आहे. त्यामुळं दुसरी बाजू कळू शकली. नाही तर इतक्या वर्षांपूर्वीचं हयात असलेलं कुणी शोधून त्यांच्याकडून माहिती घेणं अवघडच होतं. ( पण गांधीजींसारख्या निरागस व्यक्तिमत्वाचा खून करावासा का वाटावा याची कारणे पटली नाहीत). मुद्दा अशा काळाच्या पडद्याआड जाणा-या त्या काळातल्या पिढीच्या अनुभवाच्या खजिन्याचा होता.

छान लिहीले आहे! आधीच्या काळातील लोक व त्यांच्या आजूबाजूला/राज्यात्/देशात्/इतर देशांत घडणार्‍या घटना, त्यांची त्यांना मिळू शकणारी माहिती हे सर्व त्या काळातील साधनांच्या दृष्टीकोनातून पाहता येणे फार अवघड आहे.

आज नव्वदीच्या घरातली पिढी हा चालताबोलता ऐतिहासिक ठेवा आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन ठेवायला हव्यात. एक महतवाचा दस्तावेज तयार होईल.>>> सहमत. नव्वदीच्याच काय पण सुमारे ६०-७० च्या पुढच्या लोकांकडूनही बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळेल.

माझ्या लहानपणी माझे आजोबा (ते गेले तेव्हा ८६ वर्षांचे होते) मला असंख्य गोष्टी सांगायचे जुन्या काळातील. आता असे वाटते की तेव्हा कॅमकॉर्डर्स असते आणि ते सर्व रेकॉर्ड करता आले असते तर किती बरे झाले असते!

आपण माहितीच्या विस्फोटात राहतो. गरज असो वा नसो, इच्छा असो वा नसो, वेळ असो वा नसो- आपल्याला सगळ्या गोष्टींबद्दल सगळे काही ’माहिती’ पडत जाते, आणि फेसबुकादी माध्यामांमुळे आपल्याबद्दलचे सारे काही सगळ्या जगाला माहिती पडत जाते !>> ह्म्म्म.. माझा अगदी आवडीचा विषय. मानवी मेंदू या माहितीच्या अंतर्स्फोटाने आणि बहिर्स्फोटाने एखाद दिवशी आपली शक्तीच गमावून बसणार आहे असा माझा विज्ञानकथा लिहीणारा एक मित्र कायम म्हणायचा. Happy

आमच्या घरामधे (नात्यामधे) वयाची शंभरी पूर्ण केलेल्या एक आज्जी होत्या. दहा वर्षापूर्वी त्या वारल्या. २००० साली त्यांची मुलाखत एका कानडी वाहिनीवर घेतली होती. तीन शतकांचे साक्षीदार म्हणून. त्यांच्याकडून "त्याकाळाबद्दल" माहिती घेण्यापेक्षा वार्ताहर "याकाळाबद्दल" काय वाटतय हेच जास्त विचारत होता. वार्ताहराने पहिलाच प्रश्न चुकून इंग्रजीतून विचारला, लगेच सुधारून कानडीत विचारला. आज्जीबाईंनी मात्र थेट किंग्ज इंग्लिशमधे उत्तरला सुरूवात केली. त्याकाळी त्या मुलींच्या कॉन्व्हेंटमधे शिकलेल्या होत्या.