अलेक्झांडरची (सिकंदर) स्वारी व भारतीयांचे पराक्रम (भाग - २)

Submitted by बाजीराव-अवि on 23 January, 2013 - 02:33

अलेक्झांडरचे बालपणः - इ.स. पुर्व ३५६ मध्ये मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची पत्‍नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रचलित आख्यायिका सांगितली जाते की, तो फिलीफचा पुत्र नसुन सर्वोच्च ग्रीक देवता झ्युस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियासकडे गुढ विद्या होत्या व तिने झ्युस देवतेचे प्रतिक मानले गेलेला साप पाळला होता, म्हणुनच अलेक्झांडर झ्युसचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली.फिलीफने अलेक्झांडरला युध्दशास्त्रात निपुण केले परंतु कला, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला मिळावे म्हणुन ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत अस. अलेक्झांडरला कुमारवस्थेतच स्वारीवर जाण्याची संधी मिळाली. फिलीफने अथेन्स व थेबेस यांच्यावरील स्वारीत अलेक्झांडरला सोबत नेल्याचे वाचनात येते.

अलेक्झांडरची राजपदावर नेमणुक : - एजियाच्या सभागृहात मोठा उत्सव सुरू असतानाच पॉसेनियस नावाच्या एका तरुणाने काही खाजगी कारणस्तव फिलिपच्या छातीत खंजीर भोसकून त्याची हत्या केली. सत्तेची लालसा तसेच पॉसेनियसला पकडून न्यायसंस्थेपुढे उभे करणे सहज शक्य असतानाही अलेक्झांडरने त्याला ठार केले या आणि इतर काही कारणांवरून फिलिपच्या खुनात अलेक्झांडर आणि ऑलिंपियासचा हात असल्याचाही तर्क मांडला जातो. तसेच दरायसने आपल्या मार्गातील काटा दूर व्हावा म्हणून ही हत्या घडवून आणली अशीही शक्यता आहे.
यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी मॅसेडोनियन सैन्याने अलेक्झांडरला आपला राजा घोषित केले.

अलेक्झांडरची महत्वकांक्षा : - राजगादी हातात येताच अल्रक्झांडरने पर्शियन साम्राज्य, पार्मेनियव यांसारख्या साम्राज्यावर विजय मिळवुन आपला मोर्चा इजिप्तकडे वळवला. इजिप्तच्या वाटेवर लागणार्‍या अनेक शहरांनी त्याच्यापुढे शरणागती पत्कारली. पुढे इ.स. पुर्व ३३१ मध्ये अलेक्झांडरने नाईल नदीच्या किनारी अलेक्झांड्रिया शहराची निर्मिती केली. अलेक्झांडर येथून पुढे लिबियाच्या वाळवंटातील सिवा येथील अमुन रा (ग्रीक उच्चार:ऍमन) या देवाच्या मंदिरात कौल घेण्यास गेला. येथे त्याला देवाच्या कौलानुसार झ्यूस/ अमुनचा पुत्र म्हणून घोषित करण्यात आले. जनता आणि सेनेकडून निर्विवाद पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक राजकारणाची चाल असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत पडते. सिवाला दिलेल्या भेटीनंतर अलेक्झांडर पुन्हा मेंफिसला परतला. यानंतर आशियात समेरिया येथे बंडाळी झाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याने आपल्या सैन्याची आघाडी पुन्हा आशियाच्या बाजूला वळवली. आपल्या प्रचंड सैन्यानिशी अलेक्झांडर पुर्वेच्या दिशेने गांधार प्रांताकडे कुच केले. मग त्याने सोगदिया प्रांतावर चढाई करून बेससला ठार मारले व त्याने आपला मोर्चा पंचनद प्रांताकडे वळवला. (प्लुटार्कच्या Parrallel Lives या कांदबरीतुन साभार )
क्रमशः

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम संकलन आहे.

पण अलेक्षेंद्राला त्या पॉसेनियस चा जीव घेण्याची वेळ आली नाही.

मी कुठे तरी वाचलेल्या आवृत्तीत फिलिपच्या छातीत (की पाठीत?) पॉसेनियस सुरा खुपसून पळून चालला होता. त्याच वेळी त्याचा पाय पायात अडकून तो पडला आणि रक्षकांनी त्याला ठार मारले.

फिलिपच्या खुनाबद्दल काही मत-मतांतरे आहेत.
१. खुद्द त्याच्या राणीने त्याचा खुन करवला ही एक शक्यता आहे. (कारण फिलिपने अनेक विवाह केले होते पण लेटेस्ट मध्ये त्याने त्याच्या नव्या नवरीला राणीला केले होते. विवाह अनेक केले तरी राणीपदाचा दर्जा!)

२. त्याच्या मुलीच्या लग्नात १२ ऑलिंपियन देवांसोबत त्याने स्वत:लाही तेरावा देव म्हणून घोषित केले होते. त्याचा राग येऊन हा खुन झाला.

फिलिप म्हणजे फिलिप दुसरा. हा अलक्षेंद्राचा बाप, हा खूप धोरणी होता त्यानेच ग्रीसला एकत्र केले. युद्धाचे फॅलेंक्स तंत्र परिणामकारकरित्या वापरले. पुर्वीचे ग्रीस ही सारी नगर राज्ये होती. ती सदैव एकमेकांशी भांडत असायची. फॅलेंक्स या तंत्राच्या आधाराने लढाया करून त्याने सर्वांवर विजय मिळवले. ग्रीस काहीसे एकसंध म्हणून उभे राहीले. (फॅलेंक्स नंतर कधी तरी)

त्या बळावर अलेक्षेंद्राला पुढची झेप घेता आली. हेच फॅलेंक्स पद्धत अलेक्षेंद्राने ही वापरली.

पर्शियन साम्राज्य (म्हणजे आताचा इराण) हे ग्रीसला भयंकर त्रास देत असे. प्रत्येक युद्धात ग्रीसचा पाडाव ठरलेला असे. त्यामुळे अतिशय धोरणीपणाने अलक्षेंद्राने यावर हल्ला केला. असे म्हणतात की हा हल्ला करण्या आधी त्याने पर्शियामध्ये खुप अशा अफवा उठवल्या की देवानेच पर्शियासाठी अलक्षेंद्राची नेमणूक केली आहे. तो देवाचे राज्य आणणार आहे.

शिवाय त्याने सर्वोत्तम गुप्तहेर खाते तयार केले होते. शत्रू सैन्याची नेमकी माहिती त्याच्या कडे होती. या सर्वांमुळे त्याला विजय मिळाला. या विजयानंतर पुढे अनेक राज्यांनी तर अलक्षेंद्र येतोय म्हणतानाच भीतीने त्याचे मांडलिक होणे पसंत केले. त्यामुळे लढाई, वाटाघाटी, विवाह या सर्वांच्या वापराने त्याने हे विजय मिळवले.
पण हे साम्राज्य फक्त १३ वर्षे टिकले! त्याच्या मृत्युनंतर त्याच्या सरदारांनीच राज्ये वाटून खाल्ली!

फिलिप च्या खुनाबद्दल आता तिसरे मत.

पॉसेनियस फिलिपचा रक्षक होता आणि पॉसेनियस आणि फिलिप यांचे प्रकरण होते.

(प्राचीन ग्रीस मध्ये समलैंगिकता समाज मान्य होती. खुद्द देवाधिदेव झेफ्स किंवा इंग्रजी उच्चारा प्रमाणे झ्युस, हाच समलैंगिक - खरे तर उभयलैंगिक होता. एरा किंवा इरा या देवतेशी त्याचे लग्न झाले होते पण त्याच्याच सेवकाशी त्याचे प्रकरण होते.)

फिलिप चे मन आता नव्या पोरावर बसले. त्यामुळे त्याला पॉसेनियस इतका महत्त्वाचा राहिला नाही.
याशिवाय पॉसेनियसला फिलिपच्या सासर्‍याने त्रास दिला. त्याच्यावर घरी बोलावून बलात्कार केला. त्याची तक्रार पॉसेनियसने फिलिपकडे केली. पण त्याने सासर्‍याला दंड दिला नाही किंवा त्याचा सूड घेतला नाही. त्याला दूर देशी चांगले पद दिले. त्यामुळे पॉसेनियस चिडला आणि त्याचा खुन केला.