घेतो जपून आता मी श्वास राहिलेले!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 January, 2013 - 14:15

गझल
घेतो जपून आता मी श्वास राहिलेले!
आहे उधार मजला आयुष्य लाभलेले!!

मी लाविली स्मितांची ठिगळेच जागजागी....
आयुष्य सर्व होते आतून फाटलेले!

केली तुझ्या परीने तूही शिकस्त फुलण्या;
होते वसंत सारे जात्याच बाटलेले!

होते बरेच काही बोलायचे तिच्याशी;
संवाद सर्व झाले ओठात गोठलेले!

हे फार छान झाले, विसरून त्यास गेलो....
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले!

डोळ्यांसमोर माझ्या माझे क्षितीज आहे!
मी चाललो किती ते, अजुनी न पाहिलेले!!

उघडू नकात डोळे माझ्या कलेवराचे;
माझे अतीत सारे मी त्यांत झाकलेले!

हे वासरू मनाचे भारी उनाड झाले!
मीहून आज त्याला हृदयात डांबलेले!!

मृगजळ असो कशाचे, फसणार मी न आता!
सारे विवर्तनांचे मी पाश तोडलेले!!

मोडीत काढले मी सोने अखेर माझे!
मी ठेवणार नाही भंगार गंजलेले!!

क्षण थांब जीवना तू! कर चाल मंद थोडी....
पळवू तरी किती मी? वार्धक्य खंगलेले!

अपशब्द अन् शिव्यांचा भरतात तोबरा ते....
दिसतेच तोंड त्यांचे दिनरात रंगलेले!

तिन्हिसांज होत आली, आधीच भेट त्यांना!
नंतर असायचे तो मदिरेत झिंगलेले!!

अवशेष साक्ष देती...ते सर्व राजवाडे!
जे आजकाल दिसती पडके, दुभंगलेले!!

धस लागतोच मजला दिवसात कैक वेळा!
मी आरशात बघतो मज रोज फाटलेले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या रानफुले गझलसंग्रहातील रचना, काही सुचलेल्या/स्फुरलेल्या शेरांची भर टाकून पोस्ट केली आहे! नोंदनीय/दखलपात्र आहे का हे रसिकंनीच ठरवावे!

नाही आवडली क्षमस्व ......पण वाईटही नाही आहे हे नक्की

आपली जुनी व नवी गझल यात काहीच सुधारणा म्हणून जाणवत नाहीत प्राध्यापक साहेब !
प्रांजळ मतासाठी क्षमस्व

अरविंदराव तू/मी शिवाय जगात दुसरे आहे काय?
श्वास घेतल्याशिवाय जगून दाखवा असे म्हणणे झाले!