"....अ‍ॅण्ड नॉमिनीज् आर....!!"

Submitted by अशोक. on 14 January, 2013 - 01:35

नवीन वर्ष सुरू झाले की जागतिक मनोरंजन क्षेत्राला वेध लागतात ते "ऑस्कर्स" च्या सोनेरी बाहुल्यांचे ज्याना जगभर मान्यता आहे आणि हॉलिवूडमध्ये पाय ठेवलेल्या वा ठेवणार्‍या प्रत्येक कलाकाराची, निर्मात्याची, दिग्दर्शकाची, सार्‍या गटातील तंत्रज्ञांची आयुषभराची इच्छा मनोकामना असते की आपणही किमान एकदा का होईना पण त्या भव्य झळाळत्या स्टेजवर मानाने जावे आणि "..ऑस्कर गोज टु" हे जादूमय शब्द ऐकत ऐकत ती लाडाची बाहुली मान्यवराकडून आपल्या थरथरत्या हाताने घेण्याचे भाग्य लुटावे. हॉलिवूड निर्मितीतीलच नव्हे तर परदेशस्थ विभागातही येणार्‍या चहुदिशांच्या प्रवेशिका पाहिल्यावर आपल्या चित्रपटाला त्या गटात 'ऑस्कर' मिळावे याचे स्वप्न भारतीय चित्रपटसृष्टीही पाहते.

बघताबघता ८५ व्या ऑस्कर पारितोषिकांचा डंका वाजू लागला आणि आज त्याची पहिली पायरी कमिटीकडून टीव्ही माध्यमातून दाखविण्यात आली....ती म्हणजे "ऑस्कर नॉमिनेशन्स". वर्षभर पडद्यावर आलेल्या चित्रपटांतून काही चित्रपट ऑस्कर कमिटी जगभरातून आलेल्या शिफारशीवरून 'नॉमिनेशन्स = नामांकन' जाहीर करते आणि मग फेब्रुवारीच्या ११ तारखेच्या प्रत्यक्ष विजेत्या पारितोषिक वितरण समारंभाच्या दिवसापर्यंत विविध माध्यमातून नॉमिनेशन्स मिळालेल्या विविध चित्रपटांबद्दल...त्यातील कलाकारांबद्दल, तंत्रज्ञांबद्दल चर्चेचे अगदी रान उठविले जाते.

या लेखात आपणही ज्या चित्रपटांना 'बेस्ट पिक्चर ऑफ द इअर' नामांकन मिळाले आहे, त्याबद्दलच विचार करू....कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींच्या बाबतीत स्वतंत्र लेख लिहिणे गरजेचे आहे. इथे एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की हा धागा फक्त 'ऑस्कर नॉमिनेशन्स' साठी असल्याने ज्या ९ चित्रपटांचा इथे उल्लेख होत आहे त्या सर्वांचे सविस्तर कथानक सांगणे शक्य नाही, किंबहुना ते योग्यही नाही. फक्त त्रोटक स्वरूपातील ओळख इतकेच त्याचे स्वरुप आहे.

"ऑस्कर नॉमिनी फॉर द बेस्ट पिक्चर"....

१. "लिंकन : LINCOLN "
ALincoln.jpg

स्टीव्हन स्पिअलबर्ग...हे नाव घेता क्षणीच चित्रपटाचा विषय कोणताही असला तरी त्याची भव्यता तो चित्रपट पाहण्याअगोदरच जगभराच्या चित्रपटप्रेमींच्या नजरेसमोर येते, इतके नाव स्पिअलबर्गने आपल्या कलात्मक आणि विषयाशी अनुरुप अशा चित्रणपद्धतीने मिळविले आहे. 'अब्राहम लिंकन' - अमेरिकेच्या या राष्ट्राध्यक्षाविषयी माहिती नसलेली व्यक्ती या जगात विरळ म्हणावी लागेल. अमेरिकन सिव्हिल वॉर, नीग्रोना गुलमागिरीतून मुक्तता, रंगभेदाचे उच्चाटन करण्यासाठी लिंकनने केलेले अथक प्रयत्न आणि त्यातच विरोधकांनी केलेला त्याचा राष्ट्राध्यक्ष पदावरच असताना एका नाट्यगृहात केलेला पूर्वनियोजित खून. ह्या ठळक घटनापैकी स्टीव्हन स्पिअलबर्गने १८६५ च्या त्या चार महिन्याचा काळ चित्रपटासाठी निवडला असून अमेरिकन घटनेतील १३ व्या दुरुस्ती बिलाबाबत त्याने केलेला आटापिटा [ह्याच दुरुस्तीअन्वये नीग्रोना गुलामगिरीतून मुक्तता मिळणार असते]...आणि त्यावरून रीपब्लिकन व डेमोक्रॅट्स यांच्यातील डावपेच यांचे विलक्षण ताणाचे तसेच अगदी जणू त्याच काळात प्रेक्षकाला घेऊन जाण्याची त्याची हातोटी प्रेक्षकाला खिळवून ठेवते. तब्बल अडीच तासाच्या या चित्रपटात "संवाद" हाच प्रमुख कलाकार आहे. पात्रांचे संवाद हीच 'अ‍ॅक्शन' या चित्रपटाचे आकर्षण केन्द्र बनले आहे. डॅनिएल डे-लेविस या दोन ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने साकारलेला 'अब्राहम लिंकन' पडद्यावर पाहताना असे वाटत राहते की खुद्द लिंकनच ती भूमिका सादर करीत आहे, इतके साम्य डॅनिएलने दाखविले आहे. विशेषतः लिंकनचे लांबलचक संवाद कॅमेर्‍याच्या एकाच अ‍ॅन्गलने तसेच एकाच टेकमध्ये घेतल्याने त्याचे पाठांतर कौतुकास्पद म्हणावे लागेल.

विविध विभागासाठी एकूण '१२ नॉमिनेशन्स" लिंकन ने मिळविली आहेत.

२. "आमूर...AMOUR"
A3.jpg

अगदी मराठी चित्रपटातून तसेच नाटकातून शोभेल अशी या चित्रपटाची कथा. ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झालेला हा चित्रपट कहाणी सांगतो ते जॉर्ज आणि अ‍ॅना या वयाच्या ८० च्या दशकात असलेल्या संगीत शिक्षक जोडप्याची. त्यांची एकुलती एक मुलगी ईव्ह, जी स्वत:ही संगीत शिक्षिका आहे, परदेशी नोकरीत असते. हे वृद्ध जोडपे एकमेकाला सांभाळून जुन्या आठवणीवर जगत असते, त्यातच प्रेम...[आमूर = प्रेम] आणि एके दिवशी अ‍ॅनाला हृदयविकाराचा झटका येऊन ती विकलांग होते. तिच्या उर्वरित दिवसासाठी जॉर्ज करीत असलेले प्रयत्न आणि त्याचे हाल पाहून होणारी अ‍ॅनाची तगमग...अशी ही अत्यंत आपुलकीची सरळसोट वाटणारी कथा. वैशिष्ठ्य म्हणजे या चित्रपटातील अ‍ॅनाच्या भूमिकेसाठी 'इमॅन्युअल रिव्हा' ह्या फ्रेन्च अभिनेत्रीला 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस'साठीही नॉमिनेशन मिळाले असून सध्या ही अभिनेत्री ८५ वर्षाची आहे आणि जर तिला ही बाहुली मिळालीच तर ऑस्करच्या इतिहासातील पारितोषिक जिंकणारी सर्वाधिक वयाची अभिनेत्री म्हणून तिचा गौरव होईल.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स = ५

३. "लाईफ ऑफ पाय" - LIFE OF PI"
A2.jpg

तैवान इथे जन्मलेल्या आणि आता अमेरिकन नागरिकत्व घेतलेल्या आन्ग ली या दिग्दर्शकाचा "क्राऊंचिंग टायगर, हिडन ड्रॅगन" तसेच 'सेन्स अ‍ॅण्ड सेन्सिबिलिटी" हे गाजलेले चित्रपट आपणास माहीत आहे. याच दिग्दर्शकाचा यंदाचा जगभर उत्पन्नाचे रेकॉर्ड केलेला आणि भारतीय कलाकारांच्या अदाकारीने नटलेला "लाईफ ऑफ पाय" हा जंगलपट जगभरातील समीक्षकांच्या दृष्टीने अतिशय गौरविला जात आहे. बेस्ट पिक्चरचा प्रबळ दावेदार असलेल्या या चित्रपटाची कहाणी म्हणजे सागरी दुर्घटनेमुळे एका युवकाच्या नशिबी आलेली अनपेक्षित सागरी भटकंती आणि त्याला मिळालेला एक तितकाच अनपेक्षित सागरी सहकारी...बंगाली वाघ. भारतात सर्वत्र गाजावाजा झालेल्या या चित्रपटाने ऑस्करपर्यंत झेप घेतली आहे त्यामुळे यंदाच्या शर्यतीकडे आपल्या भारतीय प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेले असणार.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स : ११

४. अर्गो : ARGO
AArgo.jpg

सम्राट शहाच्या उचलबांगडीनंतरचे धगधगते इराण, शाहला अमेरिकेकडून पाठिंबा मिळतोय म्हणून तेहरानच्या अमेरिकन दुतावासात इराणी अतिरेक्यांनी केलेला हल्ला आणि तेथील सुमारे ५० कर्मचार्‍यांना ओलिस म्हणून कैदेत ठेवणे...त्यातून सहा अमेरिकन राजनितितज्ज्ञांनी सुटका करून कॅनेडिअन वकिलातीमध्ये आश्रय घेणे...त्यांच्या सुटकेसाठी सीआयने केलेले प्रयत्न व त्या गटाचा नायक यांच्यातील द्वंद्व अतिशय वेगवाने चित्रीकरणाने पाहाणार्‍याला अक्षरशः खिळवून ठेवते.

एकून ऑस्कर नॉमिनेशन्स : ७
५. "बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" - Beasts of the Southern Wild

A5.jpg
सहा वर्षाची एक मुलगी आणि भडक माथ्याचा तिचा बाप यांच्यातील 'हेट अ‍ॅन्ड लव्ह' पद्धतीची कथा फुलते ती समुद्रकिनारी असलेल्या त्यांचा कम्युनिटीला वादळाचा तडाखा बसतो त्या अनुषंगाने. आपले घर, वडील याना तर त्या नैसर्गिक कोपातून वाचवायचेच शिवाय वसाहतीत त्या वादळातून शिल्लक राहिलेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठीचा आटापिटा... सहा वर्षाच्या 'हशपप्पी' या मुलीचे काम करणार्‍या क्वेन्झेन वॅलिस [जी या क्षणी ९ वर्षाची आहे] हिला तिच्या अविस्मरणीय अशा अभिनयासाठी "बेस्ट अ‍ॅक्ट्रेस" चे नामांकन मिळाले आहे. यदाकदाचित तिला हे ऑस्कर मिळाले तर इतक्या लहान वयात तसे मिळविणारी ती पहिली 'अभिनेत्री' ठरेल.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

६. "जॅन्गो अनचेन्ड - Django Unchained"

A6.jpg
"किल बिल, पल्प फिक्शन, इनग्लोरिअस बास्टर्डस..." आदी गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाचा - क्वेन्तिन टॅरॅन्टिनो - जॅन्गो अनचेन्ड हा ज्याला 'वेस्टर्न' धर्तीचा म्हटले जाते त्या जातकुळीतला चित्रपट. जॅन्गोचे काम केले आहे जेमी फॉक्स या अभिनेत्याने. कथानक घडते १८५८ मध्ये...अमेरिकेतील नीग्रोंच्या गुलामगिरीचा काळ. जॅन्गो त्याच गुलामगिरीत खितपत पडला असून तिथून तो आपल्या मदतकर्त्याने दिलेल्या सहाय्याच्या आधारे बाहेर पडतो आणि पत्नीच्या शोधार्थ निघतो...जी आता गब्बर अशा जमिनदाराच्या मळ्यात अन्य गुलाम स्त्रियांच्या समवेत काम करत असते. दोघांचीही वेगवेगळ्या ठिकाणी विक्री झालेली असते पण पत्नीला त्या कैदेतून मुक्त करण्यासाठी जॅन्गोने केलेली धडपड सांगणारी ही कहाणी. विशेष म्हणजे 'टायटॅनिक' फेम लीओनार्डो कॅप्रियोने त्या जुलमी मळेवाला जमिनदाराची नकारार्थी अशी भूमिका साकारली आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

७. ले मिझेराब्ल - Les Miserables

A7.jpg
व्हिक्टर ह्युगो या जगप्रसिद्ध फ्रेन्च लेखकाची १८६२ मध्ये प्रकाशित झालेली ह्याच नावाची कादंबरी इथल्या बर्‍याच सदस्यांना माहीत असेलच. याच कादंबरीवरून वेळोवेळी तयार झालेल्या संगीतिकाही इंग्लंड तसेच युरोपच्या अन्य देशातही त्या त्या काळातील समाजाला भावल्या होत्या. एका मोठ्या कादंबरीवरून हा चित्रपट बेतला असल्याने त्याच्या कथानकाचा आवाकाही तसाच दीर्घ असल्याने थोडक्यात सांगायचे झाल्यास...काळ १८१५, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी ज्यॉं व्हॅल्जीनला काही काळासाठी 'पॅरोल' मिळते. बाहेर पडल्यावर एका चर्चमध्ये त्याला तेथील बिशप रात्रीपुरता सहारा देतो, पण त्याच्याकडे असलेल्या चांदीच्या शिक्क्यांचा व्हॅल्जीनला मोह पडतो, ते तो चोरतो, पण रंगेहाथ पकडला गेल्यावर जेलचा वॉर्डन जाव्हेर्ट त्याचे पॅरोल रद्द करून परत तुरुंगात डांबण्यासाठी आल्यावर बिशप 'त्याने चोरी केली नसून मीच त्याला जगण्यास काहीतरी मदत म्हणून ती चांदीची नाणी दिली' असे सांगितल्यावर नाईलाजास्तव त्याची सुटका करणे अधिकारीवर्गाला भाग पडते. अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने व्हॅल्जीन सावरतो आणि स्वतःला नव्याने घडविण्याची शपथ घेतो. पॅरोलचा कालावधी संपण्यापूर्वी तो त्या अधिकार क्षेत्रातून बाहेर पडून वेषांतर करून विविध कामे करत करत एका छोट्या फॅक्टरीचा मालकही बनतो. पण तुरुंगाधिकार्‍याने जणू काही शपथच घेतलेली असते त्याला शोधून पकडून परत तुरुंगात घालण्याची. तोही त्याच्या मागावर निघतो. हा पाठलाग चालू असताना इकडे फॅक्टरीतील एक स्त्री कामगार फॅन्टाईन अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीसाठी धडपडत असते, जी दूर एका गावातील दयामाया न दाखविणार्‍या कुटुंबात काम करीत असते. फॅन्टाईनकडून तिच्या पालनपोषणासाठी वेळेवर आणि आवश्यक तितके पैसे येत नसल्याची सततची तक्रार ते कुटुंब करीत असल्याने जादाची कमाई व्हावी यासाठी नाईलाजास्तव फॅन्टाईन वेश्याव्यवसायही पत्करते. अर्थात त्या व्यवसायात अनिच्छेने उतरल्याने घाणेरड्या गिर्‍हाईकांशी तिचे भांडण होते आणि नेमके तिला अटक होते ती जाव्हेर्टकडूनच...तिथे व्हॅल्जेन तिला वाचवतो. दिसण्यात वागण्यात आमुलाग्र बदल झालेल्या व्हॅल्जेनला सुरुवातीला पोलिस अधिकारी ओळखत नाही...पण मग....कथानक पुढे सरकते. खूप मोठा आवाका आहे...पुढे तो त्या फॅन्टाईनच्या निराश्रीत मुलीचे पितृत्वही स्वीकारतो...इ.इ.

हॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांची यात मांदियाळीच आहे असे म्हटले तरी चालेल. बेस्ट पिक्चरसोबत ह्यू जॅकमनलादेखील 'बेस्ट अ‍ॅक्टर' चे नामांकन मिळाले आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
८. "सिल्व्हर लाईनिंग्ज प्लेबुक" - Silver Linings Playbook

A8.jpg
हा चित्रपट मी अद्यापि पाहिला नसल्याने पूर्ण कथानक माहीत नाही, तरीही ऑस्करच्या निमित्ताने जाणून घेतले की, विनोदी धर्तीची ही एक सुखान्तिका असून पॅट सॉलिटॅनो नामक नायक, जो नुकताच मेन्टल ट्रीटमेन्ट घेऊन घरी परत आला आहे, आणि आल्यावर त्याला समजते की त्याची पत्नी निक्की घर सोडून गेली आहे, वडील बेकार झाले आहेत आणि आता नोकरी नको तर स्वतःचे छोटेसे रेस्टॉरन्ट सुरू करण्यासाठी भांडवलाची जुळवाजुळव करीत आहेत. निक्की दुसर्‍याच्या प्रेमात पडली आहे, तर रेड हॅन्डेड सापडलेल्या त्या प्रियकराला तो बेदम मारहाण करतो तर सहकार्‍यांचा 'पुन्हा मानसिक स्थितीवर उपचार करून घे' हा सल्ला झिडकारून नव्या उमेदीने आयुष्य सुरु करत असताना त्याला टिफनी नामक एक विधवा भेटते. दोघेही संगीतप्रेमी असल्याने त्यांचे जुळतेही. टिफनी स्वत:च पॅट आणि निक्की यांचे मिलन व्हावे यासाठी प्रयत्नशील असते..संगीत स्पर्धेत भाग घेणे व त्यासाठी तयारी करण्यात पॅटचे मन जसे गुंतत जाते तसेच त्याला निक्की नव्हे तर टिफनीमध्येच आपली जोडीदारीण दिसू लागते....पुढे कथानक जाते.

थोडक्यात टिपिकल अमेरिकन फॅमिली ड्रामा म्हटले तरी चालेल.
[चित्रपटात पॅटवर मेडिकल उपचार करण्यार्‍या डॉ.पटेलची भूमिका साकारली आहे आपल्या अनुपम खेर यानी.]

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ८
[या आठ नॉमिनेशन्समध्ये विशेष म्हणजे 'बेस्ट अ‍ॅक्टर, बेस्ट अ‍ॅक्ट्रेस, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस' अशी चारही अभिनयासाठीची नॉमिनेशन्स मिळाली आहेत...ऑस्करच्या इतिहासातील ही अपूर्व अशीच घटना मानली जाते.]

९. "झीरो डार्क थर्टी - Zero Dark Thirty"

A9.jpg
टिपिकल अमेरिकन थ्रिलर ड्रामा ज्याला म्हटले जाईल असा हा अ‍ॅक्शनपट. 'हर्ट लॉकर' या अतिशय गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन जिने केले होते त्या कॅथरिन बिग्लोचा हा चित्रपट. हर्ट लॉकरसाठी तिला २००९ चे 'बेस्ट डायरेक्टर' चे ऑस्कर मिळाले होते आणि तशा बहुमान मिळविणारी ती पहिली महिला ठरली होती. त्या यशानेच प्रेरित होऊन कॅथरिन झीरो डार्क थर्टीसाठी 'ओसामा बिन लादेन' हा विषय निवडून त्याला शोधून संपवायचा घाट घालणे आणि तो कसा यशस्वी केला गेला याचे चित्तथरारक कथानक म्हणजेच हा चित्रपट. जेसिका चॅस्टेन या अभिनेत्रीला या चित्रपटातील 'माया' च्या भूमिकेसाठी 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' चे नामांकन मिळाले आहे.

एकूण ऑस्कर नॉमिनेशन्स - ५

~ तर असा हा ९ चित्रपटांचा आणि त्यातील कथानकांचा थोडक्यात घेतलेला आढावा. सध्यातरी 'लिंकन', अर्गो' आणि 'लाईफ ऑफ पाय' यांचे ऑस्कर शर्यतीतील पारडे जड दिसत असल्याची चिन्हे आहेत.

अशोक पाटील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सविस्तर वाचून प्रतिक्रिया देईनच.

(शुक्रवारी स्टार-मूव्हीजवर याच शीर्षकाचा लाईव्ह कार्यक्रम होता. त्याआधी तासभर जाहीर झालेल्या नामांकनांवर आणि संबंधित चित्रपटांवर 'एक्सपर्टस्' बोलतील असं काहीतरी सिनॉप्सिसमधे दाखवत होते. म्हणून आवर्जून तो कार्यक्रम पहायला बसले, तर एक्सपर्टस् म्हणून करण जोहर, किरण राव आणि इम्रान खान (अभिनेता) यांना बोलावलेलं होतं. Uhoh पहिली १-२ प्रश्नोत्तरं पाहिली आणि कंटाळून मी टी.व्ही. बंद करून टाकला.)

एकदम मस्त. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. एकसे एक मस्त चित्रपट आहेत. Happy

तर एक्सपर्टस् म्हणून करण जोहर, किरण राव आणि इम्रान खान (अभिनेता) यांना बोलावलेलं होतं. <<<<<<<<<< हे राम Lol

"...करण जोहर, किरण राव आणि इम्रान खान .....एक्स्पर्ट??"

-- ओ हो !! थॅन्क्स ललिता-प्रीति.....बरं झालं तुम्ही हे 'रहस्य' इथे उघड केले. आय मीन, मी तर हा कार्यक्रम पाहिलेला नाहीच, पण उगाच केव्हा तरी रीपीट म्हणून टाकला तर आता सावध झालो.

वेल...बाकी ही मुलाखत घेतली तरी कुणी...? म्हणजे निदान तो अ‍ॅन्कर तरी एक्सपर्ट होता का ?

अशोक पाटील

मस्तच. सगळ्या चित्रपटांची माहिती एकत्र दिल्याबद्दल धन्यवाद. ह्यातले दोन चार बघितले आहेत. आता बाकिचे बघायच्या मागे लागतो Happy

लेख सविसतर उद्या वाचतो.. आता झोपेची वेळ झाली..

मात्र ललिताप्रीतींनी आपल्या प्रतिक्रियेत इम्रान खानच्या पुढे कंसात अभिनेता का लिहिले... आमीरचा भाचा अशी ओळख नसता का देता आली...

मस्त लिहिलय.. मी गेल्या तीन वर्षांपासूनच ऑस्कर पहायला/फॉलो करायला लागलो आहे. त्यामुळे यंदाची नॉमिनेशन्स शोधणारच होतो.. इथे एक कॅटेगरीतरी आयती मिळाली.. बेस्ट मुव्ही नेहमी आपल्याला वाटतो तो सोडून भलताच निघतो.. Happy

तर एक्सपर्टस् म्हणून करण जोहर, किरण राव आणि इम्रान खान (अभिनेता) यांना बोलावलेलं होतं. >>> Lol

अरे आपली बर्फी होती ना यात................... मूकबधीर्रणबीरपट..!!!!

<< बर्फी कधीच ऑस्करबाहेर फेकला गेला.

वा अशोकजी, किती सुंदर पद्धतीने तुम्ही हे सर्व लिहिले आहे .... तुमचे एकूणच लिखाण वाचकाला भुरळ घालते...
हे सगळे सिनेमे केव्हा, कसे पहायला मिळतील अशी जाम उत्कंठा निर्माण झालीये.....

डॅनिएल डे-लेविस - मला स्वतःला हा अभिनेता प्रचंडच आवडतो.

मस्त लेखन, छान विषय व देखणी चित्रे. एकूणच लेख अप्रतिम. आता हे सिनेमे कधी बघायचा योग येईल ते बघायचे.

मस्स्त लिहिलंय. Happy

वय वर्षे ८५ आणि वय वर्षे ९ >>> मला ऑस्कर्सची ही बाबच सर्वात आवडते.

ला मिझरेबल >>> या शीर्षकाचं काहीतरी पाहण्यात अथवा वाचण्यात आलं होतं असं वाटतच होतं. इथे वाचून कळलं. (पण मला वाटत होतं, की या शीर्षकाचा याआधीही चित्रपट येऊन गेला आहे.)

झीरो डार्क थर्टी >>> कॅथरीन बिग्लोला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं नामांकन जाणूनबुजून देण्यात आलेलं नाही असं गेल्या आठवड्यात पेपरमधे वाचलं होतं. त्यामागे काहीतरी राजकीय कारण असल्याचं बोललं जात आहे. ख.खो.दे.जा.

बाकी ही मुलाखत घेतली तरी कुणी...? म्हणजे निदान तो अ‍ॅन्कर तरी एक्सपर्ट होता का ? >>> कुणीतरी शर्मा / चोप्रा आडनावाची बाई होती. मेक-अप थापलेली, चकाचक इंग्रजी बोलणारी...

"....चोप्रा आडनावाची बाई होती. ...."

... मग ती नक्कीच 'अनुपमा चोप्रा' असणार. स्टार वर्ल्ड या चॅनेलवर तिचा 'फ्रंट रो' या शीर्षकाचा हॉलीवूड घडामोडीवर आधारित पाक्षिक कार्यक्रम असतो. तसे तिचे या विषयातील ज्ञान सखोल दिसत्येच [विशेषतः तांत्रिक बाजू]; पण का कोण जाणे अ‍ॅन्करिंग करताना ती नेहमी इतके हसतहसत सार्‍या बाबी घेते की काही वेळ असे वाटते की हा कार्यक्रम कधी 'गंभीर' होणारच नाही. स्टीव्हन स्पिएलबर्गच्या 'शिंडलर्स लिस्ट' या ज्यू नागरिकांची कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पमधील हलाखीची स्थिती विषयावरील चित्रपटाबद्दल बोलताना तरी अनुपमाने काहीसे गंभीर व्हावे !! पण ईल्ला...त्यावेळीही तिचे ते कोलगेट टूथपेस्ट हसणे चालूच होते.

असे अ‍ॅन्कर्स कार्यक्रमाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासतात.

बाकी... किरण राव हिने हिंदुस्थान टाईम्सला ऑस्कर संदर्भात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलेली "The grammar and the syntax of our movies are so different that there are very few films that can actually appeal to the world audience and, especially, to the Academy audience" ही कबुली प्रामाणिक वाटते.

अशोक पाटील

अनुपमा चोप्राचा अभ्यास चांगला आहे आणि तिची चर्चा करण्याची पद्धत पण इंटरेस्टिंग आहे.

ल मिझराब्ल ही मुळात १८६२ मधे प्रसिद्ध झालेली फ्रेंच कादंबरी आहे. त्यावरून ऑपेरा, म्युझिकल्स, फिल्म्स सगळेच झालेले आहे. ब्रॉडवेवर हे म्युझिकल खूप गाजलेले आहे.

"...अनुपमा चोप्राचा अभ्यास चांगला आहे...."

~ नक्कीच. तसे मी माझ्या प्रतिसादात सूचित केले आहेच. मला काहीशी खटकलेली तिची संवाद खुलविण्याची धाटणी. वर दिलेल्या शिंडलर्स लिस्ट प्रमाणेच मागे अनुपमाने 'अवतार' वर अर्ध्याएक तासाचा कार्यक्रम सादर केला होता. त्या चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला तिने अतिशय अभ्यासू पद्धतीने खुलविले होते....[त्याची गरजही होतीच म्हणा], पण ते करताना "टायटॅनिक" च्या रोझ आणि जॅक चे वारंवार संदर्भ देणे बिलकुल गरजेचे नव्हते. दोन्ही चित्रपट जरी एकाच निर्माता दिग्दर्शकाचे असले तरी तुलना अयोग्यच.

अशोक पाटील

अशोककाका इंटरेस्टींग लेख.
अनुपमा चोप्राचा अभ्यास चांगला आहे >>> +१
पण ती खूप गुडीगुडी मुलाखती घेते असं मला वाटतं. अर्थात मोठमोठ्या सेलेब्रिटीजना बोलवुन त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न ती विचारू शकत नाही म्हणा.

खूपच रोचक माहिती. धन्स अशोकजी.
लिंकन (निर्मिती अनिल अंबानी ना ?) अन लाइफ ऑव्ह पाय च्या निमित्ताने भारतीयांची एक छाप जाणवली नॉमिनेशन्समध्ये अन दुसरी छाप एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरच्या अनेक कथानकांची.पीरियड ड्रामाचे मोठे आव्हान पेलणारी .

"...लिंकन (निर्मिती अनिल अंबानी ना ?) ..."

येस्स...भारती. रीलायन्सच्या अनिल अंबानी यानी स्थापन केलेली ही "रीलायन्स बिग एन्टरटेनमेंट" कंपनी हॉलीवूडच्या ड्रीम वर्क्स अणि फॉक्स या नामवंत कंपनीशी हॉलीवूड चित्रपटनिर्मितीशी करारबद्ध झाली आहे. "लिंकन" ला सर्वोत्कृष्ट चित्रपटनिर्मितीची ऑस्कर बाहुली मिळालीच तर ती स्वीकारण्यासाठी अनिल अंबानीदेखील स्टेजवर आलेले दिसतील. [तसे व्हावे ही सदिच्छा]

यापूर्वीही स्टीव्हन स्पीएलबर्गच्या 'वॉर हॉर्स' ची निर्मिती रीलायन्सने केली आहे.

अशोक पाटील

भारतासाठी एक आनंदाची बाब म्हणजे लाईफ ऑफ पायमधल्या एका गाण्यासाठी (अंगाईगीत) तमिळ गायिका बॉम्बे जयश्री हिला मानांकन मिळालेले आहे.

अरे रोहन....पण सध्या तुझी लंडनच्या गल्लीबोळातील भटकंती चालू आहे ना ? तसे असेल तर मग असे कलात्मक चित्रपट पाहाण्यासाठी जी निवांत मानसिकता हवी असते ती निदान तुझ्यासाठी तरी दुर्मिळच झाली असणार....अशी साधार भीती वाटत आहे. तरीही बघणार असशीलच तर 'लिंकन' पासूनच सुरुवात कर.

अशोक पाटील

Pages