कॉलनीच्या गोष्टी ९- कॉलनी मधे आयडॉल <सेमि> संगीत नाटक

पात्रे
सुमित्रा अर्थात राजे बाई-गाण्याचे क्लास चालवतात, वय साधारण साठीच्या आसपास

आरोही -राजे बाईंची मुलगी,वय साधारण तिशी-पस्तिशीच्या मध्ये. वयाच्या अकरा- बारा वर्षापासून गाणं शिकतेय.

सविता वर्टी - वय अट्ठावन्न च्या आसपास, सुमित्रा राजेंची धाकटी बहीण. ही पण बँकेत आहे पण कॉलनीत रहात नाही. शिवाजी पार्कच्या जवळ रहाते.

चिरमुले मास्तर - वय कोणास ठाउ़क? संगीताचे ज्ञान अन विद्वत्ता पाहता दीड दोनशे वर्षे वय सहज असेल. राजे बाईंचे गुरू अन आरोहीचे गुरू

ही आतापर्यंत आलेली पात्रं . बाकीची येतील तशी तशी त्यांची ओळख होईलच.

प्रवेश पहिला शनिवारची संध्याकाळ. आरोही, तिची आई अन मावशी गप्पा मारत आहेत. शनिवारी बॅंकेचं काम अर्धा दिवसच असते असतं त्यामुळे वर्टी बाईना आपल्या बहिणीला भेटता येतं. बर्‍याच शनिवारी त्या कॉलनीत येतात. आरोही मावशी म्हणत म्हणून कॉलनी तली बरीच मुलं पण त्यांना सविता मावशी म्हणतात.

सुमित्रा : 'अगं काल फोनवर म्हणालीस की एक खास बातमी सांगायची आहे, उद्या प्रत्यक्ष भेटू तेंव्हा सांगेन. ते अजुन सांगितलंच नाहीस.'

आरोही : ' काय गं मावशी, काय बातमी आहे सांग ना? व्ही आर एस घेणार आहेस की काय?'

सविता : ' ( आरोहीला ) नको गं बाई तो विषय काढूस. मला घरी बसून वेड लागेल. चालतेय तितके दिवस चालू दे नोकरी. ( सुमित्रा कडे पहात ) अगं तुला ती रजनी आठवते का? वेंगुर्लेकर गं? तुझ्याबरोबर चिरमुल्यांच्या कडे पण येत होती थोडे दिवस?'

सुमित्रा : ( एकदम आनंदाने) सापडली की काय ती तुला? कुठे असते? काय करते? तुला कशी भेटली?

सविता : 'अगं हो, हो, हो, जरा दमाने घे! सोमवारी तिचा फोन आला मला. पाटण्याला असते ती. दोन तीन दिवसांकरता मुंबईत आली होती. बँकेतच आहे ती. तिनेच पत्ता काढला माझा अन ऑफिसमधे फोन केला. अविनाशरावांशी पण बोलले म्हणाली.'

सुमित्रा : ( वैतागाने ) बघ, ह्यांचं नेहेमीचंच आहे. कुठलेही निरोप वेळेवर देणार नाहीत. तुला आठवतंय का'

सविता : ( सुमित्राला मधेच थांबवत) झाली का सुरुवात? मी सांगतेय ते ऐकायचं राहिलं बाजुला. अविनाशरावांच्या कागाळ्या सुरू. ( हसत ) तुझंही नेहेमीचच आहे.

सुमित्रा :'बरं, बरं तू सांग पुढे. काय म्हणाली रजनी?'

सविता : 'तिचं लग्न झालं त्यानंतर तू तिला शेवटचं कधी भेटली होतीस?'

सुमित्रा : 'लग्नानंतर एक दोन वेळाच भेटलो होतो आम्ही. तिच्या नवर्‍याला तिने तिच्या जुन्या मित्र मैत्रिणींशी बोललेलं आवडत नव्हतं. अन तिने एखादे वेळी आडून आडून सांगितलं असतं कदाचित पण एकदा आम्ही सगळ्याजणी मंगळागौरीला जमणार होतो जयश्री च्या घरी. मी अन अजून एक मैत्रीण मिळून रजनीला न्यायला तिच्या सासरी गेलो. तर तिचा नवरा आमच्यावर ओरडला होता. ' मोठ्या घरची सून आहे रजनी आता. तुमची चाळकरी मैत्रीण नाही. तिला तिच्या सासरच्या रिती भाती शिकायला लागतील. आल्या मोठया मंगळागौरीला न्यायला.' आम्ही जास्त वेळ थांबलो तर रजनी ओक्साबोक्शी रडणार हे स्पष्ट दिसत होतं. लगेच निघालो आम्ही. रजनीच्या सासूबाई ऐकत होत्या पण त्यांनी देखील आम्हाला थांबवलं नाही की आपल्या लेकाला काही म्हणाल्या नाहीत. तीच माझी अन तिची शेवटची भेट. तिच्या नवर्‍याबद्दल बरंच काही ऐकायला येत असे नंतरची काही वर्षं. तिचे सासरे गेले तेंव्हा पेपर मधे आलं होतं बरंच. तिचा नवरा ही वारला असं ऐकलं होतं उडत उडत. कशी आहे गं आता? गाणं तर सोडलंच होतं तिने लग्नानंतर. आता पाटण्याला कशी काय पोचली ती? अन मुलं बाळं ?'

सविता : 'आरोही, बेटा अजून एक कप कॉफी आण करून. रजनीची सगळी कहाणी सांगायची म्ह़णजे घसा सुकणार माझा '. ( आरोही जाते )
सविता : ( सुमित्रा कडे बघत ) 'अगं एखाद्या कादंबरीत शोभेल अशी कहाणी आहे ग तिची.'
सुमित्रा : अगं तिच्या लग्नाची सुद्धा एखाद्या कादंबरी सारखीच कहाणी होती की. तुला आठवत असेलच की सगळं.
सविता : ( एक निश्वास टाकून ) तसं नाही गं. तिच्या लग्ना पर्यंतची गोष्ट योगिनी जोगळेकर किंवा स्नेहलता दसनूरकरांच्या कादंबरीत शोभून दिसली असती. पण नंतरची ही सगळी कहाणी म्हणजे शरतचंद्रांच्या कादंबरी सारखी आहे.

सुमित्रा : म्हणजे?

सविता : अगं वसंत हट्टंगडीला ती आवडली होती तेंव्हा तो कसा तिच्या मागे लागला होता? तिच्या साठी चिरमुल्यांच्या घराच्या बाहेर, तुमच्या कॉलेजच्या बाहेर तिची वाट पहात असायचा. तिच्या गाण्यावर, तिच्या रूपावर तो भाळला होता. ती बिचारी सरळमार्गी मुलगी होती. वसंत सारखा मुलगा आपल्या मागे लागेल असं तिच्या कधी स्वप्नातही आलं नसेल.

सुमित्रा : असा विचार येइल तरी कसा? वडील शाळा मास्तर, आई घरी शिकवण्या करायची. रजनी धरून सहा बहिणी. सगळ्यात धाकटा भाउ. रजनीच्या वरच्या दोन बहिणींची लग्न लावताना वडील मेटाकुटीला आले होते. रजनी हून धाकटी सुरेखा तुझ्याच वर्गात होती ना. खरं तर रजनी पेक्षा दिसायला तीच सुंदर होती.

सविता: अगं पण वसंत रजनी च्या गाण्यावर पण लट्टू होता नं. म्हणजे, त्यावेळी तरी सगळ्यांना तसंच वाटत होतं बरं का.

सुमित्रा: अगं चिरमुल्यांकडे गाणं शिकायला येत होता तो! पंडित हट्टंगडींचा मुलगा अन चिरमुल्यांकडे शिकणार? हट्टंगडी म्हणजे फक्त किराणा घराणं मानणारे. अन मास्तर म्हणजे तुला माहितच आहेत. त्यांना कुठलंही संगीत वर्ज्य नाही. एल्व्हिसच्या सुद्धा प्लेटी असायच्या त्यांच्या कडे.

आरोही ( कॉफी घेऊन येते) :अगं आई आता सी डी चा जमाना आला अन तु मात्र रेकॉर्ड म्हणायला पण तयार नाहीस. प्लेटी काय म्हणतेस?

सविता:पुरे पुरे बरं नवा जमाना. आजही हट्टंगडींच्या जुन्या प्लेटींना जी किम्मत आहे ती तुमच्या सी डींना नाही हो.

सुमित्रा: पुढे सांग ना. उगाच नवीन अन जुन्याचा वाद नका घालू दोघी.

सविता: अगं इतकं जाहीरपणे प्रियाराधन करायचा तो! रजनीच्या वडिलांच्या कानावर गेली बातमी तेंव्हा ते काय भडकले होते. सुरेखाकडनं कळत असे ना आम्हाला. आठ दिवस रजनी ला कॉलेजला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं.

सुमित्रा : हो ना गं. एकुलता एक मुलगा, एका मुली पायी डोक्यात राख घालून बसला तर या विचाराने शेवटी वसंताची आई कोणाला न सांगता एकटीच गेली होती वेंगुर्लेकरांकडे. रजनी त्यांना प्रथमदर्शनीच पसंत पडली. वसंताची आई स्वतः भेटायला आली, काही आढे वेढे न घेता ,कसल्या ही अटी न घालता त्यांनी मुलगी पसंत असल्याचं सांगितल्यावर देखील वेंगुर्लेकर मास्तर तयार नव्हते. मुलीनी हौस म्हणून गाणं शिकणं, कॉलेजच्या कार्यक्रमात वर्षाकाठी एखाद दुसरं गाणं म्हणणं वेगळं अन हट्टंगडींसारख्या संगीतमय घरात मुलगी देणं वेगळं. परत जात वेगळी वगैरे होतंच.
सविता : काय कार्यक्रम चालायचे नै पंडितजींचे तेंव्हा. कलकत्त्याच्या कॉन्फरंसमधे शेवटच्या दिवशी गायचा मान त्यांचाच असायचा कित्येक वर्षं. कोल्हापूरला, इंदूर- उज्जैनी ला, लखनौला सारख्या मैफिली होत. त्यांच्या इतकेच त्यांच्या गाण्याचे चहातेही प्रसिध्द. काय एकेक किस्से ऐकलेत तेंव्हा आपण.

सुमित्रा: पण काही म्हण वसंताच्या गाण्यात काही दम नव्हता. पंडीतजींचा आवाज सुद्धा भरदार. एकेक सूर असा पक्का लागायचा. वसंताचं गाणं म्हणजे फक्त कॉलेजात किंवा छोट्या गावातल्या गणेशोत्सवात गाण्यापुरतंच. आवाज बरा होता तसा. पण रियाझ करायचा नाही, अन उगीच नाही नाही ते प्रयोग करत बसायचा. बरं गाणं म्हणताना नाटकं पण किती? नाट्यसंगीत म्हणताना तर नाट्यसंगीत म्हणतोय की भरतनाट्यम करतोय काही कळत नसे.

सविता : अगं रजनीच्या लग्नानंतर पंडितजींनी तिला चिरमुल्यांकडची शिकवणी बंद करायला लावली. ते स्वत: तिला शिकवत. तिच्या गाण्यावरचे बाकीचे संस्कार काढून त्या जागी किराणा अन फक्त किराणा घराणं रहावं असा त्यांचा अट्टाहास.नवर्‍याच्या प्रेमापायी अन सासर्‍यांच्या नाव लौकिकाला दबून तिने तेही सहन केलं. मोठं घर, येणारे जाणारे चिकार. ते सर्व सांभाळून रियाझ करावा लागे. जरा चूक झाली की पंडितजी आरडा ओरडा करत. हाताला लागेल ते फेकून मारत. पुन्हा चिरमुले मास्तरांचा उद्धार ठरलेला. पण वर्षा दोन वर्षात ती एकदम किराणा घराण्याच्या रंगात पूर्ण पणे रंगून निघाली.

सुमित्रा : पण कधी नाव ऐकलं नाही तिचं. मी पण माझ्या संसारात बुडले होते म्हणा. मला कोणी सांगितलं नाही चिरमुल्यांची शिकवणी बंद करायला. पण सासूबाईंना माझं गाण शिकणं फारसं आवडत नसे. घरचं सगळं सांभाळून शिकवणीला जाणं, रियाझ करणं पण जमेनासं झालं. तरी कशी बशी जात होते थोडे दिवस. पण आरोही झाल्यावर बंदच पडली माझी शिकवणी सुद्धा.

आरोही : पण मला आठवतंय तेंव्हापासून तर तू घरी गाण्याचे क्लास घेत आहेस आई. ते कसं काय चाललं आजीला?

सुमित्रा : चोंबडेपणा करू नकोस उगीच. ( हसत) चालवून घेतलं त्यांनी नाईलाजाने! तू शाळेत जायला लागलीस त्यानंतर सुरू केले मी क्लासेस.तोपर्यंत त्यांना माझी अन मला त्यांची सवय झाली होती.

सविता : ती जसजशी पंडितजींच्या हाताखाली तयार होऊ लागली तसतसं वसंताचं गाण्यातलं लक्ष उडू लागलं गं. पंडितजींची तालीम फार कडक असे. जबरदस्त रियाझ करुन घेत. वसंताला ती डिसिप्लिन पेलवेनाशी झाली. त्याचं मित्राबरोबर फिरणं, पार्ट्या करणं वाढत गेलं. कुठल्या कुठल्या गाण्याच्या कार्यक्रमांना म्हणून जात अन जातील तिथे दारू पिउन दंगा करीत. गाण्याच्या नादात कोठ्याची पायरी सुद्धा चढायला लागला तो.

सुमित्रा : ( किंचीत गोरी मोरी होऊन , आरोहीला ) कप घ्यायचा नाही का मावशी च्या हातून?

आरोही : आई , आता मी अजून शाळकरी मुलगी आहे का? मावशीने कोठ्याचा उल्लेख केल्यावर मला लगेच स्वैपाकघरात पिटाळायला? मास्तरांच्या पण दोन बायका होत्याच ना? नूर बीबी ने किती ही दोन्ही खांद्यांवरून पदर लपेटून घेतला तरी तिच्या साडी नेसायच्या पद्धतीनेच कळत असे की ती वेगळीच आहे म्हणून.

सविता : खरं आहे तिचं. आता लहान आहे का ती? तिला काय कळत नाहीत का असल्या गोष्टी?
सुमित्रा : बरं बरं पुढे सांग.
सविता: काय सांगायचे रजनीच्या दुर्दैवाचे दशावतार ? रजनीची गाण्यातली प्रगती तिच्या सासूलाही खुपू लागली. त्या रजनीचा दुस्वास करायला लागल्या. आपल्या लेका पेक्षा तिची प्रगती जास्त होते हे तिला सहन होईना. पंडीतजींचे इतर शिष्य ही तिच्यावर जळत.वसंताला ही हे सर्व कळत होतं. आपली लायकी त्याला पुरेपूर माहिती होती. पण बायको समोर उणेपणा कसा कबूल करणार?

सुमित्रा : पुरुषाची जातच अशी. बायको जरा वरचढ झालेली चालणार नाही. मग करूच नये आपल्या पेक्षा वरचढ मुलीशी लग्न!

सविता : लग्ना अगोदर ज्या गुणांची मोहिनी असते तेच तर लग्नानंतर नकोसे होतात. हिंदी मराठी सिनेमा मधे सुद्धा पहा ना? किती गुणी नट्या, पण लग्नानंतर चित्रपट सन्यास घेतात.

सुमित्रा : पण रजनी ने मैफिलीत वगैरे गाणं म्हटल्याचं कधी ऐकलं नाही मी.

सविता : पंडितजींची शिस्तच तशी बाई. त्यांची पूर्ण खात्री झाल्या खेरीज जाहीर कार्यक्रम करू देत नसत. सगळ्याच शिष्यांबद्दल हा नियम होता त्यांचा. चुकून कोणी त्यांच्या परवानगी शिवाय केलाच कार्यक्रम तर परत दारात उभं करत नसत. त्यांना वाटलं तरच ते एखाद दुसर्‍या खाजगी मैफिलीत आपल्या शिष्याला गायची संधी देत. तिथे जर सगळं नीट निभावून नेलं तर मग पब्लिकच्या पुढे गायची परवानगी मिळे. त्यात सुद्धा पंडितजीच राग, चीजा ठरवत. त्याबरहुकूम गायला लागे. म्हणूनच ना त्यांचे शिष्य अगदी मोजकेच असायचे, आहेत.

सुमित्रा : मग वसंता कसा गं गायचा वाटेल तिथे?

सविता: अगं त्याला आईची फूस होती. त्या रदबदली करत पंडितजींजवळ लेकासाठी. अगदीच पंडितजींनी नाही ऐकलं की त्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग करत. पंडितजींची पण दुसरी बायको होती ना

सुमित्रा : काय सांगतेस? पंडित उपेंद्रराव हट्टंगडींची दुसरी बायको?

सविता: तुला जसं माहितच नाही?

सुमित्रा : मला कसं माहीत असेल? गाण्याच्या क्षेत्रात काय नियम आहे का प्रत्येक प्रसिद्ध कलाकाराला दोन बायका असल्याच पाहिजेत असा? अन सगळेच काय चिरमुल्यांसारखे दोघीना राजरोसपणे एकत्र नांदवतात?

सविता : पंडितजी अन राजरोसपणे अंगवस्त्र वागवणार? शक्यच नाही. अगं इतके कडक अन कर्मठ होते ते. अन त्यांची ही दुसरी बायको कलावंतीण. अंकोल्याच्या देवळातली. पंडितजींकडे गाणं शिकायला पाठवलं होतं तिच्या आईने. आधी पंडितजी तयारच नव्हते तिला गाणं शिकवायला. पण तिचा आवाज ऐकून ते कबूल झाले होते. तिला गाणं शिकवता शिकवता ते कधी तिच्या प्रेमात पडले ते त्यांनाच कळलं नव्हतं. पण मांजर जरी डोळे मिटून दूध पीत असलं तरी दुनिया बघतच असते ना. काशीबाईंनी त्यांना चांगलं फैलावर घेतलं होतं. घर सोडून जाण्याची धमकी दिली.

सुमित्रा : आपण लहान होतो तेंव्हाची गोष्ट असेल ही. त्या काळी कसा काय गं धीर झाला असेल त्यांना? चिरमुल्यांच्या पहिल्या बायकोने गपचूप नूर बीबी ला घरात घेतलं होत. धाकट्या बहींणी सारखं वागवतात तिला.

सविता : काशीबाईंचे वडील मोठे नावाजलेले वकील होते बेळगावात. माहेरचा भक्कम आधार होता त्यांच्या पाठीशी. अन उपेंद्ररावांनासुद्धा आपली चूक उमगत नव्हती असं नाही. पण त्यांना मोहावर काबू ठेवता आला नाही येवढं खरं. शेवटी अंकोलेकरणीची परत अंकोल्याला रवानगी केली पंडितजींनी. पण त्यांना तिच्या वाचून रहावेना. एक दोनदा कार्यक्रमाचा निमित्त सांगून ते अंकोल्या जाऊन तिला भेटून आले. त्याही गोष्टी काशीबाईंच्या कानावर गेल्या वाचून राहिल्या नाहीत.


कमाल! फार म्हणजे फारच सुरेख आहेत तुझ्या सगळ्या कथा! बहोत खुब! एकदम पु. ल. स्टाईल लिखाण वाचतोय असं वाटलं!



एकदम पु लंशी बरोबरी नको बुवा. तेव्हढी माझी लायकी नाही. मी काही तरी खरडते, चार लोकं वाचतात, आवडलं म्हणतात, क्वचित कोणी अजून लिही म्हणतात यातच आनंद आहे. पु लंच्या लेखनाने जितकं हसवलंय, जितकं रडवलंय अन जितकं स्वतःवर हसायला शिकवलंय तितकच पुरे.



सविता: रागाने माहेरी निघून गेल्या होत्या त्या वसंताला घेऊन. पंडितजींची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर होईन बसली. सासरी जाऊन बायकोला समजवून आणायचं म्हणजे स्वतःची चूक कबूल करायला लागली असती. सासर्‍यांचा जमदग्नी अवतार पाह्यला लागला असता. न जावे तर बायको स्वतःहून येणार नाही. शेवटी त्यांच्या एका मित्राने मध्यस्थी केली होती अन काशी बाईंना परत आणलं होतं. महिना दोन महिने व्यवस्थित गेले असतील. परत कुठल्याशा दौर्‍यात मनोरमा पंडितजींना येऊन भेटल्याचं काशीबाईंच्या कानावर आलंच. आता माहेरी जाऊन सुद्धा काही फरक पडणार नाही हे त्या उमजल्या. पंडितजी परत आल्यावर कडाक्याचं भांडण झालं नवरा बायकोचं. पंडितजींचं म्हणणं असं की ते मनोरमेच्या गाण्यावर, आवाजावर भाळले होते. त्यांनी काशी बाईंना काही कमी पडू दिलं नव्हतं, सांसारिक जबाबदार्‍या सर्व निभवत होते. काशीबाईंना आपला हक्क अबाधित रहायला हवा होता. लपून छपून भेटी गाठी करता करता ती कधी घरात येईल किंवा पंडितजी तिच्या साठी दुसरं बिर्‍हाड करतील काय भरोसा?

सुमित्रा : मग शेवटी माघार कोणी घेतली?

सविता: दोघेही आपापल्या परीने अडून बसले होते गं. गाण्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. शेवटी त्यांचा नेहेमीचा तबलजी होता गणपती कामत, त्याने दोघांचीही कान उघाडणी केली होती. तिला घरात घ्यायचं नाही , बाहेर गावी मैफिली ला गेल्या ठिकाणी तिला भेटायचं नाही, घरी सांगून सवरून एखाद दोन दिवसासांठी तिच्याकडे जाता येईल, तिने पंडितजींचा गुरू म्हणून उल्लेख करता कामा नये अशा बर्‍याच अटी घातल्या होत्या काशीबाईंनी अन नवरा बायकोची दिलजमाई झाली होती. गणपती कामत काशीबाईंना वकिलीण म्हणत असे कित्येक दिवस.

सुमित्रा : तुला बरी गं येवढी माहिती? अन मला कधी बोलली नाहीस ते?

आरोही ( स्वैपाकघरातून येत ): अगं तुमचं पुराण अजून चालूच आहे का? मावशी, काकांना पण इकडेच यायला सांग ना. बाबा येतीलच इतक्यात. जेऊनच जा तुम्ही. आज मी करते काहीतरी.

सुमित्रा: नशीब आहे बुवा मावशीचं. आज भाची स्वतः स्वैपाक करते म्हणतेय. एरवी स्वैपाकघर कुणीकडे आहे ते पण माहित नसतं तुला.

सविता: बरं, तूच लाव फोन तुझ्या काकांना अन त्यांची काय काय फरमाईश आहे तेही तूच बघ. बरं मी काय सांगत होते?
( आरोही जाते )
सुमित्रा : पंडितजींच्या प्रेम प्रात्राबद्दल सांगत होतीस. त्या सगळ्याचा रजनीशी काय संबंध आहे ते काही मला कळलं नाही, पण तुझी सुरस आणि चमत्कारिक कथा चालू दे. नाही तर परत मला दम देशील.

सविता : अगं तेच तर सांगतेय. वसंताने काही केलं तरी काशी बाई त्याला पाठीशी घालत. पंडितजींनी विरोध केला की लगेच ' निदान लग्नाच्या बायकोला वागवतोय तरी.' किंवा तत्सम टोमणे ठरलेले. उपेन्द्ररावांनी कुठल्या तरी देवळात जाऊन मनोरमेशी लग्न लावल्याच्या अफवा त्यांनी ऐकल्या होत्या. पंडितजींनी कितीही नाकारलं, गणपतीची साक्ष काढली तरी त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे वसंता एकदम बहकत गेला. बड्या घरचा मुलगा, दिसायला देखणा, कायम खिशात खुळखुळणारे पैसे. त्यामुळे मित्रांच गराडा चिकार. ते सगळे टोळभैरव वसंताच्या पैशाने मजा करायला टपलेले असायचे. सुरवातीला गाण्या करता म्हणून कोठ्यावर, तमाशाला इथे तिथे जात असे. हळूहळू गाणं बाजूलाच राहिलं अन गाणे वाली करता कुठल्या कुठल्या पायर्‍या चढू लागला वसंता. रजनीचा सासूरवास वाढतच चालला. भरीस भर म्हणजे लग्नाला बरीच वर्षं उलटून गेली तरी मूलबाळ नव्हतं. सासूचे टोमणे ऐकावे लागत. कुठे जाऊन चेकप वगैरे करायचे दिवस नव्हते ते. सगळेच बाईवर दोष टाकून मोकळे होत. दारू, सिगरेट, रात्रीची जागरणं या सगळ्या पायी वसंताची तब्येत ढासळत होती. पंडितजींचं पण वय झालं होतं, आवाज पूर्वीसारखा लागत नसे, मुंबईबाहेरचे दौरे झेपत नसत. त्यांनी रजनीला बरोबर न्यायला सुरुवात केली. तिला साथीला घेत, कधी एखादी चीज पेश करायला सांगत. हळू हळू तिचं नाव होऊ लागलं.

सुमित्रा : मी कधी नाही ऐकलं ते? कुठे काही छापून आलं असेलच ना.

सविता : अगं वर्तमान पत्रांनी दखल घ्यावी असे मोठे कार्यक्रम करेनासे झाले होते ते त्या सुमारास.



उद्यापासून आठ दिवस मिकी माउसच्या गावाला जाणार. तिथून आल्यावर उरलेला भाग पूर्ण करेन.



वाट बघतेय केव्हा परत येणार!
मिकीमाऊसचे गाव enjoy करा.



अग अग शोनु कुठे चाल्लि
थांब जरा इथे मला भुक लगलि
कथा सगळ्या झाल्या वाचुन एकहि नाहि शिल्लक
लवकर लवकर खालि कर गं तुझ गुल्लक