जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 January, 2013 - 05:28

खडा वा धान्य भरडू दे, कशाचे काय जात्याला
जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला

जुनी पत्रे, जुना अल्बम, जुनी मीही, जुनेरे मन !
नव्याने जन्म दे अथवा नवा दे अर्थ नात्याला

शिका-याने शिकारीचे असे औचित्य साधावे
स्वतःचे प्राण लावावे कधी काढून बाणाला

कितीदा आरसा माझ्या मनाचा लख्ख मी करते
कितीदा चेहरा त्याचा भुलवतो तोच पा-याला

फुलांचा गंध किंवा रंग किंवा रूप नसते... पण
स्वतःचे वेगळे अस्तित्व या प्रत्येक काट्याला

सुन्याश्या मैफिली माझ्या कशी येईल मादकता
कधी ओसंडुनी वाहेल का निम्मा रिता प्याला

कमालीची निरर्थकता मनाला ग्रासते आहे
जिण्याचा अर्थ समजावेल का कोणी खरा त्याला

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी एक अतिशय उत्कृष्ट गझल! बहुधा, तुमच्या सगळ्या गझलांमध्ये अधिक आवडलेली गझल. सर्व शेर आवडले. अभिनंदन सुप्रिया.

स्वच्छ वृत्त हाताळणी, थेट अर्थ आणि उत्तम प्रतिमा विश्व! गांभीर्यपूर्वक मांडलेले खयाल.

अनेक शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

वाह वावा !!!

मला सगळ्यात जास्त आवडलेली तुमची तिसरी गझल... भिंती आणि वादळे नंतर.

..................................................................

खडा वा धान्य भरडू दे, कशाचे काय जात्याला
जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला

जुनी पत्रे, जुना अल्बम, जुनी मीही, जुनेरे मन !
नव्याने जन्म दे अथवा नवा दे अर्थ नात्याला

कमालीची निरर्थकता मनाला ग्रासते आहे
जिण्याचा अर्थ समजावेल का कोणी खरा त्याला

सुंदर शेर आहेत. खूप आवडले.

वृत्त हाताळणी, सहजता ह्यासाठी खास अभिनंदन.

गांभीर्यपूर्ण खयालांबद्दल बेफिकीर ह्यांच्याशी सहमत.

आपली गझल दिवसेंदिवस बहरत चालली आहे, अनेक शुभेच्छा!

बाकीच्या शेरात कुठे काय किंचित कमी आहे(माझ्यामते) ह्याची आपल्याशी प्रत्यक्ष चर्चा करायला आवडेल, अर्थातच आपली इच्छा असल्यास. हे मुद्दाम दाखवून देण्यासाठी नव्हे तर गझल खूपच वरच्या दर्जाची आहे म्हणून म्हटलो. गैरसमज नसावा

बेफीजी, शशांक, शाम, विदिपा....

<<<<आपली गझल दिवसेंदिवस बहरत चालली आहे, अनेक शुभेच्छा!>>>>

विदिपा माबोवरील आपल्या सगळ्यांच्या योग्य सुचवणींचाच तर परिपोष आहे हा !

चर्चा करायला मलाही आवडेल खचित...पण अर्थात विपुतून...नाहीतर परत यावरुन एक नवा धागा निघेल. Happy

मनःपुर्वक ऋणी आहे आपल्या सगळ्यांची.

-सुप्रिया.

माते _/\_ Happy

गज़ल मुरतीये.. दिवसेगणिक...
मतल्याबद्दल काय म्हणू...

खडा वा धान्य भरडू दे, कशाचे काय जात्याला
जसे येते तसे घ्यावे 'प्रिया' आयुष्य वाट्याला>> सेम कमेंट .. हिअर इज सुप्रिया!!!

जुनेरे मन>>> क्लास.. क्लास सुप्रिया...व्वाह! त्या मिसर्‍यात ह्या शब्दांचा वापरच चपखल!!

ह्या पुढचाही प्रत्येक शेर खणखणीत...

तुझ्या प्रतिभेला सादर प्रणाम!!!

कमालीची निरर्थकता मनाला ग्रासते आहे
जिण्याचा अर्थ समजावेल का कोणी खरा त्याला <<< व्वा ! >>>

आवडली गझल

शिका-याने शिकारीचे असे ऑचित्य साधावे
स्वतःचे प्राण लावावे कधी काढून भात्याला >> भात्याच्या पेक्षा "बाणाला" जास्त बरोबर वाटले असते.

कमालीची निरर्थकता मनाला ग्रासते आहे
जिण्याचा अर्थ समजावेल का कोणी खरा त्याला

अतिशय सुंदर.
गझलही.

गझल मुरतीय - अशी काँप्लिमेन्ट प्रथमच वाचायला मिळाली गझलेसाठी:-)

(याला टीका समजू नये, फक्त असा अभिप्राय प्रथमच बघितला इतकेच म्हणायचे आहे)

<<<<गझल मुरतीय - अशी काँप्लिमेन्ट प्रथमच वाचायला मिळाली गझलेसाठी:-)>>>>

अश्या दिलखुलास अभिप्रायानेच तर नवीन गझल स्फुरते बेफीजी Happy

धन्स बागेश्री Happy

प्राजु, अनंत ढवळेजी, स्वराली, मंदार खरे (विशेष-निवडक १० साठी) Happy

मनःपुर्वक आभार!

-सुप्रिया.

सुप्रियाताई आवर्जून ह्या गझलचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद... सुटली होती नजरेतून Sad

सुंदर झालीय ही गझल... जुनेरे मन , शिकारी तर मस्तच पण शेवटचा शेर बेहद्द आवडला... अभिनंदन

खुपच सुंदर गज़ल! गज़ल कशी असावी, काव्य कसे असावे याचा अप्रतिम नमुना वाटली! धन्यवाद!

फारच सुंदर आणि दमदार गझल. Happy

(आष्टगावच्या मुशायर्‍यात बहुधा तुम्ही हीच गझल सादर केली होती. Happy )

Pages