ओढ...!

Submitted by बागेश्री on 26 December, 2012 - 07:55

पावलांना कुठलीच आणि कशाचीच ओढ नसली की,
जगण्याचे संदर्भ बदलतात..!

स्वतःतच रमण्याची ही संधी मानावी की सर्व काही गमावल्याचं द्योतक,
ह्या प्रश्नांत गुरफटून जायला होतं!

ओढीनं ओढलं जाणारं आयुष्य, आपल्यासकट वेळेला घेऊन धावत असतं,
काळाच्या चक्राची पाती भराभर फिरतात....

ओढ सरली, की मग मात्र
घरातून चोरी गेलेल्या सामानानंतरची भकास पोकळी दाटते...

ह्या पोकळीतच उदास श्वास घुटमळू द्यायचे की स्वतःचा, स्वतःपुरता नवा डाव मांडायचा -
हे ठरवायला हवंच!

---------------------------------------------------------------

-ब्लॉगवरही प्रकाशित: वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..

पाऊलांना ऐवजी,''पावलांना'' असं केल्यास बरं होईल.

बागे

प्रगल्भ स्फुट !!
उपमा सुंदर... घरातून चोरी गेलेलं सामान हे बदलता आलं तर ? असलं तरी बिघडत नाही कारण आशय पोहोचवतंय ते.

(डोक्याला मुंग्या येतात हे असं वाचायला. खूप काळजीपूर्वक वाचावं लागलं. इतक्या वेळात प्रा. च्या दहा गझला वाचून झाल्या असत्या.)

सुंदर आहे मुक्तक, बागेश्री. ओढीनं ओढलं जाणारं आयुष्यं... अगदी अगदी.
<<घरातून चोरी गेलेल्या सामानासारखी पोकळी>> जितका अधिक विचार करतेय तितकं हे अधिकच समर्पक वाटतय.
असोशीनं, कौतुकानं, काडी काडी करीत जमवलेली प्रत्येक गोष्टं. त्यामागे आठवणी गुंतलेल्या... अनेक जवळचे, दूर गेलेले, सखे-सोबती, काही हव्याहव्याशा आठवणे अन काही नकोश्याही. प्रत्येकाला बांधून ठेवलेली एक "ओढच"... कधी सोन्याची तर कधी काट्यांची.
हे सगळं क्षणात गमावून रितं झाल्याची पोकळी अजून कशी असणार?
मजा आया... बागेश्री.

>>ओढ सरली, की मग मात्र
घरातून चोरी गेलेल्या सामानानंतरची भकास पोकळी दाटते.>>..
नित्यप्रत्ययाचे..
सुंदर.

राजस कल्याणकर यांची एक कविता आठवली ..
अशीच सुंदर.तीच प्रगल्भता,विषय जरासा वेगळा..शेअर करावीशी वाटली.
तू आत आलास
तेव्हा माझं सामान मी बांधून ठेवलं होतं.
रिकाम्या घरातून मारावी शेवटची व्याकूळ फेरी
तशी एकवार पाहून घेतली होती माझ्या आतली सुनी वसाहत.
सगळी खिडक्यादारं घट्ट लावली होती
जबर दरोडा पडून गेल्यानंतर सुचलेल्या शहाणपणासारखी.
आता निघणार-
एवढ्यात तू आलास.
जाताजाता अशी कुठली बिळं बुजवायची राहून गेली होती..

ललिताने गुंगवले. ललित आवडले. (पावलांना - याच्याशी सहमत). तुमच्यासारखेच नाजूक व गंभीर ललित. उगाच शाब्दिक फाफटपसारा न आणता थेट मुद्यावर पोहोचवणार्‍या ओळी आहेत. पहिल्या ओळीवर रेंगाळलो. पहिल्या ओळीतील मुद्यावर चर्चा करायची नेहमीसारखीच इच्छा आहे. पण त्याला काही जण कीस काढणे म्हणतात म्हणून विपूमध्ये करेन किंवा बघू नंतर! समीरनेही दाद दिली आहे यात सगळे आलेच म्हणा!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

प्रत्येक प्रतिसाद खूप खास वाटला...
आभार मानून मोल कमी करत नाही... लोभ असू द्या हे मनापासून म्हणतेय! Happy

बेफी,
जे वाटलं ते लिहा अगदी बेफिक्रीने, मला वाचायला/चर्चा करायला आवडेलच.. Happy

(..आणि हो, ते 'पावलांना' असं बदलंलय.. थँक्स डॉक आणि बेफी)

सुंदर स्फुट!
इतके दिवस काय उत्तर देऊ म्हणून प्रतिसाद द्यायची थांबले होते. अजूनही नक्की काय उत्तर देऊ समजत नाही. तेव्हा म्हटले निदान वाचल्याची पोचपावती द्यावी.! Happy

दाद, भारती,
सुरेख प्रतिसाद!

Happy

दीपक,
तुझा प्रतिसाद... !! Happy

शुभा
छान वाटलं गो.. आवर्जून वाचतेस अन कळवतेस हे खूप आहे..

जान्हवी Happy

मनातली उलथापालथ 'आत्मानुभूती' वाटावी इतकी प्रभावीपणे मांडलेली आहे.

भारती ह्यांनी दिलेली कवितासुद्धा तितकीच प्रभावी आहे, आवडली. शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

pranu, इथे नेहमी येत गेलात की जमेलच की Happy
विदिपा Happy
रणजित, जाई, श्रुती.. अनेक दिवसानंतर दिसलात लिखाणातल्या प्रतिसादांत.. Happy