अज्ञेयाचें रुद्धद्वार -स्वा. सावरकर

Submitted by भारती.. on 4 December, 2012 - 14:55

अज्ञेयाचें रुद्धद्वार -स्वा. सावरकर
========
ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे
ऐकोनि तुझ्या भाटांच्या
गप्पांसि गोड त्या त्यांच्या,
व्यापांसि विसावा माझ्या
जीवासि ये घरीं तुमच्या
ठोठावित थकलो! अजुनि नुघडती बा रे |आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ॥१॥
विस्तीर्ण अनंता भूमी
कवणाहि कुणाच्या धामीं
ठोठावित बसण्याहूनी
घेईन विसावा लव मी
येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे |हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ॥२॥
ज्या गाति कथा राजांच्या
सोनेरि राजवाड्यांच्या
मी पथें पुराणज्ञांच्या
जावया घरा त्या त्यांच्या
चाललो युगांच्या क्रोशशिला गणितां रे |तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ॥३॥
दुंदुभी नगारे शृंगे
गर्जती ध्वनीचे दंगे
क्रांतिचे वीर रणरंगे
बेभान नाचती नंगे
मी जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे | अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ॥४॥
कोठूनि आणखी कोठे
चिंता न किमपि करिता ते
ही मिरवणूक जी मातें
नटनटुनि थटुनि या वाटे
ये रिघूं तींत तों नाचतानाचता मारे | पथ शिरे स्मशानी! ज्यांत तुझें ते घर रे ॥५॥
सोडुनी गलबला सारा
एकान्त पथा मग धरिला
देताति तारका ज्याला
ओसाडशा उजेडाला
चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे |अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ॥६॥
जरि राजमार्ग जे मोठे
तुझियाचि घराचे ते ते
घर अन्य असेलचि कोठे
या अरुंद आळीतुनि तें
मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे | हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ॥७॥
घर दुजे बांधु देईना
आपुले कुणा उघडीना!
या यत्न असा चालेना
बसवे न सोडुनी यत्ना
ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे | तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे 8||

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्यवीर सावरकर, मानवी अस्तिवाचा एक प्रगल्भ आविष्कार. आयुष्याला परिमाणे क्रांतीकारी योद्ध्याची, महाकवीची, द्रष्ट्या नेत्याची, समाजसुधारकाची, प्रकांडपंडिताची, एका माणसाच्या आत ही इतकी गर्दी. १८८३ मधला जन्म ते काळ्या पाण्याच्या (पन्नास वर्षांच्या !! एकमेव तिथेही एवढी शिक्षा ठोठावली जाण्यात! ) शिक्षेत सूट मिळून स्थानबद्धतेत रत्नागिरीला पुनरागमनाच्या १९२३ या वर्षापर्यंतचे उणेपुरे चाळीस वर्षांचे जीवन अग्निपरीक्षेसारखे.. नंतरचा विजनवास स्वदेशातलाच ! ( 'विजनवासी' हेच तर त्यांनी कवी म्हणून घेतलेले टोपणनाव.) पुढे ८३ व्या वर्षी प्रायोपवेशन करून शांतपणे एखाद्या योग्यासारखा मृत्यूचा स्वीकार, पण समाधी नाही, तर स्वेच्छामरण. अत्यंत विज्ञाननिष्ठ, तर्ककठोर अशा या व्यक्तित्वाला क्रांतीकार्याला,देशकार्याला अग्रक्रम दिल्याने एका गोष्टीसाठी पुरेशी आंतरीक सवड मिळाली नसावी !

अज्ञाताचा शोध. पर्यायाने परमेश्वराच्या 'घरा'चा शोध.

अंधार्‍या अरण्यमार्गावरून जावे, हातातल्या विजेरीखाली फक्त पावलांखालची वाट तेवढी उजळत असावी तशी आपल्या आकलनशक्तीची गत. हे भोवतालात काय घडते आहे ? ते का घडते आहे ? या घटनाक्रमात नियती अन निर्णयांचे नेमके नाते कोणते ? कर्मविपाक कसले ? पापपुण्यांचा प्रकार काय ? मी कोण आहे ? का आहे ? परमेश्वर कोण ? तोही का आहे ? तो कुठे आहे ? तू कुठे आहेस ? तुला शोधायचे आहे. तुझ्याशी जन्मभराचे बोलायचे आहे.या आयुष्यांचा,या काळांचा,या विश्वाचा तू निर्माता नियंता ना ? माझा जन्मजन्मातला पालक ? मग माझ्या या थकलेल्या शरीर-मनाला, प्रश्नविव्हल बुद्धीला विश्रांती त्या तुझ्याच घरात, तुझ्याच मांडीवर मिळेल..

'अज्ञेयाचे रुद्धद्वार' -अज्ञाताचा बंद दरवाजा.. इथे या कवितेत आपल्याला भेटतात विशुद्ध कवी-भूमिकेतले सावरकर.प्रदीर्घ आठ कडव्यांमध्ये ते 'त्या' च्याशी संवादत आहेत, तक्रार करत आहेत. या क्षणी ते अस्तित्वाच्या कोलाहलाला विसरले आहेत, तो कोलाहल दूरच्या गलबल्यासारखा या कवितेत पाझरला आहे. पण आता फक्त ते आहेत अन तो अज्ञात विश्वनियंता. त्याचे ते 'अज्ञेयाचे घर' अन काहीकेल्या न उघडणारा त्या घराचा बंद दरवाजा.. आत्मशोधाचा कठोर न संपणारा रस्ता.त्या चक्रपाण्याच्या घराच्या चक्राकारी रस्ता. रस्त्याच्या आदिअंताच्या बिंदूवरचे ते गूढ घर.

''ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याचि ते सारे
ऐकोनि तुझ्या भाटांच्या
गप्पांसि गोड त्या त्यांच्या,
व्यापांसि विसावा माझ्या
जीवासि ये घरीं तुमच्या
ठोठावित थकलो! अजुनि नुघडती बा रे |आंतूनि तुझी तीं बंद सदोदित दारें ॥१||''

काहीसे थकून, त्रासून अन तरीही आशेच्या आसावल्या सुरात परमेश्वराचा हा प्रिय पुत्र त्याला शोधतोय..म्हणतोय, ' तुझ्याच घरातून निघून तुझ्याच घरी परतायचे असते ' असेच तर आजवर तुझ्या भाटांच्या गप्पामध्ये ऐकत आलो ! भाळलो त्या गप्पांवर, मनोमनी आसावलो की माझ्या व्यापांमधून मला विसावा मिळेल तो त्या तुझ्या घरीच.. पण ही कसली तुझी रीत.. दार वाजवून थकलो तरी ते दार आतून घट्ट बंदच. किलकिलेही झाले नाही.

चार ओळींच्या कडव्यातील प्रत्येक ओळीचे एक अंतर्गत यमक अन पाचव्या धृपदाला जोडून घेणार्‍या ओळीचे धृपदाशी यमक असे कवितेच्या घराचे बांधकाम.. . साधा वाटणारा पण संवादाची गती पेलणारा
सशक्त आकृतीबंध..

सावरकरच ते, परमेश्वरालाही थोडे खडसावतच आहेत. त्याच्या अस्तित्वाची ग्वाही देणार्‍या आस्तिकांना 'भाट' म्हणत आहेत अन त्या ग्वाहीला 'गप्पा' असे संबोधत आहेत ! प्रयत्न करूनही जे सिद्ध होत नाही ते स्वप्नरंजनच तर नाही ? पण तसे नाही. हा उपरोधिक स्वर लावतानाच कुठून तरी खोल अंतर्यामातून त्यांना परमेश्वर आपले ऐकतो आहे याची जाणीव आहे म्हणून तर या कवितेतला एकतर्फी वाटणारा संवाद खंडित होत नाही..

विस्तीर्ण अनंता भूमी
कवणाहि कुणाच्या धामीं
ठोठावित बसण्याहूनी
घेईन विसावा लव मी
येईन पुन्हा ना तुझ्या घरा ज्याची रे |हीं वज्र कठिणशी बंद सदोदित दारे ॥२॥

ही एवढी विशाल विराट पृथ्वी.. मी खूप हिंडून पाहिली रे माझ्या ज्वलज्जहाल जगण्याच्या अवकाशात. तशी अगणित घरे आहेत विश्रांती घेण्यासाठी. पण मी यातल्या कोणत्याही ठिकाणी रेंगाळणार नाही.. किती का थकवा ,प्रवास अन दिशांचे अज्ञान असो तुझे घर शोधून काढण्यात, पण तुझ्याच घरी येईन, त्याची 'वज्रकठीण' दारे ठोठावत राहेन, तू कसा उघडणार नाहीस ते पाहू. माझी भावना 'अनन्य' आहे. मला सवलत नको आहे. तुझ्याशिवाय कोणीही नको आहे कारण मला विसावा देण्याची क्षमता दुसर्‍या कशातही अन कुणातही नाही.
सावरकरांचे 'हिंडणे' - एका आयुष्याची महाभ्रमणगाथा्.. ही विशाल पृथ्वी मी खूप हिंडलो असे म्हणण्याचा अधिकार त्यांना नाहीतर कोणाला असणार? आणि ते हिंडणेही किती भयाकारी परिस्थितींनी व्याप्त. नाशिकात जन्म,पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण,लंडनला बॅरिस्टरी शिकण्यासाठी पण क्रांतीच्या हेतूने प्रयाण व अटक,मार्सेलिसची ती प्रसिद्ध समुद्रात घेतलेली उडी, फ्रान्सला अटक, पुढे अंदमान,, नंतर बंगाल व रत्नागिरीतील नजरकैद.अंतिम वर्षे मुंबईत.या अशा अफाटअचाट हिंडण्यात कवीच्या अस्तित्वकेंद्रात परमेश्वराच्या शोधाची तीव्र प्रेरणा सातत्याने निर्माण होत असते.. कुठे आहे तो या दृष्यांच्या अनुभवांच्या पसार्‍यात ? की तोच आहे तो ऊर्जास्त्रोत जो माझ्याच आतून उन्मळून वाहत होता ?

ज्या गाति कथा राजांच्या
सोनेरि राजवाड्यांच्या
मी पथें पुराणज्ञांच्या
जावया घरा त्या त्यांच्या
चाललो युगांच्या *क्रोशशिला गणितां रे |तो पथा अंति घर एक तुझें तें सारें ॥३॥

(*युगक्रोश -युगांचे कोस )

आता मोर्चा पुराणांकडे वळला आहे.. पुराणकारांनी लिहिलेल्या या गूढरम्य पुराणकथा- त्यांमधले ते विलक्षण व्यक्तिमत्वांचे,तत्वांचे राजे, ते ऐश्वर्यसंपन्न अन चित्रविचित्र स्थापत्यांच्या नेपथ्याने कथानकाला उठाव देणारे सुवर्णराजप्रासाद. मनबुद्धीला आवाहन करणार्‍या या चित्तचक्षुचमत्कारिक कथांमधून फुटणार्‍या मार्गाने जाऊन सत्य शोधावे,अभ्यासावे म्हणून किती युगे चालत राहिलो.. अन काय आश्चर्य, प्रत्येक पुराणकथेच्या विचित्रार्थांनी सळसळणार्‍या अंधार्‍या अरण्यमार्गांच्या शेवटी तुझे तेच एक घर उभे असलेले दिसले.. त्या सार्‍या पौराणिक विचार-वाटा मला पुनःपुनः तुझ्या बंद दारापर्यंत आणत राहिल्या.

तत्त्वचिंतक,सामाजिक विचारवंत सावरकर येथे पुराणकथांचे सत्त्व शोधत आहेत .'श्रुतीस्मृतीपुराणोक्त' या भारतीयांच्या व्यवच्छेदक लक्षणाची 'Up-to-date' या युरोपीय आग्रहाशी तुलना करून त्यांच्या मागासलेपणाची वेळी कठोर शब्दात जाणीव करून देणारे सावरकर स्वतः अर्थातच पुराणांचे,परंपरांचे,अगदी प्राचीन भारतीय कालमापनांचेही विचक्षण अभ्यासक होते.त्या परंपरेतील जडत्व त्यागून त्यातले चैतन्य जागवण्याचा त्यांचा अहर्निश प्रयत्न होता तो एका हिंदू राष्ट्राच्या उभारणीचा भाग. पण या साधनेत भारतीय दर्शनांच्या गूढवादी गाभ्याला टाळणे अन हेटाळणे तितके सोपे नाही हे त्यांनाही मान्य आहे. त्यांच्यातला तर्कनिष्ठ विज्ञाननिष्ठ आस्तिक येथे त्या अद्भुतरसाने भरलेल्या पुराणकथांमध्ये विखुरलेल्या ईश्वरतत्वाचा शोध घेतो आहे.

दुंदुभी नगारे शृंगे
गर्जती ध्वनीचे दंगे
क्रांतिचे वीर रणरंगे
बेभान नाचती नंगे
मी जात मिसळुनी त्यांत त्या पथें जों रे | अंतासि उभें घर तेंचि तुझें सामोरे ॥४॥

आता कवीचे स्वानुभवाकडे येणे.ही एक बेभान महायात्रा निघालीय. रणवाद्ये गर्जताहेत.रक्त उकळतेय. वीररसाने भारलेय वातावरण..तळहातावर शीर घेतलेले हे क्रांतीवीर भौतिकाची, ऐहिक लाभाची शुद्ध सोडून 'नंगे' होऊन नाचताहेत या मिरवणुकीत. माझेही रक्त तापलेय, मीही त्यांच्या रौद्र नृत्यात सामील होऊन त्यांच्याबरोबर जातो तो काय, रस्त्याच्या शेवटी तेच ते तुझे घर.. अटळपणे तिथेच पोचणे.

अगदी अल्पवयापासून घेतलेला क्रांतीचा वसा पुढे ऐन तारुण्यात भराबहराला आला.'क्रांती' हा सावरकरांचा निदिध्यास. त्यांच्या आचारविचारात, जीवनात हा क्रांतीचा अध्याय एवढ्या प्रखरपणे उतरलाय की क्रांती-सर्वांगीण- धर्मक्रांती,युद्धमय सशस्त्र क्रांती,व्यक्तिगत विचारक्रांती, समाज जीवनातील क्रांती हीच त्यांची अधिष्ठात्री देवता असावी असे वाटते . या क्रांतीचे दूत कधी त्यांना प्रेरित करीत,कधी ते या क्रांतीदूतांना. मॅझिनी,लेनिन,केमाल पाशा ,रासबिहारी बोस,सुभाषचंद्र,मदनलाल धिंग्रा,मॅडम कामा.रक्तरंजित वारीच्या या अन इतरही धीरवीर वारकर्‍यांची कितीतरी नावे सावरकर चरित्रात गुंफलेली आहेत. सावरकरांचे अध्यात्म जीवनाहून वेगळे कसे असेल? या राष्ट्रप्रेमाच्या बेहोष वारीत त्यांना त्यांचे अज्ञेय चुटपुटते गवसते आहे, परमेश्वर भासतो-दिसतो आहे..

कोठूनि आणखी कोठे
चिंता न किमपि करिता ते
ही मिरवणूक जी मातें
नटनटुनि थटुनि या वाटे
ये रिघूं तींत तों नाचतानाचता मारे | पथ शिरे स्मशानी! ज्यांत तुझें ते घर रे ॥५॥

कवीने सोडलेय आता विश्लेषण करणे. मी नाही चिंता करत. कोठून, कुठे का जात असेना.. या जीवनाच्या लोभस महायात्रेत जरा नटूनथटून मीही सामील होईन,धुंद नाचत सारे क्लेशदायक प्रश्न विसरण्याची नशा करेन असे म्हटले तो काय ! मिरवणुकीचा रस्ता थेट स्मशानात पोचला जिथे मला दिसले तेच ते ते तुझे चिरपरिचित घर अन त्याची बंद दारे.

आयुष्याचा कोलाहल अन कोलाहलातले आयुष्य. एक चकवा. शेवटी प्रत्येकाची अन समस्तांची ही रंगीबेरंगी महायात्रा संपते स्मशानात. त्या तिथे सगेसोयरे निरोप घेतात.प्रियतम देहाचीही माती झालेली असते. सोबत शिल्लक राहते फक्त परमेश्वराच्या अस्तित्वाच्या जाणिवेची. आयुष्यभर हे रहस्य उकलायला कधी वेळ मिळत नाही, कधी वेळ मिळूनही रहस्याची निरगाठ सुटत नाही. अगदी भल्याभल्यांनाही तो लबाड परमेश्वर जन्ममृत्यूच्या कोड्याचे उत्तर सांगत नाही.पण त्या स्मशानशांततेत 'तोच एक सत्य, बाकी सारी भ्रांती' हे चरचरून पटते.

सोडुनी गलबला सारा
एकान्त पथा मग धरिला
देताति तारका ज्याला
ओसाडशा उजेडाला
चढ उतार घेतां उंचनिंच वळणारे |अजि मार्ग तो हि ये त्याचि घरासी परि रे ॥६॥

स्मशानशांततेच्या अनुभवानंतर स्मशानवैराग्य येते. नको वाटतो गलबला.. कवी एकटाच एकाकी रस्त्यावर भरकटतोय अगदी कवीसारखाच. आता सर्व भूमिका निमाल्या आहेत. मनही विश्रब्ध आहे्. हा रस्ता तरी कसा ? तर 'तारकांच्या 'ओसाडशा फिकट उजेडा 'त अंधुक उजळलेला. वळत जातो, चढत उतरत जातो, पण हिंडून फिरून पोचतो तुझ्या त्या गूढ घरापाशी.

इथे सावरकरांचे शब्द प्रतिभेच्या अलौकिक प्रकाशात न्हायले आहेत. केशवसुतांच्या 'सतारीचे बोल' या कवितेतील भावावस्थेची आठवण करून देणारी ही शब्दकळा ..
(''काळोखाची रजनी होती,हृदयी भरल्या होत्या खंती;
अंधारांतचि गढलें सारे लक्ष्य, न लक्षी वरचे तारे;
विमनस्कपणें स्वपदें उचलित रस्त्यांतुनि मी होतों हिंडत;
एका खिडकींतुनि सूर तदा पडले-दिडा दा, दिड दा, दिड दा ''! !!)
..आपल्याही अंतर्यामाला स्पर्शून जाते कारण इथे ते महामानव नाहीत तर एका सामान्य पण प्रतिभाशाली कवीच्या भूमिकेत आहेत, चकित आहेत, थकले आहेत, प्रश्नांकित आहेत.

जरि राजमार्ग जे मोठे
तुझियाचि घराचे ते ते
घर अन्य असेलचि कोठे
या अरुंद आळीतुनि तें
मी म्हणुनि अणूंच्या बोगबोगद्यांतुनि रे | हिंडुनी बघे घर अन्ति तुझे सामोरें ॥७॥

थकलो रे मी हे मोठमोठे रस्ते क्रमून अन या तुझ्या बंद दरवाजांशी धडका घेऊन. नक्कीच तुझे आणिकही एखादे छोटेसे,सोपेसे घर असेल जेथे मला रिघाव मिळेल.. या आशेने मी अणुपरमाणूंच्या बोगद्यात शिरतो अन पुनः पाहतो तुझे तेच चिरपरिचित घर तेथेही..

ब्रह्मांडापासून आता अणूपर्यंतचा उलटा प्रवास करतो आहे एक विज्ञाननिष्ठ साधक.काही वेगळे गवसेलच कसे रस्ता बदलून पाहिला म्हणून ? त्याच त्या अंतिम सत्यापर्यंतचा एक सूक्ष्मातला प्रवास..तेच घर, तेच गूढतेचे केंद्र. तेच अनुत्तरित प्रश्न.

घर दुजे बांधु देईना
आपुले कुणा उघडीना!
या यत्न असा चालेना
बसवे न सोडुनी यत्ना
ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपी बा रे | तीं तुझ्या घराची बंद सदोदित दारे 8||

आणि हा शेवटचा त्रस्त प्रतिप्रश्न परमेश्वरालाच करतो आहे कवी. तू दुसरे घर आम्हाला करू देत नाहीस, तर्‍हेतर्‍हेने तुझ्यापर्यंतच घेऊन येतोस. पण स्वतःच्या रहस्याची बंद दारे उघडतही नाहीस्..काहीच उपाय चालत तर नाही, पण ही मूळ अस्वस्थता तुझा शोध न घेता स्वस्थ बसूही देत नाही. काय करू ?
एकच करतो.. तुझ्या घराची बंद दारे ठोठावत बसतो झाले !

अगदी सारांशरूप शब्दात जीवनाला पुरून उरणारा हा अज्ञाताचा शोध सावरकरांनी येथे संपवला आहे. ते स्वतः सत्यान्वेशी असल्याने अंतिम सत्य आपल्याला सापडले आहे असा खोटा अभिनिवेश नाही, पण हरल्याची भावनाही नाही. शोध चालूच आहे जोपर्यंत श्वास चालूच आहे..

प्रायोपवेशन करून जीवनयात्रा संपवताना या संन्यस्त सेनानीला गवसला असेल का तो अर्थ ? त्याशिवाय शेवटपर्यंत टिकलेले एवढे निर्मोही धैर्य कुठून येणार !

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा ग्रेट जॉब भारतीताई

धन्यवाद
सावरकार एक महाकवी होते .त्याना मानाचा मुजरा!!
_________/\__________

'मी भास्कर यांनी ही दुर्मिळ व मी अद्याप न वाचलेली कविता माझ्याकडे काही आठवड्यांपूर्वी रसग्रहणार्थ दिली होती. तिच्यावर लिहिणे हा माझा बहुमान अन आनंद.
धन्स, वैभव, पारु..

अप्रतिम! आवडले.
*****
सावरकार एक महाकवी होते .त्याना मानाचा मुजरा!!
<<
<<
+१

मी भास्कर यांनी ही दुर्मिळ व मी अद्याप न वाचलेली कविता माझ्याकडे काही आठवड्यांपूर्वी रसग्रहणार्थ दिली होती. तिच्यावर लिहिणे हा माझा बहुमान अन आनंद. >>>> आणि तुमच्या या खास शैलीतील असे हे अमोघ रसग्रहण वाचायला मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही.

स्वातंत्र्यवीर महानच. त्यांचे जीवन, त्यांची वाणी, लेखन सर्व काही विलक्षणच. त्यात त्यांचा हा परमेश्वराशी अद्वितीय संवाद.

यावरचे तुमचे सखोल, अभ्यासपूर्ण, रसपूर्ण विवेचन...... वा वा वा शर्करायुक्त दुधात केशर, वेलची वगैरे सर्वच.

हे दुर्मिळ काव्य समोर आणल्याबद्दल मी भास्कर यांचेही शतशः आभार.

भारतीताई,
अप्रतीम कामगिरी!
" आणि तुमच्या या खास शैलीतील असे हे अमोघ रसग्रहण वाचायला मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही" या पुरंदरे यांच्या म्हणण्याशी १००% सहमत.
रसग्रहणाच्या प्रतीक्षेत होतोच! ते दिसताच वाचून काढले आणि फार समाधान वाटले. सावरकरांच्या प्रतिभेचा आविष्कार समजायला तुमच्या या रसग्रहणांनी मोठीच मदत होते आहे. त्यासाठी तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी ते अपुरेच!
ही कविता वाचल्यावर जो वरवरचा अर्थ मला समजला होता तो किती अपुरा होता याची जाणीव या रसग्रहणामुळे झाली. एक वाचन झाले आहे पण तेवढ्याने पूर्ण समाधान झाले नाही. ते सावकाश आणि नीट समजाऊन घेऊन सवडीने पुन्हा लिहीन.

खुप छान वाटलं हे वाचून... शाळेत शिक्षिका एखादी कविता शिकवताना भान हरपायला होत असे, तसे वाटले.

खूप धन्यवाद सर्व प्रतिसादकांचे !
शशांकजी,दिनेशदा, उपमा आवडल्या :))
मी भास्कर, तुमचेच आभार हे आग्रहाने लिहून घेतल्याबद्दल.

ग्रेट ... खूप आवडले! >> ++१
शाळेत शिक्षिका एखादी कविता शिकवताना भान हरपायला होत असे, तसे वाटले. >> ++१

@ भारतीजी
>> येईन पुन्हा ना तुझ्या घरा <<

या ओळिच्या वरचा आणि नंतरचा संदर्भ घेता तुम्ही दिलेला अर्थ बरोबरच वाटतो. पण या ओळीतील 'ना' चा अर्थ कसा लावायचा?
आणखी कोणाकडॅ ही कविता असेल तर तीतही हा 'ना' आहे का याचा खुलासा झाला तर बरे होईल.

@भारतीजी
दुसर्या कडव्याचा तुम्ही दिलेला अर्थ सर्व संदर्भ पाहाता बरोबर वाटतो. पण मग खालील ओळीचे काय?
"येईन पुन्हा ना तुझ्या घरा"

इतर कोणाकडॅ ही कविता असेल तर तीत दुसर्‍या ओळित ' ना' आहे का ते पाहून इथे लिहिल्यास आभारी होईन,

खरे आहे मी भास्कर, माझ्यापुरता एक खुलासा शोधलाय कारण ही कविता मला कुठेही अन्यत्र सापडली नाही फक्त सावरकर संदर्भ शोधताना शीर्षक तेवढे 'अज्ञेयाचे रुद्रद्वार ' नसून 'रुद्धद्वार म्हणजे ' बंद दार ' असे आहे हा उल्लेख दोन तीनदा मिळाला, तो कविता वाचता समर्पक वाटल्याने स्वीकारला.

>> येईन पुनः ना तुझ्या घरा >>
यातील ना चा अर्थ नकारार्थी न लावता बोलीभाषेतील आग्रहाचा जसे की ' मला यायचेय ना तुझ्याकडे !' '' किंवा
'ऐक ना माझे' यातल्यासारखा लावल्यास अर्थसुसंगती रहाते !

@भारती बिर्जे डि... | 10 December, 2012 - 20:02नवीन
.. शीर्षक तेवढे 'अज्ञेयाचे रुद्रद्वार ' नसून 'रुद्धद्वार म्हणजे ' बंद दार ' असे आहे हा उल्लेख दोन तीनदा मिळाला, तो कविता वाचता समर्पक वाटल्याने स्वीकारला.<<

योग्यच केलेत.
मलाही 'रुद्वद्वार' खटकत होते. 'क्रोधित' असा अर्थ घेतला तरी कवितेत तसे त्यांना अभिप्रेत होते असे दिसत नाही. त्यामुळे तुम्ही घेतलेला अर्थ सुसंगत वाटतो.

>>>> येईन पुनः ना तुझ्या घरा >>
यातील ना चा अर्थ नकारार्थी न लावता बोलीभाषेतील आग्रहाचा जसे की ' मला यायचेय ना तुझ्याकडे !' '' किंवा
'ऐक ना माझे' यातल्यासारखा लावल्यास अर्थसुसंगती रहाते ! <<
व्वा! फारच छान! कविता सम्जून घेणे हीही किति आनंददायक बाब आहे!
धन्यवाद!
आता रसग्रहण पुन्हा वाचून प्रतिसाद लिहीन.