चाफ्याची कथा वाचली चष्म्याची, आणि त्यातल्या खूप प्रश्नांची उत्तरे गंभीरपणाने द्यावी असं मनात आलं. ती कथा किंवा लळित इतक छान विनोदी होतं, की प्रतिसादामधे गंभीरपणाने लिहिण्याचा विनोद नाही करवला. म्हणून मग इथे लिहाव असं ठरवलं. आता हे लळित होइल का, याची शंका वाटते तरीही.
आपल्याला कसं दिसतं? आपल्या डोळ्याचा काळा, निळा, घारा वगैरे दिसणारा रंगीत भाग असतो ना तो तसा नसतो.(बघा दिसत तस नसत) तर हा असतो पारदर्शक काचेसारखा वक्राकार भाग(कॉर्निया), आणि त्याच्या मागे असते परितारिका(आयरिस). ती असते काळी, निळी, घारी वगैरे रंगीत. ती आपल्याला त्या पारदर्शक बुबुळामधून दिसते. तिच्यात मधोमध एक लहानमोठे होणारे छिद्र असते. ती म्हणजे बाहुली. ही बाहुली उजेड अंधारात सोयीप्रमाणे लहान मोठी होते. हिच्या मागे असते भिंग(लेन्स). हे दोन्ही बाजूने बहिर्वक्र असते, आणि आकाराने तुरीच्या दाण्याएवढे.
डोळ्यात येणार्या प्रकाशकिरणांचे बुबुळ व भिंग या दोन वक्राकार माध्यमातून वक्रीभवन होते आणि ते मागील नेत्रपटलावर्(रेटिना) एकत्रित होतात. तेथून ऑप्टीक नर्व्ह द्वारे संदेश जातो मेंदूतील ऑसिपिटल कॉर्टेक्समधे. तिथे त्या संदेशाचे वाचन होते आणि आपल्याला समोरच्या दृष्याचे ज्ञान होते.
सामान्यतः या यंत्रणा एवढ्या अचूक असतात की थक्क होतं मन. परंतु या दोन्ही वक्रीभवनाच्या माध्यमाची रचना जराही सदोष असेल किंवा डोळ्याचा म्हणजे नेत्रगोलाचा आकार लहान किंवा मोठा असेल (म्हणजे बुबुळापासून नेत्रपटलाची लांबी कमी किंवा जास्त असेल तर प्रकाशकिरण नेत्रपटलावर एकत्रित न होता पुढे किंवा मागे विखुरले जातात. व नीट दिसत नाही. मग ते नीट एकत्रित गोळा व्हावेत म्हणून आणखी एक वक्रीभवनाचे माध्यम म्हणून चष्म्याची काच मधे येते. मग ही काच, बुबुळ, भिंग तिघे मिळून प्रकाश नीट्ट रेटिनावर पोचवतात.
चष्मा हा उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ मला आठवत नाहीये. कुणाला माहीत असेल तर सांगा. मराठीत चष्म्याला आरशी म्हणतात. अगदी लहान मुलांनाही चष्मा लागतो. आणि प्रश्न असा की ते कळतं कसं. मुलांना स्वतःला आपल्याला चष्मा लागला आहे हे नाही समजत. त्यांना आपल्याला जे दिसत आहे ते बरोबर आहे किंवा नाही, स्पष्ट आहे का नाही याची तुलनात्मक जाणीव नसते. आपल्याला जेवढ दिसत तेच बरोबर अस वाटत त्यांना.
लहान मुलांची नजर जन्मापासून ते ९-१० वर्षांपर्यंत विकसित होत असते. म्हणजे मेंदूतील जे केंद्र आहे ते बाहेरून आत येणार्या प्रकाशकिरणांच्या स्टिम्युलेशनमुळे हळूहळू विकसित होत बाहेरची दृष्य बघायल शिकत असत. तसच त्याच्या डोळ्याचा आकारही वाढत असतो, तो सामान्यपणे १८ वर्षांपर्यंत वाढत असतो. जर मुलाला आवश्यक असून चष्मा दिला गेला नाही तर ह्या विकासाच्या प्रक्रियेत अडथळा येतो व नजर विकसित होत नाही. परिणामी डोळा आळशी होतो. याला ऍम्ब्लोपिया म्हणतात. या आळशी डोळ्यावर ताबडतोब आणि १० वयाच्या आत उपचार केल्यास डोळा पुन्हा काम करतो.
बुबुळ, परितारिका, भिंग, नेत्रपटल, नस, मेंदू ही सर्व यंत्रणा निर्दोष असेल तर नजर निर्दोष असते. यातील कुठल्याही भागात गडबड झाली तर नजर कमजोर किंवा अंधत्व असते.
या करिता प्रत्येक बालकाची वर्ष वाढदिवसाच्या आत तज्ज्ञांकडून नेत्रतपासणी करून घ्या. लहान बालकांत चष्म्याचे प्रमाण खूप कमी आहे. ० ते ६ वयोगटात सुमारे १ ते २ %. पण त्याही बालकांना उपचार करून नजर निर्दोष करणे जरूर आहे.
लहान मुलांमधे जन्मतः मोतीबिंदूही असू शकतो. हे प्रमाण सुमारे दहा हजार बालकात एक इतके आहे. तसेच डोळ्यास इजा झाल्याने किंवा अन्य कारणांनेही मोतीबिंदू होऊ शकतो. यासाठी वेळीच म्हणजे लवकरात लवकर्(अगदी दीड दोन महिन्याच्या बालकाचीही) शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून मग त्याला एक जाड जाड भिंगाचा चष्मा देतात. आपल्याला चष्म्यातून दिसते हे त्या बालकाला समजते. मग तो चष्मा लावून घेतो. आणि मस्त टुकुटुकु बघायला लागतो. ह्या चष्म्याच्या दोन्ही काड्यांना दोरा बांधून डोक्यामागे गाठ मारायची. आणि तो नाकावरून घसरू नये म्हणून चष्म्याच्या पुलावर्(ब्रिज)चपटी दोरी बांधून तीही त्या गाठीतच बांधायची मग मूल छान खेळू बागडू शकते. नाकावर चष्मा घसरला तर मुलाला नीट दिसत नाही.
लहान मुलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जाड भिंगाचा चष्मा देतात कारण दोन ते अडीच वर्षांपर्यंत मुलांच्या डोळ्यात भिंग्(इंट्रा ऑक्युलर लेन्स) बसवत नाहीत. मग त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करून आत भिंग बसवतात. मग जाड चष्म्याची सुट्टी. मग आवश्यकते प्रमाणे लहान नंबराचा चष्मा लागू शकतो.
मुलांचा आळशी डोळा कामाला लावायलाही चष्मा देतात. म्हणजे जो डोळा कामसू आहे त्याला दुधी काच किंवा काचेवर पॅड लावून तो बंद करतात. मग हा आळशी डोळा नाइलाजाने कामाला लागतो. व कामसू होतो. हा चष्मा दिवसातून ठराविक वेळातच लावायचा असतो.
सामान्यपणे चाळिशीनंतर जवळच बघायला म्हणजे वाचायला वगैरे चष्मा लागतो. याचे कारण असे की आपल्या नैसर्गिक भिंगाला क्षणोक्षणी लहान मोठे होण्याची क्षमता बहाल करणारे आणि भिंग दोन्हीकडून तोलून धरणारे स्नायू थोडे अकार्यक्षम होतात. हळूहळू वयाबरोबर हा नंबर वाढ्तो. साठीनंतर कमी झाला अस वाटत ती कदाचित मोतीबिंदूची सुरवात असते.आपले नैसर्गिक भिंग जे पारदर्शक असते ते हळूहळू अपारदर्शक होऊ लागते त्याला मोतीबिंदू म्हणतात.
नजर ६/६, ६/९, ६/१२, ६/१८, ६/२४, ६/३६, ६/६० वगैरे मधे मोजतात. याचा अर्थ असा की ६/६ नजर म्हणजे सामान्य माणसाला जे ६ मीटरवरून दिसते ते ६ मीटरवरून दिसणे. ६/३६ म्हणजे सामान्य माणसाला जे ३६ मीटरवरून दिसते ते बघायला ६ मीटरवर यावे लागणे. हा अगदी ढोबळ अर्थ दिला आहे. ६/६० याहीपेक्षा कमी नजर ५/६० ४/६० याप्रमाणे मोजतात. WHOने केलेल्या व्याख्येनुसार चांगल्या डोळ्यात ३/६० पेक्षा कमी नजर असणे म्हणजे अंधत्व. आणि चांगल्या डोळ्यात्(दोन्हीपैकी) ६/१८ पेक्षा कमी नजर म्हणजे अधू दृष्टी.
आपणास माहीत आहे काय की जगात दर एक मिनिटाला एक व्यक्ती अंध होते. आणि दर पाच मिनिटाला एक बालक अंध होते. या बालकांपैकी ५० ते ६० % बालके अंधत्व आल्यापासून १ ते २ वर्षात मृत्यू पावतात.
भारतात ३ लाख २० हजार बालके अंध आहेत आणि १० लाख बालके अधू दृष्टीची आहेत. याशिवाय ४ % बालकांना चष्म्याने दूर होऊ शकेल असा दृष्टीदोष आहे.
अंधत्वाची ८०% कारणे उपचाराने दूर करता येतात.
एका वृद्धाचे अंधत्व दूर केले तर त्याची ५ ते १० वर्षे प्रकाशमान होतात. एका बालकाचे अंधत्व दूर केल्यास पुढची ६० ते ७० वर्षे तो बघू शकतो. या वर्षांच्याहि शेबात आणि मुलांचे विकसनशील वय लक्षात घेता मुलांचे अंधत्व व दृष्टीदोष निवारण्याची सामाजिक गरज लक्षात येइल.
छान माहिती
छान माहिती मीनाताई.
छान
छान माहिती, मीनाताई.
मग चष्म्याचे न. कसे मोजतात? म्हणजे +४, +५ हे कसे?
खूप छान
खूप छान माहीती कळली... धन्यवाद.
छान माहिती
छान माहिती मीनाताई.. ह्याच संदर्भात नुकतेच कुठेतरी वाचले की सध्या दृष्टीदानाची अत्यंतिक गरज आहे कारण डोळ्यांचा तुटवडा आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने चला आपण सगळे मायबोलीकर दृष्टीदानाचा संकल्प करुया अन् फॉर्म भरुया...
चिनू,भाग्य
चिनू,भाग्या, दक्षिणा, सारीविणा
सगळ्यांना धन्यवाद!
नेत्रदानाची नक्कीच गरज आहे. त्यावरही लिहिते.
चान्गली
चान्गली माहिती!

नेत्रदानावर जरुर लिहा!
(तसेच जमल्यास, तुम्ही या विषयावर कस काय लिहू शकता, लिहिण्यास उद्युक्त होण्याची कारणे याबद्दलही समजुन घ्यायला आवडेल)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
धन्यवाद
धन्यवाद लिंबूटिंबू.
५ वर्षांपूर्वी मी माझ्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर काही दिवसांनी मी येथील स्थानीक संस्था, विवेकानंद नेत्रालय मिरज या सेवाभावी संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यानंतर मी मदुराई(तामिळनाडू) येथील अरविंद नेत्रालयात
रुग्णालय प्रशासन व समुपदेशनाचे दोन महिन्याचे निवासी प्रशिक्षण घेतले. आता मी आमच्या संस्थेत समुपदेशनाचा तसेच मेडिकल रेकॉर्ड हा विभाग पहात आहे. आमच्या संस्थेविषयी आणि नेत्रदानाविषयीही लिहिन. आमच्या संस्थेची नेत्रपेढीही आहे.
तिला महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
खुपच छान
खुपच छान माहिती आहे.......... मी पण वयाच्या १३ पासून चष्मिश आहे. नेत्रदानाबद्दल तुम्ही मदत करू शकता का? मला करयचे आहे. मी ईथे (पुण्यात) एका ठिकाणी गेलो होतो, पण मला अतिशय वाईट अनुभव आला.
धन्यवाद
धन्यवाद नितीन,
मी नेत्रदानाविषयी सविस्तर लिहिते. जरा सवडीने.