दगदगीमधे नित्याच्या प्रेमाला फुरसत होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 November, 2012 - 01:11

गझल
दगदगीमधे नित्याच्या प्रेमाला फुरसत होती!
जगण्यात रोजच्या सुद्धा वेगळीच गंमत होती!!

ती बड्या बड्या धेंडांची बसलेली पंगत होती.....
माझीच हजेरी तेथे तेवढी विसंगत होती!

का म्हणून मज वाटावा, हसण्याचा त्यांच्या हेवा?
कोणत्या सुखाला त्यांच्या दु:खांची सोबत होती?

उधळून मुक्तहस्ताने टाकली तरीही उरली...
नावावर माझ्या इतकी गझलांची दौलत होती!

ते सलाम मजला नव्हते, खुर्चीला सलाम होते!
मी म्हणायचो की, माझ्या शब्दांना किंमत होती!!

गातात गोडवे आता बघ एकमुखाने सारे.....
तो जिवंत होता तेव्हा, कोणाला किंमत होती?

एकटाच चालत होतो....तो रस्ता तसाच होता!
वाटले न पण एकाकी, रस्त्याची सोबत होती!!

कष्टाला सीमा नव्हती, वय देखिल तरूण होते!
स्वप्नांची झापड होती, जीवनात रंगत होती!!

या अपंग पायांनीही चालली जिंदगी माझी.....
सर शिखरांना करण्याची पण, मनात हिंमत होती!

मज कसे मायबापांनी छोट्याचे मोठे केले?
बापाची माझ्या तेव्हा किरकोळच मिळकत होती!

सोहळा यशाचा नाही साजरा कधीही केला!
ना हाव यशाला होती, ना माझी ऐपत होती!!

ती वाट वाळवंटाची, सोबतीस मृगजळ होते!
जाणीव तृषेला होती....ती निव्वळ फसगत होती!!

सर्कशीत आयुष्याच्या, मी एक विदूषक होतो!
आतल्या आत रडण्याची तेवढीच सवलत होती!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली.

>>>दगदगीमधे नित्याच्या प्रेमाला फुरसत होती!
जगण्यात रोजच्या सुद्धा वेगळीच गंमत होती!!

ती बड्या बड्या धेंडांची बसलेली पंगत होती.....
माझीच हजेरी तेथे तेवढी विसंगत होती!

का म्हणून मज वाटावा, हसण्याचा त्यांच्या हेवा?
कोणत्या सुखाला त्यांच्या दु:खांची सोबत होती?

उधळून मुक्तहस्ताने टाकली तरीही उरली...
नावावर माझ्या इतकी गझलांची दौलत होती!

ते सलाम मजला नव्हते, खुर्चीला सलाम होते!
मी म्हणायचो की, माझ्या शब्दांना किंमत होती!!

गातात गोडवे आता बघ एकमुखाने सारे.....
तो जिवंत होता तेव्हा, कोणाला किंमत होती?

एकटाच चालत होतो....तो रस्ता तसाच होता!
वाटले न पण एकाकी, रस्त्याची सोबत होती!!
<<<

तसेचः

>>>मज कसे मायबापांनी छोट्याचे मोठे केले?
बापाची माझ्या तेव्हा किरकोळच मिळकत होती!<<<

आणि हा सर्वाधिक आवडलेला शेरः

>>>सर्कशीत आयुष्याच्या, मी एक विदूषक होतो!
आतल्या आत रडण्याची तेवढीच सवलत होती!!<<<

धन्यवाद

सर्कशीत आयुष्याच्या, मी एक विदूषक होतो!
आतल्या आत रडण्याची तेवढीच सवलत होती!! >>> केवळ सुरेख....

वा !! एकदम सही गझल !!

सवयीमुळे माझाच एक शेर आठवला .......

मी विदूषक व्हायचो दुनियेस हसवावे म्हणुन
मी जरी रडलो तिला ती मस्करी वाटायची

भूषणराव आज सकाळी लिहिलेली गझल आहे ही!
फक्त पंगत व सोबत हे दोन जुने शेर १४-१०-१९९२रोजी लिहिलेले जुन्या डायरीत सापडले! मूड लागला व उरलेले ११ शेर ईश्वरकृपेने झरझर एका बैठकीत लिहून ही गझल तूर्तास हातावेगळी झाली, आज सुमारे २०वर्षांनंतर!
आधी शेर नंबर २....पंगतचा मतला केला होता. पण काफियांच्या कमतरतेमुळे दुसरा मतला घेवून काफियातून सुटका करून घेतली व ही गझल आम्ही पूर्ण करू शकलो!

सुंदर गझल...

जवळ जवळ सगळेच शेर उत्तम झाले आहेत..

सर्कशीत आयुष्याच्या, मी एक विदूषक होतो!
आतल्या आत रडण्याची तेवढीच सवलत होती

एकटाच चालत होतो....तो रस्ता तसाच होता!
वाटले न पण एकाकी, रस्त्याची सोबत होती!!

हे शेर विशेष आवडले..

'किंमत' वाला शेर पण मस्त आहे. पण का कुणास ठाऊक उला मिसरा गुणगुणताना तेवढी मजा आली नाही ( नक्की का ते सांगता येत नाहीये... बहुधा नव्हते आणि होते च्या शेवटच्या सम उच्चारांमुळे आणि 'सलाम' दोनदा आल्याने असे वाटले असावे )
उला मिसऱ्यामध्ये 'खुर्चीला सलाम होते!' ऐवजी 'होते माझ्या खुर्चीला' असे केले तर ?? पण यती भंग होईल त्याने...

गझल खूप आवडली
शुभेच्छा.

गझल वाचल्यावाचल्या इतकेच वाटले- अ हा हा!!! मस्त Happy
वाळवंट, यशाचा सोहळा, विदूषक, किरकोळ मिळकत... एकसे एक... भई वाह!

मतल्यापेक्षा हुस्न-ए-मतला फार आवडला.

बाकी सगळेच शेर उत्तम झाले आहेत.

सर्कस्, वाळवंट्,मिळकत.... अहाहा!!!

धन्यवाद कैलासराव! असाच लोभ असू द्या!
मतल्यातील आशयात काही खटकते काय?
हुस्न-ए-मतला जास्त आवडला, असे वदलात म्हणून सहज बालउत्सुकतेपोटी विचारले!
..........प्रा.सतीश देवपूरकर