माझे मनोगत

या लेखाचे मुद्दे सौ. स्वाति आंबोळे यांनी सुचवले. त्यांना अनेSक धन्यवाद.

आधी मी जे लिहीले होते ते त्यांना दाखवले होते. ते अगदीच विस्कळित, असंबद्ध (म्हणजे मी नेहेमी लिहितो तसे) होते. अजूनहि बरेचसे तसेच आहे, पण आता सुधारायला वेळच नाही.

कुणितरी म्हणाले मायबोलीवर 'गेले तप, नि चालू तप' अश्यासारख्या विषयावर मी काही लिहावे. बरोबरच आहे, मी वयाने म्हातारा असणार याबद्दल तुमची खात्री असेलच. तेंव्हा आता काहीहि थापा मारायला मी मोकळा.

आता तप म्हणजे बारा वर्षे असा मर्यादित अर्थ मी घेतला नाही. खरे तर Electronic Communication, PC, internet यांच्यापूर्वीचे जग नि आत्ताचे जग हा फार मोठ्ठा फरक आहे. हे खरे म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे. भारतातून अमेरिकेत येणार्‍या लोकांचे 'भयानक' वाढलेले प्रमाण हा त्याचाच परिणाम.

त्याचे काय झाले, आम्ही आलो (१९६५ ते १९७५) या काळात. तेंव्हा इंजिनियर नि डॉक्टर यांना H3 नावाचा व्हिसा मिळत असे. तेच green card. किंवा मग शिक्षणासाठी येऊन मग अगदी सहजपणे green card मिळत असे. इथे येण्यापूर्वी अमेरिकेची काSहीहि माहिति नव्हती. इथे आल्यावर सगळेच नवीन. गोर्‍या माणसांशी कसे बोलायचे माहित नाही. मग माझ्या मावसभावाबरोबर बाहेर जाऊन हळू हळू शिकलो. सुरुवातीला प्रश्नांची उत्तरे देण्यापलिकडे किंवा अगदी जुजुबी प्रश्न विचारण्या पुढे मजल गेली नाही. आमच्या कनेक्टिकटमधे फक्त तीन चॅनेल. केबल कुठेच नाही. तरीपण जास्तीत जास्त टीव्ही बघून हळू हळू अमेरिकन जीवनाबद्दल माहिति झाली. अधून मधून ऑफिसमधले लोक घरी बोलवत, चहाला. तेंव्हा त्यांच्याकडून घर कसे असावे ते कळले.
बर्‍याच गमती जमती मी इथे पूर्वी बरेचदा लिहील्याच आहेत. त्यातूनहि तेंव्हा आमची काय गंमत होत असे ते कळले असते, पण आत्ता त्या लिहीत नाही.

बरेचसे लोक इंजिनियर किंवा डॉक्टरच होते. अनेकांना हव्या त्या क्षेत्रात नोकरी न मिळाल्यामुळे कुणी विमा एजंट, नि नंतर financial advisor बनले. कुणि मिळेल ती नोकरी घेतली. बर्‍याच जणांनी 'MBA, MS' वगैरे केले. हळू हळू मार्गी लागले. आमचे इंग्रजी हळू हळू अमेरिकन झाले. आम्ही पण आँट ऐवजी अँट नि शेड्यूल ऐवजी स्केड्युल म्हणू लागलो.

मग बायका आल्या, यथावकाश मुले आली! केव्हढे कौतुक मुलांचे! माझ्या मुलाचे तीन तीन वाढदिवस साजरे होत. कारण सगळ्यांना एका दिवशी जमायला जमले नाही तर ते स्वतःच त्याचा पुनः वाढदिवस करत. फारच थोडी महाराष्ट्रियन जनता ना! आता गल्लोगल्ली भेटतात, पुण्यापेक्षा इथेच मराठी जास्त ऐकू येते!

मग मुलांना आपली भारतीय संस्कृति, मराठी शिकवणे आले! नि ते करायलाच पाहिजे याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. पण अजून मराठी विश्व चे क्लासेस नव्हते. ज्यांच्या बायका नोकरी करत नव्हत्या त्यांच्या घरी हे सोपे होते. त्यातून मुळात ज्यांच्या घरी, दररोज देवपूजा, संध्याकाळी देवापुढे दिवा नि शुभं करोति इ. नेमाने होते त्यांच्याचकडच्या मुलांना हे 'संस्कार' झाले. आजकाल भारतात सुद्धा देवपूजा राहू दे, संध्याकाळी देवापुढे दिवा लावण्या ऐवजी हातात 'प्याला' येऊ लागला आहे.
जेंव्हा मुले शाळेत जाऊ लागली तेंव्हा थोडा संघर्ष वाढला. विशेषतः जेंव्हा शाळेतून शिक्षकिणी मुलाच्या इंग्रजीबद्दल काळजी व्यक्त करू लागल्या तेंव्हा वडील मुलांशी इंग्रजी बोलू लागले. (पण कोणि 'पुट रे' किंवा 'सिट क्वाएटलि हं' असे म्हंटलेले आठवत नाही.)

आम्हाला सर्वांनाहि भारताबद्दल अतिशय प्रेम व अभिमान आहे. पण दुर्दैवाने एक गोष्ट आमच्याकडून फार वाईट झाली. ती आम्हा आई वडिलांची अक्षम्य चूक!
इथले सर्व जीवन पाहून भारावून गेलेले आम्ही, कधी भेटलो नि बोलायला लागलो की सतत 'छी:! इथल्या मानाने भारतात किती घाण (तरी तेंव्हा प्रदूषणाची काळजी नव्हती), किती तिथे सारखी लाचलुचपत!' असे बोलत!

भारताचा प्रवास पाच सहा वर्षातून एकदा फार तर. त्या वेळी मुलांना आजोबा आजी, काका मामा यांचे प्रेम जाणवत असे, पण परत आल्यावर पुनः आमचे तेच! माझ्या मुलाने चक्क नकार दिला भारतात यायला तो तेरा वर्षाचा झाल्यावर. तो म्हणाला भारत इतका वाईट आहे तर कशाला जायचे तिथे, ते सुद्धा सगळी सुट्टीभर?

त्या वेळी फार जाणवले की भारतात ही मुले वाढली असती तर असे झाले नसते. बरेच जण त्यांची मुले, विशेषतः मुली, बारा तेरा वर्षाच्या झाल्यावर भारतात परत जाण्याच्या गोष्टी करू लागले. प्रत्यक्षात फार थोड्या लोकांनी तसे केले, बहुतेक जण चक्क परत आले. कारण त्या काळी भारतात अजून काँप्युटर चा धंदा नव्हता. नोकर्‍या मिळणे एव्हढे सोपे नव्हते. (त्यातल्या एकाच्या मुलीने भारतात परत गेल्यावर १८, १९ व्या वर्षी पळून जाऊन मुसलमानाशी लग्न केले. कुणा ब्राह्मणाच्या मुलीने असेच खालच्या जातीतल्या मुलाशी लग्न केले. हे ऐकून जनता जरा धास्तावलीच! )

खरे तर इन्टरनेट येईस्तवर आम्हाला भारतात काय चालले आहे याची फार थोडी कल्पना मिळत असे. माझे एक मित्र आयुष्याची २५ वर्षे पुण्यात घालवून इकडे आले. काही इतर मित्रांच्या मते ते अजून १९५० च्या भारतातच अडकले आहेत. तेंव्हा जसे होते तसेच आत्ताहि असेल, असावे असे त्यांना वाटते. बिचारे तेंव्हाची जुनी गाणी आठवून स्वत:शीच गुणगुणत असतात. नवी गाणी ऐकली तरी त्यांना ती आवडतच नाहीत!

पण जसजसे कामावर वरच्या जागा मिळाल्या, मराठी विश्व झाले, त्यातून लोकांना कळले की याहि समाजात आपण काही करू शकतो. मग काही लोक शाळेच्या PTA चे अध्यक्ष झाले, कुणि चक्क राजकारणात पडले! आधी गावच्या कॉन्सिलमधे नि नंतर सौ. स्वति गोडबोले नि आमच्या बागराज्यातील लोक अगदी राज्याच्या assembly मधे पोचले. नाट्य, लेखन, गायन सर्वांमधे लोक पुढाकार घेऊ लागले. अजूनहि मराठी विश्वात सगळे जुनेच लोक दिसत असत.

ही सर्व परिस्थिती बदलली १९९० नंतर. भारतातून y2K चे काम स्वस्तात होते म्हंटल्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता इथे आली. त्यांचे सगळेच वेगळे! त्यांना पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही सेल का बघतो, कूपने का फाडतो याचे त्यांना आश्चर्य वाटत असे. आम्ही साध्या नोकर्‍या का केल्या ते त्यांना समजत नसे.
अर्थात outsourcing बद्दल आमचे मत इथल्या लोकांसारखेच! आमच्या
देशातल्या नोकर्‍या घेतात हे लोक! ते खरे नाहीये. जरी सुरुवातीला स्वस्त म्हणून y2K साठी हे लोक आले तरी नंतर त्यांच्या कामाची किंमत इथल्या लोकांना कळली. केवळ स्वस्त हा महत्वाचा मुद्दा कधीच नसतो. त्याबरोबरच कामाची quality सुद्धा अत्यंत महत्वाची असते. ते इथल्या लोकांच्या लोकांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी भारतातील कंपन्यांना काम देणे चालूच ठेवले. असो.

आता मायबोलीबद्दल. जेंव्हा मायबोली सुरू झाली नि मला कळले तेंव्हा मला कोण आनंद झाला! आता मला माझी प्रिय मराठी भाषा पुनः लिहायला, वाचायला मिळणार! भारतातील नि येथीलहि कित्येकांनी ती हौस अगदी मन:पूत पुरवली! आता गेल्या एक दोन वर्षात हे चित्र बदलले आहे. आता मी फक्त बा. रा. च्या बा. फ. वर जातो, कारण नवीन लोकांबद्दल जास्त माहिती नाही. कुणि एकदम रागावतात वगैरे.
आम्हाला सर्वांना वाटते की आता इन्टरनेट आले, भारताजवळ पैसे आले, म्हणजे भारतातला भ्रष्टाचार कमी झाला असेल, सामाजिक सुधारणा झाल्या असतील वगैरे.
प्रत्यक्षात काही दारूण सत्ये कळतात -
भ्रष्टाचार, लाचलुचपत मुळीच कमी नाही, सामाजिक परिस्थिती तर बिघडलीच आहे. दररोज कुठेतरी राडा, बाँब स्फोट! कुठलेहि काम व्हायला पूर्वीसारखीच दिरंगाई नि हलगर्जीपणा!

ज्यांना आपले मित्र म्हणत होतो, ज्यांच्याशी तासन् तास बोलत असू, त्यांच्याशी आता दोन मिनिटाहून जास्त बोलायला विषय नाही. अगदी सख्ख्या भावंडांशी बोलायला सुद्धा फारसे काही नाही! प्रदूषणाचा नाही म्हंटले तरी फारच त्रास होतो. भारतातल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक जीवनाबद्दल काही कल्पना नाही. तिथल्या लोकांच्या बोलण्याच्या विषयांबद्दल आपल्याला काहीहि माहित नाही. त्यांचे नि आपले विचार फारच भिन्न. कुठे काही बोलायला जावे तर म्हणतात, अहो ते तुमच्या अमेरिकेचे राहू द्या, भारतात काय असते तुम्हाला माहित नाही!

खरे तर त्यांची भाषा सुद्धा अगदीच विचित्र वाटते, ना धड मराठी, ना हिंदी ना इंग्रजी! बिचारी मराठी भाषा तर जवळ जवळ नाहीशीच झाली!

जर आई बाबा देवाघरी गेले तर भारतात जायला काही कारणच नाही!

सिनेमात जसे एखादा माणूस न मिळालेल्या प्रेयसीच्या आठवणीने जन्मभर रडत बसतो, तसे होते भारताचा विषय निघाला की. उगाचच चेहेर्‍यावर हसू, मनात खेद.

या उलट गेल्या तपात इथे आलेल्यांचे भारताशी संबंध तुटलेच नाहीत! जे काय तिथे चालले आहे ते त्यांना माहितच आहे, त्यांच्या अपेक्षाहि काही वेगळ्या नाहीत, त्यांना फार तर फार आईच्या हातच्या जेवणाची आठवण येत असेल, पण आजकाल आई वडिलांनासुद्धा येणे सोपे झाले आहे! नि आता तर भारतातहि इथल्या सारखेच चांगले पगार, नि नोकर्‍या! माझ्या माहितीतले अनेक तरूण लोक भारतात सहकुटूंब परतले नि मजेत रहातात!

आता काय साहित्य संमेलन, चुकलो, विश्व साहित्य संमेलन नि नंतर मराठी नाट्यसंमेलनहि अमेरिकेतच होणार! मज्जाच मज्जा. पण यात मराठीचे काय? आजकालची भारतातली मराठी म्हणजे एकदम भेळ! हिंदी, इंग्रजीचा भरपूर वापर. मग कसचे मराठी? उगाचच काहीतरी!

जसे माझे हे सर्व लिखाण!


झक्की,

तुळशीला कुठलीच माती वर्ज्य नसते. एखादया मोडक्या भांड्यात माती घालून तुळस लावा की पवित्रतेचा अनुभव देणार्‍या वॄंदावनात तिला लावा. दोन्हीकडे ती तेवढीच रसरसून बहरेल. प्रश्न आपण तुळशीला कुठले कुंपण देऊ शकतो त्या आपल्या कुवतीचा आहे.

दूरून झळाळणार्‍या पाश्चिमात्य संस्कॄतीच्या आकर्षणापायी भारतात आपली संस्कॄती हातून निसटत चाललीय तर पाश्चिमात्य संस्कॄतीचे दुष्परिणाम जवळून पाहू शकत असल्याने आपल्या संस्कॄतीला घट्ट चिकटण्याची इथल्या काहींची धडपड सुरू आहे. ज्यांना वॄंदावन सापडले त्यांची तुळस ते जिथे जिथे आहेत तिथे तिथे बहराला आलीय. इतरांचा शोध जारी आहे!

फिलीच्या विमानतळावर तिथल्या नगराध्यक्षांचे एक वाक्य आहे: तुम्ही ज्या गावात राहता किंवा काम करता किंवा फिरायला जाता त्या गावावर प्रेम करा. मला एक आणखीन पाऊल पुढे जाऊन म्हणावसं वाटतं की 'त्याच बरोबर जेथून आलात तेथला गंध त्या गावाच्या वातवरणात मिसळून टाका!'

मला वाटतं ही किमया जमली तर वॄंदावन दूर नाही!!!!

तुमच्या मनोगतात हे थोडं माझंही........बाकी प्रतिकिया काय देऊ? तुमच्या मनोगतात तुमच्या अनुभवाचे मनन आहे त्यामुळे ते वाचनीयच नव्हे तर चिंतनीयही झाले आहे हे त्याचेच प्रमाण नाही का?



झक्की, खूप छान आणि मनापासून लिहिलंत!! आवडलं!

खरंच ३५-४० वर्षांपूर्वी भारत सोडून परदेशात स्थाइक होणं किती कठीण असेल ह्याचा किंचित का होईना अंदाज आला.

सिनेमात जसे एखादा माणूस न मिळालेल्या प्रेयसीच्या आठवणीने जन्मभर रडत बसतो, तसे होते भारताचा विषय निघाला की.<<<< थोड्याफार फरकाने सगळ्यांची हीच स्थिती आहे.
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! फिदीफिदी



आवडलं मनोगत.. माझा मामाही २८-२९ वर्षांपुर्वी आला अमेरीकेत. तेव्हा कशी परिस्थिती असेल ते थोडंफार समजलं या लेखातून. त्याचेही विचार असेच काहीसे आहेत.. आता परत भारतात कायमचं परतणं अवघड वाटतं त्याला. आजी आजोबा होते तोपर्यंत भारतात जायची ओढ.. आता काही नाही.. अमेरिकाच जवळची वाटते...
साधारण ३०एक वर्षांपूर्वी आलेल्यांना असं वाटत असावं..

या उलट गेल्या तपात इथे आलेल्यांचे भारताशी संबंध तुटलेच नाहीत! जे काय तिथे चालले आहे ते त्यांना माहितच आहे, त्यांच्या अपेक्षाहि काही वेगळ्या नाहीत, त्यांना फार तर फार आईच्या हातच्या जेवणाची आठवण येत असेल, पण आजकाल आई वडिलांनासुद्धा येणे सोपे झाले आहे! नि आता तर भारतातहि इथल्या सारखेच चांगले पगार, नि नोकर्‍या! माझ्या माहितीतले अनेक तरूण लोक भारतात सहकुटूंब परतले नि मजेत रहातात!

हे पटले..



झक्की, मस्त लेख एकदम, दिवळी अंकात शोभला असता की!
'इन्टरनेट नव्हतं तोवर तिथली इथे खबर बात च नाही ' हे आता झेपतच नाही!! स्मित



झक्की, मनोगत आवडलं .......... स्मित

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे



>>>> पण दुर्दैवाने एक गोष्ट आमच्याकडून फार वाईट झाली. ती आम्हा आई वडिलांची अक्षम्य चूक!

त्यात फारस वाईट वाटून घेण्याचे कारण नाही! इथे राहुनही आम्ही हेच म्हणतो! ते ऐकुन आमची पोरे त्यान्च्या त्यान्च्या समजुतीप्रमाणे जे काय समजुन घ्यायच ते घेतिल आणि तसे वागतील.
पण त्यान्ना एक सान्गितलय, की नुस्त हे वाईट ते वाईट अस म्हणण्यापेक्षा, जर त्यात काही सुधारणा हव्या असतील तर त्या तुमच्या तुम्हालाच कराव्या लागतील, एकेकट्याने किन्वा सान्घिकपणे!
बाकी मनोगत छान!
मग? केव्हा येताय भारतात? आलात की या घरी मागच्या वेळ सारखे! स्मित
...;
आपला, लिम्बुटिम्बु



झक्की, खूप छान लिहिलंत. पण तुम्ही असे माबो वर गप्प गप्प राहू नका हो !



Zakki,
मनापासून आवडल (तसच लिहीलय त्यामुळे पोचल...).

इथल्या सर्वांपेक्षा तुम्ही जास्त पावसाळे(अमेरिकन) पाहिले हे निश्चीत. तेव्हा अनुभवाने तुम्ही अधिक संपन्न तेव्हा तुमच्या मननामधून बरेच काही चिंतन घडेल, आमचे. अगदी तीस नाही पण साधारण पंधरा वर्षापूर्वी सुध्धा अमेरिकेत येवून स्थायिक झालेल्यांची पण हीच अवस्था आहे. वर छान लिहीले आहे, कुंपण ठरवले की व्रुंदावन सापडायला वेळ मिळत नाही.

"हे विश्वची माझे घर"... असे समर्थांन्नी म्हटले ते उगाच नसावे.

आम्ही साधारण अकरा वर्षे अमेरिकेत राहून आता दुबईत आलो, अन कालाने "तुमच्या" पुण्यात जावू?स्मित समस्या सर्वत्र आहेतच त्यांच स्वरूप वेगळ आहे.. प्रत्त्येक ठिकाणच्या स्वताच्या बर्‍या वाईट गोष्टी आहेत. शेवटी "घर" म्हणून जे काही आहे ते चार भिंतीतले लागे बांधे, मग ते कुठे का असेना. कर्मभूमी बदलते तसे घराच्या भिंती बदलल्या इतकच पण "घरपण" अजूनही तेच आहे. आजकाल च्या धावत्या युगात सर्वच नाती मनानेच जगावी लागतात, तितके जमले तरी बरेच काही साध्ध्य झाले असे मि मानतो. प्रवास महत्वाचा, कारण शेवटी सर्वांचे destination एकच आहे. नाहितरी समर्थ म्हणतातः
मरे एक त्याचा दूजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे..

समर्थंचे मनाचे श्लोक नुसते रोज म्हटले तरी किती मनःशांती येते.

इथे परवा असेच एक वाक्य ऐकले: आयुष्यभर, मनासारखा बिछाना घालण्यासाठी माणुस धडपडतोय.. मग शांत झोपणार कधी? बहुदा शेवटचे झोपू तेव्हा, अन तेव्हा कळून चुकले असेल की सर्व आयुष्य बिछाना घालण्यातच गेले!!

असो. तुमच्या या मनोगतात उगाच माझ पाल्हाळ झाल.. पण हे अगदी पटलं:
>> आता मायबोलीबद्दल. जेंव्हा मायबोली सुरू झाली नि मला कळले तेंव्हा मला कोण आनंद झाला! आता मला माझी प्रिय मराठी भाषा पुनः लिहायला, वाचायला मिळणार! भारतातील नि येथीलहि कित्येकांनी ती हौस अगदी मन:पूत पुरवली! आता गेल्या एक दोन वर्षात हे चित्र बदलले आहे. आता मी फक्त बा. रा. च्या बा. फ. वर जातो, कारण नवीन लोकांबद्दल जास्त माहिती नाही. कुणि एकदम रागावतात वगैरे.



झक्की, लेख वाचायला बर्‍यापैकी उशिर झालाय. पण खूप आवडला... स्मित



हो, अन त्या स्वातीचे आभार आम्ही पण मानायला हवे. ही इतकी वाक्य सुसंबद्ध् लिहून कशी काय घेतली बुवा तुमच्याकडून फिदीफिदी दिवा घ्या



झक्की दादा,खूप मना पासून लिहिलेले मनापासून वाचले अन मनापासून आवडलेही.

हेच प्रश्न अन न सापडणारी उत्तरे असे हे भारतातून गेलेल्या लोकांचे अन तिथल्या लोकांमागे भारतात राहिलेल्या कुटुंबियांचे समीकरण झाले आहे.
अल्पावधी साठी आलेली मुले,त्याहून थोड्या जास्त अवधी साठी जाणारे आई वडील्,अमेरि़कन एम्बसी कडून हल्ली थोडे शिथिल झालेले व्हिसा सम्बन्धी नियम व त्यामुळे जाण्या येण्याची वाढलेली वर्दळ असे हे चित्र आहे-अन आता आर्थिक सन्कट भेडसावत असताना या अनिवासीय लोकांची चिंता -त्याना परत यावे लागेल का?
खूप जिव्हाळ्याने लिहिलेय तुम्ही.

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात



सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात



लेख फार आवडला, खूप मनापासून लिहीलाय. क्रुपया लिहीणं थांबवू नका,तुमच्याकडून अजून लेखांच्या प्रतिक्षेत.
<<<<कारण नवीन लोकांबद्दल जास्त माहिती नाही. कुणि एकदम रागावतात वगैरे.>>>
कोण आहे रे तो झक्की काकांना रागवतोय,आँ...स्मित
दिवाळीच्या शुभेछ्या!!
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल



मनोगत वाचनीय तसेच चिंतनीय आहे, आवडले.

भारताचा विषय निघाला की. उगाचच चेहेर्‍यावर हसू, मनात खेद.
--- एकदम खरे आहे, माझ्या एका मित्राचे भाष्य mind in Canada and heart in India...



झक्की, खूप वर्षांपुर्वी ज्यावेळी मायबोली नविन होती, त्यावेळी तुम्ही मिंग्लिश मधुन याच विषयावर लिहिले होते ते अजून स्मरणात आहे. यावेळेस तुम्ही अगदी सरळ सरळ लिहिले आहे. तुमचा नेहमीचा उपरोधिकपणा कुठेच जाणवत नाही. शिवाय तुमच्या भावना देखील तुम्ही शब्दात मांडल्यात.