अलोट जनसागर - पुढे?

Submitted by बेफ़िकीर on 19 November, 2012 - 00:52

मराठी मनाचे अघोषित सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

===================================================

बाळासाहेबांच्या दु:खद निधनाआधी दोन दिवस त्यांची प्रकृती खालावली होती तेव्हा मातोश्रीच्या परिसरात गर्दी जमू लागली होती. त्यानंतरचा दिवस काहीसा दिलाश्याचा जात आहे तोवरच पुढच्या दिवशी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर झाले. या बातमीनंतर मातोश्री, शिवसेना भवन व जेथे अंत्यविधी होणार असे जाहीर झाले त्या शिवाजी पार्ककडे विक्रमी संख्येने गर्दी जमू लागली.

या गर्दीकडे लक्ष वेधून या गर्दीचा पुढील स्थानिक राजकारणावर पडू शकणारा प्रभाव तसेच या गर्दीने पडू शकणारा पायंडा याबाबत काही मनात आले ते लिहायचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या मतांचे स्वागत आहेच.

=========================

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे काल जमलेल्या विराट व न भूतो गर्दीच्या सख्येबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र काही बातम्यांनुसार हा आकडा दहा लाख, पंधरा लाख व एकोणीस लाख यापैकी किंवा याच्या आसपासचा असावा असे दिसते.

कोणत्याही राजकारणाशी संबंधीत नेत्याच्या अंत्यदर्शनाला यापूर्वी एवढी गर्दी जमलेली नाही असेही सांगण्यात आले. (हेही शक्य आहे की कै. इंदिरा गांधी वा कै. राजीव गांधी हे राष्ट्रीय पातळीवरील नेते असल्याने त्यांच्या निधनानंतर जनमानसावर पडलेला प्रभाव व अंत्यदर्शनाची इच्छा ही विखुरली गेल्याने जाणवली नाही. पण तरीही) बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उच्चांकी व अभूतपूर्व गर्दी जमली हे नाकारता येणार नाही. ही गर्दी शांत होती, शिवसेनेच्या एरवीच्या आक्रमक भूमिकेशी फारकत घेऊन जबाबदारीने वागणारी ही गर्दी दु:खाच्या सावटात आकंठ भिजलेली होती. या गर्दीला कोठेही स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायची इच्छा अर्थातच नव्हती. बंदुकांचे बार ऐकले आणि पेटत्या ज्वाळा दिसल्या की साश्रू चेहरा घेऊन खालमानेने निघून जायचे इतकाच या गर्दीचा हेतू होता.

ही गर्दी जमवलेली नव्हती. गर्दी जमावी यासाठी हाक देण्यात आलेली नव्हती. पण एवढी गर्दी जमेल असा अंदाज मात्र होता. त्या दृष्टीनेच यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आल्या होत्या.

ही गर्दी जमण्यामागची काही संभाव्य कारणे:

१. बाळासाहेबांमध्ये 'हा आपला नेता आहे, खास आपल्यासाठी आहे' असे वाटायला लावणारे काहीतरी रसायन होते.

२. बाळासाहेब हे प्रत्यक्षात सहज भेटतील असे मुळीच नसले तरीसुद्धा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा 'बाळासाहेबांपर्यंत आपण आपले गार्‍हाणे सहज समक्ष घेऊन जाऊ शकतो' अशी धारणा निर्माण होण्याइतपत जादूई करिष्मा बाळासाहेबांमध्ये होता. यामुळे ते 'साक्षात जवळचे' नेते ठरत होते.

३. बाळासाहेबांचे राजकारण गुप्तपणे जातीवर आधारलेले असे नव्हते, जसे अनेक नेत्यांचे असते अशी धारणा समाजात आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणांसाठी भाजप व इतरांसाठी काँग्रेस असे काहीसे!

४. सक्रीय पद न भूषवल्यामुळे त्यांचे 'प्रेरणास्थान' हे 'अलिखित' राजकीय स्थान अबाधीत राहिलेले होते.

५. मार्मिकता, सडेतोड मुद्दे, खर्‍याला खरे म्हणण्याचा स्वभाव आणि प्रसंगी जहरी ठाकरी भाषेत एखाद्याचा जाहीर पाणउतारा करण्यातील 'त्या काळात' जाणवलेले नावीन्य यामुळे ते 'आम' माणसाला अधिक आपले वाटत.

६. समाज ढवळून काढणारे वक्तृत्व!

७. प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय कार्य!

८. विविध क्षेत्रात असलेले घनिष्ट संबंध! (घनिष्ट हा शब्द बदनाम झालेला आहे, येथे तो सुयोग्य अर्थाने अभिप्रेत).

९. कितीही साथीदार फुटले तरी न वाकणारे व्यक्तीमत्व!

१०. राज ठाकरे बाहेर पडणे आणि मनसेने निवडणुकीत मुसंडी मारून शिवसेनेसकट सर्वांनाच अवाक करणे या घटनांनंतर बाळासाहेबांच्या बाबतीत खास असे काहीच घडलेले नसणे व त्यामुळे आलेली एक टाईम गॅप आणि तीनंतर एकदम त्यांचे अत्यवस्थ होणे! या गॅपमुळे मराठी माणसाला व इतरांनाही 'मध्यंतरी' काही टचच राहिलेला नव्हता अशी भावना निर्माण झाल्यामुळे काहीसे उचंबळून येणे! (अशीच एक टाईम गॅप राजेश खन्नांच्या बाबतीतही परिणामकारक ठरली होती असे वाटते).

११. हेड क्वॉर्टर्स मुंबईत असणे!

१२. शिवसेनेची जनमानसांत रुजण्याची प्रक्रिया इतर पक्षांच्या प्रक्रियेपेक्षा अधिक जलद व परिणामकारक ठरलेली असणे!

१३. मनसेच्या निर्मीतीनंतर शिवसैनिक समाजात 'उद्धव एकटे पडले' अशी एक भावना काही प्रमाणात निर्माण होणे.

१४. बाळासाहेबांसाठी आणि उद्धवसाठी राज ठाकरेंनी राजकीय वाद बाजूला ठेवून सहाय्यभूत ठरणे व हे शिवसैनिक व मनसे - सैनिक तसेच इतर सर्वांनी जवळून पाहणे! भारतातील व्यक्तीपूजक समाजमनावर या गोष्टीचा परिणाम होणे!

१५. खणखणीत आवाज बंद पडणे आणि नेहमीचा एखादा राजकीय नेता हरपणे या दोहोतील फरक! खणखणीत आवाज बंद पडल्यामुळे वाईट वाटणे हे पुन्हा आपल्या मातीतील माणसाच्या बाबतीत प्रकर्षाने होणे!

१६. लोकसंख्याच मुळात वाढलेली असणे व त्यामुळे आजवर झाली नाही अशी गर्दी जमणे!

१७. माध्यमांनी सेकंदासेकंदाचे दर्शन घडवल्यामुळे पाय आपोआप शिवाजीपार्ककडे वळणे! केव्हातरी आपणही शिवसैनिक होतो असेही वाटणारे त्यात सामील होणे!

या व अश्या अनेक कारणांनी ही गर्दी अचानक जमली. केवळ काही तासात एकाच भागात पंधरा ते वीस लाख जमा होणे व शांततापूर्वक वावरून काही काळाने निघून जाणे हा अचाट प्रकार या कारणांमुळे घडून आला.

==============================

या गर्दीचे झालेले व संभाव्य परिणामः

१. शिवसेनेचे राजकीय विरोधक / स्पर्धक यांचे चेहरे अवाक झालेले दिसत होते. हे असे काही होईल, इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल याची कल्पनाच आलेली नव्हती. पंतप्रधानांनी भोजन समारंभ रद्द केला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. येथपर्यंत ठीक, पण 'अलोट जनसागर' असे ज्याला सुयोग्यपणे संबोधले गेले त्या संख्येने, परिमाणाने जनता रस्त्यावर येईल हे अनेकांच्या ध्यानीमनीही नव्हते. प्रतिभाताईंनी तर 'ही गर्दी पाहून मला काय वाटले' तेच थेट सांगितले. ही गर्दी अपेक्षित असेलही, पण प्रत्यक्षदर्शींसाठी व खासकरून विरोधकांसाठी ती जवळपास 'भयकारक शक्तीप्रदर्शन' ठरली. हे शक्तीप्रदर्शन मुळीच हेतूपुरस्पर केलेले नव्हते. उत्स्फुर्तपणे व प्रेमाने लोकांनी आपापले व्यवहार बंद केले होते. दुकानांना बंद होण्याची दहशत नव्हती. इच्छा होती. विरोधकांच्या या अवाक होण्यामुळे 'मनसे बाजूला ठेवून निव्वळ शिवसेना' हा पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.

२. राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. अंत्ययात्रेपासून दोन तास बाजूला राहणे किंवा मागे मागे राहणे यातील (मी तसा वेगळा आहे) राजकारण 'नापास' झालेले स्पष्ट दिसले. हे राज यांचे अपयश मुळीच नाही. पण जनमानसावरील पकड या घटकाबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यातील मोठी तफावत स्पष्ट होणे नक्कीच आहे.

३. अडवानी, शरद पवार व मुख्यमंत्री हे तिघे अंत्यदर्शनासाठी आलेले दिसत असताना आणखी एक बाब आढळली म्हणजे त्यांच्यासाठी कोणी खासकरून पुढे झाले नाही. सामान्य व्हिजिटर्सप्रमाणेच हे तिघे उद्धव व राज यांना अनुक्रमे भेटून पुढे गेले. असल्या सूक्ष्म बाबींचा प्रत्यक्षदर्शी व टीव्ही प्रेक्षक असलेल्या सामान्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुंबई खरोखरच इतर कोणाच्याही बापाची नाही हे अगदी कोरले गेले. येथे निवडणुकीसाठी यायचे असेल तर आमच्या परवानगीने यावे लागेल असे काहीसे झाल्याचे वाटून गेले.

४. काही काळ, म्हणजे दोन तीन वर्षे मनसे व शिवसेना यांच्यात मनसेकडून होणारा राजकीय विरोध सौम्य होण्याची शक्यता आहे. कदाचित 'बाहेरून युती'सारखे काही होण्याचीही शक्यता आहे. याहीमागे जनमताचा रेटा असू शकेल. काही माणसे इकडची तिकडे झाल्यासही नवल नाही.

५. दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच).

६. जे शेकडो सभांनाही दिसले नाही ते अंत्यदर्शनाला दिसले. अजिबात मनात नसतानाही परिस्थिती एन्कॅश झाल्यासारखे झाले. असा पायंडा पडण्याची शक्यता आहे.

७. माध्यमांना जवळपास छत्तीस तास इतर कोणतेही काम नव्हते. देशाची आर्थिक राजधानी, एखादे अजस्त्र उर्जाजनित्र बंद पडत जावे तशी अत्यल्प काळात बंद पडत गेली. पाठोपाठ पुण्यात शांतता पसरली. भारतीय राजकारणाने याची नोंद (अख्खी मुंबईच सडनली बंद पडण्याची) नक्कीच घेतली. शिवसेनेला यापुढे मनातल्या मनात दहा गुण जास्त देऊनच राजकीय खेळी खेळल्या जातील याची शक्यता आहे.

८. ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे. (हे पुन्हा भावनिक समाजाचे लक्षण, ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा आहे).

९. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मृत्यूपश्चात बाळासाहेबांची प्रतिमा अधिकच उजळली आहे. त्यांच्या स्मृतींना मनात अग्रणी ठेवून शिवसैनिक काम करतील हेही जवळपास उघड आहे.

=================================

मला ही गर्दी एक विलक्षण संदेश वाटला. नकळतपणे व आपोआप दिला गेलेला. सामान्यांनी दिलेला. जो दिला जावा असे अजिबात आवाहन करण्यात आलेले नव्हते.

केवळ 'खूप गर्दी जमली होती' किंवा 'काय गर्दी का काय' असे म्हणून विसरून जाण्यासारखी ही गर्दी नव्हती हे नक्की. या गर्दीचे राजकीय व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटते?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही मुद्दे पटले नाहीत.........काही प्रचंड पटले.
.
.
ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे.>>>>>> या बाबतीत अनिश्चितता आहे

परिणामांच्या २ व ३ क्रमांकाशी असहमत.
..आणखी एक निरीक्षण.. अंतिम संस्काराआधी राज यांनी पवार-अडवाणी-स्वराज यांना नमस्कार केला, पण शेजारच्या भुजबळांकडे ढुंकूनही पाहिले नाही. भुजबळांच्या चेहर्‍यावर मात्र अपेक्षेचे भाव होते.

हेम हे मलाही प्रकर्षाने जाणवले..
बेफिकीर.. छान लिहिलय.. कालच सगळच लोकांच वागणं उत्फुर्सततेचं होतं.

दुर्दैवाने असे आणखी एखाद्या नेत्याचे निधन झाले तर यापुढे कदाचित अश्या प्रकारचे शक्तीप्रदर्शन हेतूपुरस्परही करण्यात येईल. (देव करो व कोणाचे निधन न होवो, अर्थातच). कदापी होणे नाही

बाकी मुद्यांशी सहमत

लोकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाचा छान आढावा घेतलात... बर्‍याच अंशी पटलेच आहेत हे मुद्दे.

उदयन +१
त्यांचा रोखठोकपणा व बोलून गेलेल्या प्रत्येक वाक्याची जबाबदारी उचलण्याची पद्धत आज एकातरी राजकीय नेत्याकडे आहे का, हे वाटून गेले कायम... मराठी मनाला सतत जागॄत ठेवण्याचे कार्य आणि राजकारण उद्द्वजींना स्वतःच्या जबाबदारीवर कितीसे जमेल आणि जनसामान्यांचा पुढच्या ह्या पिढीस कसा पाठिंबा राहिल हे येता काळच सांगेल.

छान लेख लिहिलाय.. कालची गर्दी खरेच अचाट आणि उत्स्फुर्त...

मला राजकारणातले फारसे कळत नाही...

पण हे सारे पाहून एक विश्वास आला, बाळासाहेब गेले तरी मराठी माणसे यापुढेही या नावाने एकत्र जोडलेली राहतील..!!

बरेच मुद्दे पटले. भविष्यासंदर्भातले मुद्दे मात्र पटले नाहीत.

बघू काय होतंय ते दिसेलच समोर.

छान लेख ... ( इलेक्शन पोल आणि असले लेख भाकड असतात, हे काळ सिद्ध करेलच.)

बेफि... मुद्देसुत आढावा आवडला. नेमका आकडा किती जमेल हे सांगणे अवघड असणार होते तरी इतका आकडा नक्कीच कोणी पकडला नसावा. इतक्या मोठ्या संखेने लोक जमून कुठलीही अप्रिय घटना घडली नाही हे श्रेयस्कर.

याचे सामाजिक परिणाम काय होतील ते सांगता येत नाही पण राजकिय दृष्ट्या राज-उद्धव एकत्र येतील ही शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. गेल्या काही काळात तसे सुतोवाच समजून येत होते. पक्ष विलिन होणे अशक्य. युती होईल. मुंडे ह्याबाबतील आग्रही आहेत हे सर्वच जाणतात.

राज शिवसेनेत असताना जागांचा (विधानसभा असे नाहीतर पालिका) सेनेकडे होता तो सध्याच्या सेना-मनसे जागांपेक्षा कमी आहे की जास्त हे कोणी सांगू शकेल का? जर जास्त असेल तर नजिकच्या काळात हे पक्ष एकत्र येतील यात काही शंका नाही.

.......... ह्या गर्दीत पुर्वी शिवसैनिक असणारे आणि आता मनसे कार्यकर्ते असणारे अनेकजण जे राज प्रमाणेच साहेबांना आदरणीय मानत होते ते देखील या गर्दीत सहभागी झाले असणारच. त्यांना देखील शिवसैनिक संबोधण्यात आले आणि त्याचे त्यांना दु:ख्ख झाले असेल असे अजिबात वाटत नाही.

बेफि.. मला असे वाटते कि आता राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणे, हे राजकारणात गैर नाही.. त्या दोघात तसे प्रेमही आहेच, राजकीय मतभेद, आताच गुंडाळायला हवेत..

असे न घडो, पण आता मात्र वैर कायम राखले, तर मराठी म्हणून, एक शक्ती भविष्यात प्रभावी ठरणे कठीण आहे. शिवाय दुहीचा फायदा घेणारे, तर टपलेलेच आहेत.

सर्व मतप्रदर्शकांचे आभार.

>>>याचे सामाजिक परिणाम काय होतील ते सांगता येत नाही पण राजकिय दृष्ट्या राज-उद्धव एकत्र येतील ही शक्यता अनेक पटींनी वाढली आहे.<<<

सेनापती, परंतु आंबा १ यांनी दिलेल्या लिंकवर विश्वास ठेवायचा झाल्यास तसे होण्याची शक्यता खरे तर मावळतेच.

टीव्हीवर दिसणार्‍या देहबोलीनुसारतरी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना सामील करून घेत होते व सोबत ठेवत होते असे वाटले. पण बाळासाहेबांचे पार्थिव शिवसैनिकांनी उचलावे (विशेषतः राज हे फुटून व बंडखोरी करून बाहेर पडलेले आहेत या पार्श्वभूमीवर) ही भूमिका घेतली जाणे अगदीच अवास्तवही वाटत नाही. असे ऐकले की नारायण राणेंना मातोश्रीकडे फिरकू दिले गेले नाही. भुजबळांकडे राज ठाकरेंनी ढुंकूनही पाहिले नाही याचा उल्लेख वर हेम यांनी केलेलाच आहे. अश्या प्रकारच्या मानसिकतेत कोणी राज यांना तसे म्हणाले असेल का, यावर मनातून विश्वास ठेवावासा वाटत नाही, पण सांगता मात्र येत नाही.

काही मुद्दे पटले.
मुद्दा क्र. २ शी असहमत. <<<<<<<<राज ठाकरे व त्यांच्या मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे उघड आहे. यामागे राज यांनी 'माझ्या व्यक्तीमत्वात व यशात बाळासाहेबांचेच सर्वाधिक योगदान आहे' हे कबूल करणे आहे. >>>>>>> ते योगदान आहेच. राज ने कबुल केले म्हणुन नाहीच तर ते विझिबल आहे. सर्वसामन्य माणुस देखील ते जाणतो. त्यामुळे राजच्या ह्या वक्तव्यामुळे त्याच्या स्वतःवर किंवा मनसेतील कार्यकर्त्यांच्या मनावर ताण आलेला असणार हे पटले नाही.
मुद्दा क्र. ३ शी सुध्धा असहमत.
<<<<<ढाण्या वाघच हरपल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जनमानसातून आधाररुपी पाठिंबा मिळेल हे तर उघडच आहे.>>>> काही सांगता येत नाही ह्याबाब्तीत. ह्याच्या विरुध्ढ ही होउ शकते जसे की ढाण्या वाघच हरपल्यामुळे शिवसेनेत राम राहिला नाही.

>>>असे न घडो, पण आता मात्र वैर कायम राखले, तर मराठी म्हणून, एक शक्ती भविष्यात प्रभावी ठरणे कठीण आहे. शिवाय दुहीचा फायदा घेणारे, तर टपलेलेच आहेत.<<<

या मुद्याबाबत माझे मतः

मराठी माणूस हा घटक राजकीय बनवणे हे काम शिवसेना (व आता मनसेही) याच दोन पक्षांनी केलेले आहे. अन्यथा इतर पक्षांच्यादृष्टीने असा काही मुद्दा असण्यातच काही मतलब नाही. (म्हणजे तो 'मुद्दा' आहे हे शिवसेनेने स्ट्रेस केल्यानंतर त्यांना तो मान्य करून अ‍ॅड्रेस करावा लागलाही असेल, पण मूलतः त्यांच्यामते असा काही मुद्दा नाही).

मुंबईतील मतदारसंघनिहाय मतदारांना आकर्षित करणे इतपतच त्यांची निवडणुक रणधुमाळी व प्रचार सीमीत असावा.

किंबहुना, मराठी माणूस हा मुद्दा बनवणे हे शिवसेनेला आज लाभलेल्या पॉलिटिकल स्टेटसमागचे सर्वाधिक मोठे कारण आहे असे वाटते.

राणे कुठे दिसले नाहीत कदाचीत फिरकु दिले नसेल. भुजबळ होते. अगदी संजय निरुपमही दिसला. महत्वाचे म्हणजे ह्या ४-५ दिवसात निलम गोर्‍हे कुठेच नजरेस आल्या नाहीत. त्या सेनेच्या प्रवक्ता आहेत ना? अगदी कालही त्या कुठे दिसल्या नाहीत.

राज ह्यांनी स्वतःच थोडीशी सावध भूमिका घेतली होती असे वाटते.

शिवसेना भवन ह्या शिवसेनेच्या कार्यालयाजवळ जाऊन नको ते घडण्याऐवजी परस्पर शिवाजी पार्कला पोहोचण्याचा राजचा निर्णय मला व्यक्तिशः पटला

राणेंनी आधीच्या दिवशी फोन केला होता म्हणे पण त्यांना नंतर कळवतो असे सांगण्यात आल्याचे ऐकीवात आहे.

बाकी लेखातील बरेच मुद्दे पटले.

देवकाका.. आंबा यांनी तीच लिंक दिली आहे वर आणि मी त्या बातमीकडे फार लक्ष्य द्यायची गरज नाही असे म्हटले आहे. Happy

<<< शिवसेना भवन ह्या शिवसेनेच्या कार्यालयाजवळ जाऊन नको ते घडण्याऐवजी परस्पर शिवाजी पार्कला पोहोचण्याचा राजचा निर्णय मला व्यक्तिशः पटला. >>>
होय. त्यात चुकीचे असे काही नव्हते. मलाही पटले.

<<पुढील निवडणुकीत एक अनबीटेबल फॅक्टर ठरू शकेल इतपत परिस्थिती निर्माण झालेली आहे.>>
पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत हि सहानुभुती टिकण्याची शक्यता खुप खुप कमी आहे. बाकीचे विरोधक सध्या आवाक जेव्हडे झाले त्यापेक्षा ते खुष आहेत की लगेच कोणत्याच निवडणुका नाहीयेत.
उद्धव ठाकरेंसमोर खुप मोठ आव्हान आहे ते भविष्यात होणारी शिवसेनेतली फाटाफुट रोखण्याची...याच सुतोवाच काल मनोहर जोशींनी पण केलच आहे.

एकंदरीत सर्व प्रकारात उद्धव ठाकरे एकटे पडतील असे मला वाटत आहे.

बाळासाहेब असतानाच उद्धव ह्यांच्यावर मूठभर लोकांच्या प्रभावाखाली संघटनेला बाधक निर्णय घेणारा कार्याध्यक्ष अशी जाहीर टीका अनेक लोकांनी केली आहे जे शिवसेनेतून बाहेर पडले आहेत.

बाळासाहेबांचा दरारा न राहिल्याने काही जुन्या पदाधिकार्‍यांचा स्वार्थही डोके वर काढू शकतो. त्याचा बंदोबस्त कसा करायचा ह्याची उद्धवना सदैव चिंता राहू शकते.

राणे 'मी आउट ऑप्फ ईन्डिया 'आहे असे एका वाहिनीला टेलिफोनिक मुलाखतीत सांगताना मी ऐकले होते. कदाचित असे घडणार याचा अंदाज आल्याने कन्फ्रंटेशन नको म्हणून गेले असावेत...

Pages