तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

Submitted by फूल on 17 November, 2012 - 16:22

"ज़ब कि तुझ बिन नही कोई मौज़ुद,
तो फ़िर य़े हंगामा ए खुदा क्या है?"

ज्येष्ठ आणि कवीश्रेष्ठ नाझ खिलावी यांच्या दोन ओळींनी ह्या निबंधाची सुरुवात करावीशी वाटली. तुझ्याविना ह्या जगात दुसरं काही नसेलच तर हे देवा, हा सारा पसारा, ही माया, हे द्वंद्व; हे सगळं काय आहे. जनसामान्यांना, संसारीजनांना; थोडक्यात माझ्यासारख्या क्षुद्र पामरांना; ज्यांना अध्यात्मातला "अ", भक्तितला "भ" आणि नामातला "न" यांची सुतराम जाण नाही, अशा अज्ञजनांना; संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, भक्तराज, आद्य लोककवी, संत नामदेव यांनी दिलेले उत्तर म्हणजेच "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल" हा अभंग!

फारच उच्चप्रतीचं काव्य आहे हे. जे समजणं, समजावून घेणं यासाठी हा जन्म पुरा पडेल असं वाटत नाही. पण तरीही माझ्यापुरता अर्थ समजावून घ्यायला हरकत नाही असं वाटतं. "हे विश्वचि माझे घर" असं म्हणण्याची आपली पात्रताच नाही. पण २१ व्या शतकातील एक नवयुवती म्हणून ह्या अभंगाकडे मी एका वेगळ्या अर्थाने नक्कीच बघू शकते आणि तोच प्रयत्न आज मी करणार आहे. मी नास्तिक नाही पण मला कुठल्याही दगडाला देव समजून शेंदूर फासणं मान्य नाही. लोकांना फसवून, त्रास देऊन, अनेकांच्या दु:खाचं कारण बनून शेवटी देवाकडे जाऊन ५० तोळ्यांचा हार चढवला कि पापांचं क्षालन होतं हे मानणारी मी नाही. मला देव माझ्या लिखाणात दिसतो. माझ्या कामात दिसतो. माझं काम हाच माझा विठ्ठल! भले मी रोज देवापुढे हात जोडत नसेन पण माझ्या कामाशी मी प्रामाणिक आहे. ह्या देशाची एक नागरीक म्हणून, ह्या समाजरचनेचा एक हिस्सा म्हणून, माझ्या कुटुंबाची एक सदस्य म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं एक माणूस म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि माझी कर्तव्य ह्यांची मला पुरेपुर जाणीव आहे. आणि ही जाणीव हाच माझा विठ्ठल आहे.

७०० वर्षांपासून ते आजतोवर राष्ट्रभर नामभक्तिचा प्रसार करणाऱ्या या अजरामर संतरचनेला दाद म्हणून हा खिलावींचा शेर वापरला इतकेच! कारण सामान्यांचा प्रश्न मोजक्या शब्दात मांडण्याचं सामर्थ्य या शब्दांत आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींसारख्या अनन्यसाधारण संतमहात्म्यांचा उपदेश जनमानसांत फक्त पोचवण्याचंच नव्हे तर ते रुजवण्याचं काम करणाऱ्या श्री संत नामदेव महाराजांना त्रिवार वंदन करूनच आता पुढे जायला हवं....

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥ नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारीला भागवत ॥ भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥

नामदेव महाराजांकडे आलेले विस्तार कार्य त्यांनी चोख पार पाडले. "नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदिप लावू जगी ॥"असं सांगत सांगत त्यांनी देशभरात भक्तिची आक्रमणे केली. म्हणून नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांनी बांधलेल्या भक्तिमंदिराचा आधारस्तंभ होते, आहेत आणि राहतील.

तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥

भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा प्याला म्हणजे नामदेवांच्या "नामभक्तिचे" एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. "चक्रवाक पक्षी वियोगे बाहती । जाहले मज प्रती तैसे आता ॥" असे म्हणणाऱ्या नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विठ्ठल दिसू लागला. खरं तर "तीर्थ" म्हणजे पाण्याने भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल. म्हणून चंद्रभागा नदी हे "तीर्थ" आणि त्याकाठी वसलेलं "पंढरपूर" हे "क्षेत्र" म्हणजे स्थान! नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झाले. ह्या विठ्ठल नामाच्या गजरात "माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली" आणि म्हणून "देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥." पुढे नामदेवांना माय, बाप, आप्त, इष्ट, गण, गोत, गुरू ह्या सगळ्यातच विठ्ठल दिसू लागतो आणि अखेर ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात, ते सुख जे ह्या मायिक विश्वाच्या अतीत आहे, जे कालातीत आहे आणि निरंतर आहे म्हणजेच "नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥". त्या सुखाचं "निधान" म्हणजे साठाही विठ्ठलच आहे असे ते सांगतात. आता ह्या जागेला पोचल्यावर, विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचे भय नाही. हा या प्याल्याचा शेवटचा घोट. हुश्श!!

जग सुधारण्याचा विचार करणारे संतमहात्मा हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येतात. आणि ते लाखात एक असतात. लिमोझिन, फेरारी ह्या गाड्यांचं कसं कधीच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही. पण "मारुती सुझुकी" मात्र घराघरांत असते. तसंच आहे. दर दिवशी जगभरात शेकडो मुले जन्माला येतात पण १६ व्या वर्षी भगवद्गीतेचे प्राकृतात भाषांतर करणारा एकच असतो. ती जबाबदारी फार मोठी आहे. देव ती आपल्यासारख्यांच्या तकलादू आणि पोकळ खांद्यांवर कदापि सोपवणार नाही, काळजी नसावी. पण देवाने हा मनुष्य देह "कसा वापरावा" हे आपल्यासारख्यांना कळण्यासाठी निर्माण केलेल्या चालत्या बोलत्या "माहितीपुस्तिका" म्हणजे हे संतजन आहेत, आणि त्यांचा आपापल्यापरीने रोजच्या जीवनात आपल्या मनाला झेपेल आणि बुध्दिला पटेल असा वापर तर आपण नक्कीच करू शकतो.

माझ्या मते प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे. यशोदेचा बालमुकुंद वेगळा होता आणि राधेचा कान्हा वेगळा होता, देवकीचा नंदन वेगळा होता आणि मीरेचा कृष्ण वेगळा! तसंच एखाद्या चित्रकाराला त्याचं चित्र हाच विठ्ठल! पं. भीमसेन जोशींना तो गाण्यात दिसला म्हणूनच त्यांच्या गाण्यातून लोकांना अमृतानुभूती मिळाली, सचिनला बॅट मधे विठ्ठल दिसला आणि तो आज जागतिक क्रिकेटचा देव मानला जातो. नारयण मूर्तींना तो सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग मधे दिसला. एखाद्या गृहिणीला तो तिच्या घरकामात आणि नवऱ्याची, मुलांची देखभाल करण्यात दिसेल, एखाद्या शेफला तो खिलवण्यात दिसेल, एखाद्या नर्तकाला नृत्यात दिसेल तर एखाद्या वादकाला त्याच्या वाद्यात दिसेल.

मला असं वाटतं कि जर एखादी गोष्ट मी माझ्या आयुष्यात; स्वत:चं स्वत्व हरवून, देहभानरहित हॊऊन, अतिशय एकाग्र चित्ताने करू शकत असेन , त्यासाठी माझी कुठलाही त्याग करण्याची, कितीही परिश्रम करण्याची तयारी असेल तर मला माझ्यापुरता माझा विठ्ठल सापडल्यासारखंच नव्हे का?

अर्थात म्हणून मी नामदेवांइतकी थोर नक्कीच होणार नाही. माझा विठ्ठल माझ्या कलेपुरता किंवा कामापुरता मर्यादित आहे. ते काम झालं किंवा त्या कलेचा अभ्यास झाला की माझा विठ्ठल दिसेनासा होतो. पण नामदेवांना माझ्यातहि विठ्ठल दिसला असता. सांगायचा मुद्दा हा की संत महात्म्यांना "ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे" तिथे ईश्वराचे निजरूप दिसायचे. माझे तसे नाही. पण तरीहि पं. भीमसेन जोशींसारखी एक तान जरी घेता आली तरी आयुष्याचं सार्थक होईल असं वाटत नाही का?

आता ह्याच नाण्याला उलट करून बघूया... आपल्या कर्तृत्त्वावर मोठ्या झालेल्या लोकांना त्यांच्या कामात विठ्ठल दिसला कारण त्यांच्या साधनापरिश्रमाला तोड नाही. पण जर प्रत्येकालाच स्वत:ला नेमून दिलेल्या कामात विठ्ठल दिसू लागला आणि प्रत्येक जण आपल्याला नेमून दिलेले काम चोख बजावू लागला तर प्रत्येक जण सुखी होणार नाही का? मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की आपण आपल्या पुरता विचार करावा. जगाचा विचार करण्याची आपली क्षमताहि नाही आणि आपल्याकडून तशी अपेक्षाहि नाही. पण जग हे शेवटी माणसांचच बनतं ना? "खुद हि भीड का हिस्सा है। तकलिफ़ भी खुद हि को है।" ह्या न्यायाने किंवा अन्यायाने म्हणा प्रत्येकाने आपलं काम योग्य केलं, ते देवाचं काम समजून केलं, तर जगातले असंख्य प्रश्न निकालात निघतील नाही का?

हा विचार अवास्तव किंवा अतिशयोक्ती नाही. हा पोकळ आशावादहि नाही. पं. भीमसेन जोशी, मास्टर ब्लास्टर ही माणसंच आहेत. त्यांनाही दिवस २४ तासांचाच आहे. जर त्यांची ब्रह्मानंदाशी टाळी लागू शकते. तर आपण काय पाप केलंय? आणि आपण त्यांच्याइतके मोठे हॊऊ न हॊऊ हा वेगळा भाग! पण किमान स्वत:चं काम प्रामाणिक पणे, संपूर्ण मन लावून करण्याचा प्रयत्न तर मी नक्कीच करू शकेन!

"तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल" ह्याचा अर्थ संत नामदेवांसाठी फार मोठा आणि व्यापक असेल पण माझ्यापुरता विठ्ठल मी शोधलाय. तो कसा बघायचा आणि कशात बघायचा हे ही मला कळलं आहे. मी ह्यातच समाधानी आहे. नामदेवांसाठी चरांचरांत भरून रहिलेला विठ्ठल थोडावेळ तरी माझ्या वाट्याला येईल. आणि न जाणो कदाचित येत्या जन्मांमधे हाच मार्ग मला नामदेवांच्या विठ्ठलापर्यंत घेऊन जाईल. कामात विठ्ठलाला पाहणाऱ्या अशाच दोन ओळी...

फिरत्या चाकावरती देशी
मातीला आकार, विठ्ठला,
तू वेडा कुंभार...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विठ्ठल विठ्ठल.....

फूल, त्या ओळी 'नाझ खिलावी' यांच्या''तूम इक गोरखधंदा हो' ह्या अजरामर सूफी रचनेतल्या आहेत.

नुस्ता बदल करु नका फूल, शक्य असल्यास ही रचना वाचा आणि नुसरत साहेबांनी गायलेली ऐका. तूमच्या लेखात जे आहे त्याच पद्धतीचं काही लिहिलय त्यात

पुन्हा एकदा सुर्रेख... फुला, एकसे एक बढकर लेख येतायेत.
<<आता ह्याच नाण्याला उलट करून बघूया... आपल्या कर्तृत्त्वावर मोठ्या झालेल्या लोकांना त्यांच्या कामात विठ्ठल दिसला कारण त्यांच्या साधनापरिश्रमाला तोड नाही. पण जर प्रत्येकालाच स्वत:ला नेमून दिलेल्या कामात विठ्ठल दिसू लागला आणि प्रत्येक जण आपल्याला नेमून दिलेले काम चोख बजावू लागला तर प्रत्येक जण सुखी होणार नाही का? मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की आपण आपल्या पुरता विचार करावा. जगाचा विचार करण्याची आपली क्षमताहि नाही आणि आपल्याकडून तशी अपेक्षाहि नाही. पण जग हे शेवटी माणसांचच बनतं ना? "खुद हि भीड का हिस्सा है। तकलिफ़ भी खुद हि को है।" ह्या न्यायाने किंवा अन्यायाने म्हणा प्रत्येकाने आपलं काम योग्य केलं, ते देवाचं काम समजून केलं, तर जगातले असंख्य प्रश्न निकालात निघतील नाही का? >>
प्रश्नच नाही.... हे उत्तरच आहे.
Happy

पण २१ व्या शतकातील एक नवयुवती म्हणून ह्या अभंगाकडे मी एका वेगळ्या अर्थाने नक्कीच बघू शकते आणि तोच प्रयत्न आज मी करणार आहे. मी नास्तिक नाही पण मला कुठल्याही दगडाला देव समजून शेंदूर फासणं मान्य नाही. लोकांना फसवून, त्रास देऊन, अनेकांच्या दु:खाचं कारण बनून शेवटी देवाकडे जाऊन ५० तोळ्यांचा हार चढवला कि पापांचं क्षालन होतं हे मानणारी मी नाही. मला देव माझ्या लिखाणात दिसतो. माझ्या कामात दिसतो. माझं काम हाच माझा विठ्ठल! भले मी रोज देवापुढे हात जोडत नसेन पण माझ्या कामाशी मी प्रामाणिक आहे. ह्या देशाची एक नागरीक म्हणून, ह्या समाजरचनेचा एक हिस्सा म्हणून, माझ्या कुटुंबाची एक सदस्य म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं एक माणूस म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणि माझी कर्तव्य ह्यांची मला पुरेपुर जाणीव आहे. आणि ही जाणीव हाच माझा विठ्ठल आहे.>>>

जियो. आजचा दिवस सार्थकी लागला हे ललित वाचून.

फुल,

यु आर ऑन द राईट ट्रॅक!

देव, अध्यात्म म्हणजे भोंदुगिरी करणारे बाबा हा "समज" असलेल्या लोकांनी एकदा तरी वाचावा असा सुंदर लेख. फारच सुंदर.. माझ्या निवडक दहात!

@ बागुलबुवा:

आज "तुम एक गोरखधंदा हो" ऐकलं. मला एक स्वर्गीय अनुभूती दिल्याबद्दल धन्यवाद. अजूनही तेच ऐकते आहे.

लिखाणातही बदल केले आहेत. मायबोली वर येऊन जे होणं अपेक्षित होतं ते घडतंय. खूप काही शिकायला मिळत आहे. हार्दिक धन्यवाद! Happy

माझ्यासारख्याच इतरांसाठी ही लिंक तुम एक गोरखधंदा हो...

http://www.youtube.com/watch?v=HwhKtSL8pp4

@ mansmi18: हार्दिक आभार!

तसेच सर्वांचेच आभार! मला प्रोत्साहन दिल्याबद्दल.

अतीशय नेमका प्रश्न व त्याची अतीशय नेमकी व सुसंगत उकल !!!

त्यासाठी नामदेवाची रचना आधारभूत मानलीत व विठ्ठल हा माझ्या अतीशय जिव्हाळ्याचा विशय साध्य म्हणून वापरलात हे फार फार आवडले

गेले काही दिवस असेच चिंतन विचा करत होतो की<<<मला देव माझ्या लिखाणात दिसतो. माझ्या कामात दिसतो. माझं काम हाच माझा विठ्ठल! >>>व अश्यात हा तुमचा लेख वाचणे हा योगायोगच

मला असाच एक शेर प्रत्यक्ष श्रमानुभूतीनंतर सुचला होता तो असा होता ...........

नाहतो घामात विठ्ठल माझिया
राबतो त्या सावळ्या मातीत मी

असो !!

आपले मनःपूर्वक आभार व हार्दिक आभिनंदन
तुमच्या विचारातला प्रामाणिकपणा व ठामपणा अतीशय लोभस आहे

आज पुन्हा एकदा हा लेख वाचतोय हे माझा यावरील पूर्वीचा प्रतिसाद वाचून आता समजले Happy

पुनश्च धन्स

पुलेशु

~वैवकु
Happy

मस्त लिहिले आहे, तुम्ही तुमचा विठ्ठल शोधा, अप्रतिम!
तू लिहिलेल्या मुद्द्याप्रमाणेच मला हा अभंग अत्यंत क्रांतीकारक, रिबेलिअस, लिबरल असा वाटतो. प्रस्थापित धर्मचौकटीतली प्रत्येकच गोष्ट ही फक्त विठ्ठलच आहे, तिर्थही तोच, क्षेत्रही तोच, देवपूजाही तोच हा विचारच जाचक आणि भ्रामक धार्मिक संकल्पना मोडीत काढणारा, माणसाला मुक्त करणारा आहे.