आजी

Submitted by फूल on 12 November, 2012 - 17:20

आज ३ दिवसांच्या रजेनंतर निखिल कामावर जात होता. तीन दिवस त्याच्या आजारपणात कसे गेले कळलंच नाही. थोडा थकवा, थोडा अशक्तपणा ते सगळं आलंच ओघाने. मी नेहमीप्रमाणेच पत्निसुलभ काळजीत. कसा जाईल? वेळेवर खाईल की नाही? दिवसभर काम होईल का ह्याच्याने? कि दिवसभराच्या थकव्याने पुन्हा आजारपण वगैरे वगैरे.

त्याला शिदोरी बांधून दिली आणि नवरा कामावर भुर्र. मी आमच्याच घराच्या बाल्कनीत जाऊन त्याला अच्छा करायला उभी राहिले. नेहमी सारखंच हसून निखिल ने हात हलवला मी हि हसून टाटा केलं. आणि तो पाठमोरा झाल्यावर नकळतच माझे हात जोडले गेले. मनात तो सुखरूप परत यावा ही अपेक्षा.

त्याक्षणी दूर कुठेतरी मनाच्या खोलवर जपून ठेवलेली एक आठवण; धावत येऊन मला कोणी बिलगावं तशी बिलगली. माझ्या आजीची आठवण. तिला मी कैक वेळा असं हात जोडून उभं राहीलेलं पाहिलंय. कोल्हापूरच्या घराच्या मागच्या अंगणात. स्वच्छ अंघोळ केलेली, गोरीपान, कपाळाला कुंकु, चेहऱ्यावर म्हातारपणाच्या नव्हे तर अनुभवाच्या सुरुकुत्या, थोडे थोडके नव्हे तर ७० पावसाळे आणि तितकेच उन्हाळे बघून झालेले पांढरे केस, पण पूर्ण पांढरे नाहीत हं किंचित करडे आणि तेल लावून चप्प विंचरलेले, एका बाजूला भांग, कदाचित माझ्या सगळ्याच मावश्या आणि आई सुद्धा म्हणूनच एका बाजूला भांग पाडत असतील. अर्थात आजीनेच त्यांना आणि त्यांच्या केसांना वळणं लावली होती.

मी आजीला कधी नऊवारी साडीत बघितले नाही. पूर्वी नेसायची. पण मी बघते आहे तेव्हापासून गोल साडी नेसायची, चापून चोपून, साध्याच सुती साड्या.

आजोबा होते तेव्हा गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र आणि हातात कायमच बांगड्या भरलेल्या. अगदी सर्वार्थाने भरलेला हात. हाताची लांब सडक बोटे अजून आठवतात मला. इतकी वर्ष कष्ट करूनही तिचा हात मऊ कसा हे मला पडलेलं आणखी एक कोडं. तो हात हातात घेतला कि त्यात तिच्या मायेची उब जाणवायची. तोच हात कित्येकदा माझ्या पाठीवरून, डोक्यावरून प्रेमानं फिरलाय.

माझी आजी तशी चांगलीच उंच होती आणि सडसडीत बांधा. मला नेहमी वाटायचं आजी तिच्या तरूणपणी किती सुंदर दिसत असेल नाही? माझ्या वेण्या आवळता आवळता आजीने सांगितलेल्या तिच्या आणि तिच्या मुलींच्या केसांबद्दलच्या किती तरी गोष्टी आठवतात.

नेहमीच चेहऱ्यावर करारी भाव पण डोळ्यात मात्र अपार माया आणि कोल्हापूरला आल्या आल्या किंवा कोल्हापूरहून निघताना नमस्काराला वाकून वर बघितल्यावर तिच्या डोळ्यातून ओसंडणारी माया, आशिर्वाद, सदिच्छा सगळं सगळं अजून आठवतं. डोळेभरून बघायची मला. होतेच मी तिची लाडकी एकुलती एक नात.

माझी कोल्हापूरची एकमेव अगदी सेंट परसेंट आजीसारखी आजी. माझी आजी. माझ्या आईची आई. बाबांची आई सुध्दा खरं खासच होती पण तिचा सहवास लाभण्याचं भाग्य माझ्या नशीबी नव्हतं. माझ्या वयाच्या चौथ्या वर्षीच ती आजी देवाघरी गेली. पण ही कोल्हापूरची आजी तर अगदी जवळची. आजी म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर तिच उभी राहते.

माझं आजोळ कोल्हापूर. लहानपणी झुक झुक आगिनगाडी हे गाणं जणू मी प्रत्यक्ष जगले आहे. कधी शाळेला मे महिन्याची सुटी लागते आणि कधी एकदा मी कोल्हापूर गाठते असं व्हायचं. मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस. आमची ठरलेली गाडी. कधी मामा, मावशी नाहीतर कोणीतरी घ्यायला यायचं आणि मे महिन्याची सुटी संपली की आई-बाबा न्यायला यायचे. हे असं सारं मी ५ वर्षांची असल्यापासून चालू झालं ते अगदी अलिकडे पर्यंत चालू होतं. म्हणजे मी कॉलेजला असताना सुद्धा.

महालक्ष्मी एक्सप्रेसही तशीच माझ्या आयुष्याला जोडलेली. जणू जन्मच झाला माझा त्या गाडीत. वर्षातून दोनदा कोल्हापूरला जाणं येणं व्हायचंच. रात्री ९.०० वाजता गाडी ठाण्याहून सुटायची. आणि सकाळी ८.००-८.३० ला कोल्हापूर. एरवी कधीही लवकर उठावसं वाटलं नाही पण गाडीत मात्र आईने उठवलं की लगेच उठून बसायचे. आता मामा येईल स्टेशनवर घ्यायला, त्याच्या एम. ए. टी. वरून. काय सुख? काय सुख? जणू स्वर्गच. मिरजेनंतर दोन्ही बाजूला पळणारी ऊसाची हिरवी गार शेतं बघता बघता कोल्हापूर कधी यायचं कळतच नसे. मामा स्टेशनवर उभाच असायचा आणि त्याला धावत जाऊन बिलगायचं.

अजोबा खिडकित किंवा मला आठवणाऱ्या आमच्या जुन्या घरात बाहेर खुर्ची टाकून वाट बघत बसायचे. आजोबांची ती सवयच होती कुणीही येणार म्हटलं की अशीच वाट बघत बसायचे. आणि लांबून मंडळी येताना दिसली की, "अगं ए हे आलं बघ खुळं डंब." आजोबा आणि तिकडचे सगळेच मला डंबा म्हणायचे. ते तसं का म्हणायचे ते आजतागायत मला कळलं नाही. पण ते प्रेमाचं संबोधन होतं एव्हढं मात्र जाणवायचं. ह्या माणसांनी मला अगदी दगडू, धोंडू काहीही म्हटलं असतं तरी ते प्रेमाचंच होतं. "अगं ए हे खुळं डंब आलं बघ." खुळा हाही खास कोल्हापूरी शब्द आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना नपुसकलिंगात संबोधण्याची धाडसी कोल्हापूरी शैली. ते गण्या, ते सुश्या पासून ते ते बच्चन आणि ते सच्या पर्यंत.

आजोबांचा हा पुकारा झाला की आजी लगबगीनं तांब्यातून पाणी आणि भाकर तुकडा घेऊन यायची आणि माझ्या आणि आईवरून भाकर तुकडा ओवाळून टाकायची. तिच्या नुसत्या सदिच्छांनीच साऱ्या वाईट शक्तिंचा नाश झाला असता तर त्या भाकर तुकड्याची गरजच काय? पण तिची श्रद्धा आणि आमची फक्त उपस्तिथी. ओवाळल्याशिवाय आत यायचं नाही. मला त्यातही गंमत वाटायची. आपलं कौतुक करतायत असं काहीतरी.

मग काय कौतुकाला ऊत यायचा आणि अगदी आजीसुलभ कौतुक. तेल लावून अंघोळ घालणे, केस शिकेकाईने धुवून देणे, अंगाला लावायला डाळीचं पीठ. लहान असताना सगळी अंघोळच घालायची आजी नाहीतर मावशी. नंतर जशी मोठी झाले तशी पाठ चोळून द्यायला यायची. न्हाणीघरातली ती आठवण खूपच जवळची आहे. बंबात तापवलेल्या पाण्याचा खरपूस वास, त्यात मिसळलेला शिकेकाईचा आणि साबणाचा वास आणि आजीच्या पाठ घासताना वाजणाऱ्या बांगड्या. "पुरे काय?",आजी विचारायची. "आणखिन पाणी लागलं तर सांग काय, आणि जास्त वेळ बसू नको अंगाला गारठा लागेल." सोहळाच जणू.

बाहेर आले की मोकळे केस सोडून घरभर फिरायला अजिबात परवानगी नसायची. केस वाळले कि तेल लावून वेण्या. "ये डंबा वेणी घालते." मग आजीच्या केसांच्या केसेस चालू व्ह्यायच्या. तिचे केस, तिच्या मुलींचे केस असं करता करता केसातून अगदी नाजूक हात फिरायचा, गुंताही सहज सोडवला जायचा. कुठेही बारीकसा ऊं सुद्धा न होता आणि तिच्याच भाषेत वेण्या आवळल्या जायच्या. तिचे केसही खूप लांब आणि दाट होते असं सांगायची, वेणी घालून खोपा घातला की असा दोन कानांच्याहुनही बाहेर जायचा ह्याचं वर्णन करणारी ती अजूनही मला आठवते.

नंतर मला जेव्हा शिंग फुटली तेव्हा माझ्या केसांची मी स्वत:च वाट लावली- (इति आई) आणि माझे केस गॉन केस झाले. मग कोल्हापूरला जाताना पोनीटेल घालून जायचे आणि तिकडे गेले कि आजी विचारायची "केस कापलेस?" नजर चुकवतच उत्तर जायचं "हो". दोन-तीन दिवस ती पोनीटेलची नाटकं बघितली की मग शाही फर्मान निघायचं, "विजू,(मावशीला उद्देशून) हीच्या पहिल्या वेण्या आवळ बघू." आणि त्या गॉन केस चं पुन्हा केसांत रुपांतर व्हायचं. आजी वेणी घालताना प्रेमाने सांगायची "पुढच्या वेळी येताना केस वाढवून ये काय कापू नकोस, आणि मग तुझ्या आई चे केस. की चालू पुन्हा" मला तेव्हा गंमत वाटायची.

वेणी घालून झाली की कपाळाला गंध लावयचं. मग आजी म्हणायची, "बघू, आता कसं छान दिसतंय बघ. जा आता देवाकडे दिवा लावा आणि रामरक्षा म्हणा." मग देवाकडे दिवा लावायचा. मामा कडचं देवघर अगदी सिनेमातल्या देवघरासारखं. मोठ्ठ. तिथे देवाला दिवा लावायचा आणि मग देवाला कुंकु वाहून घरातल्या सगळ्या बायकांना कुंकु लावायचं. मी आमच्या मांजरीलाही कुंकु लावायचे. तीही बाईच ना. बऱ्याचदा दुसऱ्या दिवशीही मांजरीचं कपाळ लाल असायचं. काहीतरी उद्योग!

आजीनीच रामरक्षा म्हणायला शिकवली. एकावर्षी मी आणि आजीने रामरक्षेचा नेम केलेलाही आठवतोय मला. राम नवमीच्या आधी ८ दिवस आणि रामनवमी दिवशी अशी रोज नऊ वेळा रामरक्षा म्हणायची. आजी स्वस्थ डोळे मिटून बेड वर पडून म्हणायची. कधी कधी नुसतच ऐकायची. मी मात्र पुढे मागे होत होत, कधी आजू बाजूने जाणाऱ्या मांजरांशीच खेळ असं करत म्हणायचे. रामरक्षा पाठ होतीच त्यामुळे अर्थ कळो न कळो तोंड चालू रहायचं.

कोल्हापूरला चैन असली तरी त्या चैनीच्या संकल्पना वेगळ्या असायच्या. घरी अगदी दुभत्या म्हशीचं दूध यायचं ते पण ताजं ताजं त्यामुळे दूधा-तूपाला कमी नसायची ना कधी झाकून ठेवलं जायचं. मोठ्या गंजात ताक केलं जायचं आणि ताक झालं की आजी बोलवायची आणि म्हणायची "हं आ कर, आणि ताकाने थबथबलेला तो पांढरा पांढरा मऊसूत आनंदाचा गोळा पोटात पडायचा, धन्य! "अजून नाही हं आता जेवताना" मग मावशीने केलेल्या गोल भाकरींवर ह्या लोण्याच्या गोळ्यांनी शिक्का मोर्तब व्ह्यायचे आणि आमची बोटे आणि पोटे धन्य व्हायची. म्हणूनच म्हटलं सर्वार्थाने भरलेला हात.

मावशीच्या गोल भाकऱ्या हेही न सुटलेलं कोडं आहे. आमची तर कंपास ने काढलेली वर्तूळं सुद्धा कधी गोल झाली नाहीत. कर्कटक अश्या त्या करंट्या नावाच्या वस्तू कम हत्याराने काढलेली वर्तूळ ही त्या नावाला साजेशीच असायची करंटी. आणि मावशीच्या भाकरी मात्र चंद्रा सारख्या गोल आणि खरपूस. टम्म फुगलेल्या भाकरीवर वितळणारा लोण्याचा गोळा. आणि काय हवं?

आजीच्या हाताखाली चिक्कार शिकायला मिळालं, स्वयंपाक करण्याची भिती तर कोल्हापूरलाच चेपली गेली. पूजा कशी करायची?, रांगोळी काढणे; आजी पाट पुढ्यात घेऊन मला घेऊन बसायची आणि रांगोळी काढायला शिकवायची. चिमटीनं रांगोळी कशी पाडायची, सगळा हात बुचकाळायचा नाही, ठिपका गोल पडायला हवा, रेष बारीक यायला हवी. असं बरच काही. अशा अनेक कलांचा, कामांचा श्रीगणेशा तिकडेच झाला. पोळ्या लाटणे, भाकरी थापणे (हे काही मला अजून जमत नाही), पाट्यावर चटणी वाटणे, उकडीचे मोदक वळणे, पुरण वाटणे, उडिदाच्या पापडाचं पीठ वरवंट्याने कुटणे आणि पुन्हा कुटताना जर तो वरवंटा पाट्यावर आपटला तर त्याची कर निघते आणि ती पिठात लागून कुरकुरीत पापडाबरोबर करकरीत करही तोंडात येते. जात्यावर भरड काढणे, पाखडणे, सडा घालणे, शेणाचे गोळे करणे त्यासाठी आधी शेण उचलून आणणे, कळशीने पाणी भरणे, ताक घुसळणे, टिपण, विणकाम, भरतकाम, उलटा टाका, सुलटा टाका, काजं, बटणं, हुक लावणे, हार करणे, जेवायला पाने वाढणे, दिवाळीला किल्ला करणे, कपडे चोळून धुणे, साडी सुध्दा मी तिकडेच पहिल्यांदा नेसली आणि नऊवारी साडी सुध्दा आजीनेच नेसायला शिकवले. ह्यातलं सगळंच मला येतं असं नाही, तेव्हा आलं असंही नाही पण मी हे सगळं करून बघितलंय हे सांगताना मात्र अभिमान वाटतो.

आजी नेहमी म्हणायची," सासरी तुला करायला नाही लागलं काही तर बरच आहे गं, पण आपल्याला सगळ्या कामाची माहिती हवी, हाताखाली माणसं असली तरी त्यांनी आपल्याला फसवता कामा नये हे एक आणि आपलं त्यांच्यावाचून अडता कामा नये."

आता आता अलिकडे आई बाबा मला घरी ठेऊन क्वचित कधीतरी कामानिमित्त आठवड्याभरासाठी बाहेर जायचे. मी घरी एकटी आहे याची आईपेक्षाही आजीला जास्त काळजी. मामाला फोन करायला सांगायची.

हेही तिचं एक वैशिष्ट्यच ती फोनवर कधीच बोलायला यायची नाही. का ते माहित नाही. मात्र मला कोल्हापूरहून निघताना सांगयची तुझ्या हाताने लिहिलेलं पत्र पाठव. मीही मग बऱ्याचदा लिहायचे पत्र. एकदा कोल्हापूरला गेल्यावर तिने मला मी पाठवलेली सगळी पत्र दाखवली होती. तिच्या गादीखाली तिने जपून ठेवली होती.

तिच्या शेवटच्या चालत्या फिरत्या दिवसात रोज संध्याकाळी तासभर बागेत काम करायची. तिचं ते आवडीचं काम. जे कौतुकाचे, जिव्हाळ्याचे हात आमच्या डोक्यावरनं फिरले तेच त्या वेलींवरनं, झाडांवरनं फिरायचे. सगळी बाग खूष होती. एक वाळकं पान दॄष्टीस पडेल तर शपथ. अंधार पडायला लागला चल आई असं म्हणून म्हणून आत आणावं लागायचं ती मात्र आत यायला तयार नसायची.

आजोबा गेल्यावर मग ती थोडी थकल्यासारखी वाटायची. माझंही मग कोल्हापूरला जाणं कमी झालं वर्षातून १५ एक दिवस राहून यायचं. फोन व्हायचेच त्यात तिची ख्याली खुशाली कळायची एव्हढंच. गळ्यातल्या मंगळसूत्राची जागा आता चेन ने घेतली आणि हातातल्या हिरव्या बांगड्याही नाहीश्या झाल्या. मात्र तरीही दुसऱ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असायच्याच. मामा ऑफिसला मोटरबाईक वरून निघाला की आजी बाहेर अंगणात यायची आणि सांभाळून जा असं सांगत त्याच्या जाण्याच्या वाटेकडे बघत हात जोडून उभी रहायची. मनात तो सुखरूप परतावा ही अपेक्षा!

हेच सगळं आठवत मी निखिल गेलेल्या वाटेकडे पहात उभी होते. त्या ५-१० मिनीटात मन कुठल्याकुठे फिरून आलं, गत काळाच्या आठवणींचा मागोवा घेऊन आलं. आभाळ भरून आलं होतंच पण पाऊस पडणार नाही असं म्हणता म्हणता गालावर काही ओघळलंच. हे व्हायचंच. तिच्या सोबतच्या आठवणी जगता जगता आता तिच एक आठवण झाली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फूल, मस्तं जमलय व्यक्तीचित्रण. आज्जी उभी राहिली डोळ्यांसमोर. <<बंबात तापवलेल्या पाण्याचा खरपूस वास, त्यात मिसळलेला शिकेकाईचा आणि साबणाचा वास आणि आजीच्या पाठ घासताना वाजणाऱ्या बांगड्या. >>
छान ... अगदी माझीच आज्जी अनुभवतेय अस्सं...
मायबोलीवर स्वागत आहे, फुला.... लिहीत रहा.. आवर्जून वाचेन.

सुरेख व्यक्तिचित्रण
कोल्हापुरी बोलीभाषेचा वापर थोडा अधिक केला असता तर अजून बोलकं झालं असतं !

मी आमच्या मांजरीलाही कुंकु लावायचे. तीही बाईच ना. बऱ्याचदा दुसऱ्या दिवशीही मांजरीचं कपाळ लाल असायचं.>>> Proud

डंबा Happy

खूप छान लिहिलंस, ओघवतं! शुभेच्छा!

मस्त.

आमची आजे (आईची आई) अशीच पाठ घासून द्यायची.. सर्व आज्या सेम असतात काय? Happy एक कोपरा हा त्यांच्यासाठी असतोच. तो उघडला हे वाचून.

खुप सुंदर लिखाण.... मी माझ्या कोणत्याच आजीला पहिले नाही. पण आपल्यालाही अशीच आजी असावी असे वाटायला लावणारे लिखाण. माबोवर स्वागत!! पु.ले.शु..

त्या काळातल्या सगळ्या स्त्रिया अशाच रहायच्या. खूप सुंदर लिहिलं आहेस फूल!

मध्यंतरी मंगळसूत्र म्हणजे लग्न झाले म्हणून फक्त एक प्रतिक आहे ते घालायलाचं हवे असे नाही असे समजवून सांगणारी एक फूल आली होती ती तुच का?

Pages