लेखकांसाठी काहीतरी..

jejeuttam1.jpg

दरवर्षी प्रमाणे सिंगापूरमधे ह्या वर्षी देखील गणेशोत्सव साजरा झाला. यंदाचे हे १३ वे वर्षे होते. Global Indian International school नी मंडळाला गणपती बसविण्याकरिता शाळेचीच एक खोली दिली होती. त्याबद्दल GIIS चे आभार.

कित्येक वर्षांपासून तेच तेच कार्यक्रम होतात. लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम म्हणजे मुलांचे हिंदी मराठी गाण्यांवर नाच होतात. ह्यावर्षी मात्र 'मुहुर्त' नावाची मुलांची एक एकांकीका सादर करण्यात आली. मुलांच्या कार्यक्रमाचे निवेदन मुलांनीच करायचे असा इथे पायंडा पडला आहे त्यामुळे नाच गाणी हे कार्यक्रम बघायला आणखी छान वाटते. ह्यावर्षी 'लोककला, लोकनृत्य, लोकसंगीत' ह्यावर आधारीत हिंदी मराठी गाणी निवडण्यात आलीत आणि छोट्या छोट्या मुलामुलींनी अत्यंत समर्थपणे ही जबाबदारी पेलली. शाळा, अभ्यास आणि अनेक प्रकारच्या शिकवणी ह्यातून वेळ काढून तब्बल तीन महिने नित्यनेमाने तालमीला वेगवेगळ्या ठिकाणी हजर राहून आपले नृत्य पक्के करायला ही मुले कुठेच कमी पडले नाही.

संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ह्या मान्यवर कलाकारांचा 'आयुष्यावर बोलू काही.. ' ह्या कविता आणि गाणी ह्यांच्यावर आधारीत एक कार्यक्रम झाला.

रामशास्त्री, नेताजी पालकर, अयोद्येचा राजा, कुन्कू, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे सर्व चित्रपट म्हणजे प्रभात फिल्मची उत्तम कलाकृती. श्रीयुत ऐ. व्ही. दामले ह्यांनी प्रभात फिल्म्स वर एक Documentary निर्माण केली. तीही गणेशोत्स्वाच्या ६व्या दिवशी दाखविण्यात आली.

गणेशोत्वाची सुरवात अथर्वशीषाच्या सहस्त्रवर्तनाने झाली. शाळेतील सगळे वातावरण कसे टाळ घंटी आण टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमले होते आणि सभोवतालाचा परिसर चैतन्यमन झाला होता.

काहीतरी वेगळे करायचे म्हणून मराठी साहित्यावर आधारीत 'गद्य वाचनाचा' कार्यक्रम करण्यात आला. ह्याला एकून १३ वाचक लाभलेत. ह्यात शांता शेळके, इरावती कर्व, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, पु. ल. देशपांडे, मारूती चितमपल्ली, दमा मिरासदार, व. पु. काळे, वसंत कानेटकर, गदिमा आदी लेखकांच्या उत्तम साहित्यकृतींचे वाचन करण्यात आले. वाचनाची योग्य अशी तालिम करून, निवेदनात्मक रितीने हा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे नविन काहीतरी म्हणून केलेला हा कार्यक्रम एक उत्तम कार्यक्रम ठरला. वर ह्याच कार्यक्रमाचे एक छायाचित्र टिपले आहे.

तर असा होता सिंगापूर महाराष्ट्र मंडळातील गणेशोत्सव...

- बी