देवाला पत्र

आमचाकडे मागच्या वर्षी गणपती होता, पण यावेळेला तो इकडे आलेलाच नाही. जयकडचा गणपती आज जाणार आहे म्हणून मी त्याच्यासोबत हे पत्र पाठवणार आहे. आई म्हणते, की गणपती त्याच्या बाबाकडे जाईल. त्याचे बाबा दूर हिमालयावर आहेत. माझे बाबा पण तिथेच असतील, म्हणून हे पत्र लिहितोय.
प्लीज गणपतीबाप्पा..
माझ्या बाबाना थोड्या दिवसासाठी तरी परत पाठवून दे. आई सारखी रडत असते. ती म्हणते की बाबा आता कधीच परत येणार नाहीत. पण मला खरं वाटत नाही. माझे बाबा आर्मीमधे आहेत, ते खूप ब्रेव्ह आहेत. खूप सार्‍या लोकाना ते सपासप मारू शकतात. माझ्या क्लासमधला आरुष म्हणतो, कि फिल्ममधली मारामारी खोटी असते, पण माझे बाबा त्याच्यापेक्षा भारी मारामारी करू शकतात. त्याच्याकडे मोठी आणि छोटी बंदूक आहे. ते मागच्यावेळेला सुट्टीत आले होते तेव्हा त्यानी मला ते दुष्मनलोकाना कसं मारतात ते करून दाखवलं होतं. वाव.. मीपण आर्मीतच जाणार आहे. मला पण असंच मोठं व्हायचं आहे. पण मी असं म्हटलं की आई मला ओरडते. म्हणते की खूप अभ्यास कर, इंजिनीअर हो आणि काकासारखा अमेरिकेला जा.

मी नाही जाणार माझ्या आईला सोडून असं मी म्हटलं की आई रडते. कधी कधी असं का वागते मला कळतच नाही. बाप्पा, माझी एक लहान बहीण पण आहे. ती आता खूप छोटी आहे. ती फक्त रडते. तिला बोलता येत नाही. चालत पण नाही. आई म्हणते की ती फक्त बाळ आहे म्हणून ती अशी आहे. पण मला माहीत आहे, माझे बाबा आले की ते तिला बरोबर शिकवतील. मला पण सायकल नीट येत नव्हती. बाबा आले होते तेव्हाच त्यानी शिकवली. बाप्पा, बाबाना नक्की सांग हा निरोप.

आई मला म्हणते की मीच आता सावीचा हे माझ्या बहीणीच नाव आहे, बाबा आहे. पण मला कळत नाही हे कसे शक्य आहे? मीतर अजून किती लहान आहे. मीच अजून स्कूलमधे आहे, , मग मी माझ्या बाबाचे काम कसे करू?

थोडया दिवसापूर्वी माझ्या बाबाच्या ऑफिसमधून काही लोक आले होते. त्यानी एका मोठ्या बॉक्सअमधून काहीतरी आणले होते. त्याला तिरंगा पण घातला होता.

आई ते बघितलं कि सावीसारखीच रडायला लागली होती. अमर अमर.. हे माझ्या बाबाचे नाव आहे. असं ओरडत होती. काका काकू आणि आजी पण अमेरिकेहून आले होते. ते पण सगळे रडत होते. मला काका म्हणाला, हे बघ तुझे बाबा, पण तिथे बाबा कुठेच नव्हते. ती बॉक्समधे एका कपड्यात काहीतरी होते. काय होतं ते मला समजलंच नाही. माझे बाबा मात्र नक्कीच नव्हते. माझे बाबा अगदी माझ्यासारखे दिसतात. ते तिथे आलेलेच नव्हते. तरीपण बाबा तिथे होते असं आई म्हणाली.
मग मी खूप सार्‍या पूजा केल्या. तिथे मी त्या कपड्याना आग पण लावली. काका खूपच रडत होता. त्याला रडताना बघून मला पण रडू आलं.

प्लीज बाप्पा, माझ्या बाबाना हे सगळं जरूर सांग विसरू नको. मला आईची फार काळजी वाटते. ती जेवत पण नाही. मी जेवलो नाही कि मला भरवते, पण स्वतः काहीच खात नाही.
आधी सारखी छान साडी पण नेसत नाही. तो लाल कलरचा माझा फेवरेट ड्रेस पण घालत नाही. मला म्हणते कि आता तो जुना झाला म्हणुन घालत नाही.
माझ्या बाबाना येताना आईला अजून कपडे आणायला सांगा. माझ्याकडे खूप आहेत मला नको. सावीला पण घेऊन या. ती तिचे कपडे खूप घाण करते. लहान आहे अजून ती ना म्हणून.

माझ्याकडे खेळणी आहेत. मला आता अजिबात नको. आई मला व्हिडीओ गेम खेळू देत नाही, माझ्या सर्व बंदुकापण तिने फेकून दिल्या. प्लीज बाबाना त्याच्या बंदुका घेऊन यायला सांगा हा..

आणि माझ्या बाबाना सांगा की मी आईला अजिबात त्रास देत नाही. ती सांगेल ते सर्व ऐकतो. मस्ती करत नाही. शाळेत अभ्यास करतो. बाईचे सर्व ऐकतो. कुणालापण मी त्रास देत नाही. मला तो गूड बॉयचा स्टारपण मिळाला होता. आता परत पण मिळणार आहे.

मी सावीला पण त्रास देत नाही. तिला चिमटे पण काढत नाही. मी तिला सेरेलेक भरवायला पण शिकलो. बाबा लवकर इकडे आले की मग बाबा तिला अजून शिकवतील. ते मला स्विमिंगपण शिकवतील.

आठवणीने सांग हा...

माझे नाव अजित आहे. अजितचे बाबा म्हणून विचारलं स की पटकन सापडतील माझे बाबा. माझे प्रिन्सिपल म्हणतात की ते लाखात एक आहेत म्हणून तू असेच विचार, तुझे कन्फ्युजन होणार नाही
चल बाय आता, पुढच्या वर्षी लवकर ये. आणि त्याच्या आधी माझ्या बाबाना पाठवून दे.

गणपती बाप्पा मोरया.


नंदिनी, निबंध वाचून वाटतंय की साधारण दुसरी तिसरीतल्या मुलाने हे लिहीलं असेल .. फार फार तर चौथी पाचवीतल्या .. कल्पना चांगली आहे पण एव्हढ्या लहान मुलांच्या हातून अंत्यसंस्कार करत नाहित गं .. आणि मुलाचे काकाही उपस्थित होते तेव्हा तर हे काहि रुचत नाहि ..

बाकी कल्पना छान आहे ..



लहान मुलगा इतके 'पत्र' लिहू शकेल का अशी बारीक शंका आली, मग मनातले विचार असे म्हणून वाचले. अगदी सुंदर जमले आहे.
बाबांना सगळे जमते हा विश्वास केव्हढा!



नंदिनी, पत्र आवडले... त्याला जे दिसते, जे वाटते ते लिहिले आहे... कुठेही अभिनिवेष जाणवला नाही... त्यामुळेच भिडणारे झाले आहे... quite poignant.

Perhaps I'm old and tired, but I always think the chances of finding out what really is going on are so absurdly remote that the only thing to do is to say "Hang the sense of it" and just keep yourself occupied.



खरंच खुप छान लिहिलं आहे.....मुलाचा निरागसपणा ओसंडुन वाहतो ....