अंगोला एक झलक- भाग ४

Submitted by जाह्नवीके on 25 October, 2012 - 07:42

या छोट्याश्या घराचे मालक आणि त्यांची पत्नी ओरासिओ आणि इलियाना (वय वर्षे ५६ आणि ४७)...त्यांना सहा मुलं......सगळ्यात मोठी मुलगी इसाबेल (३२ वर्षे) तिच्या नवर्याबरोबर राहते. तिला तीन मुलं आहेत. मनुवेल, मारिया आणि सादी...वय वर्षे अनुक्रमे ७, ४ आणि १...इसाबेल घरात तयार केलेला ब्रेड रस्त्यावरच्या बाजारात विकते आणि तिचा नवरा अगुस्त हा घरातल्याच शेतात कॉफी आणि कसावा चे पीक घेतो. जेव्हा इसाबेल आणि अगुस्त पहिल्यांदा भेटले आणि त्यांनी बरोबर राहायचा निर्णय घेतला तेव्हा अगुस्त फोटोग्राफर म्हणून काम करत असे. पण मधल्या अस्थैर्याच्या काळात त्याला पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले कारण त्यांच्या मते ज्याच्याकडे कॅमेरा आहे तो गुप्तहेर असला पाहिजे आणि अंगोला सरकारच्या विरोधात काही काम करत असला पाहिजे. तुरुंगात असताना अगुस्तने पोलिसांचा खूप मार खाल्ला....नंतर सुटून आल्यावर मात्र ओरासिओ यांनी आपला मुलगा आणि त्याची बायको (?) यांना सुरक्षिततेच्या कारणावरून घरातच राहायला परवानगी दिली. त्यांची मुलं मनुवेल आणि मारिया शाळेत जातात.
इसाबेल नंतरच्या दोन मुली आपापल्या मुलांना घेऊन वडिलांच्या घरीच राहतात. त्यांचे नवरे त्यांच्या बरोबर राहत नाहीत. त्या दोघी घरात तयार केलेले ब्रेड घराबाहेरच असलेल्या छोट्या दुकानात विकतात. यात त्यांना त्यांची सगळ्यात छोटी बहिण पॉला मदत करते. ही १९ वर्षांची आहे. ती सध्या एका लुईस नावाच्या पोलिसाच्या प्रेमात आहे आणि तिने नुकताच एका मुलाला जन्म दिलाय. हा युक्लीडस डिकास्टा कुटुंबातला सगळ्यात लहान सदस्य आहे. अ‍ॅना आणि एमिली नंतरची बहीण नताशा सुद्धा तिच्या मुलांबरोबरच राहते. तिला ४ मुलं आहेत. जॉन, पेद्रू, टोनी आणि एलीडीयो...वय वर्षे अनुक्रमे १२, १०, ७ आणि ४.....नताशा घाउक विक्रेत्यांकडून घेतलेल्या वस्तू रस्त्यावरच्या बाजारात विकते...आणि स्वतःचा आणि मुलांचा खर्च भागवते.
ओरासिओ यांचा सगळ्यात मोठा मुलगा झेका हा त्याच्या दोन बायकांसोबत राहतो. तो सुरक्षारक्षक आहे आणि त्याच्या बायका इथल्या इतर बायकांप्रमाणे बाजारात फळं किंवा तत्सम वस्तू विकून घरखर्चाला हातभार लावतात. त्यांची मुलंही शाळेत जाण्याएवढी मोठी आहेत. पहिल्या बायकोला-संद्राला ओलीम्पियो आणि जोझे ही ४ आणि २ वर्षांची मुलं तर दुसर्या बायकोला अ‍ॅन्जेलिनाला विल्यम हा एक मुलगा...झेका पेक्षा लहान मुलगा मारियो हा गाड्या धुवायचे काम करतो. हे काम इथे खूपच मोठ्या प्रमाणात केले जाते. तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळी जर खिडकीतून खाली डोकावून पाहिलेत तर किमान ४ जण गाड्या धुताना दिसतात. शनिवार आणि रविवार हे तर खूपच मोक्याचे दिवस असतात.
सर्वसाधारण पणे कोणत्याही अंगोलन कुटुंबाची चरितार्थाची हीच पद्धत....हे कुटुंब आपण मध्यमवर्गीय म्हणू शकतो कारण या कुटुंबातली सगळी मुलं शाळेत जातात. जुने असले तरी अंगभर घालायला यांच्याकडे कपडे आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की घरातला प्रत्येक जण पैसे मिळवत असल्याने ही परिस्थिती शक्य आहे. या चांगल्या परिस्थितीत दोन वेळ जेवणापलीकडे मात्र काहीही येत नाही. कुठल्याही प्रकारची चैन याही कुटुंबाला परवडण्यासारखी नाही. कारण यांच्या जेवणात कधीही मांस नसते कारण ते विकत घेउन खाण्याची ऐपत नाही. जर एखाद्या दिवशी मांस असेल तर ते कुणीतरी स्वतः पाळलेले आणि मोठे केलेले एखादे बदक किंवा कोंबडी असते.....बियर किन्वा वाईन ही सुद्धा कोणी दिलेली असली तरच! अंगोलन कुटुंबातले पुरुष साधारण पणे त्यांच्या बायकांची काळजी घेत नाहीत. तर त्यांनी मिळवलेले पैसे ते घराबाहेर जास्त खर्च करताना दिसून येतात...
असं म्हणतात की इथली अर्थव्यवस्था ही जशी विक्री-खरेदी वर आधारीत आहे तशीच ती बर्याच प्रमाणात इथल्या स्त्रियांवर आधारित आहे. कारण इथे रस्त्यांवर वस्तू किंवा खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांमध्ये स्त्रिया जवळ पास ७५ टक्क्यांहून जास्त आहेत. कारण इथे खाद्यपदार्थ पुरुष विकत नाहीत. याला कारण काही असावं असं वाटत नाही पण दिसत नाहीत हे नक्की...पुरुष माणसं जास्ती करून स्पेअर पार्टस, घरगुती वापराच्या हॅन्गर, क्लॉथ स्टॅन्ड यासारख्या वस्तू विकतात. ही "इन्फॉर्मल" अर्थव्यवस्था प्रगती करू शकत नाही कारण या प्रगती साठी काही ठोस उपाय योजलेले दिसत नाहीत. एका सर्व्हे नुसार महागाई मुळे किमतींमध्ये झालेली वाढ हीच काय ती इथल्या उत्पन्नातली वाढ आहे. पण आपला धंदा वाढवण्यासाठी काही उपाय ह्या विक्रेत्यांकडे नाहीत. काही वर्षांपूर्वी इथल्या विक्रेत्या बायकांनी बचत गटासारखी एक संकल्पना राबवली होती पण वाढत्या महागाईच्या दरामुळे हे बचत गट चालणेही अशक्य झाले...
पण तरीही इथे अनेक विकासाची काम होतानाही दिसतायत.....इथल्या काही हातावर मोजण्याएवढ्या सुशिक्षित लोकांमुळे आहे ती परिस्थिती झपाट्याने बदलत्ये...काही वर्षात इथली लोकं, त्यांचे विचार, बदललेले दिसतील हे नक्कीच..
असो....हे माझे आत्तापार्यान्ताचे अंगोला बद्दलचे ज्ञान...अनेक चौकशान्मधून, नवर्याच डोकं खाऊन, आणि इकडे तिकडे बघून मिळवलेले....तुम्ही दिलेल्या प्रतिसादांनी मला लिहिते केले....नाहीतर नुसतेच इथे राहून कंटाळून परत गेले असते.....आणि काहीतरी राहिले खरे....ची रुखरुख लागून राहिली असती....धन्यवाद! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवी, किती सहजपणे या स्त्रिया परिस्थिती स्वीकारतात ना ? एवढे कष्ट करुनही, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. खुप वर्षे बघतोय हे वास्तव.

धन्यवाद माधवी_नयनीश....... Happy
दिनेशदा....
मला वाटतं परिस्थिती स्वीकारायला दुसरी पर्यायी परिस्थिती नसावीच त्यांच्यासमोर......
त्यामुळे आहे त्यात नाईलाजाने स्वीकारण्यासारख काही आहे अस वाटतच नसाव.....!!

इथे दारावर येणार्‍या ९९ टक्के विक्रेत्या स्त्रियाच आहेत. त्यात भाजीपाल्यापासून, मेकपचे सामान, शांपू, टुथपेस्ट, नॅपीज पासून वाट्टेल ते असते. आईस्क्रीम विकायला एक पुरुष येतो, तेवढाच अपवाद. दुकाने मात्र पुरुष चालवतात.

आमच्या कंपनीत मात्र अनेक जणी काम करतात. त्यापैकी काही, पोर्तूगाल मधे शिकलेल्या आहेत. ( यादवी काळात त्यांचे आईवडील देश सोडून गेले होते, पण आता परत आलेत.) त्यांचे पगारही बर्‍यापैकी आहेत.

गेल्या महिन्यातल्या निवडणुकाही शांततेनेच पार पडल्या.

दिनेशदा,

हो हो...निवडणुका शांततेतच पार पडल्या..
या काळात काहीही होऊ शकतं असा सांगितल्याने आम्ही दोघा महिनाभर सिंगापूर ला गेलो होतो......
तेवढीच इथून सुटका.. Proud

चिमण, पुरुष नाही ठेवत, बायकाच ठेवतात त्याला, आणि पोसतातही.....
(यंदा कर्तव्य आहे का ? बोलणी करायला मी आहे हो, इथे !)

>> बोलणी करायला मी आहे हो, इथे !
बोलणी करायला तू ढीग असशील रे! नंतर तिची बोलणी खाणार पण आहेस का?

ती पोर्तूजीजमधे बोलणार, आपल्याला कुठे कळणारै ?

प्राथमिक बोलणी / घासाघीस मी करु शकतो, खाणाखुणा करून !

छान लिहिताय ! पण एवढ्यातच थांबवलं का ? 'क्रमशः' हा शब्द वाचताना बरं वाटतं की अजून वाचायला मिळणार आहे. Uhoh

अरे थांबवलात का?? मस्त चाललेली की लेखमालिका... अजुन काही लिहा ना. .त्यांचे सण , शिक्षण, वगैरे वर....