फक्त आणि फक्त श्रीदेवी — इंग्लिsh विंग्लिsh

Submitted by जिप्सी on 6 October, 2012 - 15:09

सदमा, चांदनी, लम्हे, चालबाज या आणि अशा कित्येक चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची नंबर वन नायिका श्रीदेवी. बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अंदाजे एक तप चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिल्यानंतर तीने "इंग्लिsh विंग्लिsh" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाचे प्रोमोज पहिल्यांदा पाहिल्यानंतरच खास चित्रपटातगृहात जाऊन बघण्याचा निर्णय केला होता. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रीलीजच्या दुसर्‍याच दिवशी पाहुन आलो हा चित्रपट आणि तो पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच. Happy

हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या पुण्यात राहणार्‍या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. नवरा (आदिल हुसैन), मुलगा सागर, मुलगी सपना आणि सासुसोबत तिचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला असतो. नवरा चांगल्या पदावर कामाला, मुले चांगल्या शाळेत शिकायला, लग्न, उत्सव प्रसंगी मोतीचूराचे लाडु बनवण्याचा तिचा व्यवसाय असं सारं काही व्यवस्थित असुनही एक गोष्ट शशीला खटकंत असते ते म्हणजे तिला इंग्रजी बोलता न येणं. यावरून तिला स्वतःच्याच घरी बर्‍याच वेळा अपमानित व्हाव लागत असे. छोट्या छोट्या प्रसंगातुन इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारा तिचा कोंडमारा तिचा यात दाखवला गेलाय. अगदी मुलीच्या शाळेतला प्रसंग असो किंवा "आप मेरी पढाई लोगी? आपको अंग्रेजी पडना आता है?" या मुलीच्या बोलण्यातुन मिळणारे शालजोडीतले यातुन फक्त इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारी घुसमट दाखवली. नवरा आणि मुलीच्या इंग्रजी बोलण्यामुळे आणि ते न समजल्याने ती त्यांच्या बाहेरच्या जगात कुठेही फिट नसते. तिचं एकच मागणं असतं कि प्रेम तर कुटुंबातुन मिळतंय पण पाहिजे ती फक्त थोडी आपुलकी.

अशावेळी अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा एक प्रसंग घडतो आणि सुरूवात होते ती तिच्या एका नव्या प्रवासाची. तिला तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्युयॉर्कला जावे लागते. सुरुवातीला तिला काही कारणास्तव एकटीलाचा सर्वांच्या आधी अमेरीकेत जावे लागते. तिचा हा पहिलाच विमानप्रवास. यावेळी व्हिसा काढण्याच्या प्रसंगापासुन इमिग्रेशन पर्यंत केवळ इंग्रजी न बोलता येत असल्याने शशीची होणारी तारांबळ, विमानप्रवासात तिला भेटणारा, अगदी न्युयॉर्कपर्यंत तिची मदत करणारा आणि "इन गोरे लोगोंसे डरना छोड दो और इन्हे तुमसे डरने दो" आणि विमान प्रवासाचा पहिला अनुभव "पहला experience है तो उसे अच्छी तरह से एन्जॉय करो, क्यो कि ये फिरसे नही आयेगा" असा मोलाचा सल्लाही देणारा "तो" हे सगळे प्रसंग मनाची पकड घेतात.

पुढे शशी जेंव्हा अमेरीकेत येते तेंव्हा तिच्यासोबत अशा काही घटना घडतात कि ती कुणाच्याही नकळत चार आठवड्यात इंग्रजी शिकवण्याच्या क्लासेसला जाते. इथे तिच्यासारखेच स्पेन, फ्रान्स, पाकिस्तान, चीन अशा इतर देशातुन इंग्रजी शिकण्यासाठी आलेले मित्र भेटतात. यातील क्लासमधल्या गमती बघताना हा चित्रपट पूर्वीची जुनी टिव्ही मालिका "जबान संभालके" च्या दिशेने जातोय कि काय असं काही क्षण वाटत. इथुनच मग पुढे सुरू होतो तो शशीचा अस्खलित इंग्रजी बोलण्याचा प्रवास.

संपूर्ण चित्रपट कुठेही इंग्रजी भाषेला अति महत्व देणारी एखादी डॉक्युमेंटरी न वाटता सहज आपल्या आजुबाजुला घडत असलेली एखादी गोष्ट वाटते आणि याचे श्रेय जाते ते कथा/पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन करणार्‍या गौरी शिंदेला. हा संपूर्ण चित्रपट शशी म्हणजेच श्रीदेवी भोवती फिरतो. तरीही सुलभा देशपांडे, आदिल हुसैन, मेहदी नेबु, या कलाकारांनी आपआपल्या भुमिकेत छाप पाडली आहे. दोन्ही छोट्या मुलांचे कामही झक्कास आहे. श्रीदेवीच्या अभिनयाबाबत तर मी पामर काय बोलणार Happy मुलीच्या बोलण्याने उदास होणारी प्रसंगी चिडणारी आई, रेस्टॉरन्टच्या त्या प्रसंगाने भेदरलेली भारतीय स्त्री, मुलाच्या हट्टापायी केलेला मायकल जॅक्सनचा थोडासा डान्स, नवर्‍याने कौतुक करावे यासाठी आसुसलेली बायको, सासुची काळजी घेणारी सुन, न्युयॉर्कमधे साकारलेली विद्यार्थीनी, इंग्रजी क्लासमधला युवक तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी बोलतो तेंव्हाचा तो प्रसंग इत्यादी सारं काही श्रीदेवीने आपल्या सहज सुंदर अभिनयातुन साकार केलंय.

या चित्रपटाचे संगीतही श्रवणीय आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सहजच ओठावर रेंगाळतात. विशेषतः
"नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं"
बदला नजारा, गुस्ताख दिल आणि Manhattan हि गाणीही मस्त आहेत,

"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.

कलाकार : श्रीदेवी, अदील हुसैन, सुलभा देशपांडे, मेहदी नेबू, प्रिया आनंद
दिग्दर्शन/कथा/पटकथा/संवाद : गौरी शिंदे
निर्माता : सुनील लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर बाल्की
संगीत : अमीत त्रिवेदी
गीत : स्वानंद किरकीरे

तटि: चित्रपट रीव्ह्यु लिहिण्याचा जास्त अनुभव नाही (देऊळ सोडला तर) पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच हा प्रयत्न. Happy

वरील सर्व प्रचि आंतरजालाहुन साभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलाय रिव्हू. आताच्या हिदीं मूव्ही मधे मजा नसते. पण तुझ्या रिव्हू मुळे बघावासा वाटतोय. बघतोच हा मूव्ही.

श्रीदेवी साउथ असते. नवरा गोडबोले. लव म्यारेज. बच्चन बुढा झाला, तेंव्हा त्याच्यासाठी खास तसे रोल लिहिले जाऊ लागले. तसे श्रीदेवी आणि नेने यांच्यासाठीही असे स्पेशल रोल लिहिले जावोत या शुभेच्छा.. नाहीतर कुठल्या तरी रिअ‍ॅलिटी शोत या परिक्षक म्हणून झिजत बसतील. ती फुलराणीचा षिनेमा अवतार आहे. बघित्लाच पाहिजे.

श्रीदेवीचे या सिनेमातले फोटो पाहून परत एकदा तिच्या प्रेमात पडले आहे. सिनेमा सुंदर असणारच..पण केवळ तिचं भाबडं सुंदर रुप पहायलादेखिल हा सिनेमा पहायचा आहे मला Happy

योगेश, मस्त रिव्ह्यू Happy मलाही मध्येच "जबान सम्हालके"ची आठवण झाली तुझा लेख वाचताना.. तेवढ्यात पुढचं वाक्य वाचलं.

अरे वा तुझा नंबर लागला.............. Wink
.
.
.
.
श्रीदेवी साठी खास बघायचा आहे....

गौरी शिंदेचा आहे म्हणून बघावासा वाटतो पण इतका वेळ श्रीदेवीला सहन करणं जमणार नाही. श्रीदेवी जामच डोक्यात जाते - पहिल्यापासूनच. Happy

:श्रीदेवी फॅक्लला घाबरून धूम ठोकणारी बाहुली:

मी कालच बघितला . खूप छान आहे सिनेमा . विशेष म्हणजे एका मराठी मुलीने संवाद लेखन आणि दिग्दर्शन हीं केले आहे. हिंदी सिनेमात एका मराठी मुलीची सुरवात फारच आश्वासक झाली आहे तेह्वा तीच कौतुक करायला आपण थियेटर मध्ये जायलाच पाहिजे Happy

मामी एवढा प्रिजुडिस बरा नव्हे. नटातून काय काढून घ्यायचे हे दिग्दर्शकाला माहीत असेल तर एरव्ही डोक्यात जाणार्‍या मंडलींनाही पसन्तिची दाद द्यावी लागते. उदा: ओंकारामधाला सैफ. गुलजारने अचानक साठी विनोद खन्नाला आणि परिचयसाठी जीतेंद्रला घेतल्यावर सगळ्यांच्याच भृकुट्या वक्र होऊन मोडायला आल्या.आज दोन्हीही बॉलीवूडमधले क्लासिक समजले जातात. माझ्या सारखा कट्टर राजेश खन्नाच्या द्वेष्ट्याने ही आनन्दमध्ये मान तुकवली. असे परमनन्ट प्रिजुडिस बाळगून आपणच आनदाला मुकतो...

बाळू जोशी बरोबर आहे तुमच . पण श्री देवीचा बोलण बर्यापैकी नाटकी वाटत हेही तितकच खर .
अभिनय चांगला आहेच. पण बोलण पण सहज पाहिजे.
संवाद फेकीमध्ये विनाकारण लाडिकपणा असतो अस मलाही वाटत .पण त्याकरता उत्तम सिनेमा मात्र चुकवू नये Happy

श्रीदेवीचा असा रोल असलेल्या पिक्चरचे खरे नाव 'हिन्दी-विन्दी' असायला हवे, कारण पूर्वी तिला हिन्दीलाच दुसर्‍या कोणाचेतरी डबिंग लागे Happy

पण श्रीदेवीचे ग्लॅमर, लोकप्रियता व त्या रोल्सना लागणारी चपखल अभिनयक्षमता - आणि अर्थात 'किलर' लुक्स- याचे एकत्र कॉम्बिनेशन नंतर माधुरी सोडल्यास कोणाचेही नाही.

मामी, चनस, साती Proud

बिजली गिराने वो है आई..... Happy She is back with Bang!!!!

मायबोलीकर रसप यांनी इथे खुप छान Review लिहिला आहे.

मी लिहिण्याचा थोडासा प्रयत्न केला तो फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच Proud

मस्त आहे सिनेमा.....
आई, बायकोला गृहीत धरणार्‍या मंडळींना हलका चिमटा आहे.... लेखन, दिग्दर्शन तर आहेच छान पण पात्रयोजना पण अप्रतिम आहे.... बर्‍याच लोकांच्या मते श्रीदेवीच्या नवर्‍याच्या रोलमध्ये एखादा चांगला चेहरा घ्यायला पहिजे होता पण मला जो आहे तो परफेक्ट वाटला.... एक टिपीकल नवरा म्हणून शोभलाय तो!.......एक न एक कॅरेक्टर लक्षात राहते Happy

फार मस्त लिहिले आहे...

>>"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.<<

वेल सेड !

जिप्सीला मी फक्त "कॅमेर्‍याची भाषा" बोलताना/लिहिताना पाहिले आहे पण आज श्रीदेवीच्या निमित्ताने का होईना त्याच्याकडून एका सुंदर लेखाची मेजवानी मिळाली असेच म्हणतो. या चित्रपटाबद्दल [तो प्रदर्शित होण्यापूर्वी] काही मते वाचायला मिळाली होती आणि ज्याअर्थी तब्बल एका तपानंतर श्रीदेवीसारखी एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री ही भूमिका स्वीकारते म्हणजे नक्कीच कथानकात 'हटके' इलेमेन्ट असणार हे पक्के मत झाले होतेच. आज जिप्सी यानी ते सिद्ध करून दाखविले आहे.

अशा म्हटल्या तर खट्याळ अवखळ भूमिका करण्यात श्री देवी कायम आघाडीवर राहिली आहे, या चित्रपटाच्या कथानकाचे अंगही काही त्याच धर्तीचे असल्याने तिलाच या प्रमुख भूमिकेत घेण्याचा निर्माता दिग्दर्शकांचा उद्देश्य सफल झाला आहे असेच म्हटले पाहिजे.

मस्त रे जिप्स्या...
या एका लेखासाठी तूला सगळे (आतापर्यंत अजिबात न केलेले) गुन्हे माफ ! मी श्रीचा डाय हार्ड फॅन आहे, कुणाला काहीही वाटो. आजच जातोय बघायला............

जिप्स्याने चक्क फिल्म चा रिव्यु लिहिलाय्..वॉव.. म्हणून इकडे वाचायला आले..
श्रीदेवी ने खरंच धमाल अभिनय केलेला दिसतोय.. नक्की पाहणार.. Happy
अदरवाईज..विकु ला काहीही वाटो पण Wink .. मला श्रीदेवी चा अभिनय अती नाटकीय/ कृत्रिम (हिस्ट्रियॉनिक) वाटत आलाय नेहमीच ..

Pages